|| संजय मोने

मागच्या आठवडय़ातल्या लेखात ‘‘तो’ दिवस उजाडला..’ असं लिहून लेख अर्धवट सोडला होता. पण त्यात काही उल्लेख किंवा काही तपशील वा उल्लेखनीय तपशील राहून गेला होता. काही घडामोडी (ज्या बहुतेक वेळेला आर्थिक असतात आणि अत्यंत महत्त्वाच्या असतात.) राहून गेल्या होत्या. म्हणूनच त्या सगळ्या घटनांचा आणि इतर गोष्टींचा ऊहापोह केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि चित्रपट निर्मितीच्या व पश्चात निर्मितीच्या वेणा उलगडून सांगता येणार नाही.

तर.. सगळ्या अडचणींवर मात करून आता चित्रपट पूर्ण झालाय, किंवा त्याचा काही भाग राहून गेलाय, हे निर्मात्याचा लक्षात आणून दिलं जातं. इथपर्यंत येऊन मी थांबलो होतो. ‘राजा हरिश्चंद्र’नंतर अडचणी न येता पुरा झालेला चित्रपट जवळजवळ नाहीच. बऱ्याच वेळा बाकी सगळं झालेलं असतं, पण तांत्रिक बाबींच्या खर्चाचा ताळमेळ लावायचा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जितक्या पशात चित्रपट पूर्ण होणार असं आधी निर्मात्याला सांगितलेलं असतं त्यापेक्षा ऐन वेळेला अजून काही पशांची गरज निर्माण होते. आता एकदा ऐन वेळेला म्हटलं की ती वेळ नक्की सांगता येणारी नसते. म्हणजेच अचानक निर्मात्याला मानसिक आणि आर्थिक धक्का बसावी इतकी ती रक्कम असते. पंचवीस ते पंच्याहत्तर इतकी तर ती असतेच असते. आता हे हजार तर निश्चितच नाहीत. लाखच असतात. तेवढय़ा पशांची तरतूद झाली नाही तर चित्रपट पूर्ण होऊन तो पडदा बघणार नाही याची जाणीव निर्मात्याला करून दिली जाते. आतापर्यंत त्या बिचाऱ्याचे आधीच बरेच पसे खर्च झालेले असतात. त्या खर्चाचा सगळा तपशील मात्र चोख दिलेला असतो. परंतु अपुरा चित्रपट काही प्रदíशत होणं शक्य नसतं. कारण तो बघायला कोण येणार? त्यामुळे उरलेल्या पशांची सोय करणं एवढंच त्याच्या हातात असतं. ती सोय भल्याबुऱ्या कुठल्याही मार्गाने होते. काही चाणाक्ष लोक उरलेले पसे घालून चित्रपट पूर्ण करायची हमी घेतात. पण यात त्यांनाही एक हमी हवी असते. ती म्हणजे प्रदर्शनानंतर जो काही गल्ला गोळा होईल त्यात पहिल्यांदा त्या माणसाचे पसे काढून घेऊन त्याला मोकळा करणे. ‘मरता क्या न करता?’ या न्यायाने निर्माता त्याला होकार देतो.

मागच्या लेखात मॉलमध्ये कलाकारांना नेऊन तिथे जाहिरात करण्याच्या टुमबद्दल सांगितले होते. त्यासाठी निर्मात्याला असे सांगण्यात येते- ‘‘साहेब! चित्रपटाच्या आधी वेफर्स आणि शीतपेये तसेच इतर पदार्थाची जाहिरात नाही का करत? त्यामुळे त्या पदार्थाची तुफान विक्री होते. म्हणून आपण जर  मॉलमध्ये आपल्या चित्रपटाची जाहिरात केली तर आपल्यालाही तुफान विक्री होईल.’’

या समीकरणाला मान तुकवण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय निर्मात्याकडे उरलेला नसतो. आणि याच वेळी त्या निर्मात्याच्या शहरात लायन्स किंवा इनरव्हीलसारखा एखादा समूह असतो, तो एक समारंभ घडवून आणतो. त्या समारंभात ‘आगामी चित्रपटाचे भावी निर्माते’ अशी ओळख करून देऊन या निर्मात्याला एक पुष्पगुच्छ देऊन (त्यातही पुष्प कमी आणि पानांचा गुच्छच जास्त असतो.) सत्कार केला जातो. जरी त्या समारंभातल्या निवेदकाला त्या चित्रपटाचे निश्चित नाव माहीत नसले तरी तो ती निर्मिती जागतिक दर्जाची होणार आहे असा आशावाद व्यक्त करतो. आणि इतर सभासद नंतर होणाऱ्या भोजन समारंभात ‘चित्रपट पाहायला नक्की येणार..’ अशी ग्वाही देतात. या सगळ्या प्रसंगानंतर झालेल्या जल्लोशामुळे निर्मात्याचा ओसरत जाणारा उत्साह ‘केला जरी पोत बळेची खाले ज्वाला तरी ती वरती उफाळे’ या कवितेतल्या ओळींप्रमाणे पुन्हा एकदा जोर धरतो. आणि आपल्या या चित्रपटाने बरीच मोठी उलथापालथ सांस्कृतिक क्षेत्रात होणार याबद्दल त्याच्या मनात कुठलीही शंका उरत नाही आणि तो आपल्या बटव्याच्या दोऱ्या सल सोडतो.

