News Flash

हंडीवाल्या नेत्यांचा  विजय असो!

मागच्या रविवारचा लेख पाठवला आणि त्यानंतर लगेचच गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा आपला सण होता

(संग्रहित छायाचित्र)

दरवर्षी आपण वाचतो, टीव्हीवर तर हजार वेळा पुन्हा पुन्हा पाहतो –  की दहीहंडी फोडताना शंभरच्या आसपास गोविंदा जखमी झाले.

या वर्षी कुश नावाचा एकजण मृत्युमुखीही पडला. त्यांच्या आयुष्याचा हिशोब कोण देणार? दोन लाख, पाच लाख दिले म्हणजे जबाबदारी संपत नाही. काही वेळा एखादा गोविंदा कायमचा अपंग होतो. तो घरातला एकुलता एक कमावणारा असेल तर त्याच्या कुटुंबीयांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं?

मागच्या रविवारचा लेख पाठवला आणि त्यानंतर लगेचच गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा आपला सण होता. दुसऱ्या दिवशी त्याबद्दलचा विदारक असा वृत्तान्त सगळ्या वर्तमानपत्रांत सचित्र आणि सटीप छापून आला. दरवर्षी या सणाची व्याप्ती भयानक.. खरं तर भीषणच म्हणावी अशा पटीने वाढतच चालली आहे. आणि खेदाची गोष्ट ही, की हे सगळं अनुचित आहे असं वाटणारे फार थोडे लोक आहेत. मुळात हा सण नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला? हा आहे उत्तर भारतातला सण! इथे जसा गणेशोत्सव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केला, तसा दहीहंडी सुरू करणारा नेता तिथे कोणी होऊन गेला का? आणि हा सण साजरा करण्यामागे कोणती कथा आहे? त्या काळात गोकुळात कृष्ण आणि त्याचे काही यादव सवंगडी दुपारी भूक लागली की

घराघरांत दही, दूध आणि लोणी यांच्या ज्या टांगलेल्या हंडय़ा असायच्या, त्यावर डल्ला मारून आपली भूक भागवत असत अशा गोष्टी आम्हाला शाळेत असताना सांगितल्या जायच्या. (यादव मंडळींनी दुसऱ्याच्या अन्नावर आपलं पोट भरायचं, किंवा दुसऱ्यांच्या- अगदी पार जनावरांच्या अन्नावर डल्ला मारून आपली पोळी भाजायची, ही प्रथा आजही इमानेइतबारे पाळली जात आहे.) भुकेसाठी चोरी करावी हे संस्कार विद्यार्थ्यांवर घडावेत, असं त्या काळात या गोष्टी लिहिणाऱ्या लेखकांना का वाटलं असावं? बरं, त्यांना तसं वाटलं! पण त्यात- पुढे शिक्षणात ज्या अनेक सुधारणा केल्या गेल्या, त्या करणाऱ्या तज्ज्ञांना याबाबतीत काही पावलं उचलावीत असं का नाही वाटलं? त्या बिचाऱ्या गोकुळातल्या मुलांना अन्नासाठी चोरीचा मार्ग अनुसरावा लागला यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं बालवय लक्षात घेतलं पाहिजे. याचा दोष त्यांच्या आयांकडे जातो. (आईचं अनेकवचन ‘आया’ हे त्या काळातलं व्याकरण आहे. हल्लीच्या व्याकरणात एकच असली तरीही ती ‘आया’ असते. पण या इथे ती ‘आया’ विचारात  घेतलेली नाहीये.) बरं, ही दह्य़ा-दुधाची चोरी काही एकदाच झाली नसावी. कारण एकदाच घडणाऱ्या गोष्टींनी परंपरा निर्माण होत नाही. याचा अर्थ ही घटना गोकुळात वारंवार होत असणार. म्हणजेच मुलं उपाशी असण्याचं कारण एकतर त्यांच्याकडे जो स्वयंपाक होत असेल त्याला तोंड लावावं असं मुलांना वाटत नसणार. म्हणजेच त्या अन्नाचा दर्जा बेचव असणार. गरिबीमुळे त्या मुलांना अन्न मिळत नसणार, हे पटायला जरा कठीणच वाटतं.

