19 November 2019

News Flash

पिढय़ान् पिढय़ांचे प्रश्नोपनिषद

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असूनही रस्त्यावर असंख्य खाण्याचे पदार्थ बनवून चोवीस तास विकले जातात.

संजय मोने

निवडणुकांच्या आधी एकमेकांवर आरोपांचं शेण फेकणारे राजकीय पक्ष नंतर गळ्यात गळा घालून ‘युती’ वा ‘आघाडी’ असं गोंडस नाव घेऊन सत्तेवर येतात. लोकांनी त्यांना एकत्र येण्यापासून नाकारलेले असते, तरीही ते राज्यकारभार हाकतात. यात मतं देणाऱ्यांचा उपमर्द होतो. असं असूनही कोणी काही करू शकत नाही..

१. मोटरसायकल आणि स्कूटरस्वार बिनदिक्कत पदपथावर गाडय़ा उभ्या करतात. वेळप्रसंगी त्यावरून चालवतातही. कोणी काहीही करू शकत नाही.

२. रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्त करण्याऐवजी ‘खड्डे’ कशाला म्हणायचे, यावरच चर्चा आणि वादविवाद होतात आणि मूळ काम होत नाही. कोणी काहीही करू शकत नाही.

३. आपण टोल भरतो तो रस्ते नीट असावेत म्हणून; पण ऐन नाक्याच्या तोंडावर महाकाय खड्डे आऽऽ वासून उभे असतात. कोणी काहीही करू शकत नाही.

४. आपला देश निधर्मी आहे असं सगळे पार ठासून सांगतात; परंतु जातीपातीचा अभिमान आपल्या रक्तात पूर्णपणे भिनलाय. कोणी काही करू शकत नाही.

५. सणासुदीला सार्वजनिक उत्सवासाठी ‘ऐच्छिक’ या गोंडस नावाखाली हजार-पाचशे रुपये मागायला खंडणीबहाद्दर येतात. त्यांच्या अरेरावीपुढे कोणी काही करू शकत नाही.

६. परदेशात असलेल्या मुलाकडे किंवा मुलीकडे दोन-चार महिने राहून आल्यावर आई-वडील आपल्या देशाबद्दल राग ते घृणा येईपर्यंत शिव्या घालतात. पण कधीही त्यात आपल्या या देशाबद्दल काळजीचा सूर नसतो. कोणी काही करू शकत नाही.

७. जीव जाईपर्यंत मोठमोठय़ाने आवाजाचा गदारोळ करायचा आणि सगळ्यांना त्रास होईपर्यंत आनंद व्यक्त करून सण साजरा करायचा, हा प्रत्येक धर्माच्या नागरिकांनी सध्या आपला बाणा ठरवला आहे. कोणी काही करू शकत नाही.

८. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. जवळपास तितकेच पैसे कमावतात. काही वेळेला बायको जास्त मिळवत असते. पण घरी पार्टी संपल्यावर आवराआवर करायला नव्वद टक्के नवरे मदत करत नाहीत. कुठलीही स्त्री काही करू शकत नाही.

९. दरवर्षी परीक्षांचं वेळापत्रक कोलमडून पडते, पेपर फुटतात. मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्या भविष्याकडे पाहवत नाही. कोणी काही करू शकत नाही.

१०. मराठी सिनेमांची गळचेपी होते. ते प्रदर्शित करायला चित्रपटगृहं मिळत नाहीत, अशी हाकाटी किंवा आकांत मांडला जातो. परंतु आपण लोकांना हवे असलेले उत्तम चित्रपट देतो आहोत की नाही, याचा विचार काही होताना दिसत नाही. कोणी काही करू शकत नाही.

११. एखादी मोडकी किंवा जुनी गाडी वापरणारा कार्यकर्ता अचानक निवडून येतो आणि पाच वर्ष टिकला तर तीस-पस्तीस लाखांची वा त्याहून महाग गाडी त्याच्या दारात झुलायला लागते. जरा धाडसी असेल तर तीन- चार कोटी रुपयांच्या घराचा तो धनी होतो. कसा? कोणी काही करू शकत नाही.

