06 August 2020

News Flash

तदेव लग्नम्..

आपल्या सुभ्याच्या लग्नात त्यावरून त्याची आणि भटजींची मारामारी झाली.

प्रतिनिधिक छायाचित्र

आता लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. पण आंतरपाटच नेमका कुठेतरी गहाळ झालेला असतो. अनेकांच्या माता-पित्यांची नम्र आठवण (मनातल्या मनात) काढून तो शोधला जातो. नवरा-बायकोच्या गळ्यात घालायचे हार सकाळीच आणल्यामुळे आपसात गुंतलेले असतात. पालकांचा जीव घाईला आलेला असतो. आणि मांडवात मात्र..

मागच्या आठवडय़ात केटरर घरी येऊन काही काळ कलह माजवून गेला ते आपण वाचलंच असेल असं मी गृहीत धरतो. आता मूळ लग्नाच्या प्रसंगाला फार थोडे दिवस उरलेले असतात. तरी वधू-वराच्या घरी वाद चालूच असतात. त्यातला मुख्य वाद म्हणजे बोलावणी. कारण दोन्ही बाजूला काही अवघड नातेवाईक असतात. एकीकडे- ‘‘बापूकाका नको? अगं, केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्या घरावर! माझं सगळं शिक्षण त्यांनी केलंय.’’

‘‘पण बदल्यात त्यांच्या माडांवर चढून नारळ काढून देत होता ना त्यांना? त्यातच एकदा पडलात वरून आणि पायात खोड आली ना तुमच्या! मीच होते म्हणून ‘हो’ म्हटलं लग्नाला. आणि या झाडावरून त्या झाडावर उडय़ा मारून नारळ कशाला काढायला गेलात? काय लंकादहन करायचं होतं?’’

तर दुसरीकडे- ‘‘तुझा तो भगवंतमामा नको. फार तर संध्याकाळी बोलाव. विधी चालू असताना भटजीला शंका विचारत बसतो. आपल्या सुभ्याच्या लग्नात त्यावरून त्याची आणि भटजींची मारामारी झाली. दोघे रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकांना मारता मारता बासुंदीच्या पातेल्यात पडले. दोघांना पोलिसांनी अटक केली. सगळा चुथडा झाला लग्नाचा. भगवंतमामा नको!’’

..या वादांमुळे होणारे लग्न सोडाच; पण झालेली मोडतील की काय, असा प्रश्न निर्माण होतो. मग तरुणांकडून एक मागणी होते- ‘‘हे काय.. संगीत नाही? मग काय मज्जा?’’

‘‘नको. आपण काही सिंधी-पंजाबी आहोत? आणि लग्नाचे सगळे विधी आपण का कमी करत आलोय? सगळं आटोपशीर व्हावं म्हणून ना? मग आता हे संगीतफिंगीत कुठे वाढवत बसता?’’

त्यातून ‘मुलांना हौस असते म्हणून हो!’ असा एक मुद्दा पुढे येतो. आणि मग आदल्या दिवशी एकदाचा ‘संगीत’ हा कार्यक्रम घडतो.

लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी ‘साडी तेव्हा बरी वाटली होती.. पण आता अंमळ फिक्कीच वाटत्येय नाही?’ अशी प्रश्नवजा चिंता अचानक आडवी येते. मग बदलायला कोण जाणार यावर चर्चा होते. एखादा पुरुष सगळं पटकन् व्हावं म्हणून जायला तयार होतो. त्यावर लगेच- ‘‘तुम्ही? नको. मागे एकदा मी म्हणाले, ‘अहो, जरा ही बदलून वांगी रंगाची आणा..’ तर पांढरी घेऊन आले.’’

‘‘आता आमच्या कृष्णाकाठी पांढरीच वांगी मिळतात. आणि काय एवढं रंगाचं? त्या साडीचं काय भरीत करायचं असतं?’’

शेवटी कोणीतरी साडी बदलून आणायची जबाबदारी घेतं आणि वाद टळतात. एकंदरीत वाद होणं आणि ते टाळले जाणं हेच चालू असतं. कसातरी लग्नाचा दिवस उजाडतो. सकाळी दोन्ही बाजूच्या घरी काय स्थिती असते ते सांगणं कठीण आहे, परंतु मंगल कार्यालयात आल्यावर मात्र हा समारंभ म्हणजे एक बुद्धिबळाचा सामना आहे असं वाटायला लागतं. कधीतरी वधूपक्षाला यायला एक मिनिट उशीर होतो. त्यावरून ‘पोच नाही अगदीच. प्रसंगाचं गांभीर्य म्हणून नाही..’ इथपासून ‘दोन मिनिटांच्या उशिरामुळे नेपोलियन लढाई हरला होता’पर्यंत मुक्ताफळं उधळली जातात. तेवढय़ात हॉल उघडून देणारा नाहीये हे कळतं. काही वेळ सगळे ताटकळत बसतात आणि मग तो माणूस येतो.

