संजय मोने

प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जाताना एक महत्त्वाचा बदल झाला होता : आतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची! सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी. पुन्हा १०.४० ते साडेबारा पुढचे तास. आमच्या शाळेत याआधी आठवीपासून सकाळची शाळा असायची. पण आमच्या बॅचपासून सातवीलाच सकाळची शाळा सुरू झाली. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसणारी आमची फळी याआधीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त हुशार होती आणि त्यांना त्यासाठी तयार करता यावं म्हणून आमचा वर्ग सकाळी भरू लागला.

यानिमित्ताने आम्हाला पुरुष शिक्षक शिकवायला येऊ  लागले. आतापर्यंत स्त्री-शिक्षक होत्या. म्हणजे तसे पी. टी.साठी डेव्हिड सर होते, गायनासाठी सोनावडेकर होते. डेव्हिड सर ज्यू होते. आमच्या शाळेत कासूकर होता, तो ज्यू होता. एक ओरा शहापूरकर नावाची मुलगी होती, तीसुद्धा ज्यू होती. आमच्या वाढत्या आणि आडवयात आमच्यासाठी ती स्वप्नसुंदरीच होती. गोरीपान, अत्यंत धष्टपुष्ट आणि रेखीव. खरं तर अजून बऱ्याच शब्दांत तिचं वर्णन करता येईल. पण ते असो. आमच्या पौगंडावस्थेतील आयुष्यात तिचा एकटीचा विरंगुळा होता. नंतर ती इस्रायलला गेली. सगळं कुटुंबच. तेव्हा ‘बॉबी’  चित्रपट आला होता. त्यातल्या डिंपल कपाडियासारखी ती दिसायची. निदान आमच्या नजरेला तरी! कासूकरच्या घरी आम्ही बऱ्याच वेळा जायचो. त्याच्या मोठय़ा सगळ्या बहिणीसुद्धा आमच्या शाळेत शिकल्या होत्या. आमचे डेव्हिड सरसुद्धा फार फार प्रेमळ होते. त्या सगळ्यांकडे बघताना आणि त्याच सुमारास हिटलरचे चरित्र वाचताना ‘असा काय त्याला ज्यू लोकांचा त्रास झाला असेल?’ हा प्रश्न नेहमी मनात यायचा. एक मुलगा होता.. आरिफ किंवा असंच काहीतरी त्याचं नाव होतं. त्याला एकदा ‘गीताई’ वाचनात पुरस्कार मिळाला होता. माझ्या धाकटय़ा बहिणीच्या वर्गात एक मेरी नावाची मुलगी होती. आजही ती आमच्या घरी येत-जात असते. ती बरेच अडलेले ‘दुबरेध शब्द’ (हा उच्चार तिचाच आहे. बाकी इतर सगळे ‘कठीण शब्द’ इतकंच म्हणायचे.) इतर मराठी मुलांना चटकन् सुचवायची. आज ती मस्कतला असते, पण मराठी फार उत्कृष्ट बोलते. आपला देश निधर्मी आहे हे आम्हाला कुणाला माहीतही नव्हतं; पण आमच्याकडून त्याचं पालन नकळत व्हायचं.

आमच्या गायनाच्या सोनावडेकर सरांची एक गंमत आहे. ते फार मृदू होते. पट्टीने फोडून काढणे दूरच; ते कुणाला नीट झडझडून रागवायचेसुद्धा नाहीत. एकदा एका मुलाला त्यांनी काहीतरी मस्ती करताना पकडलं. त्यांच्या अत्यंत तलम आवाजात ते त्या मुलाला चार हिताच्या गोष्टी सांगत होते आणि उगाच नावाला हाताने चापटय़ा मारत होते. ना त्याला मार बसत होता, ना सरांचं बोलणं संपत होतं. शेवटी तो मुलगाच कावला आणि म्हणाला, ‘‘सर! सोडा ना मला! किती वेळ हे चालणार?’’

त्यावर सरांनी हसून त्याला- ‘‘पुन्हा असं करू नको हां!’’ असं प्रेमानं सांगितलं.

