संजय मोने

मित्र म्हणाला, ‘‘सुभाषशेठ, आधी माझ्या मित्राबरोबर हात तर मिळवा!’’ त्यानं मंद हसून माझ्याशी हात मिळवला. इतका मऊ हात याआधी मी कधीच अनुभवला नव्हता. त्या हाताचं वय होतं पन्नासच्या पुढे, पण स्पर्श होता तो एखाद्या तान्ह्य़ा मुलाच्या हाताचा. ‘‘हा हात हेच माझं सगळ्यात मोठं हत्यार होतं.’’ – सुभाषशेठ. ‘‘कसलं हत्यार?’’

‘‘जास्त ताणत नाही आता. मी इथं येण्यापूर्वी खूप सफाईदार घरफोडी करायचो. पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून. चांगली वीस वर्ष. कदाचित थोडी जास्तच.’’ मी काही विचारणार, तोच त्यानं समोरच्या भिंतीकडे बघत बोलायला सुरुवात केली..

मी ही गोष्ट खूप वर्षांपूर्वी वाचली होती. पण त्या गोष्टीच्या नायकाला प्रत्यक्षात भेटेन आणि तेही एकदा नाही, तर लागोपाठ दोन-तीन वेळा असं वाटलं नव्हतं. मूळ नाव आणि ठिकाण बदललं आहे, कारण त्या शहरात बरीच वर्ष जाणं झालं नाहीये. त्यामुळे तो माणूस आज जिवंत आहे की नाही, तेही माहीत नाहीये. त्याची-माझी शेवटची भेट झाली त्यालाही तब्बल तीसहून जास्त वर्ष लोटली आहेत. तेव्हा सदरहू इसम पन्नाशीच्या आत-बाहेर होता.

झालं असं की, त्या काळात मी एका माणसाकडे एका सिनेमासाठी सहकारी दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. चित्रीकरणाची स्थळं बघायला एका शहरात गेलो होतो. पाच-सहा दिवस मुक्काम होता. त्यावेळी एका स्थानिकाची ओळख झाली. तेव्हा त्याला कलाक्षेत्रात काहीतरी करायचं होतं. गडगंज श्रीमंत. पण डोक्यात विचार चित्रपट आणि नाटक यांचे. घरच्यांच्या दृष्टीने हे भिकेचे धंदे. दोन दिवसांनंतर जरा आमची मत्री झाली. वयाच्या विशी-पंचविशीत प्रत्येकाच्या डोक्यात एक कथा असते आणि त्यावर जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण होऊ शकते यावर त्याचा ठाम विश्वास असतो. माझ्या डोक्यातही का नसावी मग? मी त्याला बोलण्याच्या ओघात ती सांगितली. त्यावर तो म्हणाला, ‘‘चल! आज तुला एका माणसाला भेटवतो. त्याचं आयुष्य म्हणजे एक चित्रपट आहे. मला जर संधी मिळाली तर मी त्यावर एक चित्रपट निर्माण करीन.’’

एवढं त्यानं म्हटल्यावर आम्ही दोघं संध्याकाळी त्या माणसाला भेटायला गेलो. छान ऑफिस होतं त्याचं. उत्तम सजवलेलं. एकंदरीत थाटावरून असामी धंद्यात मस्त जम बसवून आहे हे कळत होतं. त्यानं आम्हाला आत बसायला जागा दिली. काही वेळ फोनवर बोलणं चालू होतं त्याचं. त्यानंतर त्यानं चेकबुक काढून दहा-बारा सह्य़ा केल्या.

हे सगळं चालू असताना माझा मित्र माझ्या कानात कुजबुजला, ‘‘ओळख करून दिली, की हात मिळव.’’

‘‘का?’’

‘‘कळेल नंतर.’’

हे आमचं होतंय – न होतंय तोवर त्याची कामं संपली. लगेच तीन चहा आणि बरोबर काहीतरी खायला आलं. मग मित्रानं ओळख करून दिली, ‘‘हे सुभाष तोमर.’’

मी त्याला काय करतो ते सांगितलं. फार काही नव्हतंच, त्यामुळे अर्ध्या मिनिटात सांगून झालं.

‘‘मी वितरक आहे या सगळ्या वस्तूंचा,’’ त्याने कपाटाकडे बोट दाखवलं. त्यात तेलाच्या बाटल्या, बिस्किटं, पेय, दूध आणि बरंच काही होतं. ‘‘नेहा डिस्ट्रिब्युटर्स.. माझ्या मुलीच्या नावाने आहे ही कंपनी. काय काम आहे तुमचं?’’

