संजय मोने

पुढच्या आठवडय़ात दिग्विजयच्या चष्म्याची

वादळी हकीगत राज्यभर झाली. कामावर जायची चोरी. सगळीकडे सारखे वाहिन्यांचे लोक मागे लागलेले. दरम्यान त्याच्या समाजाच्या लोकांनी ‘महाराष्ट्र बंद’चं आवाहन केलं. हे बंद सोमवारी असले की मुळात बरीच दुकानं बंद असतात. त्यामुळे तो यशस्वी झाल्याचा भास होतो. तसंच झालं.

सकाळ झाली. दिग्विजय उठला. नेहमीचा कार्यक्रम सुरू केला त्याने. तेच मंजन. नंतर दाढी. लगोलग आंघोळ. त्यात आलेले वर्तमानपत्र चाळणे. एकही बातमी मनाला आनंद देणारी नाही, तरीही दिग्विजय वर्तमानपत्र दररोज वाचतो. आजही त्याने वाचून पुढच्या दिवसाची आखणी केली. आखणी कसली, नेहमीची यातायात मनात पुन्हा एकदा जुळवली!

घराबाहेर निघाला तर नाक्यावर सगळे पदपथ एकदम रिकामे. नेहमीचे अंगावर येणारे आगाऊ  विक्रेते आपापले ठेले गुंडाळून उभे होते. आसपास असंख्य पोलीस आणि तारांकित वर्दीधर ‘गुर्मी’ हा एकच गुण आई-वडिलांनी शिकवल्यासारखे येणाऱ्या-जाणाऱ्या गरीब पादचाऱ्यांवरती उगाचच गुरगुरत होते. कोणीतरी मोठा राजकीय नेता येणार असेल, म्हणून हे सगळे चाललेय हे दिग्विजयने ओळखले. तितक्यात नाक्यावर उभे राहणे याव्यतिरिक्त कुठलाच गुण अंगात नसणारे काका कदम त्याला सामोरे आले.

‘‘दिग्या! बघितलंस- सगळं एकदम स्वच्छ. आज पंतप्रधान येणार म्हणून बघ सगळं कसं साफसूफ आहे! नाटक रे नाटक.. वरपासून खालपर्यंत! पोलीस बघ.. बिचाऱ्यांना डय़ुटी लागली. राहा दिवसभर उभे. ते जाणार इथून तीन-साडेतीन मिनिटांत.. कोणालाही न बघता! आणि हे मात्र राबताहेत दिवसभर. सावली नाही. पाणी नाही. जेवण वगैरे दूरचीच गोष्ट झाली.’’

काका कदम म्हणजे कायम आपल्या मतांच्या पिंका तोंडातल्या किवामवाल्या पानाबरोबर टाकत फिरतात. बायको काही वर्षांपूर्वी वारली. घरात शिजवायला कोणी नाही. या पंतप्रधानांच्या गदारोळात नेहमीचा अर्धे पोहे आणि अर्धा उपमा हा त्यांचा ठरलेला नाश्ता रस्त्यावर न मिळाल्याने सगळी तगमग ते व्यक्त करत होते.

दिग्विजयने त्यांना फार प्रतिसाद दिला नाही, कारण तेवढय़ात त्याची बस आली. धावतपळत जाऊन त्याने ती पकडली. आत नेहमीचे लोक होते. एकाने आल्याबरोबर त्याला कुठल्या तरी देवस्थानाचा प्रसाद दिला. चार दिवसांपूर्वीचा होता. खवट होता. पण धार्मिक भावनांशी खेळ नको म्हणून त्याने तो गिळून टाकला. बस थोडी पुढे गेली. तिकीट काढताना त्याने आपला चष्मा काढून पाकिटातून बघून पैसे दिले.

हा त्याचा नवीन चष्मा होता. ‘‘ही एकच वस्तू आहे तुला देण्यासाठी.. माझा वारस म्हणून!’’ असे म्हणत आजोबांनी शेवटच्या क्षणी त्याच्या हातात दिला होता. ‘‘सोन्याचा आहे. बाकी हे घरदार वगैरे तुम्ही काही बघणार नाही. तुझ्या बापाला तर इथे यायलाही वेळ मिळाला नाही.. तेव्हा घर शाळेला देऊन टाकतो.’’

चष्मा लावून बघितला, तर नंबर एकदम बरोबर! जणू काही आजोबांनी तो त्याच्यासाठीच बनवून घेतला होता!! आजोबांच्या काही आठवणीसुद्धा त्याच्याकडे नव्हत्या. त्या रात्री आजोबा मरण पावले. गावाहून त्यांचे सगळे पश्चात विधी उरकून दिग्विजय परतला. दोन महिन्यांपूर्वीची ही गोष्ट.

