25 April 2019

News Flash

सिने-ज्ञानामृत

त्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो.

प्रख्यात सिने-पत्रकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे एका अर्थाने इतिहासकार असलेले इसाक मुजावर आमच्या सकाळच्या फिरायच्या ठिकाणी कधी कधी यायचे. त्यांना जरा खुलवलं की रंगात येऊन ते चित्रपटांबद्दल विलक्षण माहिती सांगायचे. एका चित्रपटात म्हणे तब्बल ७२ गाणी होती. एक गाणे साधारण चार मिनिटांचे धरले तर २८८ मिनिटं त्यांतच गेली. चित्रपट होता की गाण्याच्या भेंडय़ांचा कार्यक्रम? तसंच एकच नाव असलेले चित्रपट आठ-दहा वेळा तरी निर्माण केले गेले आहेत. सरदार चंदुलाल शहा यांनी शंभर चित्रपट निर्माण केले होते.. हे सगळं ऐकताना वेळ कसा आणि कधी निघून जायचा, कळायचं नाही. हे ऐकून आपणही असेच चित्रपट पाहावे असं वाटायला लागलं.

त्या काळात मी आणि इतर काहीजण प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत होतो. (म्हणजे नेमकं काय करत होतो, ते आजही स्पष्ट झालेलं नाहीये.) चित्रपट पाहायचे म्हणजे कुठलेही आणि कधीही एवढंच माहीत होतं. म्हणून एकदा ‘दूर का राही?’ या नावाचा मराठी चित्रपट पाहायला गेलो तर तो ‘दूर का राही!’ नावाचा हिंदी चित्रपट निघाला. खोटं नाही, खरंच! खोटंच सांगायचं असतं तर ‘रामपूर का लक्ष्मण’ या चित्रपटाला ‘रामपूर का लक्ष्मण?’ या नावाचा मराठी चित्रपट असेल म्हणून पाहायला गेलो असं सांगितलं असतं. खच्चून चित्रपट पाहिले. काही काही तर किती वेळा पाहिले हे सांगतासुद्धा येणार नाही. ‘तिसरी मंझील’ किंवा ‘ज्युवेल थीफ’ हे दोन ठळक. ‘पडोसन’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ त्यापाठोपाठ. सुमारे वीस-पंचवीस वेळा ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपल्याहून वरिष्ठ प्रेक्षकही भरपूर आहेत. पन्नास वेळा, साठ वेळा.. चक्क शंभर वेळा पाहणारे!

गाण्यांसाठी पाहायचे चित्रपट अर्थात वेगळे होते. त्या सिनेमांत समोर नायक गाताना दिसायचा, पण त्याला डोळ्याआड करायची कला हळूहळू अवगत व्हायला लागली. म्हणजे समोर राजेंद्रकुमार, विश्वजित, भारतभूषण, प्रदीपकुमार वगैरे नव्याने किंवा पहिल्यांदा पाहणाऱ्यांना दिसत असणार. पण मला मात्र फक्त मोहम्मद रफी किंवा किशोरकुमार, मुकेश, तलत महमूद यांचाच आवाज ऐकू यायचा. मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक दर्दी- किंवा हल्लीचा शब्द वापरायचा तर सुजाण प्रेक्षकांना! नायिका मात्र सगळ्याच आवडायच्या. अगदी प्रिया राजवंशसुद्धा. उंच आहे ना? अजून काय हवं नायिकेच्या जातीला? अशी स्वत:च्या मनाशी समजूत घालून घ्यायची.

बहुतेक चित्रपटांच्या कथाही त्या काळातल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यासारख्याच असायच्या. सरळ, साध्या आणि सोप्या. मुलीचं लग्न कधी होणार, या काळजीने नायिकेचा बाप पाईप ओढत बसलेला असायचा. आणि आपला वांड, चाळिशीला आलेला, पण पंचविशीत असल्यासारखा वागणारा मुलगा कधी ताळ्यावर येणार, या चिंतेत नायकाची आई मग्न असायची. बऱ्याच वेळा नायक आणि नायिकेला एकच पालक असायचा. तेव्हा नेहमी वाटायचं, इतके पैसे खर्च करून चित्रपट काढतात, तर देऊन टाकायचे ना दोघांनाही आई-वडील. कंजुषी कशाला? फार तर घरातला एखादा नोकर किंवा दोघांच्या मित्र-मैत्रिणींपैकी एकजण कमी करून टाकायचे.