‘‘कुठे गेला होतास?’’ कुणीतरी वसकन् ओरडतो. त्याला कवडीची किंमत न देता तो शांतपणे जवळच्या किल्ल्यांच्या जुडग्यातून एकेक किल्ली कुलपावर चालवत असतो. खरं तर त्याचं हे रोजचं काम; तरीही त्याला चावी लक्षात का राहत नाही देव जाणे! शेवटी एकदाचे कुलूप उघडते आणि तो माणूस ‘नाश्ता करायला..’ एवढेच शब्द उच्चारतो. मधे बराच वेळ गेल्याने हे कशाचे उत्तर होते हेच कोणाला कळत नाही, म्हणून मग तो स्पष्टीकरण देतो-

‘‘साला इथला नाश्ता भुक्कड असतो. केटरर आहे की बैल?’’ माणसातून केटररची गणना एकदम प्राणी विभागात झाल्यामुळे दिवसभर काय खायला मिळणार याचा साक्षात्कार दोन्ही बाजूंना होतो. रीतसर पायबिय धुऊन मुलीचा मामा नारळ फोडायला जातो. हा मामा कुठल्याही लग्नात शांतपणे जात नाही; तीरासारखा कुणावर तरी धावून जावं तसा का जातो देव जाणे! हळूहळू लोक स्थिरावतात. वर आणि वधू असं लिहिलेल्या खोल्यांत ठाण मांडतात. हल्ली काही ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन्सही मागवल्या जातात. त्याची माणसं आधीच येऊन ‘कुत्ता जाने, चमडा जाने’ अशा आविर्भावात मख्खपणे बसलेली असतात. आता सावकाश एकामागे एक नातेवाईक येऊ  लागतात.

‘‘कसली गर्दी हो गाडय़ांना? त्यापेक्षा ती मद्राशांची लग्नं बरी. पहाटेचा मुहूर्त असतो.’’

‘‘आणि कसला कोपऱ्यात आहे हा हॉल? एकालाही पत्ता माहीत नाही. वर आमची बायको! पत्रिका गेली रद्दीत. पत्ता आठवत नाही. जो-तो म्हणतोय- कुठला काका कळंबे पथ? या काक्याला पण रस्त्यावरच येऊन पडायचं होतं? जरा हमरस्ता तरी बघायचा.’’

‘‘मग सापडला कसा?’’

‘‘रॉयल बारच्या मागच्या बाजूला आहे, असं एकाने सांगितलं तेव्हा आलो.’’

‘‘अरे वा! मागच्या बाजूला बार आहे का?’’ या प्रश्नामागचा आनंद फार थोडय़ा लोकांना कळेल!

एका टॅक्सीतून तेवढय़ात सनईवाले येतात. बरोबर चौघडेवाले असतात. मागून एक जण ऑफिसात न्यायच्या बॅगेसारखं एक वाद्य घेऊन येतो. इतकी लग्नं पाहिल्येत मी. शिवाय एक स्वत: केलंय. पण तो बॅगवाला काय वाजवतो, मुळात ते वाजतं का, हे आजवर कळलेलं नाही. सनईवाले आणि सहकारी शांतपणे आपला जामानिमा उलगडतात. तेवढय़ात त्यांच्याजवळ एक इसम येतो.

‘‘काय वाजवाल?’’

‘‘सांगाल ते.’’

‘‘ ‘दैव जाणिले कुणी’ वगैरे नको.’’

‘‘साहेब! तेवढं कळतं आपल्याला.’’

‘‘हो! पण सांगून ठेवतो.

एका लग्नात ‘बायको माझी पाहुणी, आवडली मेहुणी’ हे गाणं वाजलं होतं!!’’

त्यावर सनईवादक ‘घाबरू नका’ असं म्हणतो आणि सूर लावतो. बऱ्याच लग्नांत वाजवणं कमी आणि सूरच जास्त वेळ असतो. पण आजूबाजूला इतके सूर लागलेले असतात, की यांचं सगळं त्यात दबून जातं. या सुमारास फेटे बांधणारा माणूस त्याचं सैन्य घेऊन हॉलच्या दारात हजर होतो. माफक चर्चेनंतर एक माणूस रंगीत कापडं उलगडायला लागतो आणि मूळ माणूस ‘धर माणूस की पकड मुंडी आणि आवळ फेटा’ या चालीवर फेटे बांधायला लागतो. काही वेळात लग्नघर फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा लग्नाला आल्यासारखे लाल-शेंदरी दिसायला लागते! काही जणांचा चष्मा आत अडकलेला असतो, त्यांना तो सोडवून घ्यायला पुन्हा फेटा बांधला जातो आणि ‘एक्स्ट्रॉ माणूस.. एक्स्ट्रॉ पैसे’ असं सांगून फेटेवाला वर पैसे उकळतो. त्या पैशावरून भर मांडवात.. ‘‘दिवाकरकाकांनी मुळात फेटा बांधायचा कशाला? पठ्ठे बापूराव समजतात की काय स्वत:ला?’’