१२. झोपडपट्टीत राहणारे त्यांना आयतं बांधून दिलेल्या घरात न राहता ते विकून पुढच्या झोपडीची तयारी करतात. कोणी काही करू शकत नाही.

१३. मुंबईत राजभाषा मराठी हे चलनी नाणं न उरता हिंदीची चलती वाढते आहे. कोणी काही करू शकत नाही.

१४. दारू पिऊन बेफाट गाडी चालवून निरपराध लोकांना ठार मारलं जातं. त्यावर कठोर उपाययोजना करण्याऐवजी हॉटेल्स रात्रभर चालू ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात वेळ वाया घालवला जातो. कोणी काही करू शकत नाही.

१५. मालिकांमध्ये सर्रास अंधश्रद्धेचा प्रसार केला जातो. जादू, मंत्र-तंत्र यावर भर दिला जातो. कोणी काही करू शकत नाही.

१६. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असूनही रस्त्यावर असंख्य खाण्याचे पदार्थ बनवून चोवीस तास विकले जातात. त्यातल्या काही गाडय़ा या त्या भागातल्या नगरसेवक, आमदार वा खासदार यांच्या डोळ्यासमोर चालवल्या जातात. बऱ्याच वेळा त्यांच्या दयाळू आश्रयानेही त्या उभ्या राहतात. कोणी काही करू शकत नाही.

१७. न्यायालयात जामीन मिळाला म्हणजे आता काही खटला उभा राहत नाही याची खात्री पटल्याने जणू काही तो माणूस निर्दोष सुटला असा समज करून घेऊन गुन्हेगार किंवा राजकारणी नेत्यांचे ‘निष्ठावान’ कार्यकत्रे न्यायालयाच्या बाहेरच फटाके फोडून आनंद साजरा करतात. कोणी काही करू शकत नाही.

१८. समाजमाध्यमांतून (फेसबुक, ट्विटर) इतरांना नागरिकशास्त्राचे धडे देऊन सतत अक्कल शिकवणारे आपल्या महागडय़ा कुत्र्या-मांजरांना मलमूत्रविसर्जन करायला सकाळी रस्त्यावर फिरायला घेऊन येतात. कोणी काही करू शकत नाही.

१९. ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या तत्त्वांवर आपण राज्य- पातळीवर विधानसभा व विधान परिषद आणि राष्ट्रीय पातळीवर लोकसभा आणि राज्यसभा अशी भवनांची निर्मिती केली. आणि यापैकी ज्येष्ठ सभागृहांत कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या (ज्यांना निवडून येऊन राजकारण करायचे नसते अशा) माणसांच्या नियुक्त्या करायच्या, असा मूळ संकेत होता. मात्र, आज निवडून यायची लायकी वा ताकद नसणाऱ्यांना, नेत्यांना फक्त आणि फक्त आपण राजकीय सोय म्हणून तिथे पाठवून एक अत्यंत गैर पायंडा पाडला आहे. कोणी काही करू शकत नाही.

२०. रस्त्यावर विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे सामान्य माणसांना पदपथावर चालता येत नाही. उठसूठ कुठल्याही घटनेचा मेणबत्त्या पेटवून निषेध नोंदवणाऱ्या एनजीओ यावर आंदोलन का उभारत नाहीत? या प्रश्नाला उत्तर ‘नाही’ म्हणून कोणी काही करू शकत नाही.

२१. निवडणुकांच्या आधी एकमेकांवर आरोपांचं शेण फेकणारे राजकीय पक्ष नंतर गळ्यात गळा घालून ‘युती’ वा ‘आघाडी’ असं गोंडस नाव घेऊन सत्तेवर येतात. लोकांनी त्यांना एकत्र येण्यापासून नाकारलेले असते, तरीही ते राज्यकारभार हाकतात. यात मतं देणाऱ्यांचा उपमर्द होतो. असं असूनही कोणी काही करू शकत नाही.

२२. पिकाला हमीभाव देण्यावरून वादंग माजतात, पण उत्पन्नाची हमी द्यायला कोणीही तयार होत नाही. कोणी काहीही करू शकत नाही.

