काही लोक इतके खडूस असतात की आपण आपल्याला अप्रूप वाटेल अशी कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली तरीही ते अत्यंत निर्विकार चेहरा ठेवून ती ऐकतात. आणि आपलं सगळं सांगून झाल्यावर पूर्ण मख्ख चेहरा करून ‘‘हँ! त्यात कॅय आहे?’’ असं म्हणतात. अशांसाठी हा लेख अस्तित्वात नाही असं समजावं.

आपल्या भैय्या उपासनी या अवलिया मित्राने (‘आपला मित्र’ अशासाठी म्हटलं, की या लेखाचा पहिला भाग वाचल्यानंतर एव्हाना भैय्या उपासनी हा माझा मित्र तुम्हालाही आपला वाटेल ही खात्री आहे!), त्याच्या-माझ्या अपुऱ्या राहिलेल्या मैत्रीने मला काय दिलं, हे सांगायला बसलो तर ते फार वैयक्तिक असेल. फक्त एकच सांगतो.. माझ्या या भैय्याबद्दल एकदा मी पु. ल. देशपांडे यांना (सुधीर भट नावाचा माझा निर्माता होता. त्याच्याबरोबर मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा-) सांगितलं, ‘‘देशपांडेसाहेब! तुमचा जसा भैय्या नागपूरकर होता, तसा माझा जळगावचा भैय्या उपासनी आहे.’’

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

पुलंच ते! त्यांच्या विनोदाचा वेग विलक्षण असे. ते चटकन् म्हणाले, ‘‘बरोबर! जळगाववरूनच नागपूरची ट्रेन जाते. अशी माणसं त्याच रस्त्यावर भेटतात.’’

तर- असा हा विलक्षण मित्र जेव्हा मी त्याला पुढच्या वेळेला भेटायला गेलो तेव्हा खूपच अस्वस्थ दिसला. कारण त्याची जळगाव केंद्रावरून रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावर बदली झाली होती.

‘‘काय आहे ना संजय, कुठून कुठे बदली करतात? आणि का? म्हणून ठरवलंय- नोकरी सोडायची..’’

‘‘काय? नोकरी सोडायची? आणि मग काय करणार? येतोस मुंबईला? आता मालिकाबिलिका फार फोफावल्यात. ‘कॅमेऱ्याची भीती वाटत नाही तो अभिनेता!’ अशी नटाची व्याख्याही बदललेय. तू तर त्यांच्यापेक्षा  जास्त चांगला आहेस. भरपूर काम मिळेल.’’

यावर त्याच्या खास स्टाईलमध्ये भैय्याचं उत्तर काय होतं, माहीत आहे?

‘‘भाताच्या किंवा भाकरीच्या एका घासाने पोट जितकं भरतं, तितकं भरपूर चुरमुऱ्यांनी भरत नाही. आणि आपल्याला इथे आरामात राहायची सवय झाल्येय. मुंबईला आलो तर ते सगळं बदलायला लागणार. स्वभाव बदलायला लागणार. नंतर काही काळाने जरा यशबिश मिळालंच; थोडंबहुत नाव झालंच; तर मग

मूळ स्वभाव डोकं वर काढणार. आणि तो तुमच्या लोकांना जाणवला की लगेच तुम्ही म्हणणार, ‘अरे यार! भैय्या उपासनी आता बदलला.’ खरं तर मी तिथे येतो तो बदलून आलेला असतो. फुकट नम्रबिम्र असल्यासारखं वागतो. नकोच ते.’’

बऱ्याच कलावंतांचा स्वभाव नंतर का बदलल्यासारखा भासतो, ते त्या दिवशी मला नेमकं कळलं. खरं तर त्याचा सवाल योग्य होता. अशी बदली का करतात? अरे, रत्नागिरीचा हापूस जळगावला रुजत नाही किंवा दुसऱ्या ठिकाणची संत्री कोकणात फळत नाहीत; तर माणसासारखा माणूस कसा तिथे सुखी राहील? आणि अशा माणसांच्या बदल्या करून काय मोठी मराठी भाषा आणि कार्यक्रम यांच्यात वृद्धी होणार आहे?

‘‘आपण ठरवलंय.. इथे राहून काहीही करेन, पण आता त्रिस्थळी यात्रा नको.’’