‘‘असू दे! असते हौस एकेकाला. त्यावरून आता नका चिडू.’’

‘‘आम्हालाही सुंदर बायकोची हौस होती. म्हणालो कधी पुरवा म्हणून?’’

.. अशा तऱ्हेची कुरबुर होतेच.

आता लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. आंतरपाट नेमका कुठेतरी गहाळ झालेला असतो. अनेकांच्या माता-पित्यांची नम्र आठवण (मनातल्या मनात) काढून तो शोधला जातो. नवरा-बायकोच्या गळ्यात घालायचे हार सकाळीच आणल्यामुळे आपसात गुंतलेले असतात. पालकांचा जीव घाईला आलेला असतो. आणि मांडवात मात्र..

‘‘ऐका! तुम्ही बायोकॉम घ्याच. पंधरा दिवसांत दुप्पट होतोय.’’

‘‘बरी आहे का शुगर आता?’’

‘‘अं.. ती लाल साडीवाली कुसुमची मुलगी ना हो? मधे बरंच काही ऐकलं तिच्याबद्दल. खरं आहे का हो?’’

‘‘काय मग? लगेच जेवणार का काही श्रमपरिहार?’’

‘‘अं! पण ‘डोण्ट ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ आहे ना?’’

‘‘ड्रायव्हर आहे आपल्याकडे! चला!’’

.. असे विविध पातळीवरचे संवाद झडत असतात.

एक गोष्ट मात्र हटकून होते हल्ली. दोन्ही बाजूच्या एकेका माणसाला आदल्या रात्रीच्या मंद सुगंधाने एकमेकांचे खरे नाते समजून येते आणि मागच्या बाजूला असलेल्या रॉयल बारमध्ये ते पक्के करायला दोघेही कूच करतात. पुढे एक वेळ होणारे लग्न मोडते, पण त्या दोघांचा ‘एकच प्याला’चा प्रयोग अनेक वर्ष चालू राहतो!

इकडे आता मंगलाष्टकं सुरू झालेली असतात. आधी सांगूनही अत्यंत बेसूर आणि भेसूर शब्दांत स्वरचित काव्य सादर होते. त्या काव्यात जिथे ‘समजे’ हा शब्द जेमतेम मान मोडून बसेल तिथे ‘हातकणंगलेकरांची अनुराधा’ हे शब्द कोंबून बसवले जातात. लग्न लागते. वधू-वरांना भटजीच्या ताब्यात देऊन सगळे लोक निघून जातात. एकाही लग्नात मी तिथे चार लोक उभे राहिलेत असं दृश्य पाहिलेलं नाही. बुफे असेल तर सगळे रांगा लावायला लागतात. इकडे भटजींच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांतून ‘हाताला हात लावा’, ‘मम म्हणा’, ‘आता या बाजूने पाणी सोडा’.. या आणि अशाव्यतिरिक्त कुठल्याही शब्दांचा बोध होत नाही. जेवणारे जास्त आणि टेबलं कमी अशी मांडणी नेहमीच असते. मग वयाने मोठे असणाऱ्या लोकांना त्यावर बसवले जाते.

आतल्या बाजूला केटरर.. ‘‘साले काय बकासूर आलेत काय जेवायला? रश्श्यात बटाटा वाढव आणि जरा तिखट मार.. ए गाढवा! त्या पराठय़ांना मेन मेन माणसं जेवली की तूप पुरे, गरम पाणीच लाव..’’ अशा ऑर्डर्स देत असतो.

मग कशीबशी जेवून सगळी मंडळी निघून जातात. आणि ज्यांनी हा खर्च केला त्यांना अन् ज्यांच्यासाठी हा खर्च झालेला असतो त्यांना चार घास कसेबसे खायला मिळतात!

ज्यांनी लग्न अनुभवलंय त्यांना हा अनुभव पुन्हा नकोसाच वाटणार. आणि ज्यांनी हे अनुभवलं नाहीये त्यांनी खुशाल करा लग्न!

संजय मोने sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2018 1:01 am

Web Title: author sanjay mone article on wedding experience
Next Stories
1 लग्न.. द इव्हेंट!
2 लग्नाची बैठक..
3 ट्रिप-पुराण
Just Now!
X