शिवाजी पार्कची सकाळ खऱ्या अर्थाने दुपारी संपते. अकरा-साडेअकरापर्यंत इथे ‘सकाळ’ म्हणून फिरणारे असतात ते सगळे निघायला लागतात आणि मग दुपारची मंडळी इथे येऊ  लागतात. झाडांच्या सावल्या ‘पकडून’ ती आपला डेरा टाकतात. काही मुलं असतात ती अभ्यास करायला येतात. आपली पुस्तकं-वह्य़ा घेऊन, आजूबाजूच्या वाहनांचा गोंगाट कानामागे टाकून एकतानतेने त्या मुलांचे एकलव्याप्रमाणे विद्याग्रहण सुरू असते. तर काही मोक्याच्या ठिकाणी शाळेतल्या गणवेशातील मुलामुलींचे हितगुज चालू असते.

‘‘घरी बोल ना! आपलं लव आहे म्हणून!’’

‘‘नाय रे! पप्पा मारतील मला.’

‘‘ए! माझं नाव सांग ना!’’

‘‘म्हणूनच मारतील बोलले. आपलं लव कोनालाच चालनार नाय!’’

या आणि अशा संवादांना ‘हितगुज’ याशिवाय दुसरा सभ्य शब्द मला तरी सुचत नाहीये. एकदा एक मुलगा तावातावाने फोनवर ओरडत होता,

‘‘..मग आपलं ब्रेक झालं समजू काय?’’

पलीकडून बहुधा त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच उत्तर आलं असावं म्हणून तो आवाज चढवून म्हणाला, ‘‘मला वाटलाच होता तू गद्दारी करणार. ठीक आहे. ब्रेक तर ब्रेक! अख्ख्या जिंदगीत तुझं नाव घेणार नाही. एकटाच जगनार.. आता फायनल एकच काम कर आपल्यासाठी.’’

चौदा-पंधरा वर्षांचा मराठी मुलगा ‘जिंदगी, गद्दारी’ अशा उर्दू शब्दांनी आपल्या प्रेमाच्या थडग्याला महिरप लावत होता. आता ‘फायनल काम’ कोणते याबद्दल मला फार उत्सुकता लागून राहिली. काय असेल त्याचे ते काम? कारण दुसऱ्या एका मुलाने ‘‘एक फायनल किस मारून जा..’’ असं मनोगत व्यक्त केलं होतं. आता याची काय मागणी असेल? तितक्यात तो धुमसत्या आवाजात म्हणाला, ‘‘फायनल रिचार्ज मार पन्नासचा!’’

वा! प्रेमाच्या ऐन भरातही त्याला आपल्या ढासळत्या अर्थसंकल्पाची जाणीव होती.

मैदानात दुपारी गर्दी असते ती क्रिकेटच्या सामन्यांच्या खेळाडूंची. त्यात फार काही गंमत नसते. आणि हल्ली फार गंमत त्यात उरलेली नाहीये. कट्टय़ावर खरे नाटय़ रंगत असते. काही फिरते विक्रेते आपल्या गटासकट प्रत्येकाचा ‘सेल आणि ऑर्डर्स’ यांचं गणित सोडवत असतात. समुद्राच्या बाजूच्या कट्टय़ावर काहीजण ‘सब भूमी गोपाल की’च्या थाटात चक्क ताणून देऊन घोरत असतात. तर काही घर आलं अशा समजुतीने तिथे लोळत असतात. त्यांच्या पोटातला द्रव पदार्थ त्यांना स्थळ-काळ-वेळ यांचं भान विसरवून टाकतो. असं भान न विसरलेले मात्र पार्कातल्या जिमखान्यातून संथ गतीने दुपारच्या जेवणासाठी ‘घराकडे अपुल्या’ कूच करत असतात. सरबते आणि बर्फाचा गोळा विकणारे ऐन जोरात आपला व्यवसाय करत असतात. अशाच कुठल्यातरी कोपऱ्यात काही माणसं बसलेली असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नाहीत. ‘एकाकी’ किंवा ‘सगळ्यापासून दूर गेलेले’ याच शब्दांत त्यांचं वर्णन करता येईल.