मग काही महिन्यांनी त्याचा फोन आला- ‘‘पुढच्या महिन्यात प्रयोग ठरलाय ना तुझा? भेटू या नक्की. मी आता बिल्डर होण्याच्या मार्गावर आहे. हल्ली रोज साइटवर जातो. दिवसभर मर मर काम करणाऱ्या लोकांबरोबर राहतो. कादंबऱ्यांत लिहितात त्यापेक्षा खूप वेगळं जगतात रे हे लोक.’’

भैय्या आणि बिल्डर? हे कसं काय?

पुढच्या महिन्यात प्रयोगाला गेलो. भेट झाली.

‘‘संजय, मधला काळ फार वाईट गेला. कमाई शून्य. मात्र खर्च तर होतोच ना आपला! पण घरच्यांनी सांभाळला हां मला. विशेषत: माझ्या बायकोने. शिवाय आपले मित्र होतेच. अरे हो! आमच्या जळगावात वेळेला धावून येणाऱ्यांनाही मित्र म्हणतात बरं का!’’

आता मस्त गाडीबिडी घेतली होती त्याने. ऐट होतीच. ती अर्थात जन्मापासून होती. वडील प्रख्यात कीर्तनकार. त्यांच्या पोटी हा नबाब कसा काय जन्माला आला? त्याचा भाऊ राया. त्याबद्दल याचं मत ऐकायचंय?

‘‘मी नक्कीच राम नाहीये, हे नक्की. अगदी हजार हिश्श्यांनी खरं. पण माझ्यासारख्या रावणाला हा राया नावाचा लक्ष्मण कसा काय लाभला, देवच जाणे!’’

पण या वेळेला एकंदरीत स्वारी जरा जास्तच गमतीत होती.

‘‘चल, आजपर्यंत तुला आपल्या मित्रांकडे कधी घेऊन गेलो नव्हतो, आता जाऊ या.’’

मी त्याला गमतीत विचारलं, ‘‘का रे, माझी लायकी नाही म्हणून?’’

त्याने मला एकदम मिठी मारली. आणि बघतो तर त्याच्या डोळ्यांत चक्क पाणी!

‘‘असं नको रे म्हणूस. माझी लायकी नव्हती. ते सगळे मनाने मोठेच आहेत.. आणि होते.’’

आम्ही त्याच्या एका मित्राच्या घरी गेलो. जळगावचे प्रख्यात पुस्तकविक्रेते दादा नेवे यांच्याकडे. आज भैय्या नाही, पण दादा तेव्हा जे माझे मित्र झाले ते आजपर्यंत आहेत. ही सगळी माणसं इतकी मोकळीढाकळी कशी काय राहू शकतात? पाण्याचा गुण.. दुसरं काही स्पष्टीकरण नाही. माझी आणि दादांची मैत्री व्हायला पाच सेकंदसुद्धा लागले नाहीत. दादांच्या घरात गप्पा झाल्या आणि आम्ही तिथून दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो.

‘‘कुठे जातोय आपण भैय्या?’’

‘‘एक कचोरीवाला आहे इथे.’’

‘‘भैय्या, कचोरीवाल्याशी ओळख करून घेऊन मी काय करू? शिवाय तुम्ही सगळे आमच्या इथे जगातली सगळ्यात उत्तम कचोरी मिळते वगैरे सांगता ना, ते जरा वाढवूनच असतं हां! महाराष्ट्रात अशा अनेक ‘जगातल्या उत्तम’ गोष्टी खायला घातल्यात अनेकांनी. त्यातल्या नव्वद टक्के बकवास होत्या.’’

‘‘संजय, ही कचोरी पण ठीकच असते. पण याची खासियत काय आहे, सांगू तुला? गिऱ्हाईकाचा चेहरा आवडला नाही तर हा कचोरीवाला चक्क ‘कचोरी नहीं मिलेगी! चल भाग!’ असं म्हणून त्याला घालवून देतो.’’

‘‘भैय्या.. नको!’’ मी धास्तीच्या स्वरात म्हणालो. इतकी र्वष अभिनय करून जरा जम बसवला होता आणि आता कुठल्या तरी कचोरीवाल्याला माझा चेहरा कुरूप वाटला, ही बातमी मुंबईला पोहोचली आणि माझ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना कळली तर पुढे कामं कशी मिळणार?

‘‘अरे, चल तर!’’

