|| संजय मोने

ही गोष्ट माझ्या मराठी मित्राने सांगितली. कोणाचाही मराठी मित्र अशी गोष्ट सांगू शकतो. सुमारे पंचवीस ते तीस वर्षांचा कालखंड या गोष्टीत आपल्याला दिसतो. महाराष्ट्रात कुठेही ही घडू शकते. खरं तर घडलेली आहे..

‘रूपजी देवराज’ नावाचा एक माणूस कोकणात एका शहरात मालवाहतूक करणाऱ्या वाहनाबरोबर मदतनीस म्हणून आला होता, सुमारे तीस वर्षांपूर्वी. महाराष्ट्राबाहेर त्याचा फक्त गरिबीचा शाप असलेला संसार होता. गाव त्याचं रखरखीत. उन्हाळा आणि कमी उन्हाळा हे दोनच ऋतू. पहिल्यांदाच कोकणात येत होता तो. उन्हाळ्यातसुद्धा कोकण आपली झाडी थोडीबहुत टिकवून असतं. कोकणातलं रुचकर पाणी आणि आजूबाजूचा परिसर त्याला फार आवडला. सगळं सामान उतरवून झाल्यावर परत आपल्या देशाकडे निघायचं होतं. मात्र अचानक त्याला चार दिवसांनी तिथूनच दुसरं सामान घेऊन निघायची ऑर्डर मिळाली. कंपनीच्या माणसाने त्याला तिथेच थांबायला सांगितलं. जेवणखाणं आणि इतर खर्चाला चार पैसे आणि एक छोटी खोली राहायला दिली. रिकामा वेळ होता म्हणून त्याने आजूबाजूच्या गावात एसटीने फिरून जिवाची चैन करायची ठरवली. तिथल्याच जवळच्या गावी तो उतरला. ते माझ्या मित्राचं गाव, ज्याची आणि त्या रूपजी देवराजची ही गोष्ट आहे.

तर.. रूपजी सकाळी गावात उतरला. साडेसात-आठ वाजता. तिथलं महालक्ष्मीचं देऊळ बघण्यासारखं आहे, असं त्याला निघताना एक जण म्हणाला होता. गाव तसं लहानच होतं. एक शाळा, सरकारी इस्पितळ होतं म्हणून जरा महत्त्व होतं गावाला. बाजारपेठ होती. बाजारपेठ म्हणायलाच; चार दुकानं, अन् चार बांबूंच्या वर झापा टाकून एक हॉटेल होतं. ‘नवदुर्गा हॉटेल’ असा त्याचा फलक एका क्षीण दोरखंडाच्या आधाराने लटकत होता. त्याला लागूनच एक एसटीचा थांबा होता. कोकण असल्यामुळे एक दशावताराची जाहिरात लटकत होती. तिने आधीच्या एका सुपरहिट सिनेमाची जाहिरात झाकून टाकली होती. एक मोठा सिनेस्टार जणू काही तिथे येऊन केस कापतो असा भ्रम निर्माण करणारं एक केशकर्तनालय होतं, त्याला ‘हजामत केंद्र’ असं सत्याच्या अगदी जवळ जाणारं नाव होतं! एकच मोठं म्हणावं असं दुकान होतं- ‘कदलेकर सन्स’ असं नाव असलेलं, तेही बंद होतं. त्यावर दुकान उघडण्याची वेळ ऐटीत लिहिली होती- ‘साडेदहा ते साडेसहा’ आणि खाली ‘दुपारी जेवणाची सुट्टी दोन तास’ असंही लिहिलेलं होतं.

रूपजी जेव्हा उतरला तेव्हा हा सगळा भाग शांत होता, कारण एकूणएक दुकानं बंद होती. रूपजीबरोबर उतरलेले काही लोक आपापल्या वाटेने निघून गेले आणि तो एकटाच उरला. एसटी अध्र्या तासाने परतीच्या प्रवासाला निघणार होती. त्यासाठी काही लोक जमा झाले होते. उतरल्यावर रूपजीने चहासाठी आजूबाजूला मान फिरवली. तल्लफ भागण्याची काहीच सोय नव्हती. शेवटी एसटीच्या ड्रायव्हरकडून थोडं पाणी पिऊन तो महालक्ष्मीच्या देवळाकडे चालू लागला. तसा तो काही देव देव करणारा नव्हता, पण गरिबीने त्याला परमेश्वरावर विश्वास ठेवायला भाग पाडलं होतं. देवळात गेल्यावर मूर्ती पाहून त्याने हात जोडले आणि या गरिबीतून बाहेर काढून सुखाचा संसार व्हावा यासाठी प्रार्थना केली. थोडा वेळ तिथेच बसावं आणि पुढच्या गावाकडे निघावं असं त्याने ठरवलं. बसल्या बसल्या तिथल्या गारव्यामुळे त्याचा डोळा लागला. जाग आली तेव्हा तास-दीडतास उलटून गेला होता. बाहेर आल्यावर पाहिलं, तर बाजारपेठेला हळूहळू जाग येऊ  लागली होती. म्हणजे दुकानं उघडली नव्हती, तर त्यांचे नोकर येऊन गप्पा छाटत बसले होते. देवळाच्या बाजूच्या घरात तो पुन्हा एकदा पाणी प्याला. घरात शहाळी उतरवून घेतली होती, त्याचा ढीग पडला होता. त्याने भीतभीत किंमत विचारली. ‘दोन रुपये’- ऐकल्यावर त्याने नको असं सांगितलं (३०-३५ वर्षांपूर्वीचे हे दर आहेत). बाहेर येऊन समोरच असलेल्या थांब्यावर तो एसटीची वाट पाहू लागला.