कारण ज्या घरांत दह्य़ा-दुधाचे आणि लोण्याचे हंडे भरलेले आहेत तिथे संपन्नता असलीच पाहिजे. शिवाय त्या काळात काही आजच्यासारख्या उंच इमारती नव्हत्या. वाडे होते, महाल होते, छोटय़ा झोपडय़ा होत्या असं त्या गोष्टी वाचल्या की आपल्याला समजतं. शिवाय ती सगळी यादव मंडळी ही लहान मुलं होती. त्यामुळे एकावर एक असे फार फार तर दोन किंवा तीन थर लावून ते त्या हंडय़ांपर्यंत पोहोचत असणार, हे नक्की. मग आत्ताच या इतक्या गगनचुंबी हंडय़ा का उभारल्या जातात? त्या काळातल्या त्या लहान मुलांच्या हंडय़ा या फक्त भूकेचा प्रश्न मिटावा यासाठीच रचल्या गेल्या. आताच्या काळातल्या हंडय़ांना पशाच्या माळा- अगदी लाख लाख रुपयांच्या- का जोडलेल्या असतात? घरातले पालक झोपलेले असताना तत्कालीन यादव बच्चेकंपनी गुपचूप आपला कार्यभाग उरकायची. आजच्या जगात प्रचंड आवाज करत, कोलाहल माजवत या हंडय़ा का फोडल्या जातात? शिवाय पालक दुपारचे झोपतात ही वाईट गोष्ट नाहीये का? कारण आजकाल कुठल्याही वैद्यकीय शाखेचे डॉक्टर दुपारची झोप कशी अनिष्ट आहे, हे आपल्या कानीकपाळी ओरडत नसतात का? त्या काळातल्या एखाद्या अमुक तमुक यादवाने किंवा कोणीही ‘जा त्या घरात आणि हंडी रचून खा लोणी-दही-दूध. त्याबद्दल तुम्हाला मी इतके इतके पसे देतो..’ अशी ऑफर दिल्याचं काही माझ्या वाचनात आलेलं नाही. मग आज अनेक लोक आपलं नाव लावून, काही लाखांचं पारितोषिक लावून ती हंडी फोडण्याची ऑफर का देतात? शिवाय त्या गोकुळातल्या मुलांनी कधी मथुरा किंवा हस्तिनापूर येथून हंडी सर करू शकणारे तज्ज्ञ मागवले होते असंही कुठं माझ्या वाचनात आलेलं नाही. मग आपल्याकडे मागे स्पेन देशातून मनोरा रचणारे का आले होते? आपण असं समजू या, की त्या गोकुळातल्या मुलांना अन्नपाणी व्यवस्थित मिळत होतं, त्यांची कसलीही आबाळ होत नव्हती. पण त्यांच्यात एक खोडकरपणा होता, व्रात्यपणा होता म्हणून ती मुलं हा उद्योग करत असत. आणि त्यांचा नेता होता भगवान श्रीकृष्ण. पण या सगळ्याबरोबर भगवंताने ‘भगवदगीता’ही सांगितली. मानवाने  कुठल्या वेळेला कसे आचरण करावे याचा मूलमंत्र त्याने दिला. आजच्या काळात सगळी ‘भगवदगीता’ सोडा; त्यातला एखादा श्लोक तरी आजच्या हंडीफोडय़ांना म्हणता येईल? रचून सांगणं तर दूरचीच गोष्ट आहे! गीतेतला श्लोक सोडा; ‘सीता और गीता’ किंवा ‘गीता मेरा नाम’ या दोनपकी एका सिनेमाची गोष्ट तरी न चुकता सांगता येईल ह्य़ांना? भगवान कृष्णाने न्यायाची बाजू घेऊन अन्यायाचा आणि दुष्टांचा संहार नेता म्हणून केला.. नव्हे, घडवून आणला. आजच्या या हंडीवाल्या नेत्यांना न्याय आणि दुष्ट या गोष्टी संहार करण्याच्या वाटत नाहीत. उलट, न्यायाची विविध क्लृप्त्या वापरून कशी फिरवाफिरव करावी यात ते प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णावरही मात करताना दिसतात. ठिकठिकाणी व्यासपीठ उभारून, रस्त्यांची अडवणूक करून, मोठय़ामोठय़ाने अचकटविचकट गाणी बोंबलत ठेवून, पशाचा धुरळा करून हा सण साजरा कसा करवतो त्यांना? मोटारसायकलवरून किमान तीनच्या संख्येत बसून आपापल्या पक्षाचा झेंडा फडफड करत मिरवून बेभान अवस्थेत आपले अनुयायी फिरले