12 November 2019

News Flash

मी जिप्सी.. : लॉटरी

आईने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. रात्रभर मी माळरानावर बसून भविष्याचा विचार करत होतो.

(संग्रहित छायाचित्र)

आईने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. रात्रभर मी माळरानावर बसून भविष्याचा विचार करत होतो. माझा आणि घरच्यांच्या भविष्याचा. माझी चूक मला कळली होती. आणि आता मला ती सुधारायची होती. पण कशी सुधारणार? शेवटी घरच्यांकडून तीन दिवसांची मुदत मागून घेतली. नाव नाही सांगत त्या माणसाचं; पण त्याने मला वडिलांना देण्यासाठी पसे देऊ केले. बिनव्याजी. का दिले असतील? आजही सांगता येत नाही. पसे वडिलांच्या खात्यात भरले आणि घरच्यांसाठी चिठ्ठी लिहून कोल्हापूर सोडलं.

माणूस बिघडायला फार वेळ लागत नाही. मात्र, माणसाला सुधारायला फार वेळ लागतो. बऱ्याचदा आपण आजूबाजूला अशा तऱ्हेने बिघडलेल्या माणसांची खूप उदाहरणं पाहतो. परंतु बिघडलेला माणूस आश्चर्य वाटावं इतका सुधारलेला क्वचितच नजरेला पडतो.

आज मी जे लिहिणार आहे ते एका सामान्य माणसाबद्दल आहे. संपूर्ण वाया गेलेल्या एका मुलाने आपली प्रगती अत्यंत चोख मार्गाने कशी करून घेतली त्याची ही गोष्ट आहे. नावं आणि स्थळ बदलले आहे. परंतु तरी जे घडून गेलं आहे आणि सध्या जे आहे ते सत्य आहे. झालं असं- की काही कामासाठी मी पाच-सहा वर्षांमागे बेंगळुरु येथे गेलो होतो. माझ्या एका कार्यक्रमासाठी! माझा जो काही भलाबुरा असा (बराचसा बुराच!) प्रवास आहे (‘प्रवास’ असं लिहिताना मला फारसं प्रशस्त वाटत नाहीये. नशीब ‘कारकीर्द’ लिहिलं नाही.), त्याचा एक कार्यक्रम मी तयार केला होता. त्याला आपला पुण्याचा सुधीर गाडगीळ कारणीभूत आहे. त्याला असं मित्रांना ढकलून द्यायचा छंद आहे.

तर त्या कार्यक्रमानंतर मी तिथल्या लोकांना म्हटलं की, एखाद्या साध्या ठिकाणी आपण जेवायला जाऊ या. दिवे लावून काळोख करणाऱ्या कुठल्या तरी महागडय़ा ठिकाणी नको. कारण अशा ठिकाणी गेल्यानंतर खायला काय समोर आलंय ते न दिसता फक्त त्याचे अव्वाच्या सव्वा असलेले दरच दिसत राहतात. म्हणून मग आम्ही एका साध्या, पण अत्यंत स्वच्छ अशा हॉटेलात जेवायला गेलो. सगळे जण जमले. जे तिथे उपस्थित नव्हते त्यांच्याबद्दल इतरांकडून बरीच माहिती आपसूकच कानावर पडत होती. त्यांचा शिष्टपणा, पुढे पुढे करण्याची हौस, खोटं वागणं वगरे सगळं. इतरही काही गृहछिद्रं कळली. हे बोलणं सुरू असताना मी मात्र त्यात अजिबात रस घेतला नव्हता. कारण प्रत्येक ठिकाणी- अगदी परदेशातही हेच सगळं जेवणाआधी तोंडी लावायला लागतंच. फक्त नावं बदललेली असतात.

माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं याचं दुसरं कारण म्हणजे त्या उपाहारगृहाचे मालक किंवा जे कोण तिथले जबाबदार गृहस्थ होते ते आजूबाजूला वावरत होते. जेवणाची ऑर्डर काय आणि कधी मिळणार आहे याची वाट पाहत होते. त्या गृहस्थांना मी कुठेतरी याआधी भेटलोय किंवा निदान पाहिलं तरी आहे असं सारखं वाटत होतं. पण इतक्या दूर.. पार कर्नाटकात कोण असणार माझ्या ओळखीचं? शिवाय मी जेमतेम दुसऱ्यांदा बेंगळुरुला गेलो होतो. याआधी कॉलेजला असताना आमची स्टडी टूर (?)गेली होती तेवढीच. त्यातली टूरसुद्धा आठवत नव्हती, तर स्टडी कुठली आठवणार? बरं, ते गृहस्थ कानडी भाषेत बोलत होते. जेवण वगरे झालं. फार उत्तम होतं. शेवटी जाताना त्या गृहस्थांना भेटायचंय असं मी आमच्या यजमानांना सांगितलं. जाऊन त्यांना भेटलो.