चष्मा मात्र झकास होता. अगदी आजच्या काळातल्या फॅशनचा. आजोबांच्या मृत्यूनंतर गावाशी सगळी नाळ तुटली होती त्याची. शाळेने त्याचे घर नको म्हणून सांगितले; कारण त्या घराची दुरुस्ती करून ते ताब्यात घेण्यात संस्थेला बिलकूल रस नव्हता. ‘बघू पुढे-मागे त्याचं काय ते..’ असं म्हणून दिग्विजय आपल्या दैनंदिन नोकरीत दिवस ढकलत होता.

तर- त्याची बस एका जागी स्थिर उभी होती. कारण आता पंतप्रधान आणि त्यांचा काफिला येऊ  घातला होता. गाडय़ा बंद करायचा हुकूम  पोलीस सोडत होते. आज दिग्विजयला कधी नव्हे ती खिडकी मिळाली होती. पंतप्रधान जाताना दिसणार होते. समोरून रोरावत गाडय़ा जाऊ  लागल्या. अचानक रस्त्यात एक कुत्रा आडवा आला, त्यामुळे सगळ्या गाडय़ा थांबल्या. पंतप्रधानांची गाडी अगदी दिग्विजयच्या समोर येऊन थांबली. मागच्या बाजूने काच खाली झाली आणि एक क्षण पंतप्रधान त्याला दिसले. जणू त्यांची नजरानजर झाली आणि दुसऱ्याच क्षणाला कुत्रा बाजूला झाला आणि सगळा काफिला रोंऽरोंऽ करत निघूनही गेला. मग बस निघाली. सगळ्या गाडय़ा निघाल्या. अचानक पुन्हा भयाण आवाज सुरू झाले.

दिग्विजय आपल्या कचेरीत पोहोचला. दिवसभर काम, काम आणि काम.. सकाळी घडलेला प्रकार तो विसरूनही गेला. बायकोला फोन करून रात्री बाहेर जेवायला जायचा बेत त्याने ठरवला. पुन्हा सगळा बसचा प्रवास करून तो घराच्या जवळ उतरला. सहज खिशात हात घालून पाहिलं, तर चष्मा गायब! वाचायचाच होता; त्यामुळे अडचण आली नाही. पण कुठे गेला? डोकं खाजवलं नाही त्याने.. कारण विचार करताना डोकं खाजवून काहीही होत नाही; ती फक्त एक म्हण आहे, हे त्याला माहीत होतं. ‘असेल, कचेरीत राहिला असेल..’ स्वत:शीच तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी कचेरीत आल्या आल्या त्याने चष्मा शोधला, तर कुठेही नाही. ‘प्रवासात बसमध्ये पडला असणार..’ असं म्हणत तो साहेबांकडे गेला आणि सोन्याचा चष्मा, आजोबांचा आहे, वगैरे सगळं त्याने त्यांना सांगितलं. साहेबांनी त्याला- ‘‘बसच्या डेपोत जाऊन विचारा,’’ असं सांगून लवकर जायची परवानगी दिली.

‘‘तुम्ही एक अर्ज द्या. आपण बघू काय होतं ते.’’ डेपोतले साहेब म्हणाले.

‘‘पण मिळेल ना?’’

‘‘बघू या म्हटलं ना मी? पावती असेल चष्म्याची- तर तीही द्या अर्जासोबत.’’

‘‘पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी बनवून घेतला होता. आता त्याची पावती कुठे असणार?’’

‘‘जरा सांभाळून वापरत जा आपल्या वस्तू. आम्हाला काय हे एकच काम आहे?’’ साहेब जरा घुश्शातच म्हणाले.

दिग्विजयचा आवाजही जरा वरचा लागला. तणतणत तो बाहेर पडला. तिथे कुठल्या तरी वृत्तवाहिनीचा रिपोर्टर होता. सकाळपासून त्याला काही बातमी मिळाली नव्हती. त्याने लगेच त्याला कॅमेऱ्यासमोर उभा केला आणि- ‘‘एक मोठी बातमी. सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला! दिवसाढवळ्या दरोडा..’’ असं बोंबलत दिग्विजयची कहाणी हाणायला सुरुवात केली. काही क्षणांत ती सगळीकडे दिसायला सुरुवात झाली. डेपोतून नकारघंटा घेऊन तो घरी परतला. जरा टेकतो- न टेकतो तोच घराची कडी वाजली. दार उघडून पाहतो, तर काही वर्षांपूर्वी इकडेतिकडे मवालीगिरी करणारा आणि आता बिल्डर झालेला नगरसेवक उभा! ‘‘आपण मोर्चा काढू. तुम्ही उपोषण करा. आज चष्मा गेला, उद्या हे सरकार तुमचे डोळे काढून नेईल. याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.’’ त्याच्या सोबत असणाऱ्यांनी घोषणा दिल्या. त्यांची समजूत काढून दरवाजा बंद करतो- न करतो तोच विभागातल्या आमदार आणि खासदारांचा फोन आला.