असं जरी असलं तरी काही काही बाबतींत चित्रपट फार रूढीप्रिय असायचे. वाढदिवस, रक्षाबंधन, दिवाळी आणि होळी ही बिनगाण्याची कुठल्याही चित्रपटात साजरी झालेली नाही. आणि होळीच्या गाण्याची सुरुवात नेहमी ‘होली है!’ अशी आरोळी मारूनच व्हायची. का? रंग, गुलाल, पाणी हे सगळं एकत्र आहे म्हणजे तिथे येऊन नाचणाऱ्या, पळणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्यांना आज होळी आहे हे कळणारच नाही, असं त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वाटायचं की काय? लोकनृत्यातसुद्धा कोळीनृत्याच्या आधी ‘मी हाय कोली!’ अशी सुरुवात असते. आणि फक्त त्यातच असते. इतर कुठेही- म्हणजे आदिवासी नृत्यातदेखील ‘आम्ही हावो वारली’ किंवा ‘कोरकू’ असं म्हणून कोणी नाचत नाही. चित्रपटातून ज्ञानार्जन होतं ते असं. तसंच दुग्धक्रांती झाली नव्हती तेव्हाही सुहाग रात दुधाच्या ग्लासाशिवाय साजरी होत नव्हती. किंवा पुढे-मागे इतकं दूध उपलब्ध होणार आहे हे आधीच त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना कळलं असणार. तसं असेल तर द्रष्टेच म्हणायला हवं त्यांना.

पण हे सगळं खपवून घ्यायचे प्रेक्षक. आणि चित्रपट पुन:पुन्हा बघायला कारणंही तयार होती त्यांच्याकडे. मी आणि माझा मित्र आमोद ठाकूर सकाळी ‘अंदाज’ नावाचा चित्रपट बघायला गेलो होतो मॅटिनीला. तो देव आनंदवाला आणि मी दिलीपसाबचा भक्त. ‘दुपारी तुझ्याबरोबर देव आनंदचा ‘हिरा पन्ना’ बघायला येईन,’ असं वचन घेऊनच तो माझ्याबरोबर आला होता. ‘अंदाज’ जबरदस्त चित्रपट. दृश्य ऐन रंगात आलेलं. पडद्यावर स्वत: दिलीपकुमार, समोर राज कपूर, जोडीला नर्गिस! अजून काय पाहिजे दीड रुपयात? तर तितक्यात एका वाक्याला बाजूचा प्रेक्षक जोरात शिंकला आणि एक वाक्य ऐकू आलं नाही. आजूबाजूला शिव्यांची राळ उडाली. चित्रपट संपला आणि आम्ही बाहेर पडलो. ‘हिरा-पन्ना’ पाहिला. पण चुकलेल्या वाक्याची हुरहुर लागून राहिली होती. संध्याकाळी मी मित्राला विचारलं, ‘‘काय रे! तुला ऐकू आलं का रे ते वाक्य?’’ तो ‘नाही’ म्हणाला. ‘‘मग उद्या परत जायला लागणार! जाऊ या?’’ मित्र शांतपणे म्हणाला, ‘‘हो! पण परत दुपारी ‘हिरा-पन्ना’ला येशील?’’ दुसऱ्या दिवशी गेलो तर ‘अंदाज’ नव्हता. कारण त्या दिवशी शुक्रवार असल्याने नवा चित्रपट त्या जागी आला होता. नंतर काही ना काही कारणांनी ‘अंदाज’ बघायचा योगच येत नव्हता. खूप वर्षे लोटली.