‘‘मी तुम्हाला कुठेतरी भेटलोय.. निदान पाहिलंय याआधी. नेमकं आठवत नाहीये.’’

‘‘तुम्ही कुठे उतरला आहात? मी तुम्हाला तिथे येऊन भेटतो, मग आपण बोलू.’’

‘‘म्हणजे माझा अंदाज खरा आहे?’’

‘‘हो! शंभर टक्के.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी ते मला भेटायला आले. येताना बरोबर उत्तम दाक्षिणात्य पदार्थ खायला घेऊन आले होते. खाऊन झालं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

‘‘एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तुम्ही पूर्वी कोल्हापूर येथे आला होतात, तेव्हा आपली गाठ पडली होती. तुमच्या खेडेकर नावाच्या कोल्हापूरच्या मित्राबरोबर आपण भेटलो होतो.’’ त्यांनी हा संदर्भ दिला तरीही मला आम्ही नेमकं कधी भेटलो होतो, ते काही केल्या आठवेना. मग मी त्यांना विचारलं- ‘‘तुम्ही इथे कधी आलात?’’

‘‘आलो नाही, यावं लागलं. वडील निवृत्त झाले होते. मी शिकलो होतो व्यवस्थित आणि नोकरीच्या शोधात होतो. त्या काळात पसे कमवायचे आणि भरपूर कमवायचे असं मी ठरवलं होतं. आमच्या कोल्हापुरात लोकांकडे बक्कळ पसे असतात. पण आमच्याकडे नव्हते. तेव्हा मला एक आकडी लॉटरीचा नाद लागला. मी घरच्यांचे सगळे पसे त्यात उडवले. वडिलांकडून धंदा करण्यासाठी म्हणून खोटं सांगून उसने घेतले होते ते पैसे. त्यावेळचे दहा-बारा लाख रुपये. एक दिवस असा आला- की सगळं घरी सांगावंच लागलं. वडील तर त्या धक्क्याने पुरतेच हादरून गेले. दोन दिवस ते गप्प बसून राहिले. आईने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. रात्रभर मी माळरानावर बसून भविष्याचा विचार करत होतो. माझा आणि घरच्यांच्या भविष्याचा. माझी चूक मला कळली होती. आणि आता मला ती सुधारायची होती. पण कशी सुधारणार? शेवटी घरच्यांकडून तीन दिवसांची मुदत मागून घेतली. नाव नाही सांगत त्या माणसाचं; पण त्याने मला वडिलांना देण्यासाठी पसे देऊ केले. बिनव्याजी. का दिले असतील?आजही सांगता येत नाही. पसे वडिलांच्या खात्यात भरले आणि घरच्यांसाठी चिठ्ठी लिहून कोल्हापूर सोडलं. एस. टी.त बसून बेळगावीला आलो. एका हॉटेलात पोऱ्याची नोकरी धरली. ‘मोरीवाला’ म्हणतात ती. कष्टांची सवय नव्हती मला अजिबात. रोज रात्री मरून जावं असं वाटे. एकदा घरी फोन केला आणि ‘तोंड दाखवता येईल तेव्हाच परत येईन.. काळजी करू नका. कुठल्याही वाईट मार्गाला आता लागणार नाही..’ म्हणून सांगितलं. त्या नोकरीत ऑर्डर घेणारा म्हणून बढती मिळाली. अचानकच. का मिळाली? माहीत नाही.

एक दिवस एक माणूस तिथे काहीतरी खायला म्हणून आला होता. त्यानंतर सलग तीन-चार दिवस तो रोज येत असे. दररोज तो माझ्याच अखत्यारीतील टेबलवर असायचा. आमचं हॉटेल फार लवकर उघडायचं. त्यामुळे सकाळी गर्दी नसायची. पाचव्या दिवशी त्याने मला विचारलं, ‘‘तू बेंगळुरुला येतोस? माझ्या मित्राला हॉटेलमध्ये सगळं सांभाळायला एक माणूस पाहिजे आहे.’’

त्याने का विचारलं? आणि नेमकं मलाच का विचारलं? माहीत नाही. मी त्याला ‘मला कन्नड येत नाही,’ असं सांगितलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘भुकेला भाषा नसते. आणि हॉटेलच्या धंद्यात फक्त भुकेच्या भाषेत काम चालतं.’’

