हिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात. आपल्या तारतम्य बुद्धीला छेद देऊन पात्रं वावरत असतात. तरीही आपण चित्रपट पाहतो. म्हणतात ना- दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये! आणि आपल्याला झुकानेवाले लोकया चित्रपट सृष्टीत गेली शंभर र्वष वावरत आहेत, हे खरं. परंतु या चित्रपटांनी आपल्याला कायम चार क्षण गुंतवून ठेवलं आणि स्वस्तात आपलं स्वप्नरंजन केलं, हे विसरता येणार नाही.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

‘हिंदी चित्रपट’ हा विषय घेऊन लोकांनी प्रबंध सादर केले आहेत. नुसता चित्रपट नव्हे, तर त्यातले एकेक कलाकार, गीतकार, संगीतकारांवरही प्रबंध लिहिले गेलेत. मागील दोन लेखांत मी जे काही मुद्दे मांडले होते त्यावर मला काही लोकांनी अभिप्राय पाठवले. त्यांनी हिंदी चित्रपटांत दाखवल्या जाणाऱ्या कुठल्या गोष्टी विचित्र असतात आणि त्या कशा काय आपण निमुटपणे बघतो, याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलंय. मात्र, त्यामुळे आपण आता चित्रपट बघायचं सोडलं, असं कोणीच लिहिलं नाही. ‘हे असंच असतं- त्याला काय करणार?’ असाच सगळ्यांचा सूर होता आणि म्हणूनच हा विषय अजून एका भागात मांडण्याचा मोह मला आवरला नाहीये.

हिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात. आपल्या तारतम्य बुद्धीला छेद देऊन पात्रं वावरत असतात. चित्रपटातल्या कॉलेजमध्ये वाणिज्य किंवा शास्त्र या शाखा जवळजवळ नसतातच. असते फक्त कला शाखा आणि नायक किंवा नायिका बी. ए. व्हायच्या खटाटोपात गर्क असतात. एखादा वर्ग दाखवला तर त्यात जे विद्यार्थी म्हणून उंडारत असतात ते सगळे बाप्पे किंवा बाप्प्या (दुसरा शब्द माहीत असल्यास तो वाचकांनी मनातल्या मनात वापरावा!)असतात. शाळेच्या प्रत्येक वर्गात दोनदा बसून ते इथपर्यंत आले असावेत, असं सारखं वाटत राहतं. त्यांच्या हातात एका बारीक वहीशिवाय काहीही नसते; बरेचदा तीही नसते. नायिका कायम बापाच्या गाडीतून येते आणि नायक गरीब असल्यामुळे चकचकीत सायकलवरून येत असतो. सुमारे तीसच्या आसपास असलेला हा विद्यार्थिवर्ग एकाच घटनेची वाट बघत असतो. ती म्हणजे- ऑल इंडिया म्युझिक कॉम्पिटीशन! तीन-साडेतीन मिनिटांच्या एका गाण्यावर त्या नायक किंवा नायिकेच्या वर्षभराच्या गुणवत्तेचा कस ठरवला जातो. कधी कधी एखादी उप किंवा सह अथवा खलनायिकाही त्याच कॉलेजात आपलं शरीर दाखवायला शिक्षण घेत असते. तिचे कपडे शिंप्याने चुकून हातरुमालाचा ड्रेस शिवल्याइतकेच असतात. एखादा खलनायकही त्या कॉलेजात सिगारेट ओढत बी.ए. व्हायला दाखल झालेला असतो. १९७२ साली ‘जंगल में मंगल’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात खलनायक प्राण (तेव्हा वय वर्ष सुमारे बावन्न) कॉलेजकुमार दाखवला होता. आता बोला!

