01 March 2021

News Flash

फ्लोरा

एक दिवस अचानक वर्तमानपत्रात ‘फ्लोरा’ बंद होणार म्हणून सगळीकडे बातमी पसरली.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

संजय मोने

मागच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील एक चिनी उपाहारगृह पन्नास वर्षांनंतर कायमचे बंद झाले. वरळी येथील ‘फ्लोरा’ हे ते उपाहारगृह! साठीच्या दशकाच्या शेवटी शेवटी ते सुरू झाले होते. मुळात त्या काळात मध्यमवर्गीय समाजात घराबाहेर जाऊन खाणं फारसं प्रचलित नव्हतं. अशा त्या काळात चिनी पद्धतीचं जेवण हे एक अप्रूपच होतं. दादर, वांद्रे.. अगदी पाल्र्यापासूनचे खवय्ये त्या काळात ‘फ्लोरा’ला आवर्जून भेट द्यायचे. आमच्या दादर भागातल्या बहुतेक सगळ्यांना चायनीज खाण्याची दीक्षा या ‘फ्लोरा’नेच दिली होती..

मागच्या आठवडय़ात मला फार पूर्वी भेटलेली, पण नेमकी कुठे भेटली ते आठवत नसणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहिले होते. आज ती व्यक्ती चार छोटय़ा उपाहारगृहांचा व्याप अत्यंत उत्तमरीत्या सांभाळत आहे, हेही लिहिले होते. असेच एक उपाहारगृह आजच्या लेखाचा विषय आहे. मागच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील एक चिनी उपाहारगृह पन्नास वर्षांनंतर कायमचे बंद झाले. वरळी येथील ‘फ्लोरा’ हे ते उपाहारगृह! साठीच्या दशकाच्या शेवटी शेवटी ते सुरू झाले होते. मुळात त्या काळात मध्यमवर्गीय समाजात घराबाहेर जाऊन खाणं फारसं प्रचलित नव्हतं. त्या काळात सणासुदीच्या दिवशी घरीच जेवायची अनिष्ट प्रथा प्रचलित होती. जायचा योग आलाच तर पंजाबी किंवा दक्षिण भारतीय उपाहारगृह जवळ करायचे, हाच रिवाज होता. त्या काळात मराठी माणूस शक्यतो घरीच जेवत असे. तरीही त्या काळात फक्त दोन वेळा जेऊ  घालणारी बरीच उपाहारगृहं अस्तित्वात होती. गुजराती किंवा मारवाडी पद्धतीचं भोजन मिळणाऱ्या खाणावळीही होत्या. गमतीची गोष्ट बघा! आज मराठी माणूसही खूप वेळा बाहेरच्या अन्नावर जगतोय; पण मराठी थाळी मिळणारी उपाहारगृहं बंद झाली आहेत!

अशा त्या काळात चिनी पद्धतीचं जेवण हे एक अप्रूप होतं. आज बहुतेक सगळ्या उपाहारगृहांत चिनी जेवण आपण जेऊ  शकतो. उपाहारगृहातच नाही, तर अगदी रस्त्या-रस्त्यावर चिनी जेवण मिळतं. खरं तर ती चिनी खाद्यपदार्थाची विटंबना आहे. प्रत्येक कोपऱ्यावर या चायनीज ठेल्यांची अमाप वीण प्रसवली आहे. उद्या जर कदाचित चीनने आपल्यावर हल्ला केलाच, तर तो भूभाग बळकावण्यासाठी नसून चिनी पदार्थाच्या भारतात होत असलेल्या बदनामीचा सूड उगवण्यासाठी असेल. शिवाय ‘जैन शेजवान’ वगैरे पदार्थ त्या सूडाच्या आगीत अजूनच तेल ओततील! सत्तरच्या दशकात फक्त एक-दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये हे चिनी पदार्थ मिळायचे. पण त्यांच्या किमती या बहुतेक जणांच्या आर्थिक आवाक्याबाहेरच्या असायच्या. अशा परिस्थितीत लिओ नावाच्या गृहस्थांनी ‘फ्लोरा’ सुरू केलं होतं. दादर, वांद्रे.. अगदी पाल्र्यापासूनचे खवय्ये त्या काळात ‘फ्लोरा’ला आवर्जून भेट द्यायचे. चित्रपट आणि नाटक क्षेत्रातले (नाटकातले जरा कमीच; कारण तेव्हा ‘फ्लोरा’सुद्धा नाटकवाल्यांना परवडण्यासारखे नव्हते!) बरेच लोक तिथे वारंवार ये-जा करायचे. आमच्या दादर भागातल्या बहुतेक सगळ्यांना चायनीज खाण्याची दीक्षा या ‘फ्लोरा’नेच दिली होती. तिथे जेवणासाठी जाणं हा तुम्ही प्रतिष्ठित असल्याचा एक पुरावा होता. (पैसेवाले असण्याचा नाही!) त्या काळात बऱ्याचशा लोकांना चिनी जेवणातले मोजून तीन-चार पदार्थच माहीत होते आणि साहजिकच त्यामुळे त्याच पदार्थाची मागणी वारंवार व्हायची. कुणी जर म्हटले की, ‘काल आमच्या घरचे जेवायला ‘फ्लोरा’त गेलो होतो..’ तर त्यांनी काय ऑर्डर केली असणार, हे कुणीही सांगू शकायचं. शिवाय त्या काळात तिथे ऑर्डर घ्यायलाही कुणी भारतीय नव्हतेच म्हटलं तरी चालेल. त्यामुळे तिथल्या माणसाच्या डोक्यात आपली ऑर्डर पोचली आहे की नाही, हे त्याच्या मुळात अरुंद असलेल्या डोळ्यांत उमटायचे नाही.