तितक्यात एक गाडी तिथे येऊन थडकली. त्यांना गणपतीपुळ्याला जायचं होतं. कोणी तरी त्यांना रस्ता सांगितला. गाडीच्या चालकाने काही चहा किंवा काही प्यायला मिळेल का, याची चौकशी केली. नकारघंटेशिवाय त्याच्या पदरात काहीही पडलं नाही. रूपजीला काय वाटलं कुणास ठाऊक त्याने चालकाला ‘शहाळी चालतील का?’ असं विचारलं. तो ‘हो’ म्हणाला. रूपजीने पाच रुपयाला एक असं सांगितलं. घासाघीस होऊन चार रुपये ठरले आणि त्याला पाच-सहा शहाळ्यांची ‘ऑर्डर’ मिळाली! ताबडतोब त्याने मगाचच्या घरात जाऊन दीड रुपयाप्रमाणे सहा शहाळी फोडून आणली. आतली मलाई काढून द्यायचा अनुभव नव्हता, त्याने काही तरी करून ती काढून दिली. दिलेल्या पैशाचा मोबदला म्हणून भरपूर धूळ उडवून गाडी निघून गेली आणि रूपजीच्या खिशात चक्क चोवीस रुपये जमा झाले. म्हणजे थेट पंधरा रुपये फायदा!

परत जाऊन त्याने त्या घरातल्या माणसाकडून फायद्यातल्या पंधरा रुपयांची सगळी शहाळी सोलून घेतली. उन्हाळी सुट्टीचे दिवस होते. दुपापर्यंत त्याची सगळी शहाळी संपून गेली. तोपर्यंत बाजारपेठ उघडली होती. त्याने चौफेर नजरेने सगळा परिसर पाहून घेतला. कदलेकरांचे दुकान उघडले होते. हॉटेल उघडले होते. काही गाडय़ा आणि एसटी जा-ये करत होत्या. कदलेकरांच्या दुकानात कोकम सरबत आणि पन्हं मिळत होतं. काही थंड पेयेही मिळत होती. पण त्यासाठी दुकानात जावं लागत होतं. गाडीवाल्यांना त्यांच्या हातात सगळं हवं होतं. आणि कदलेकरांचा तत्त्वाभिमान त्यांना ती सेवा करू देत नव्हता. रूपजीला अभिमान वगैरे बाळगण्याची ऐपत नव्हती. त्याने कदलेकरांना आपण ते सगळे पदार्थ नेऊन देतो असं सांगितलं. त्यांनी होकार दिला. आणि संध्याकाळी जेव्हा रूपजी परत आपल्या मुक्कामाच्या खोलीवर आला तेव्हा त्याच्याकडे चक्क पन्नास रुपये आणि सरबत व पन्हं कसं बनवतात याची कच्ची पाककृती होती. रात्री जेवायला एका कोकणी माणसाकडे तो गेला आणि त्याने ती कृती आणखी पक्की करून घेतली.

दीड र्वष उलटून गेलं होतं. रूपजी गावातल्या एसटी थांब्यावर आला होता. आज त्याचं कुटुंब तिथे येणार होतं. गावातलं एक झोपडं त्याने आपलं घर म्हणून नक्की केलं होतं. आता त्याच्याकडे शहाळी, सरबतं आणि सकाळी पहिल्या एसटीने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पोहे आणि भजीपाव मिळत होता. बसायला एकच बाकडं होतं, पण सकाळी साडेसात वाजता रत्नागिरीला निघालेल्या, नवीन कारखान्याकडे नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना न्याहारी मिळू लागली होती. आणि आता रात्री साडेनऊ  वाजेपर्यंत शेवटची एसटी यायची. त्यातल्या प्रवाशांना प्रवासाचा शीण घालवायला गरम चहा रूपजीकडे मिळू लागला होता. गावातले हॉटेल होते त्याची वेळ मात्र अजूनही सकाळी दहा ते सहा हीच होती. कदलेकरही परंपरेचा मान राखत आपली दुकानाची वेळ बदलायला तयार नव्हते. त्यामुळे ऐन वेळेला लागणाऱ्या काही किरकोळ वस्तूही त्याच्या त्या पोतडीवजा ठिकाणी मिळत होत्या. मात्र एकटय़ा रूपजीला हे सगळं सांभाळणं जड जात होतं. म्हणून त्याने बायकोला बोलावून घेतलं.

