22 November 2019

News Flash

महानांचे स्मरण : केवळ दिखावा (!)

माणूस जन्माला आला की कधीतरी त्याला मृत्यूला सामोरं जावं हे लागणार असतंच.

(संग्रहित छायाचित्र)

संजय मोने

माणूस जन्माला आला की कधीतरी त्याला मृत्यूला सामोरं जावं हे लागणार असतंच. त्या सामोरं जाण्याला अनेक विशेषणांनी, काव्याने, उक्तीने सुशोभित केलं जातं. त्या सगळ्यामागची भावना मृत्यूची भीती कमी करणं, त्याची तीव्रता थोडी सुस करणं हीच असते. कोणी त्याला ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा, तोचि सोहळा अलौकिक’ म्हणून इतरांची समजूत काढायचा, त्यांची भीती घालवायचा प्रयत्न करतात. तर कोणी ‘जितनी चाबी भरी रामने, उतनाही बस चले खिलौना’ असं म्हणून हे अटळ आहे ही भावना हलकी करून, आपल्या हातात काही नाही, जे काही आहे ते जगन्नियंत्याच्या हाती आहे, याचा हवाला देऊन सगळा भार त्याच्यावर टाकतात. जगण्याच्या धडपडीत एखादा आपल्या शरीराची जास्त काळजी घेऊन, व्यायाम करून तंदुरुस्त राहायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तेव्हा काही गद्य वृत्तीच्या व्यक्ती- ‘शेवटी व्यायाम करून शरीराची निगा राखणे म्हणजे काय? तर मृत्यू नावाच्या अंतिम थांब्याकडे जन्मत:च सुरू झालेला प्रवास थोडा लांबवणे. बाकी काही नाही..’ असं म्हणून त्या बिचाऱ्या व्यायामावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला खच्ची करतात. आपण सगळे कधीतरी लोप पावणार, हे माहीत असूनसुद्धा जगत राहण्याची जबरदस्त खटपट करत असतो. कोणी शंभर र्वष जगतो, तर कोणी जन्मत:च मृत म्हणून या जगात येतो. आपल्या दृष्टीने या दोन घटना भिन्न असल्या तरी त्या ‘वरच्या’च्या दृष्टीने एक जन्म आणि एक मृत्यू इतक्याच असतात. शिवाय जगताना आपल्याबरोबर आजूबाजूच्यांना आनंद देत जगणं हे फार थोडय़ा लोकांना जमतं. अन्यथा बहुतेक माणसं कोणाला ना कोणाला तरी त्रास देत, दु:ख देत, यातना देत जगतात. जे काही महान आत्मे या जगात होऊन गेले, त्यापैकी सगळ्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी आपली नाव पैलतीराला पोचायची वेळ जवळ आली आहे हे जाणून आपल्या अनुयायांना ‘मी गेलो तरी माझे विचार जिवंत ठेवा. माझ्या नश्वर देहाला शून्य किंमत आहे. या माझ्या बा रूपाला जतन करायचा प्रयत्न करू नका, माझी तत्त्वं जिवंत ठेवा. जे काही भलंबुरं तुम्हाला माझ्या विचारांतलं उमजलं असेल, ते पुढे जाईल यात तुम्ही तुमचं आयुष्य व्यतीत करा,’ असंच सांगितलं. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचे पुतळे उभारून त्यांच्या बा रूपाचा बाजार मांडला. त्यांच्या तत्त्वांवर पुढे चालणारे काही जण जरूर होते; पण त्यांचा आवाज, त्यांचे विचार व्यक्तिपूजेच्या सोसाटय़ात पालापाचोळ्यासारखा कुठच्या कुठे उडून गेला. त्यांच्या पश्चात जितका झगमगाट केला गेला, त्याच्या दशांशाने जरी त्यांच्या जिवंतपणी लोकांनी त्यांचं सांगणं ऐकलं असतं तर या जगाची परिस्थिती आज फार वेगळी असती, सुंदर असती. आणि हे फक्त आपल्या देशात नाही, तर संपूर्ण जगात सुरू आहे.