अनेकदा चित्रपटांत गाडीचे ब्रेक नादुरुस्त करून घातपात घडवला जातो. ज्या क्षणाला चालवणाऱ्याला त्याची जाणीव होते त्या क्षणाला तो जोरजोरात स्टीअरिंग गरागर फिरवायला लागतो. इतकी र्वष गाडी चालवत असूनही त्याला कळत नाही, की असं करून काहीही उपयोग होत नसतो. इंधनाचा पुरवठा बंद करायचा विचारही त्याच्या मनात येत नाही. अशा घटनेत चालक हा नायक असेल तर तो झाडावर गाडी आदळून आपली सुटका करतो, नायकाव्यतिरिक्त इतर कोणी असेल तर झाडावर गाडी आदळून तो पुढच्या दृश्यात भिंतीवर टांगलेल्या फोटोत उभा राहिलेला दिसतो. एकाचा जीव वाचवणारी आणि दुसऱ्याचा जीव घेणारी झाडं फक्त हिंदी चित्रपटांतच असू शकतात!

देव-देवतांचे चमत्कार असलेले काही चित्रपट पूर्वी यायचे- ‘जय संतोषी माँ’, ‘जय महालक्ष्मी माँ’, वगरे. त्यांत एक दृश्य कायम असायचं : शेकडो खरकटी भांडी व लाखो कपडे धुवायला टाकलेले आहेत आणि नायिका ते एकटीने धूत आहे. तिचा छळ करणारी तिची सासू आणि नणंद समोरच बसून काहीतरी गोडधोड ओरपत आहेत. त्यांच्या खाण्याचा पहिला हप्ता संपवून पुढचा सुरू करायला आत जातात. बरं, घरात माणसं आपल्याला दिसतात चार किंवा पाच; मग इतकी भांडी आणि कपडे धुवायला येतात कुठून? तर त्या दुष्ट मायलेकी आत जातात, तत्क्षणी संगीताचा झंकार होऊन देवी प्रकटते. दिवसाचा कुठलाही प्रहर असो, ती देवी कमळ किंवा तत्सम फुल, एखादे हत्यार आणि उभारलेला हात अशाच पोझमध्ये असते. शिवाय तिच्या चेहऱ्यावर शॉटच्या आधी खाल्लेल्या पानाने रंगलेले स्मितहास्य असते. नायिका तिला आपण आनंदाने ही कामं करत आहोत, असं विनवून सांगते. पण देवीच ती, ती काय ऐकणार आहे? ती चुटकीसरशी सगळी कामं करून टाकते, म्हणजे स्वत: करत नाही तर ती आपोआप होतात! हे असे चित्रपट पाहून त्या काळात अनेक गृहिणी ‘आपली कामं पण अशीच झाली तर बरी!’ या इच्छेने व्रत करायच्या. मात्र एक गोष्ट कळत नाही- जी देवी ही कामं करून टाकण्यापेक्षा नायिकेच्या घरच्यांना कमी भांडी आणि कपडे धुवायला टाकायची बुद्धी का देत नाही?

मारधाड किंवा साहसयुक्त चित्रपटांत बरेचदा नायक किंवा नायक आणि नायिका दोघेही पोलीस अथवा खलनायकाचे साथीदार यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून वेषांतर करतात. करतात ते ठीक आहे, पण त्यानंतर ते गायला, नाचायला सुरुवात करतात आणि लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. अगदी पुढेपुढे करून आगाऊपणे त्यांचे नाचगाणे होते. कशाला? गपचूप वेषांतर करून जा ना निघून! याचा कळस आहे ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटात. तीनही नायक मारे वेषांतर करतात आणि खलनायकाच्या संपूर्ण संघासमोर कुठले गाणे म्हणतात? तर- ‘एक जगाह जब जमा हो तीनो- अमर! अकबर! अँथोनी!’ मग उपयोग काय त्या वेषांतराचा? आणि खलनायकांना ते इतकं बोंबलून सांगतात तरी काही केल्या उमगत नाही! असं कसं होऊ शकतं? पण त्या वर्षांतला तो सगळ्यात हिट चित्रपट होता.