असाच एक ग्रुप असायचा आमच्या कॉलेजच्या काळात. आता आम्ही त्या काळात कॉलेज न करता पार्कात काय करायचो, हा प्रश्न इथे गैरलागू आहे. तर एक जण असायचा- जो जोरजोरात संयुक्त महाराष्ट्राचे संदर्भ देत भाषणं ठोकायचा. अत्यंत मुद्देसूद आणि ओघवती शैली होती त्याची. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, सानेगुरुजी आणि इतरांची भाषणे त्याला शब्दश: मुखोद्गत होती. त्याच्यासाठी काळ १९६० सालीच थांबला होता. एकदा आम्ही काही मित्रांनी त्याला ‘मुंबईसह महाराष्ट्र कधीच झाला!’ असं सांगितलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘पण समस्या अजून त्याच आहेत.’’ यावर काय बोलणार?

दुसरा एक होता त्याला संपूर्ण शिवाजी पार्कवर एक छप्पर घालून हवं होतं. ‘‘सगळ्या घर नसलेल्या लोकांना विचार करायला चोवीस तास एक हक्काची जागा होईल..’’ असा त्याचा दावा होता. ‘राष्ट्रपतींना पत्र पाठवायचं आहे, पत्ता द्या..’ असं तो सगळ्यांना सांगायचा. पुढे तो कुठे गेला, कोणास ठाऊक! एकजण होता तो सकाळ-संध्याकाळ वाहतूक कंट्रोल करायचा. त्याच्या तोंडावर लोक सिग्नल तोडून जायचे आणि हा त्यांच्या मागे धावायचा. शेवटी एका माणसाने त्याला सांगितलं, ‘‘हे सिग्नल तोडणारे सगळे सुशिक्षित आहेत. त्यांना अजून शिक्षणाची गरज नाही. अशिक्षित होण्याची गरज तुम्हाला आहे.’’ त्यानंतर एका आठवडय़ात तो गेला. आजही अनेक उच्चशिक्षित लोक त्याच्या स्मरणार्थ कायदेभंग करून त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी झटत आहेत.

असं हे पार्क आणि त्याची दुपार सरत जाते आणि येते संध्याकाळ.. जेव्हा शिवाजी पार्क खऱ्या अर्थाने फुलून येते. सगळ्यात पहिल्यांदा पाचच्या सुमारास काही वरिष्ठ नागरिक- स्त्रिया आणि पुरुष- येऊन बसतात. काही काळाने त्यांचे त्यांचे आपले गट स्थापन होतात. त्यात काहीजण अगदी नव्याने येऊ  लागलेले असतात. सकाळीही ते अगदी नऊ-साडेनऊ वाजता लोंबकळत बसताना दिसतात. नुकतेच निवृत्त झाल्याने आता त्यांची किंमत घरातला कर्ता अगर कर्ती अशी उरलेली नसते. अगदी अडगळ नाही म्हणता येत, पण कुठेतरी त्या सीमारेषेवर ते आलेले असतात. घरच्यांना त्यांचं असणं खुपत असतं म्हणून आपला जीव रमवायला ते तिथे येऊन बसतात. त्यांच्या चेहऱ्यावर केविलवाणा भाव असतो. आणि त्यांच्या अगदी विरुद्ध असा नुकताच कॉलेजात जाऊ  लागलेल्या मुलामुलींचा एक थवा असतो. त्यांचं येणं, वावरणं, नवनवीन शब्दांची ओळख झाल्याने त्यांचा मुक्तपणे वापर करणं.. सगळाच मामला फार गमतीचा असतो. मोबाइलवर असलेल्या वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिकं चालू असतात त्यांची. आजूबाजूला अनेक नवनवीन खाण्याच्या गाडय़ा लागलेल्या असतात. भेळ, वडापाव, पावाचे पदार्थ यांचा हातोहात फन्ना उडवत त्यांची तावातावाने चर्चा चालू असते. सगळं जग इंग्रजी ‘एफ’ किंवा त्या प्रकारच्या शिव्यांच्याच लायकीचं आहे असा त्यांचा दृढ आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत असतो. एक गोष्ट मात्र ते कटाक्षाने पाळतात. कुठेही जरा काही वावगं दिसलं की लगेच त्याचे फोटो ते त्यांच्या मोबाइलमधून social media वर टाकायला अजिबात चुकत नाहीत. तसेच कट्टय़ावर खाल्लेल्या पदार्थाच्या प्लेट्स तशाच कट्टय़ावर सोडून जाण्यात त्यांच्याकडून कसलीही कसूर होत नाही. पार्कात सगळ्यात मौज असते ती म.न.से.च्या सेल्फी पॉइंटवर. मस्त मजेत लोक फोटो काढून घेत असतात. हल्ली ब्लाऊज शिवायला एक बाई येते असंही मी ऐकलंय. शिवाय हातापायाच्या नखांची निगा राखणारेही काहीजण आपला जोरदार धंदा करत असतात. संध्याकाळी धावायला येणारी एक नवीन जमातही उदयाला आली आहे. त्यांच्या व्यायामात येणाऱ्या माणसाला धक्का मारणे हाही एक प्रकार आहे की काय देव जाणे! हे सगळं होता होता संध्याकाळ टळत जाते आणि मालिशवाले अवतरतात. रस्त्यावर आडवे पडून अंग रगडून घेण्यात काय सुख आहे, देव जाणे! चांगल्या चांगल्या घरातली माणसे अशी रस्त्यावर पडली राहिलेली बघताना फार वाईट वाटतं.