जयंत्या होतात, पुण्यतिथ्या होतात. मग काही वर्षांनी रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी महोत्सव साजरे होतात. आता जयंतीला ‘प्रकट दिन’ म्हणायला लागलेत. मूठभर अपवाद वगळता या सगळ्या महान लोकांनी आयुष्य जगताना कष्ट केले होते. कधी कधी- खरं तर बऱ्याचदा हलाखीची वा अगदी अन्नान्न परिस्थितीचा सामना केला होता. आयुष्याशी केलेल्या इतक्या घनघोर लढाईनंतर त्यांनी जे मिळवलं आणि समाजाच्या चरणी वाहिलं त्याला तोड नाही. त्यांच्या नावाचा जयघोष करणाऱ्या कुणाचीही त्यांच्या पायाशीसुद्धा उभं राहायची लायकी नाही.

कलाक्षेत्रातसुद्धा अशी उदाहरणं आहेत. अनेक अतुलनीय कलाकृतींच्या निर्मात्यांनी अपार कष्ट करून कलानिर्मिती केली आहे. अर्थात नंतरच्या काळात ‘उपाशी राहील तो कलाक्षेत्रात नाव कमावेल’ किंवा ‘बालपणात  जर हलाखीची परिस्थिती नसेल तर निर्मिती अशक्य आहे’ असं समजण्यापर्यंत मजल गेली. आणि त्यातही एक आतला वेगळा विचार पाझरत होता.. आजही आहे. काही साहित्यिक अत्यंत सुखासीन अवस्थेत जन्माला आले आणि फार कष्ट न करता त्यांनीही उत्तम साहित्यनिर्मिती केली. संयोगाने ते सुशिक्षित होते. त्यामुळे त्यांच्यावर ‘हे पढतमूर्ख वाचकांचे लेखक’ असा शिक्का बसला. आणि हे समजून उमजून केलं गेलं. आजही केलं जातंय. कष्टाने जगून जर साहित्य निर्माण होत असेल, तर मग भारतभर पसरलेल्या रेल्वेमार्गाची निर्मिती करताना अहोरात्र खपणारे मजूर शे-दीडशे महान ग्रंथांचे लेखक झाले नसते का? निसर्गाचं दर्शन घडून जर काव्य लिहिता आलं असतं तर डेक्कन क्वीनचा चालक हा सगळ्यात महान निसर्गकवी म्हणून काव्याच्या इतिहासात अग्रक्रमी मिरवला असता. तशा अनेक रेल्वे हिरवळीने युक्त अशा प्रदेशातून जात असतात, पण डेक्कन क्वीन पुण्याहून येते आणि जाते. त्या गाडीत असंख्य विद्वान लोक ये-जा करतात असा पुण्यात तरी प्रवाद आहे, म्हणून!

आपल्या देशात माणूस हे जग सोडून गेल्यानंतर त्याची कदर करायची चूष अनेक युगं चालत आलेली आहे. र. धों. कर्वे यांना ते हयात असताना आपल्या समाजाकडून फार यातना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या पश्चात मात्र त्यांचा उदोउदो झाला. आता या वर्षी- म्हणजे २०१८ साली अचानक अनेक लोकांना पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांची जन्मशताब्दी आहे याची आठवण झाली. ते इतर वेळीही लोकांचे आवडते श्रद्धास्थान होते, हे त्यांचे नशीब. परंतु आता त्यांना काहीतरी करून, ओढूनताणून एकत्र आणून त्यांच्या कार्यावर आधारित कार्यक्रम करायची अहमहमिका लागली आहे. कार्यक्रमांत त्यांचा उल्लेख ‘अण्णा, बाबूजी आणि भाई’ असा करताना त्यांना असं दाखवून द्यायचं असतं, की जणू काही त्यांच्या पंक्तीत यांचं ताट मांडलेलं होतं! हे असे मान्यवर कलाकारांचे उल्लेख एकेरीत करणाऱ्या निवेदकांचा मला नेहमीच राग येतो. अरे! कोण तुम्ही? त्यांना अण्णा, भाई वा बाबूजी असं आपण संबोधित करायचं नसतं. आज शरद पवार यांना ‘शरद’ किंवा अगदी ‘शऱ्या’ या नावांनी संबोधित करणारे जर कोणी असलेच, तर अगदी एका हाताच्या बोटावर मोजावे इतकेच असतील. आता शरद पवारांचे उजवे हात म्हटले जाणारे निदान तीस-चाळीस इसम असतील; म्हणून आपण हाताची बोटं जरा वाढवू; परंतु त्यांच्या ऐंशीव्या वर्षी समजा एखादा कार्यक्रम केला गेला, तर महाराष्ट्रातल्या कुठल्या निवेदकाची ‘एकदा शरद यशवंतरावांना म्हणाला..’ या वाक्याने सुरुवात करायची हिंमत आहे? उगाच लोचटपणा करून रसिकांच्या भावनेला हात घालायला ‘बाबूजी एकदा अण्णांना म्हणाले..’ किंवा ‘भाई एकदा लिहीत होते आणि..’ अशा छापाची किश्श्यांची लडी उलगडत बसता?