त्या सुटलेल्या दोऱ्या अजून सल करून त्या चित्रपटाचा निर्मिती प्रमुख पुढच्या तयारीला लागतो. पूर्वी निर्मिती प्रमुख हे एकच बिरुद सगळी कामं करणाऱ्या माणसाला लागायचं. फार फार तर त्याला ‘मॅनेजर’ म्हटलं जायचं. आता त्याच कामांची विभागणी करून तीन-चार नवीन नावं देऊन तितकीच माणसं तेच काम करू लागली आहेत. त्यातलाच एक जण गावोगावी एफ. एम. चॅनेल्सच्या शाखा झाल्या आहेत तिथे कलाकारांना घेऊन जाऊन त्यांच्या मुलाखती आयोजित करतो. त्या- त्या ठिकाणचे मुलाखत्ये- ज्यांना आता ‘रेडिओ जॉकी’ असं संबोधलं जातं- ठरावीक साच्याच्या मुलाखती उरकून घेतात. त्यांचे प्रश्न ऐकून बऱ्याचदा हसावं की रडावं, तेच कळत नाही. साधारण त्यांचे प्रश्न एकाच छापाचे असतात. बरं, त्यांना या व्यवसायातल्या कलाकारांची पुरेशी माहिती बहुतेक वेळेला नसतेच. सचिन पिळगावकर किंवा अशोक सराफ यांच्यासारख्या मान्यवर कलाकारांना (ज्यांनी चाळीस-पन्नास वर्षे या व्यवसायात काम केले आहे त्यांनाही..) ‘आपण या व्यवसायाकडे कसे वळलात?’ असा प्रश्न विचारायची हिंमत ही मंडळी करू शकतात ती केवळ अज्ञानाच्या बळावरच! उरलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे असतात..

‘काय सांगाल या तुमच्या नव्या चित्रपटाबद्दल?’

काय सांगणार दहा मिनिटांत? त्यात परत ‘आपण ऐकताय धतिंग धनंजय किंवा क्यूट काíतकी यांना ढमुक ढमुक चॅनेलवर..’ हे चालूच असतं त्यांचं. आता तिथे दिसत काहीच नाही; फक्त ऐकू येतं. त्यामुळे तो किंवा ती धतिंग किंवा क्यूट आहे, हे कसं कळणार? आपल्याकडे कुठल्याही कार्यात जसं ठरावीक अंतराने ‘मम् म्हणा!’ हे ऐकू येतं, तसं थोडंसं हे ऐकू येतं. एकदा मी माझ्या मुंजीत विधी चालू असताना भटजींना विचारलं, ‘‘गुरुजी! समजा, मी नाही म्हटलं मम्.. तर काय होईल?’’ भटजींनी आपला राग जवळच असलेल्या पाण्याच्या पेल्यातला घोट घेऊन गिळला आणि ते स्वत:च ‘मम्’ म्हणाले. त्या वेळेला माझा नुकताच निर्माण झालेला घेरा आणि त्याची शेंडी माझ्या एका नातेवाईकाने इतक्या जोरात पिरगळली, की अजूनही ती कधी कधी दुखते. विशेषत: अशा चॅनेलला मुलाखत देताना विशेष. बिचारा निर्माता या कार्यक्रमात असेल तर तो ‘‘बरीच र्वष माझ्या मनात होतं की एखादा चित्रपट निर्माण करावा. पण योग्य कथा मिळत नव्हती. या चित्रपटाच्या रूपाने ती मिळाली. समाजातल्या अनिष्ट प्रथांना कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून हा चित्रपट मी निर्माण केला.’’