मित्र म्हणाला, ‘‘जरा तुमची सगळी गोष्ट सांगा ना याला.’’

‘‘फार वेळ लागेल त्याला. तेवढा आहे ना तुमच्याकडे?’’

मी मान डोलावली. तो बोलायला लागणार, तोच मित्र म्हणाला, ‘‘सुभाषशेठ, आधी माझ्या मित्राबरोबर हात तर मिळवा!’’

त्यानं मंद हसून हात मिळवला. त्या हाताचा स्पर्श झाल्यावर मला काय वाटलं त्याक्षणी ते आठवत नाही; फक्त जाणवलं इतकंच, की इतका मऊ हात याआधी मी कधीच अनुभवला नव्हता. त्या हाताचं वय होतं पन्नासच्या पुढे, पण स्पर्श होता तो एखाद्या तान्ह्य़ा मुलाच्या हाताचा.

‘‘हा हात हेच माझं सगळ्यात मोठं हत्यार होतं.’’

‘‘कसलं हत्यार?’’

‘‘जास्त ताणत नाही आता. मी इथं येण्यापूर्वी खूप सफाईदार घरफोडी करायचो. पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून. चांगली वीस वर्ष, कदाचित थोडी जास्तच.’’

मी काही विचारणार, तोच त्यानं समोरच्या भिंतीकडे बघत बोलायला सुरुवात केली, जणू एखादं स्वगत म्हणावं तशी :

‘‘शंभरच्या वर घरं फोडली मी. त्यासाठी माझं स्वत:चं एक हत्यार होतं. मीच बनवून घेतलं होतं. लॅच-की असलेलं कुठलंही घर उघडायला मला अगदी सुरुवातीला पाच-सात मिनिटं लागायची. पुढे पुढे ती वेळ कमी होत होत सात-आठ सेकंदांवर आली. हो! सात- आठ सेकंद.. कुठलंही आणि कितीही मजबूत कुलूप असो! भरपूर पसा मिळायचा. त्या काळातल्या कुठल्याही नोकरीत आणि व्यवसायात मिळणार नाही इतका आणि पुन्हा अत्यंत कमी वेळात. एकदा घरात शिरलो, की सगळं साफ करायला फार फार तर पंधरा-वीस मिनिटं लागायची. साधारणत: लोकांची आपल्याकडचा पसा किंवा दागिने ठेवायची जागा मला कशी कुणास ठाऊक, पण चट्कन कळायची. उशाखाली, फ्रिजमध्ये, स्वयंपाकघरात जो सगळ्यात कमी वापरल्याने चकचकीत डबा असतो तिथे, जरा डोकं वापरलं असेल तर बाथरूममध्ये साबणाच्या डब्यात. बस्स! संपल्या जागा! वातावरण तापलं, की दुसरं शहर गाठायचं. चन करायची. किती पसा आला आणि किती गेला, याचा हिशोब नाही. एक सवय होती, तीच शेवटी मला फायद्याची ठरली. जिथं जिथं चोरी केली त्या प्रत्येक जागेचा पत्ता लिहून ठेवायचो मी. अशी एकंदरीत शंभरी गाठली. काही वेळा माझ्याऐवजी दुसरेच पकडले गेले होते.

नंतर एक घटना घडली आणि मी सगळं सोडून द्यायचं ठरवलं. भुकेसाठी चोरी केली होती, आता चोरीचीच भूक लागायची. ती घटना घडली नसती, तर एकतर मी कधीतरी पोलिसांकडून पकडला जाऊन मोठय़ा तुरुंगयात्रेवर तरी गेलो असतो किंवा लोकांनी पकडलं असतं तर मार खाऊन मेलो असतो. माझ्याकडे यादी होती घरफोडीच्या जागांची. ती घेऊन पोलीस स्टेशनवर गेलो. लोक पोलिसांबद्दल काय वाटेल ते बोलोत; मला मात्र त्यांच्या रूपाने देव भेटला. त्या यादीवरून पोलिसांनी संबंधित लोकांना गाठलं. मी माल ज्यांना विकला होता तो सगळा पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेतला. रोख रक्कम काही परत देणं शक्य नव्हतं. पण ज्यांच्याकडे चोरी झाली होती त्यांनी मालमत्ता परत मिळाली म्हणून तक्रार काढून घ्यायचा निर्णय घेऊन माझ्यावर उपकारच केले. मला सुधारायचं आहे असं कळल्यावर काही माणसांनी रोख रकमेचीही अपेक्षा सोडून दिली. बऱ्याच तक्रारी मागे घेतल्या गेल्या, तरीही थोडी कैद भोगावीच लागली.