मी पु. ल. देशपांडे यांच्या तीन नाटकांत अभिनय केला होता. ते ती नाटकं पाहायला आले होते तेव्हा आणि त्यानंतरही त्यांना भेटायचा योग बऱ्याच वेळा आला. पण मी एकदाही त्यांना ‘देशपांडे साहेब’व्यतिरिक्त इतर कुठल्याही संबोधनाने पुकारले नव्हते. एक तर लायकी नव्हती आणि दुसरं म्हणजे माझी-त्यांची ओळख आहे असं मला वाटत होतं. त्यांना वाटत होतं की नाही, ते मला माहीत नाही. आता वर्तमानपत्रं उघडा! सगळीकडे या तीन महान कलाकारांचे चेहरे आणि त्याला कुठली तरी कलात्मक (?) नावं देऊन सादर होणारा कार्यक्रम! त्यांच्या हयातीत माडगूळकर यांना कवी न समजता ते चित्रपट गीतकार आहेत, असं बोललं जायचं. पु. ल. देशपांडे हे साडेतीन टक्के वाचकांचे लेखक आहेत, असं ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाल्यावर आठवडय़ात रस्त्यावरसुद्धा विकली जायची नाहीत असे क्रांतिकारक लेखक (म्हणजे काय, हे आजवर मला कळलेलं नाहीये. कारण १५ ऑगस्टला क्रांतिबिंती संपली, आता उरलीय जिवंत राहण्यासाठी चाललेली परवड!) म्हणायचे. विशेष म्हणजे ते स्वत: शंभर प्रती जेमतेम खपणाऱ्या मासिकांत लिहायचे. सुधीर फडके यांच्यावर ते संघवाले म्हणून आरोप केले जायचे. आता मारे सगळ्यांना कढ आलेत! बरं, कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी काय परिस्थितीत ते स्थान मिळवलं, याच्या मुळाशी कोणी जाईल तर शपथ! सध्या ही तीन महान व्यक्तिमत्त्वं एकाच वर्षी जन्माला आली या योगायोगाबद्दल नवल न वाटता आता ती विकता येतील, या कैफात सगळे मश्गूल आहेत. गायक, गायिका, निवेदक, कलावंत यांना फावल्या वेळात चार पैसे गाठीला बांधायची संधी आली आहे. गीत रचताना, चाल बांधताना किंवा लेखन करताना त्यांना काय आणि कसे वाटले याचा अभ्यास करून आपणही तसं काहीतरी करून दाखवावं असं कोणालाही वाटत नाही, हे खरं दु:ख आहे.

या सगळ्या गदारोळात नौशाद आणि स्नेहल भाटकर यांचीही जन्मशताब्दी आहे याचा विसर सगळ्या कलासक्त कलाकर्मीना पडलाय याचं दु:ख आहे. कदाचित त्यांना आता कलाकार म्हणून रसिकांच्या गळ्यात मारून विकता येणार नाही, हे कलाकर्मीनी ओळखलं असणार!

sanjaydmone21@gmail.com

First Published on November 11, 2018 12:12 am

Web Title: article about remembrance of the great only show off
Just Now!
X