चार वर्षांनंतर कदलेकरांच्या सध्याच्या मोठय़ा घरावर अजून एक मजला चढला आणि रूपजीने एका छोटय़ा पण पक्क्या घरात प्रवेश केला. हजामत केंद्राची जागा मालकाने सुरक्षित भाडे मिळायची सोय झाली म्हणून रूपजीला विकून टाकली आणि आपला मुक्काम ताडी-माडी केंद्रात कायमस्वरूपी हलवला. त्या दुकानात काम करणारा एक पोरगा आतमध्ये झोपायला मिळतं म्हणून रूपजीकडे दुकानात कामाला लागला. रूपजीची बायको त्याचे दुकानाच्या बाजूलाच असलेले छोटेसे हॉटेल सांभाळू लागली. शहाळीवाल्याची बाग पन्नास टक्के भागीत त्याने चालवायला घेतली ती तेव्हाच. आता माझ्या मित्राच्या कोकणातल्या गावात रूपजीच्या बायकोच्या हातचे फरसाण आणि शेव-गाठय़ा, ढोकळा खाऊन लोक कामावर जाऊ  लागले. हॉटेलवाल्या मालकाची बायको म्हातारपणामुळे निवर्तली आणि त्याने आपली जागा रूपजीला चालवायला दिली व तो मुलाकडे रत्नागिरीला निघून गेला. त्या गावात फक्त कदलेकरांकडे एकमेव गाडी होती. रूपजीने ती भाडय़ाने घेऊन हॉटेलमालकाला त्याच्या मुलाच्या घरी स्वत:च्या पैशाने सोडले, आणि येताना तो आपल्या भावाला व त्याच्या परिवाराला आणायला स्टेशनवर गेला.

काही वर्षांनी कदलेकरांचा मुलगा नोकरीसाठी रत्नागिरीहून परदेशात गेला. आणि रूपजीचा मुलगा कॉलेजात मराठीत सर्वाधिक गुण मिळवून आपल्या गावी परतला. त्याच वर्षी रूपजीने गावात केबल, खतं आणि इतर बऱ्याच गोष्टींची एजन्सी घेतली. दोन गाडय़ाही त्याच्याकडे होत्या. ऐन परिस्थितीत कोणाला कुठे जायचं असेल, तर त्यांना त्या उपयोगी पडत होत्या. रूपजीच्या भावाने दुकान सांभाळायला घेतले. घरातल्या स्त्रिया हॉटेल सांभाळू लागल्या.

कदलेकर आणि रूपजी यांच्यात मित्रत्वाचे नाते होते. तसे कदलेकर त्याच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठे होते. बोलता-बोलता एकदा रूपजीने भागिदारीत मोठे दुकान काढायचा प्रस्ताव ठेवला. पण कदलेकरांनी नकार दिला. हा त्यांचा सगळा व्याप त्यांच्या मुलाने सांभाळायला नकार दिला होता.

रूपजीची बायको पंचायत सदस्य झाली होती. त्याच वर्षी रूपजीने आपला नवीन बंगला बांधून पूर्ण केला. आपल्या वडिलांच्या नावाने त्याने शाळेला भरघोस देणगी दिली. नारळाच्या बागा, आंब्याचा व्यापार.. सगळ्यात त्याला यश येत होतं.

वयपरत्वे कदलेकर देवाघरी गेले. रूपजीने सगळे सोपस्कार पूर्ण केले. त्यांचा मुलगा फक्त चार तासांसाठी तिथे आला होता. मुलगीही मुंबईहून आली. संध्याकाळी त्या दोन भावंडांमध्ये कदलेकरांच्या मालमत्तेवरून वाद झाला. रूपजीने सगळं विकत घेऊन दोघांनाही पैसे देऊन मोकळं केलं. जरी आता तुमचं घर नसलं तरी तुम्ही माझे कायमचे पाहुणे आहात, असं सांगितलं. त्या दोघांनी ते ऐकलंही नाही.

रूपजीला इथे कोकणात येऊन ३५ र्वष झाली. आता तो निवांतपणे आपल्या बंगल्यात असतो. दिवसभरात एखादी चक्कर ते आपल्या कारभाराकडे मारतात. त्यांची मुलं आणि आता नातवंडं सगळं सांभाळतात. कदलेकरांची त्या गावात नामोनिशाणी नाही आणि रूपजीचं सगळं काही तिथंच आहे.

sanjaydmone21@gmail.com