बाहेर पडल्यावर एका अधिकाऱ्यानं या शहरात येण्याचा सल्ला दिला. जवळपास शून्य पैसे घेऊन मी इथे आलो. काही दिवस ढकलगाडीवरून भाजी विकली. कधीकधी रात्री कच्च्या भाज्या खाऊन दिवस काढले, अगदी उपासमारसुद्धा सहन केली कधी कधी. पण मनात सुधारायचा विचार पक्का होता. दिवसाला अठरा-अठरा तास मेहनत केली. आमची जात धंदेवाल्यांची जात; त्यामुळे पसा कसा आणि कुठून निर्माण करता येतो, हे आम्हाला आईच्या पोटातूनच शिकायला मिळतं. हळूहळू जम बसत गेला. माझा उपकारकर्ता पोलीस अधिकारी संपर्कात होता. एक दिवस असा आला, की माझं कुटुंब पूर्ण महिनाभर दोन्ही वेळेला पोटभर जेवलं. त्या दिवशी आमच्या व्यावसायिकांच्या वर्तुळात माझी सगळी माहिती त्यांना सांगितली- एक अक्षरही न लपवता आणि त्या सगळ्यांनी मला स्वीकारलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुधारायचा प्रयत्न केल्याबद्दल चक्क माझा सत्कार केला. मीही खुल्या दिलानं इथल्या स्थानिक वर्तमानपत्रात सगळ्याची कबुली छापून आणायला लावली.’’

आणि त्यानंतर तो त्याची कशी प्रगती झाली, ते सांगायला लागला. जणू एखादी चित्रपटाची गोष्ट ऐकत असल्यासारखा मी मंत्रमुग्ध बसून होतो. त्यानंतर मी जेव्हा प्रयोगासाठी गेलो तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांना (आता त्याचा व्याप इतका मोठा झाला होता, की ‘त्यांना’ असंच म्हणावंसं वाटलं) भेटलो. धंद्याचा व्याप वाढत होता, पण आता त्यांची मुलगीही त्यांना मदत करत होती. एकदा बोलता बोलता ते उठून आत गेले आणि आतून त्यांनी एक चपटी लोखंडाची सळी आणली. विचित्र आकाराची. मला दाखवून ते म्हणाले, ‘‘हे माझं हत्यार. मी अजून जपून ठेवलंय. माझ्या तिजोरीत असतं. ‘मेल्यानंतर माझ्या बरोबरच जाऊ दे, दुसऱ्या कोणाच्या हाती पडू देऊ नका’ असं मृत्युपत्रात लिहून ठेवलंय.’’

जवळपास तीन वर्ष प्रयोगाला तिथं गेलो नव्हतो. अचानक एका समारंभासाठी जायचा योग आला. तिथं पुन्हा सुभाषशेठ भेटले. शहरातल्या एका मोठय़ा क्लबचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांचा त्याच समारंभात सत्कार होता. रात्री त्यांच्याबरोबर जेवताना मला बाजूला घेऊन म्हणाले, ‘‘मी तुमच्याशी नेहमी इतकं का बोललोय माहीत आहे? तुम्ही माझ्या आयुष्यात घडलेली घटना कोणती म्हणून इतक्या वर्षांत कधीही विचारलं नाहीत. आजही पार मुंबईहून मला भेटायला आमच्या जुन्या व्यवसायातले लोक येतात. हत्यार मागतात. आम्हालाही शिकवा असं म्हणतात. पण मी त्यांना चार गोष्टी सांगून परत पाठवतो. घोडय़ाला पाण्यापर्यंत नेऊ शकतो मी; पाजू शकत नाही. ते प्रत्येकाला स्वत:च करावं लागतं. अजून एक गंमत दाखवतो,’’ असं म्हणून त्यांनी आपलं पशाचं पाकीट उघडलं. आत एक देवाचा फोटो होता आणि दुसरा त्या पोलीस अधिकाऱ्याचा!

माझ्या तुटक स्वभावामुळे त्यांचा नंबर नाहीये माझ्याकडे, पण जाऊन भेटावं असं हे सगळं लिहिल्यावर वाटायला लागलंय. असतील ना अजून ते? भेटावं असं फार वाटतंय. आपल्याला आजच्या काळातला वाल्मीकी ऋषी बघायला मिळेल, नाही का?

sanjaydmone21@gmail.com