आम्ही दोघं त्या कचोरीच्या दुकानात पोहोचलो. भैय्याने ओळख करून दिली. त्याने न बघता आम्हाला कचोरी दिली. माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता. माझी अस्वस्थता ओळखून तो कचोरीवाला म्हणाला, ‘‘क्या हुआ? पसंद नहीं पडली काय?’’

भैय्या म्हणाला, ‘‘तुम्हारे बारे में मैने बोला है इसको.’’

त्यावर तो हसून म्हणाला, ‘‘सूरतवाली शर्त दोस्तों के लिए लागू नहीं है. अगली बार

अकेले चले आना! भैय्याजी को साथ लेकर

आने की जरुरत नहीं! ये लो और एक खा लो मेरी तरफ से.’’

कचोरी खाऊन बाहेर पडल्यानंतर मी भैय्याला म्हणालो, ‘‘भैय्या, पण माझा चेहरा बरा आहे असं काही म्हणाला नाही तो कचोरीप्रसाद.’’

‘‘काय आहे संजय, धंद्यावर बसल्यानंतर खोटं बोलत नाही तो.’’ आणि अचानक भैय्या हसत म्हणाला, ‘‘तुमचे ते आहेत ना मोठे अभिनेते.. त्यांना हा कचोरी देत नाही म्हणाला.’’

अधूनमधून त्याचे-माझे फोन व्हायचे. आता जरा अभिनयाचं वेड बाजूला पडलं होतं. नंतर एकदा त्याला फोन केला मी.

‘‘भैय्या, मी पुढच्या आठवडय़ात नाटकाच्या दौऱ्यावर येतोय.’’

‘‘अरे व्वा! मग भेटू. प्रतापशेठच्या द्वारका हॉटेलमधलं तरंग चिकन खायचं राहून गेलंय आपलं. इतक्या वर्षांत कसे गेलो नाही आपण?’’

‘‘भैय्या, अरे, जळगावला प्रयोग नाहीये! मी ट्रेनने नागपूरला जाणार आहे.’’

‘‘मग मला कशाला फोन केलास? मी काय सिग्नल दाखवायला येऊ  तुझ्या ट्रेनला? कुठली ट्रेन आहे? मी जळगाव स्टेशनवर तुला तरंग घेऊन येतो.’’

‘‘अरे, नको. उगाच तुला..’’

‘‘त्रास होणारच आहे मला. पण तू सहा-सहा महिने, वर्ष-वर्ष भेटत नाहीस त्याचा त्रास जास्त होतो.’’

यावर काय बोलणार? ठरल्या दिवशी ट्रेन निघाली मुंबईहून. बसल्यावर कळलं, ती जळगावला थांबत नाही. मी पटकन् त्याला फोन केला.

‘‘माहिती आहे. पण भुसावळला थांबते. चल, मला कामं आहेत.’’

त्याने फोन ठेवला. अचानक. मला जरा ते लागलंच. इतरांनाही कामं असतात यावर मुंबईतल्या लोकांचा फारसा विश्वास नसतो.

आमची गाडी भुसावळला थांबली. कुठून कसा माहीत नाही, पण त्याने माझा डबा शोधला होता. भैय्या भुसावळला हजर होता. आम्हा सगळ्या कलाकारांना त्याने तिथल्या एका खोलीत नेलं. जेवणाची जय्यत तयारी होती.

‘‘भैय्या, अरे, खूप वेळ लागेल.’’

‘‘मला माहीत आहे. होईपर्यंत गाडी थांबवायला सांगितलं आहे.’’

त्या दिवशी भुसावळला गाडी तब्बल वीस मिनिटं जास्त थांबली. सगळ्यांना जेवायला घालून त्याने डब्यात कोंबले आणि कुणाला तरी त्याने इशारा केला. गाडी निमूटपणे मान खाली घालून सुरू झाली; जसे आम्ही कलाकार मान खाली घालून डब्यात शिरलो- तसे!

या माझ्या दोन वेळा लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबवणाऱ्या मित्राची ही कथा. तो नेहमी म्हणायचा, ‘‘आयुष्यभर लक्षात राहीन मी तुझ्या. अगदी गेल्यानंतरसुद्धा.’’

भैय्या शब्दाचा पक्का. गेल्यानंतरही. कारण तो गेला आणि माझी आईसुद्धा अगदी त्याच दिवशी गेली. कसा विसरू शकेन मी त्याला?

sanjaydmone21@gmail.com