|| संजय मोने

‘बालमानसशास्त्र’ वगरे अवजड शब्द आम्हालाच काय, पण आमच्या मास्तरांनाही माहीत नसावेत. त्यामुळे मुलांना वेळप्रसंगी चेचून काढायलाही त्यांच्या हातांनी कधी कुचराई केली नाही. आणि आता मागे जाऊन विचार केला तर त्यांचं फार काही चुकलं असं वाटत नाही. याला ‘सिंहावलोकन’ असा शब्द आहे. पण तो शब्द वापरायला लाज वाटते. आम्ही कसले सिंह?

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

‘भारत हा शेतीप्रधान देश आहे..’ असं मी शाळेत असताना माझ्या भूगोलाच्या किंवा नागरिकशास्त्राच्या पुस्तकात वाचलं होतं. आता माझ्या मुलीच्या पुस्तकातही तेच लिहिलेलं आढळलं आणि खात्री पटली, की आपला देश तसाच आहे. आपल्याकडे इतिहास (जो खरं तर कधी बदलत नाही. कारण बदलला, की तो इतिहास न राहता वर्तमान होतो.) शाळेतल्या पाठय़पुस्तकांत सतत बदलत असतो आणि इतर विषय मात्र तसेच राहतात.

गणितात गळक्या हौदाची आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याची समस्या आमचं बालपण नासवून गेली. ‘कुणीतरी त्या हौदांची दुरुस्ती का करत नाही?,’ असा प्रश्न माझ्या एका जाज्ज्वल्य सहकारी शाळूसोबत्याने विचारला होता. त्यावर मास्तरांनी आपला गणित हा विषय सोडून भूगोलातल्या नर्ऋत्य दिशेला त्याचा कान वळवला होता. आणि त्याच्या किंकाळ्या ऐकून आमच्या गायनाच्या मास्तरांनी त्याला वार्षकि स्नेहसंमेलनात प्रमुख गायक म्हणून मुक्रर केलं होतं.

काम न करणारे मजूर फक्त शाळेतल्या गणितात नसून सर्वत्र असतात, हे मोठं झाल्यावर जेव्हा कामासाठी कुठल्याही ऑफिसमध्ये जायचो तेव्हा आढळून यायला लागलं. आमच्या शालेय जीवनात (खरं तर अभ्यास आणि परीक्षा यांच्या कचाटय़ात खेळायला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे त्याला ‘जीवन’ म्हणवत नव्हतं.) आम्हाला विविध विषयांचं ज्ञान देण्यासाठी शिक्षक आपल्या रक्ताचं पाणी करत होते. आम्ही मात्र त्यांच्या ज्ञानयज्ञात शंका-कुशंकांच्या समिधा टाकून तो यज्ञ विझवायचे जमतील तितके प्रयत्न करत होतो. ‘बालमानसशास्त्र’ वगरे अवजड शब्द आम्हालाच काय, पण आमच्या मास्तरांनाही माहीत नसावेत. त्यामुळे मुलांना वेळप्रसंगी चेचून काढायलाही त्यांच्या हातांनी कधी कुचराई केली नाही. आणि आता मागे जाऊन विचार केला तर त्यांचं फार काही चुकलं असं वाटत नाही. याला ‘सिंहावलोकन’ असा शब्द आहे. पण तो शब्द वापरायला लाज वाटते. आम्ही कसले सिंह? चाळीस-पंचेचाळीस मुलांचा वर्ग. त्यात अध्र्या मुली सोडल्या तरी बावीसएक अहिरावण-महिरावण एकेका वर्गात असायचे. आपलं अस्तित्व पटवून द्यायला त्रासच दिला पाहिजे, या मतावर सगळे ठाम होते. आम्ही बहुतेक जण सुटीत एखाद्या वाचनालयात जाऊन आपलं नाव नोंदवून यायचो. पालकांचासुद्धा मूल उत्तम वाचक व्हावं, हा हेतू नसून, ‘वाचत बसलाय ना! तेवढा वेळ शांतता राहील घरात!’ इतकंच म्हणणं होतं. त्या सुटीतल्या वाचनाचा उपयोग आम्ही ज्ञानसंपादन करायला केला असं म्हणायला आता जिवावर येतं. बहुतेक वेळेला पुढच्या इयत्तेत गेल्यावर नव्याने येणाऱ्या मास्तरांना किंवा बाईंना वाचलेल्या पुस्तकातून नवनव्या शंका काढून कसं हैराण करायचं, हाच विचार आमच्या मनात ते वाचन करताना असे. अशाच एका सुटीत ‘कपडे धुवायच्या नीळमध्ये लिंबू पिळलं की हायड्रोजन सल्फाईड नावाचा अतिशय दरुगधी वायू बाहेर पडतो..’ असं आमच्या वर्गातल्या एका मुलाने वाचनातून ज्ञान प्राप्त केलं होतं. चित्रकला हा विषयही काही जणांना अवघड जातो. मला तरी फारच होता. साधं आंब्याचं चित्र काढायचं म्हणजे माझे प्राण कंठाशी यायचे. सुटीत खाल्लेल्या सगळ्या आमरसाची चव आणि गोडी निघून जायची. नव्या वर्षांत चित्रकलेचा तास आठवडय़ातून दोनदा असायचा आणि तोही पहिलाच असायचा. तो बुडावा म्हणून आदल्या दिवशी आम्ही तीन-चार जणांनी मिळून घरून नीळ आणि लिंबू आणलं. शाळा सुटताना चित्रकलेच्या वर्गात जाऊन बाकाच्या खणात ते पिळून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रकलेच्या वर्गाच्या दरवाज्यात पाऊल टाकताच तीव्र दरुगधी पसरली होती. शिपाई आणि चित्रकलेचे मास्तर त्या दरुगधीच्या उगमाचा शोध घेण्यात गर्क होते. खरं तर गणितातल्या आळशी मजुरांप्रमाणे त्यांनी हळूहळू काम करायला हवं होतं. परंतु झपाटय़ाने त्यांनी संपूर्ण वर्गाची तपासणी केली. त्या सगळ्या व्यापात वीस-पंचवीस मिनिटं वाया गेली. अर्थातच त्या दिवशी तास रद्द झाला. आम्ही सगळे आनंदात होतो. मात्र अचानक आमच्यातल्या एका मुलाला मुख्याध्यापकांनी त्यांच्या ऑफिसात बोलावून घेतलं. काही काळाने आमच्या नावाचा पुकारा झाला. पेपरात जसे डोक्यावर बुरखा घालून अपराध्यांचे पोलिसांबरोबर फोटो काढून छापलेले असतात तसे आम्ही मास्तरांच्या घोळक्याच्या मधे होतो. बुरखा मात्र नव्हता. आधी मुख्याध्यापकांकडे गेलेला मुलगा जीव गमावून बसल्यासारखा तिथे उभा होता. आमचीही गत काही सेकंदांत तशी झाली. चौघांच्या मनात एकाच प्रश्नाने फेर धरला होता : आम्हीच ते; हे त्यांना कसं कळलं? नंतर संबंधित मास्तर आणि मुख्याध्यापकांच्या चच्रेतून लक्षात आलं की ज्या वहीच्या कागदावर नीळ पेरून लिंबू पिळण्यात आलं होतं त्यावर जो पहिला मुलगा मुख्याध्यापकांकडे गेला होता त्याचं नाव स्पष्ट अक्षरात लिहिलेलं होतं. पुढचं सगळं आपल्या लक्षात आलं असेलच!