डॉ. काशिनाथ घाणेकर (आता हे कोण, म्हणून विचारून आपलं अज्ञान कृपा करून कुणी सांडून दाखवू नका.) तिथे बऱ्याचदा असायचे. कारण तो एकच कलावंत बहुधा असा होता, की त्याला तिथे वारंवार जाणं परवडत असे. मी माझ्या घरच्यांबरोबर बऱ्याचदा जेव्हा जेव्हा तिथे गेलो होतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळा ते तिथे होते. (इतक्यांदा जाणं ही मला परवडणारी गोष्ट नव्हती; पण माझ्या पालकांना परवडत असणार!)

पुढे काही वर्षांनी राहुल लिमये यांचे ‘जिप्सी चायनीज’ सुरू झाले आणि मग नाही म्हटलं तरी ‘फ्लोरा’चा तोरा थोडा ओसरला. ‘जिप्सी’मध्ये आपल्या देशातले ऑर्डर्स घ्यायला असल्यामुळे लोक मनमोकळेपणाने काय हवे, काय नको, ते चर्चा करून ठरवू शकायचे. तिथे एक बापट नावाचा तरुण याबाबतीत फारच तयार होता. स्वत: राहुल लिमयेंच्या पुस्तकात तो किस्सा त्यांनी लिहिला आहे. एका माणसाने विचारलं होतं म्हणे- ‘अहो! हे स्प्रिंग रोल्स म्हणजे नेमकं काय?’ त्यावर बापटांनी उत्तर दिलं, ‘काही नाही हो.. ताज्या तळलेल्या बाकरवडय़ा! फक्त आतलं सारण वेगळं.’ ‘जिप्सी’कडे जरी ग्राहकांचा सगळा ओघ वाढला होता तरी त्याचा मालक राहुल लिमये मात्र कधी कधी आवर्जून स्वत: ‘फ्लोरा’ला जात असे.

एक दिवस अचानक वर्तमानपत्रात ‘फ्लोरा’ बंद होणार म्हणून सगळीकडे बातमी पसरली. आम्ही सगळ्या मित्रांनी तिथे एकदा शेवटचं जाऊन यायचं असं ठरवलं. कारण प्रत्येकावर चायनीज खाण्याचे संस्कार तिथेच झाले होते. मधल्या काळात ‘फ्लोरा’चे पहिल्या दिवसापासून असणारे व्यवस्थापक वयोमानामुळे निवृत्त झाले. राहुल लिमये यांचे काहीतरी जुने संबंध असल्यामुळे मालकांनी त्यांना ‘फ्लोरा’ची जबाबदारी घेण्याची विनंती केली. स्वत:चे उपाहारगृह असूनही त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यानेच आम्हा काही मित्रांना तिथे घेऊन जाण्याचा बेत आखला. आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा तिथे आलेला एकही माणूस प्रथमच येणारा नव्हता.. नसावा. जरी आम्ही सगळे मित्र बाहेरख्याली असलो (इथे व्याकरण काहीही म्हणो किंवा तुम्हाला काहीही वाटो, ‘बाहेरख्याली’ हा संधी ‘बाहेर खाणारा’ असाच मी सोडवलेला आहे!) तरीही काही काही पदार्थ हे फक्त राहुललाच माहीत होते. मुळात माझ्या मते खाण्यावर प्रेम असल्यामुळेच राहुल लिमये हा या व्यवसायात आलाय याबद्दल माझ्या मनात बिलकूल संदेह नाही. जसं कागदाच्या धंद्यात जम बसला नाही म्हणून काही कोणी नाटक-चित्रपट क्षेत्रात येत नाही.. अगदी तसा! खूप वेळ.. पार रात्री बारा-साडेबारापर्यंत आम्ही तिथे बसलो होतो. ‘फ्लोरा’ बंद होणार याची रुखरुख लागून असंख्य लोक तिथे आले होते. आम्हीही त्यातलेच होतो. पण एक उपाहारगृह बंद होणार याची दूख जाणणारा आमच्यात तो एकटाच होता. आम्ही गप्पा मारत असताना तो मधूनच वेगळ्याच प्रतलावर जाऊन ‘फ्लोरा’चा इतिहास सांगत होता. मधूनच गप्प बसत होता. जरी तो आमच्या समोर बसला होता तरी त्याच्या मनात मागच्या पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास तरळत होता. पाणी डोळ्यांच्या कडांवर आलं होतं. बाहेर आलं नाही, इतकंच.