पुढच्या आठवडय़ात त्याच्या चष्म्याची वादळी हकिगत राज्यभर झाली. त्यामुळे कामावर जायचीही चोरी झाली. सगळीकडे सारखे वाहिन्यांचे लोक मागे लागलेले. दरम्यान, त्याच्या समाजाच्या लोकांनी ‘महाराष्ट्र बंद’चं आवाहन केलं. हे बंद सोमवारी असले की मुळात बरीच दुकानं बंद असतात, त्यामुळे तो यशस्वी झाल्याचा भास होतो. तसंच झालं.

एक महिन्याच्या आत अनेक वाहिन्यांवर त्याला आमंत्रणं आली. त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या निमित्ताने सगळे सत्ताधारी पक्षावर आगपाखड करीत होते. तितक्यात एका माणसाने स्वत:ला का कुणास ठाऊक, पण अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दिग्विजय आणि त्याची बायको हैराण झाले होते. कुठून तो चष्मा वापरायला काढला- असं झालं होतं त्याला. काचा मोडून विकून टाकला असता तर चार पैसे तरी मिळाले असते. हे नस्तं लचांड आता त्याला जड झालं होतं. कारण प्रकरण आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं होतं. इंग्रजी पेपरातसुद्धा बातमी येऊन गेली. शेवटी त्याने बायकोला माहेरी पाठवून दिलं. घरात सारखी विविध पक्षांची माणसं आणि त्यांचे वेगवेगळे सल्ले. दिग्विजयचा चष्मा गेला होता. खरं तर त्यातल्या कुणीही त्याला तो पुन्हा बनवून देऊ  शकत होतं; पण नुकतीच त्यांची सत्ता गेली होती. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायला मिळालेली संधी ते सोडणार नव्हते.

एके दिवशी अपरात्री त्याच्या घराचा दरवाजा वाजला. चार माणसं आत शिरली. गाडीत घालून विमानतळावर गेली. तिथून दोन तासांत दिल्ली. अचानक त्याला कळलं, की तो पंतप्रधानांच्या समोर उभा आहे.

‘‘दिग्विजय, काय समस्या आहे तुमच्या चष्म्याची? मला सुखाने राज्य करू द्या ना!’’ पंतप्रधान म्हणाले.

दिग्विजयने शंभराव्यांदा आपल्या चष्म्याची हकीगत सांगितली.

आपल्या जवळच्या टेबलातून पंतप्रधानांनी एक चष्मा काढून समोर ठेवला.

‘‘हाच आहे का तुमचा चष्मा?’’

‘‘हो, हो साहेब!’’ तो डोळ्यांवर चढवत दिग्विजय म्हणाला.

‘‘म्हणजे तुमची-माझी नजर सारखी आहे तर! मी मुंबईला आलो होतो तेव्हा माझी गाडी एका कुत्र्यामुळे काही काळ थांबली होती. तेव्हा एका बसच्या खिडकीतल्या माणसाच्या डोळ्यांवर मला हा दिसला. मी तो मिळवला. आणि मला तो चपखल बसलाही. पण त्यामुळे एवढं नाटक होणार असेल तर हा घ्या..’’ पंतप्रधानांनी त्याला तो परत दिला.

एक क्षण विचार करून दिग्विजय म्हणाला, ‘‘साहेब, इतके पंतप्रधान पाहिले, पण माझ्याकडे पाहणारा पंतप्रधान लाभला नव्हता. शिवाय एका सामान्य माणसाची आणि तुमची नजर एक आहे, हे आमचं भाग्य. मी नवीन घेईन. तुम्हाला हा शोभतोही जास्त. पण साहेब, ही नजर तशीच ठेवा. कारण सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे लागले आहेत, हे लक्षात ठेवा..’’ असं म्हणून दिग्विजय बाहेर पडला. चार महिन्यांनी मोकळा श्वास म्हणजे काय, हे त्याला उमगलं होतं.

वि. सू. – वाचकांनी आपल्या आवडीच्या पंतप्रधानांना कल्पून ठरवा. सक्ती नाही. ऐच्छिक आहे. कदाचित कोणीच नसेल हो!