हिंदी चित्रपटातला खलनायक हा माझ्या मते ‘भगवद् गीता’ वाचत असावा. नायिकेची प्राप्ती आपल्याला होणार नाही, हे माहीत असूनसुद्धा तो फळाची आशा न धरता दुष्कृत्यं करत असतो. शिवाय नायक तावडीत सापडला असला तरी तो एक वाक्य हटकून म्हणतो, ‘‘इतनी आसान मौत नही दुंगा.’’ आणि नायकाचा मृत्यू लांबवून तो स्वत:चा सर्वनाश घडवून आणतो. त्याचा एक अड्डा असतो. त्या ठिकाणी असंख्य खोकी पडलेली असतात. कसली असतात ती? शिवाय एक साखळी लटकत असते. कशासाठी? शेवटच्या प्रसंगात हे आपल्याला दिसते. जागा फार ऐसपस असते. ती विकली तरी उर्वरित आयुष्यात त्याचा उदरनिर्वाह आरामात होऊ शकेल इतकी मोठी. आधीच्या सगळ्या काळात खलनायकाचा त्या खोक्यांशी संबंध यावा असा कुठलाही व्यवसाय करताना तो दिसत नाही. काही काही वेळा त्या अड्डय़ांवर द्रवपदार्थ उकळत असतात. काय असते ते? शिवाय खिळ्यांची जवळजवळ येणारी यांत्रिक चाकं असतात. नायक-नायिका बी. ए. शिकताना आपण पाहतो, पण खलनायक एखाद्या शास्त्रज्ञासारखा ती अवजारं मांडून बसलेला असतो!

केवळ गाऊ आणि नाचू शकणारी, कचकडय़ाच्या बाहुलीसारखी नायिका आपल्याला पत्नी म्हणून लाभली तर आपल्या व्यवसायात तिचा कुठलाही हातभार लागणार नाही, हे खलनायकाला कळत कसं नाही? शिवाय तो अर्धवट अभ्यासू असावा असाही संशय मला चित्रपट पाहताना अनेक वेळा आलाय. कारण एखाद्या व्यक्तीला ठार मारायच्या आधी तो ‘‘मैं सिर्फ दस तक गिनुंगा’’ असं म्हणतो. याचा अर्थ काय समजायचा? आपल्याला दहा आकडे मोजता येतात हे त्याला उरलेल्यांना दाखवून द्यायचं असतं, की आपल्याला फक्त दहापर्यंतच मोजता येतात हे जाणवून तो तितकेच मोजतो? तो आकडे मोजू लागतो आणि आठ किंवा नऊ आकडे मोजल्यावर नायक येऊन हाणामारी करू लागतो. अजून एक आकडा मोजून खलनायकाला आपले ज्ञान वाढवू न देता त्याचा अभ्यास अध्र्यावर खंडित करणारा नायक हा शिक्षणाच्या विरोधात आहे असं नाही वाटत? आणि असा शिक्षणाचा शत्रू असलेला माणूस आपण नायक म्हणून खपवून घेतो? सगळ्या शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन या विरोधात कधीही आवाज का नाही उठवला?

चित्रपटांतली न्यायालये आणि त्यात वापरली जाणारी भाषा हा संशोधनाचा विषय आहे. एक ‘मक्तूल’ असतो आणि दुसरा ‘मुवक्कील’. यातला मारणारा कोण आणि मारला जाणारा कोण? हे आजवर बऱ्याच प्रेक्षकांना कळलेलं नाहीये. तसेच ‘ताजिराते हिंद’ किंवा ‘जेहरे दफा’ म्हणजे काय याचाही उलगडा झालेला नाहीये. तसेच एक वकील दुसऱ्याचा ‘फाजील दोस्त’ असतो, म्हणजे नेमका कोण असतो?

या आणि अशा असंख्य गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा आपल्याला होत नाही. तरीही आपण चित्रपट पाहतो. म्हणतात ना- दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये! आणि आपल्याला ‘झुकानेवाले लोक’ या चित्रपट सृष्टीत गेली शंभर र्वष वावरत आहेत, हे शेवटी सगळ्यात खरं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांवर लिहिता येईल. परंतु या चित्रपटांनी आपल्याला कायम चार क्षण गुंतवून ठेवलं आणि स्वस्तात आपलं स्वप्नरंजन केलं, हे विसरता येणार नाही.

sanjaydmone21@gmail.com