सहा डिसेंबर आणि त्याच्या आसपासचे दोन दिवस म्हणजे पार्कातल्या लोकांसाठी जणू बंदीचेच. त्यानिमित्त येणाऱ्या लोकांवर टीका करणं हे त्यांचं राखीव कुरण. (‘राखीव’ या शब्दात कुठलीही कोटी नाही.) त्या दिवसांत दुसरीकडे कुठे फिरायला जायचं यावर चर्चा रंगवणं त्यांना फार आवडतं.

‘‘एकदम सगळं अग्ली हो! काय करावं कळत नाही..’’ इथून संवादाला सुरुवात होते आणि ‘‘आम्हीही नागरिक आहोत. आम्हाला काही हक्क आहेत की नाहीत?’’ इथपर्यंत विषय ताणला जातो.

एकदा सहज मी अशा चर्चा मंडळात डोकावलो.

‘‘या! एक कलावंत म्हणून तुम्हाला काय वाटतं?’’

‘‘कशाबद्दल?’’

‘‘हे लोकं येतात आणि सत्यानाश होतो हो!’’

मी जरा चिडलोच.

‘‘पंढरपूरला गेला आहात का कधी?’’

‘‘त्याचा इथे काय संबंध?’’

‘‘मी गेलो होतो. मला तिथले लोक म्हणाले, ‘तुमच्या शिवाजी पार्कचे लोक इथे येऊन सत्यानाश करतात हो आमच्या शहराचा.’ त्याचं काय करणार?’’

‘‘आम्ही नव्हतो गेलो ती घाण करायला.’’

‘‘मग निदान आपले हे बांधव नेमाने येतात, श्रद्धेने येतात.. त्याला काही मार्क्‍स द्याल की नाही? आणि काय हो, विसर्जनानंतर काय आपल्या पार्कात नंदनवन असतं काय? दुर्गापूजेच्या दहा दिवसांत काय स्वच्छता नांदते इथे? आणि परवा तुम्ही कसली तरी पार्टी केलीत कट्टय़ावर- तेव्हा सगळा कचरा इथेच टाकून गेलात, त्याचं काय करणार?’’

‘‘तुमच्याशी वाद घालायला वेळ आहे कुणाला? आमच्याशी पटत असेल तर बोला.’’

रात्र झाली म्हणून मी निघालो. पण ‘आम्ही म्हणतो तेच खरं. विरोध कराल तर तुम्ही मूर्ख. कारण आम्ही शिवाजी पार्कीय!’ हे त्या गृहस्थांचं ठाम आणि पक्कं मत होतं. जेव्हा शिवाजी पार्क अस्तित्वात आलं अगदी तेव्हापासूनचं..

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com