हा निर्माता इतर वेळेला आयुष्यभर कापडातल्या अनिष्ट भागांना वेगळं काढून भंगार सामानात विकण्याचा उद्योग करून दोन वेळचं अन्न, एक बंगला, तीन गाडय़ा, बाहेर कुठेतरी पाच-सात एकर जमीन एवढी मालमत्ता कमावून बसलेला असतो. ती दुप्पट करायच्या ऐवजी तो आता या प्रथांचं निर्मूलन करायची खटपट का करतो?

रेडिओ जॉकीचा पुढचा प्रश्न..

‘‘चित्रीकरणाच्या काही गमती सांगा ना!’’

चित्रपटात आपण काम करायला आलोय; गंमत करायला नाही.. हे एकदा कोणीतरी या जॉकी लोकांना ठणकावून सांगेल का? पण नाही! बरेच कलाकार काय काय गमती घडल्या ते सांगतात. सगळे त्यावर खोटं खोटं, पण खदाखदा असतात. आणि मुळात जी दहा-पंधरा मिनिटं मिळालेली असतात त्यातला अर्धा वेळ यातच खातात.

‘‘अमुक तमुकबरोबर काम करताना काय अनुभव आले तुम्हाला?’’

कुठे सांगणार आता आलेले खरे अनुभव? मग ‘फारच छान! ग्रेट! ऑसम!’ वगरे शब्द वापरून प्रसंग साजरा केला जातो.

‘‘या चित्रपटातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता?’’

प्रत्येक चित्रपटाने संदेश दिलाच पाहिजे का? मुळात चित्रपट हा मनोरंजनासाठी प्रामुख्याने निर्माण होतो की नाही? सर्कसवाले देवल, चांदीची भांडी बनवणारे देवल, नाटककार देवल आणि चित्रपटातले सनी, बॉबी व धर्मेद्र देवल हे सगळे परमेश्वराने वेगवेगळे उगाच निर्माण केले का? त्याला काय एकाच माणसाकडून ही सगळी कामं करवून घेता आली नसती? राज कपूरने स्त्री-शिक्षणात पडू नये आणि आगरकरांनी चित्रपट निर्मिती करू नये असंच त्याला वाटत असणार. प्रत्येकाने आपले काम करावे यासाठीच हा भेद आहे ना?

या मुलाखतीत ते जॉकी जे प्रश्न विचारतात त्यांची भाषा तपासण्यासारखी असते. एकाच प्रश्नात बरंचसं इंग्रजी, मराठीचा तीव्र गंध येणारं थोडंसं हिंदी आणि मराठी चॅनेल आहे म्हणून नाइलाजाने लाजत लाजत उरलेलं आपलं बिचारं मराठी अशा तिहेरी कडबोळ्यातून स्वनिर्मित भाषेत ही प्रश्नोत्तरे होतात. एका शहरात पाच-सहा ठिकाणी या मुलाखती होतात. त्या कोण, कधी आणि किती जण ऐकतात याचा पत्ताच लागत नाही. चित्रपट कधी आणि किती ठिकाणी लागणार हे ठरवणारे लोक वेगळेच असतात. शेवटच्या क्षणापर्यंत कशाचाच अंदाज येत नाही. टीव्हीवरही चित्रपटाची जाहिरात सुरू होते. ती टीव्हीवरच्या कार्यक्रमांच्या महासागरात सुई शोधावी इतकी नगण्य असते. वर्तमानपत्रांतून जाहिराती येतात त्यांचीही तीच गत असते. वेगवेगळ्या गावी जाऊन सगळा खर्च केल्यानंतर निर्मात्याला गल्लाबिल्ला काय गोळा होईल तो पुण्यात; बाकी सगळा आनंद आहे, हे कळते. पण आता सगळ्याला उशीर झालेला असतो. कारण निर्माता आणि त्याच्या घरचे खास पहिल्या खेळाला घालायच्या कपडय़ांची खरेदी करण्यात मग्न असतात.

शेवटी चित्रपट झळकतो. ओळखीचे येऊन तारीफ करतात. ती फुकट पासवाल्यांची तारीफ असते. तिला काहीच अर्थ नसतो. लागल्यानंतर एका आठवडय़ात चित्रपट खाली उतरतो. निर्मात्याचे नवीन शिवलेले कपडे त्याच्या व्यवसायानिमित्त होणाऱ्या पुढच्या मीटिंग्जना उपयोगी येतात, एवढंच. याशिवाय आता त्या चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं काहीही उरलेलं नसतं.

शेवटी तो निर्माता आपल्या गावच्या जमिनीचा एखादा तुकडा विकून चित्रपटसृष्टीच्या सगळ्या ऋणातून मुक्त होतो.

sanjaydmone21@gmail.com