त्यावर तो म्हणाला, ‘‘करणार! पण तुमच्याकडून पकडला जाणार नाही.’’

‘‘का रे?’’

‘‘तुम्ही फार वेळ बोलता आणि हळूहळू चापटय़ा मारता. त्यापेक्षा सणसणीत दोन-चार मारा.. थोबडवून परत पाठवा.’’ सर सगळे सूर हरवल्यासारखे दिसायला लागले!

शाळेत सगळेच मस्ती करतात. आम्हीही अजिबात अपवाद नव्हतो. काय काय करायचो! सकाळी प्रार्थनेची एक रेकॉर्ड लागायची. कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली आणि कपाटाची चावी पळवून त्या रेकॉर्डऐवजी शम्मी कपूरच्या ‘जंगली’ सिनेमाची रेकॉर्ड ठेवून दिली. शाळेच्या शिपायाने नेहमीच्या सवयीनुसार काहीही न बघता ती रेकॉर्ड प्लेयरवर ठेवली आणि आमची त्या दिवशीची सकाळ शम्मी कपूर आणि शंकर-जयकिशनच्या ‘याऽऽहू चाहे कोई मुझे जंगली कहे..’ या गाण्याने साजरी झाली!

असंच एकदा शाळेच्या जवळ एक पांढरा कुत्रा फिरायचा. अगदी लख्ख पांढरा. युरोपीय लोक असतात तसा. एकाच्या डोक्यात कल्पना आली- याचा रंग बदलायचा! पण कसा? शाळेच्या एका खोलीत खेळताना जखम झाली तर लावायला एक तांबडय़ा रंगाचं औषध होतं. ‘मक्र्युरीक्रोम’ नावाचं. आम्ही काही मुलांनी त्या कुत्र्याला पकडलं आणि त्याच्या तोंडात ते औषध ओतायला सुरुवात केली. अचानक त्या कुत्र्याने हात-पाय झटकले आणि ते औषध आमच्यापैकी काही जणांच्या कपडय़ांवर सांडलं. घरी तशाच अवतारात जाणं शक्य नव्हतं. मग शाळेच्या आवारातल्या विहिरीत आम्ही आमचे शर्ट्स काढून दुपापर्यंत धूत होतो. घरी धुलाई होण्यापेक्षा हे बरं.. नाही का?

आमच्या शाळेत दोन शिक्षक असे होते, की ज्यांचा दरारा सर्वंकष होता. ते म्हणजे धनू सर आणि मोडक सर! ते फार म्हणजे फारच कडक होते. शिवाय त्यांचा मार फार लागायचा. आज विचार करताना वाटतं, की त्या आमच्या वयात आम्ही जे उद्योग करायचो ते पाहता आम्हाला फाशीच द्यायला हवी होती! गेला बाजार काळे पाणी तरी नक्की! इतकं सगळं असूनही आम्हाला शाळेत ठेवलं होतं, कारण आम्ही हे सगळे ‘उद्योगपती’ अभ्यासात फारच गती बाळगून होतो. जवळपास हुशार म्हणायला हरकत नाही इतके. आणि जरी आम्ही आमच्या गुरुजींकडून नित्यनेमाने चेचून घेत असलो तरी आम्हाला त्यांच्याबद्दल आणि त्यांनाही आमच्याबद्दल फार माया होती. आज त्या शिक्षकांपैकी जवळपास कोणीच या जगात नाहीत. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी जेव्हा केव्हा आम्हाला ते भेटायचे तेव्हा आम्ही त्यांच्या पाया पडायचो. त्यासाठी आजूबाजूला कोण आहे, ते काय म्हणतील, असा विचारही कधी मनात आला नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाच्या होत्या त्या आमच्या प्रिन्सिपल – डॉ. प्रियंवदा मनोहर बाई! कुजबुजण्यापलीकडे त्यांचा आवाज कधी मोठा झालेला आम्ही ऐकला नाही. पण त्यांचा आदरयुक्त दबदबा असायचा. कितीही वर्षांपूर्वी शिकलेला विद्यार्थी कधी त्यांच्याकडे गेला तरी त्या क्षणार्धात त्याला नावानिशी आणि त्याच्या बॅचसह ओळखायच्या. जवळपास शंभर वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं; पण शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विचार त्यांच्या डोक्यात नसायचा. मी २००६ साली त्यांना भेटायला गेलो. ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘बाई, मी मोने. संजय मोने. ओळखलंत का?’’