की आपल्याला समाजात मान मिळतो असं का वाटतं त्यांना? कायदा हातात आहे तुमच्या.. मान्य! पण मग आपला सगळ्यांचा सण आहे ना गोकुळाष्टमी; तर निदान तो एक दिवस तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे व्यासपीठ उभारून वाहतुकीची कोंडी करण्यापेक्षा आणि सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा सगळ्या पक्षांनी एकच ठिकाण मांडावे ना? एरवी आपण वर्तमानपत्रांत वाचतोच- की काही काही मुद्दय़ांवर पालिकेत किंवा विधानसभेत.. अगदी लोकसभेतसुद्धा एकमेकांच्या उरावर बसणारे पक्ष तात्पुरती युती करतात. मग या एका दिवशी केली युती; तर काय असं आभाळ कोसळणार आहे? दरवर्षी आपण वाचतो, टीव्हीवर तर हजार वेळा पुन्हा पुन्हा पाहतो- शंभरच्या आसपास गोिवदा जखमी झाले. या वर्षी कुश नावाचा एकजण मृत्युमुखीही पडला. त्यांच्या आयुष्याचा हिशोब कोण देणार? दोन लाख, पाच लाख दिले म्हणजे जबाबदारी संपत नाही. समजा, असा कोणी अकाली मृत्युमुखी पडलेला जर जिवंत राहिला असता आणि त्याने पुढे जाऊन एखाद्या व्यवसायात करोडो रुपये मिळवले असते तर..? काही वेळा एखादा गोविंदा कायमचा अपंग होतो. तो घरातला एकुलता एक कमावणारा असेल तर त्याच्या कुटुंबीयांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? गायक, कलाकार यांना लाखो रुपये देऊन हे दहीहंडीवाले बोलावतात. कशासाठी? ते राहत असतात भलत्या ठिकाणी. त्यांचंसुद्धा मत तुम्हाला मिळणार नसतं. त्यांना काय पडलेली असते? चार ठिकाणी जायचं, तसं पाचव्या ठिकाणी! दिवसभर ट्रक, टेम्पोमधून असंख्य लोक एका भन्नाट मस्तीत फिरत असतात. दुपारनंतर या दहीहंडीच्या ठिकाणी आजूबाजूला बिअर आणि इतर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. फेकून दिलेल्या अन्नाच्या पाकिटांवर कुत्रे, कावळे तुटून पडत असतात. सगळीकडे बजबजपुरी माजलेली असते. हंडी फोडल्यावर खाली पडलेली फुलं, दोरखंड आणि इतर वस्तू तशाच तिथे टाकून सगळे जण निघून जातात. परंपरा अनिष्ट वळण घ्यायला लागली की तिला ‘प्रथा’ म्हणतात. आणि प्रथेला कुठलाही संस्कृतीचा आधार नसतो. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे सगळं यापूर्वीही अनेकांनी मांडलेलं आहे आणि यात सामान्य माणूसच भरडला जातो असाच त्या सगळ्यांचाही सूर होता. पण या सर्वसामान्य माणसांचं दहीहंडीच्या प्रथेवर काय मत आहे? आमच्या शिवाजी पार्कच्या कट्टय़ाचा दुसऱ्या दिवशी सकाळी नरक झालेला असतो. मी एकदा एका अत्यंत जागरूक माणसाला याबद्दल छेडलं.. ‘‘काय हो? सहा डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी नाकं मुरडता! आता या सगळ्याबद्दल काय मत आहे तुमचं?’’

अत्यंत मख्ख चेहऱ्याने आणि त्याच स्वरात ते म्हणाले, ‘‘सणवाराची हौसमौज म्हणायचं.. दुसरं काय?’’

या अशा लोकांवर चालवायला भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शनचक्र उधार मिळेल का कुठे?

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2018 12:12 am

Web Title: actor sanjay mone lokrang article
Next Stories
1 फ्लोरा
2 मी जिप्सी.. : लॉटरी
3 मी जिप्सी.. : भैय्या उपासनी
Just Now!
X