जरा पुढच्या वर्गात गेल्यावर वाचन वाढलं आणि त्याबरोबर आमच्या ज्ञानाच्या कक्षाही रुंदावत गेल्या. दिवाळीतल्या अ‍ॅटमबॉम्बची वात थोडी सोलून त्यात उदबत्ती अडकवली आणि ती पेटवून ठेवली की सात-आठ मिनिटांनी मोठा आवाज होतो. त्याला आम्ही ‘टाइमबॉम्ब’ म्हणायचो. एकदा शाळेच्या स्वच्छतागृहात हा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाला. मात्र, त्यानंतर सपाटय़ाने शाळेत हे प्रयोग व्हायला लागले. इंग्रजांच्या राज्यात क्रांतिकारकांनी घडवून आणले नसतील इतके स्फोट शाळेत व्हायला लागले. शेवटी स्वच्छतागृहाच्या बाहेर एक शिपाई कायमस्वरूपी नेमण्यात आला. दिवाळीत पायाखाली आपण जे फळ फोडतो, (त्याचं नाव मला माहीत आहे. पण त्याला इतकी विविध नावं आहेत, की त्यावरून वेगळे वाद व्हायचे. म्हणून ‘फळ’ असं म्हटलंय. प्रत्येक वाचकाने आपले जे काही नाव असेल ते मनाशी धरावे.) त्या फळाला पोटॅशियम परमँगनेटचे इंजेक्शन टोचले आणि ते फळ लांबून कुणाच्या पायाखाली फोडले तर लाल रंगाने ती व्यक्ती माखून जाते. शाळेत हाही प्रयोग काही दिवस विद्यार्थ्यांचे हात-पाय आणि नंतर आमची कानशिलं रंगवून गेला. काही काही विद्यार्थ्यांची चित्रकला दुर्दैवाने फारच अप्रतिम असते. दुर्दैव आमचे; त्यांचे नाही. अशाच एका मुलाची चित्रकला फारच छान होती. आज तो कुठल्यातरी जाहिरात कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर आहे. त्याची चित्रं नेहमी शाळेत दर्शनी भागात लावलेली असायची. एकदा त्याने कुठल्यातरी एका महान देशभक्ताचे चित्र काढले होते. (कुणाचे, तेही माहीत आहे. पण आता नाव लिहिणं योग्य होणार नाही. तीनशे र्वष जुन्या व्यक्तीच्या पुतळ्याने भावना दुखावतात. इथे तर चाळीस र्वषच लोटली आहेत!) अत्यंत सुंदर होते. आम्हाला काही ते बघवलं नाही. एक छोटा कुंचला घेऊन आम्ही आजूबाजूला कोणी नाही असं बघून त्या चित्रात बारीक बदल केला आणि क्षणार्धात तो महान देशभक्त तिरळा दिसायला लागला. जंग जंग पछाडले तरी शाळेला त्यामागे कोणाचा हात होता ते समजलं नाही. बाजीप्रभूंनी बलिदान देऊन आपलं जीवन सार्थकी लावलं. इतिहासाच्या मास्तरांनी फार प्रभावीपणे तो धडा शिकवला. एकाने शंका विचारली. ‘‘सर! पाच तोफांचे आवाज होईपर्यंत ते का थांबले? पहिला आवाज झाला म्हणजेच महाराज गडावर पोचले असं नाही का होत?’’