‘‘साहेब! त्या दिवसापासून आजवर मी त्याचं ते वाक्य विसरलेलो नाही. त्यानंतर मी त्याला जुगारात पसे घालवून मी इथे कसा पळून आलो आहे वगरे सगळं सांगून टाकलं.’’

तो हसून म्हणाला, ‘‘चुका मुलांनी करायच्या नाहीत तर काय आम्ही करायच्या?’’

त्यानंतर त्या गृहस्थांनी मनाशी काहीतरी आकडेमोड केली आणि म्हणाले,  ‘‘बरोबर सहा तारखेला बेंगळुरुला आलो मी एप्रिलमध्ये. त्या दिवशी बाबांचा वाढदिवस असतो. मनाशी म्हटलं, शुभशकुन आहे. हॉटेलात नोकरी सुरू झाली. बेळगावीला भेटलेल्या त्या माणसाला मी सांगितलं- माझा सगळा भूतकाळ मालकांना आधी सांगून टाका. ती सगळी कहाणी ऐकून मालक म्हणाले..

असं म्हणून त्याने एक कानडी वाक्य उच्चारलं आणि माझा प्रश्नार्थक चेहरा बघून तो म्हणाला, ‘‘आता मला उत्तम कानडी येतं. थोडीशी तेलुगुही.’’ तर मालक म्हणाले, ‘‘आता तुझ्या आयुष्याचं नवीन मेन्युकार्ड आजपासून सुरू झालंय.’’

त्या दिवसानंतर या धंद्यात गुरासारखी मेहनत केली. वेळ-काळ बघितला नाही. सकाळी उठून सगळ्या जिनसा आणणं, त्याचा हिशोब ठेवणं, स्वयंपाकी, इतर नोकर यांच्यावर लक्ष ठेवणं, वेगवेगळ्या खात्यांच्या लोकांना सांभाळणं.. या सगळ्यात हिशोबात एका पशाचीही चूक होऊ द्यायची नाही असं मी ठरवलं होतं. कारण या पशानेच मला या इथपर्यंत आणून सोडलं होतं. अहो, इंजिनीअर आहे हो मी. पण मला कधीही मोह झाला नाही. का? ते माहीत नाही. हळूहळू मालक माझ्या हातात लाखांची रक्कम देऊ करू लागले. पण खरंच, त्यातल्या एका पवरसुद्धा नजर पडली नाही. तीन-चार वर्षे नोकरी केल्यानंतर मालकच म्हणाले, ‘‘आता तुला स्वत:चं हॉटेल सुरू केलं पाहिजे. बेंगळुरु शहर वाढत चाललं होतं. मालकांनीच मला हॉटेल सुरू करायला पसा दिला आणि माझं अगदी छोटंसं हॉटेल सुरू झालं. माझे मालक एव्हाना थकले होते. त्यांच्या मुलांना या व्यवसायात यायचं नव्हतं. दोघेजण परदेशात स्थायिक झाले होते. काही दिवसांनी मालकही सपत्निक तिकडे गेले. जाताना त्यांनी मला आपलं हॉटेल विकत घ्यायला सांगितलं. ‘पसे सावकाश दे..’ असंही वर म्हणाले. इतका त्यांचा माझ्यावर का जीव होता? माहीत नाही. आज माझी इथे चार हॉटेल्स आहेत. छोटीशीच आहेत. आता घरचे खूश आहेत. ते इथे येत नाहीत. पण मी त्यांना तोंड दाखवू शकतो. अहो, ज्या लॉटरीच्या मागे मी होतो ती कधीच नाही लागली मला. पण हे जे काही मला मिळालंय, लक्षात घ्या- मिळवलंय असं नाही म्हणणार मी- तीसुद्धा लॉटरीच नाही का?’’

इतकं सांगून मी काही बोलायच्या आत तो माणूस निघून गेला.. आपलं नावही न सांगता. मीसुद्धा भोचकपणा करून माझ्या यजमानांना त्यांचं नाव विचारलं नाही, किंवा कोल्हापूरला फोन करून खेडेकरजवळसुद्धा चौकशी केली नाही. आताही ठरवलंय- पुन्हा कधी बेंगळुरुला गेलो तर त्या हॉटेलात जायचं नाही. मात्र, कोणाला तरी सांगून तिथून खाणं मागवून घ्यायचं. कारण त्या अन्नाला एका विलक्षण प्रवासाची आणि कष्टांची चव आहे. शिवाय अनोळखी ठिकाणी अचानक चवदार खायला मिळणं म्हणजे लॉटरीच नाही का?

sanjaydmone21@gmail.com

First Published on September 2, 2018 1:48 am

Web Title: actor sanjay mone articles on lottery