आणि एके दिवशी कट्टय़ावर गप्पा मारताना अभिजीत देसाईला ‘अंदाज’ चित्रपटाचा सगळा किस्सा वर्णन केला. ‘‘अच्छा! साधारण काय सिच्युएशन होती?’’ मी प्रसंग सांगितला. तोही दिलीपसाबचा भक्त. क्षणार्धात तो उद्गारला! ‘‘हा.. तो डायलॉग ना? ‘ये सजावट नहीं, तुम्हारी नजर का धोखा है राजनबाबू!’ ’’ बास! इतक्या वर्षांनी तहान भागल्यासारखं झालं. त्यानंतर आमोद अमेरिकेहून काही दिवसांसाठी भारतात आला होता. भेटल्यावर त्याला लगेचच तो ऐकू न आलेला डायलॉग सांगितला. डोळ्यात अडकलेलं कुसळ निघाल्यानंतर जसा आपला चेहरा होतो अगदी तसा त्याचा चेहरा झाला होता. नंतर एकदा पुन्हा टीव्हीवर ‘अंदाज’ लागला होता, तेव्हा घरातल्या सगळ्यांना ‘चिडीचूप राहा!’ असं सांगून कानांत प्राण आणून तो डायलॉग ऐकला आणि मन शांत झालं! तारा जोडल्या आणि बल्ब पेटल्यावर एडिसन का कोण- जो असेल त्याला जसं वाटलं असेल अगदी तसं झालं. (हा शास्त्रज्ञ एडिसन की आणखीन कोण, हे लक्षात नाहीये. पण शम्मी कपूर आणि शंकर-जयकिशन यांनी एकत्र किती चित्रपट केले ते मात्र लख्ख आठवतंय. अगदी त्या पेटलेल्या बल्बसारखं.) नाटककार सुरेश चिखले माझा मित्र. त्याने ‘गाईड’ चित्रपट एकशे पंचाहत्तर वेळा मोजून पाहिला. आणि नंतर मोजणं सोडूनही खूपदा पाहिला. अख्खा चित्रपट त्याला तोंडपाठ होता.

त्या ‘गाईड’चा एक किस्सा आहे. एक गाणं विशिष्ट वेळेच्या आत संपवायचं होतं. म्हणून गाण्याच्या शेवटच्या कडव्यात म्हणे देव आनंदने वहिदा रेहमानच्या खांद्यावर हात असताना हळूच घडय़ाळात पाहिलंय. गाण्यांसाठी चित्रपट पाहणाऱ्यांना कुठलं गाणं टाळायचं, हेही माहीत होतं. ‘ज्युवेल थीफ’मधलं ‘रुला के गया सपना मेरा’ फार सुंदर गाणं.. पण त्या काळात आम्ही एकदाही ते पाहिलं नाही. आम्हीच नाही तर अनेक जण त्या गाण्याला बाहेर पडायचे आणि गाणं संपताच लगोलग परत यायचे. आता ते काहीच उरलेलं नाही. सकाळचे खेळ गेले. शुक्रवारची उत्कंठा गेली. मुख्य म्हणजे ती तगमगही आता उरलेली नाही. आजकाल कथा खऱ्या वाटतात. माणसं आपल्यातली वाटतात. संवादही खरे खरे असतात. पण चित्रपट मात्र आपले वाटत नाहीत. आता आजूबाजूला तसे प्रेक्षकही नसतात. वाऱ्या करणारे बहुधा आता नसतातच. कारण चित्रपटही आता तितका दीर्घ मुक्काम ठोकत नाहीत.

काही वर्षांपूर्वी एका नाटकाच्या दौऱ्यावर असताना मंगेश कदम, सुनील बर्वे आणि मी आमच्या हॉटेलच्या खोलीत बसून होतो. सहज म्हणून टी. व्ही. लावला. पडद्यावर चित्रपट सुरू होता. मधूनच बघायला सुरुवात केली. पडद्यावर फक्त एक ट्रेनचा दरवाजा होता आणि एक इसम तो दरवाजा ठोठावत होता. मी आणि मंगेश जवळजवळ एकाच वेळी ओरडलो.. ‘‘जुगनू!’’ सुनील बर्वे अवाक् झाला. ‘‘एवढय़ावरून तुम्ही चित्रपट ओळखलात?’’ पुन्हा आम्ही एकदम म्हणालो, ‘‘चंदन टॉकीजला पाहिला होता.’’ ‘जुगनू’ बघितला होता तेव्हा मंगेशची आणि माझी ओळख नव्हती. आणि ती का नव्हती, याचं अचानक वाईट वाटून गेलं. बाय द वे- त्या चित्रपटात मंगेश एका दृश्यात चक्क कलाकार म्हणून होता.

संजय मोने

sanjaydmone21@gmail.com

First Published on March 18, 2018 1:03 am

Web Title: author sanjay mone article on cinema of india