महाराज निसटले ही बातमी ऐकल्यावर औरंगजेबाचा चेहरा जसा झाला असेल तसा चेहरा करून मास्तर बघत राहिले. प्रश्न विचारणाऱ्याला ठेचून काढायचा त्यांचा जन्मसिद्ध हक्क बजावायचं भानही त्यांना राहिलं नाही. शाळेत सुविचार लिहून मुलं सुधारतात असं कोणाला तरी कधीतरी त्याकाळी का वाटलं, देव जाणे! रोज एक सुविचार आमच्या बोडक्यावर पडायचा. बरं, नुसता लिहून ठेवला असता तरी चाललं असतं. मंत्रीपदाची शपथ घेताना नाही का, ती घेतली फक्त की बास! तसं वागायचं नसतं! ‘श्रीमंताकडच्या शिरापुरीपेक्षा गरीबाघरची मीठ-भाकरी श्रेष्ठ!’ मास्तरांनी आम्हाला या सुविचाराचा अर्थ विचारला. वर्गातला एक मुलगा उभा राहिला. आज एका परदेशी बँकेत खूप वरच्या हुद्दय़ावर नोकरीला आहे तो. पण शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी तो रोज मार खायचा. बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं ते. कारण मार खायची कारणं दररोज निराळी असायची. सुटीत काय तो मास्तरांना आराम असायचा. त्याने मास्तरांना सांगितलं, ‘‘अर्थ सांगतो, पण आधी काही शंका आहेत त्याचं उत्तर द्या.’’

‘‘काय शंका आहेत?’’ मास्तरांनी विचारलं.

‘‘सर! तुम्ही परवा तुमच्या डब्यात शिरापुरी आणली होती. तर तुम्ही श्रीमंत आहात का? आणि दुसरी शंका- गरीब फार पूर्वीपासूनच होते?’’

‘‘अरे! समाजात गरीब-श्रीमंत हा भेद असणारच.’’ मास्तरांनी  सोडय़ाची बाटली थोडीशी उघडली की जशी फसफसायला लागते त्या आवाजात उत्तर दिलं.

‘‘मग शिरा विकून श्रीमंत बटाटय़ाची भाजी विकत घेऊन गरीबाला देऊन का खात नाहीत?’’ समाजवादाचा प्रयोग जगभर का फसला याची त्याला त्या वयात जाण नव्हती. मास्तरांनी मुठी वळवून आपल्या उत्तराची तयारी आम्हा उरलेल्या सगळ्या वर्गाला दाखवून दिली.

‘‘सर! अजून एक..’’

अंगात कवचकुंडलं आहेत, त्यामुळे कुठलाही मार लागणार नाही- या विश्वासाने तो बोलू लागला. इकडे आज त्याला किती मार पडणार, या जाणिवेने आमच्या अंगावर काटा आला होता.

‘‘पाहिजे ते विचार. एकदाच सगळी उत्तरं देतो.’’ मास्तर अशा प्रसंगात एक थंड आवाज लागतो ना पार आतून.. पोटाच्या मुळातून- त्या आवाजात म्हणाले.

‘‘मीठ-भाकरी जर गरीब खायचे, तर महात्मा गांधींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला होता तेव्हा त्यांनी भाकरीबरोबर काय खाल्लं होतं? की मीठ खाऊन त्यांनी देशाचा आणि बापूजींचा अपमान केला?’’

मास्तर पुढे झाले आणि ओला फडका घेऊन त्यांनी तो सुविचार पुसून टाकला.

sanjaydmone21@gmail.com