‘‘अरे, असं काय, ७५ च्या पहिल्या एस. एस. सी.चा ना तू? तुझ्या दोन्ही बहिणीही आपल्याच शाळेच्या.. एक ७८ ची आणि दुसरी ८१ ची. कसं चाललंय तुझं? नाटक वगैरे ठीक आहे; पण त्यालाही नोकरीसारखी कालमर्यादा असते. एका विशिष्ट वयानंतर वेळ खायला उठते. शाळेत असताना बऱ्याचदा वक्तृत्व स्पर्धेला तुझी भाषणं तूच लिहायचास. ती सवय सोडू नकोस. सुटली असेल तर पुन्हा लावून घे. लिहिता हात शेवटपर्यंत उपयोगी येतो.’’

पुढे जाऊन मग मी शाळेच्या समारंभात भाषण करावं असं नवीन शिक्षकांनी सुचवलं. तेव्हा मी जाऊन इतकंच नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं, ‘‘मला शाळेनं नेमकं काय दिलं, ते सांगता येणार नाही; पण माझ्या सगळ्याच्या सगळ्या वर्गशिक्षकांची नावं मला पाठ आहेत.. शाळा सोडून मला पस्तीस वर्ष झाली, तरीही. यावरून काय समजायचं ते समजा.’’

..आणि खरंच, मी ती सगळीच्या सगळी बिनचूक सांगितली. जाताना काही ठरवून गेलो नव्हतो; पण कशी काय ती उमटली, ते आजही सांगता येणार नाही. कदाचित मला आठवावी लागली नसणार. ती मला पाठच असणार. (इथे ‘माझ्या मनाच्या सांदीकोपऱ्यात ती दडून बसली होती..’ असं लिहायला हवं. पण उगाच ‘सर्जनशील’ वगैरे असल्याचा आळ येऊ  नये म्हणून टाळलं!)

पुन्हा एकदा सांगतो.. माझी शाळा अगदी साधी होती. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी वगैरे कुठलेही खेळ नव्हते आमच्या शाळेत. पण खो-खो आणि कबड्डीमध्ये आम्ही दादा होतो. छाया बांदोडकर, शीला आणि नीला जोशी या बहिणी, हेमा जोग, शैला रायकर या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा गाजवणाऱ्या आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. इतर अनेक क्षेत्रांत माझ्या शाळेचे विद्यार्थी आज मान उंच करून उभे आहेत.

एका वर्गापासून सुरू झालेल्या माझ्या शाळेने मला आज वयाच्या ५८ व्या वर्षांपर्यंत पुरेल इतकी शिदोरी बांधून दिलेली आहे. आणि जोपर्यंत मी असेन तोपर्यंत मला ती पुरेल याची खात्री आहे. मान्य आहे- प्रत्येकालाच आपल्या शाळेबद्दल जे वाटतं ते माझ्यापेक्षा फारसं वेगळं नसेल; किंबहुना थोडं जास्तही वाटत असेल बऱ्याच जणांना. आम्हाला शिकवायला गुरू द्रोण किंवा वशिष्ठ अथवा सांदीपनी यांच्या तोडीचे शिक्षक होते असा माझा बिलकूल दावा नाही. पण मग आम्हीही काही पांडव किंवा प्रभू रामचंद्र नव्हतो. असलोच तर थोडे कौरव किंवा रावणच होतो! पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला ते जाणवू दिलं नाही. गुरू द्रोणांनीही थोडा भेद केलाच; पण आमच्या एकाही शिक्षकांनी कधीही तसं केलं नाही. शाळा एक वेळ बंद होईल; पण आमच्यावर तिथे झालेले संस्कार कधीही आम्हाला सोडून जाणार नाहीत. त्या माझ्या शाळेला त्रिवार वंदन!

(उत्तरार्ध)

sanjaydmone21@gmail.com