तिथे आलेल्या लोकांनी घरी जाताना असंख्य पदार्थ बरोबर बांधून नेले होते. कुणी तिथली पदार्थयादी आठवण म्हणून मागत होते, कुणाला तिथला एखादा पेला किंवा चमचा हवा होता. बरेच जण बराच वेळ रेंगाळत बसले होते. आम्ही बसलो होतो त्याच्या मागच्या बाजूला मागची पिढी आणि आजची पिढी असं चार-सहा जणांचं एक कुटुंब आलं होतं. मागच्या पिढीतल्या जोडप्याची लग्नाआधीची पहिली जेवणाची भेट ‘फ्लोरा’त झाली होती, हे आपल्या मुलांना ती दोघं सांगत होती. सगळे अगदी भावव्याकूळ झाले होते..

आणि त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईतील मध्यमवर्गीयांचं चिनी जेवणाचं ते पहिलं संस्कार केंद्र बंद झालं.

या पाश्र्वभूमीवर एक विचार अजून माझ्या मनात घुटमळतो आहे. आज ‘फ्लोरा’ला बंद होताना इतकी प्रसिद्धी मिळाली. सगळ्या समाजमाध्यमांनी त्याची दखल घेतली. तशीच काही उत्तम महाराष्ट्रीय पदार्थ मिळणारी शाकाहारी आणि मांसाहारी उपाहारगृहंही मिटून गेली.. मिटूनच गेली, कारण ती बंद झाली आहेत याबद्दल किंचितही हळहळ तिथे अहोरात्र खाणाऱ्या अनेकांना वाटली नाही. गिरगावचे ‘कुलकर्णी उपाहारगृह’ असेच संपले. तिथे मिळणारी बटाटाभजी पृथ्वीतलावर आता कुठे मिळणार, याबद्दल फार कुणाला खंत नाही. अनेक भंडारी पद्धतीची मांसाहारी जेवण मिळणारी उपाहारगृहं त्यांच्या चुलीला यापुढे मत्स्याहुती अर्पण करणार नाहीत. पर्यायाने आपला क्षुधाग्नी शमवणारं एक खाद्य-विद्यापीठ आपल्या आयुष्यातून कायमचं वजा होणार, हे समजल्याने कोणाच्याही डोळ्यांतून तिथल्या तिखट जाळ जेवणाने जितके अश्रू यायचे त्याच्या अंशानेही कुणाच्या डोळ्यांत आले नाहीत. नाही म्हणायला जयवंत दळवी यांनी त्या सगळ्या उपाहारगृहांचा एक चटकदार ताळेबंद एका लेखातून मांडला होता. अर्थात त्यांचं साहित्यावर जितकं प्रेम होतं त्याहून कांकणभर सरस खाण्यावर प्रेम होतं. पोटात भुकेचा कालवा झाला म्हणूनच फक्त उत्तम साहित्य निर्माण होतं असं नाही, तर भरल्या पोटीही कसदार लिहून होतं. असो! कुठल्याही लेखाचा शेवट एखाद्या सणसणीत, काळजाला भिडणाऱ्या वाक्यात करावा असं मला कधीच वाटलं नाही. थोडंसं अर्धपोटी राहिलं तरच पुढची भूक जास्त चांगल्या तऱ्हेने भागवावीशी वाटते. नाही का?

(वाचकहो! दोन आठवडे -१९ आणि २६ ऑगस्ट- भैया उपासनी या माझ्या दिवंगत मित्राबद्दल मी जे लेख लिहिले होते, त्यापैकी एका लेखात भैयाला एक बुलेट मोटरसायकल पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीचे नाव श्री. हांडे असे लिहिले होते. त्याबद्दल एका वाचकाने मला आवर्जून ई-मेल केला आणि त्यांचे नाव प्रभाकर बागूल आहे असं निदर्शनास आणून दिलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!)

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:01 am

Web Title: flora chinese restaurant shut down after 50 years
Next Stories
1 मी जिप्सी.. : लॉटरी
2 मी जिप्सी.. : भैय्या उपासनी
3 भैय्या उपासनी – पूर्वार्ध
Just Now!
X