२३. कोकणात शेतकरी आत्महत्या करत नाहीत; मात्र इतर प्रांतांत दरवर्षी आत्महत्या होतात. त्या नेमक्या का केल्या जातात, याची सत्ताधारी सोडाच; पण विरोधी पक्षांनाही चौकशी करावीशी वाटत नाही. कोणी काही करू शकत नाही.

२४. पूर्वी नाटकांच्या दौऱ्यावर असताना अनेक वेळेला ऐन पहाटेच्या वेळी ट्रक भरभरून कांदे, टोमॅटो भाव पडू नये म्हणून घाटातल्या दरीत फेकताना पाहिलंय. कोणी काही करू शकत नाही.

२५. आपला पराभव झाला, निवडणुकीत आपलं माप आपल्या पदरात पडलं; आता सुधारू या- असं कुठल्याही पक्षाला वा नेत्याला वाटत नाही. कोणी काही करू शकत नाही.

२६. ज्यांना पट्टय़ाने फोडून काढायला पाहिजे तेच लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतात, तेव्हा त्यांना सलाम करावा लागतो, असं अनेक निवृत्त पोलीस अधिकारी आपल्या बोलण्यातून वारंवार सुचवतात. पण कार्यरत असताना आपण त्यांना अटकाव का नाही केला, या प्रश्नावर कोणीही उत्तर देत नाही. कोणी काही करू शकत नाही.

२७. ‘नालेसफाईची मोहीम फत्ते’ असे फलक झळकतात, पण तरीही पाणी साचते. त्यानंतर इतर कारणं पुढे करून सारवासारव केली जाते आणि मूळ प्रश्न नाल्यांसारखा तुंबलेला राहतो. कोणी काही करू शकत नाही.

२८. जनता गरीब होत आहे आणि देवस्थानं अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहेत. कोणी काही करू शकत नाही.

२९ ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ झालं त्या क्षणापासून क्रिकेटच्या समालोचनात इयान चॅपेल किंवा जेफ्री बॉयकॉटसारखे परदेशी समालोचक ताबडतोब आणि आवर्जून ‘मुंबई’ म्हणू लागले. मात्र, आपल्याकडचे काही छचोर लब्धप्रतिष्ठित दक्षिण मुंबईचा उल्लेख ‘सोबो’ (‘साऊथ बॉम्बे’चं संक्षिप्त रूप) असा आजही करून ‘मुंबई’ हे उच्चारण त्यांच्या जिभेच्या दर्जाचं नाही असं समजून सर्रास तसंच लिहीत असतात. कोणी काही करू शकत नाही.

३०. वाहनं वाहून नेण्याची आपल्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची क्षमता आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे आता नवनवीन वाहनं निर्माण करणं बंद केलं पाहिजे. हे खरं तर सगळ्यांनाच पटलंय. तितके सत्ताधारी निश्चितच चलाख आहेत.तसं प्रत्यक्षात होताना  मात्र दिसत नाही. कोणी काही करू शकत नाही.

३१. ‘गावाकडे चला!’ असा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. परंतु आज गावांचं अत्यंत ओंगळ शहरीकरण करून निरोगी हवा आणि आणि पाणी यांचा गळा घोटला जातोय. कोणी काही करू शकत नाही.

ही यादी खरं तर शंभराच्या पुढे अगदी सहजगत्या जाईल. आपण प्रत्येकानं विचार करायचं ठरवलं तर ती संख्या कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट- आज जे सत्तेवर आहेत त्यांनी चिडायचं कारण नाही, किंवा जे नाहीत त्यांनी हुरळून जायचीही गरज नाही. कारण हे सगळे प्रश्न एका सत्ताबदलानंतरचे नाहीत, तर पिढय़ान् पिढय़ा चालत आलेले आहेत. कोणी काही करू शकत नाही!

sanjaydmone21@gmail.com

First Published on October 28, 2018 2:09 am

Web Title: political parties alliance for the interest of power
Just Now!
X