गेली काही र्वष राजकारणी आणि कलाकार यांचे आपसात फारच सूत जुळले आहे. काही कलावंत राजकारणात प्रवेश करून बसले आहेत. आणि बहुतेक महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकारणी हमखास हजेरी लावताना दिसत आहेत. मंचावर वेळेवर न येताही त्यांच्यावाचून साहित्यिक आणि कलावंत यांचे अगदीच अडून राहते. कोणी निधन पावला की- ‘साहित्यात (किंवा कलेच्या क्षेत्रात) त्यांचे योगदान अमोल आहे’, ‘त्यांच्या निधनाने आपण आधुनिक कालखंडातील एक महत्त्वाचा धागा हरवून बसलो आहोत..’ या आणि अशा छापाच्या प्रतिक्रियाही ते व्यक्त करताना दिसतात. कलाकारही राजकीय सभांमध्ये व्यासपीठावर हजर राहून पल्लेदार भाषणं ठोकतात. यालाही आता १०-१२ र्वष झाली. आपल्या कामापेक्षा (त्याला ‘कार्य’ म्हणतात हल्ली.) कलाकारांच्या लोकप्रियतेचा निवडणूक जिंकायला जास्त फायदा होऊ  शकतो, हे राजकारण्यांच्या लक्षात आल्यामुळे ते कलाकारांना जवळ करतात. अर्थात तो त्यांचा धूर्तपणा आहे. त्यामुळे बिचाऱ्या बऱ्याच कलाकारांना आता आपल्या हाती समाजाची सूत्रं आली आहेत असं वाटायला लागलंय!

यात एक सूक्ष्म फरक असा आहे, की ज्या अजीजीने (‘अदबीने’ म्हणून त्या भावनेत थोडं पाणी मिसळून त्याची तीव्रता कमी करता येते का हो?) कलाकार राजकीय व्यासपीठावर वावरतात त्या अजीजीचा मागमूसही राजकारणी मंडळी सांस्कृतिक मंचावर वावरताना दिसून येत नाही. त्यांनी काही देणगी (‘अनुदान’ म्हटल्याने ‘देणगी’ या शब्दातली भावना फारशी कमी होत नाही.) दिली तर बरं, हेच अशा वेळी कलाकारांच्या मनात असतं. त्यामुळे एका माजी मुख्यमंत्र्यांनी ‘‘महान नाटककार गोविंद बल्लाळ वेल्हाळ यांच्या नाटकांनी सामाजिक जाणिवांची मुहूर्तमेढ रोवली..’’ असं भाषण केलं होतं! तेव्हा कुणालाच त्यांचं काही चुकलंय असं वाटलं नव्हतं. शिवाय, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुणाकडून तरी लिहून आणलेल्या वरच्या वाक्यातला फक्त ‘महान’ एवढाच शब्द अर्थासकट कळला होता असं त्यांच्या तेव्हाच्या चेहऱ्यावरून वाटलं होतं. तरीही आज सांस्कृतिक कार्यक्रमांना मंत्रिमहोदय सुसाट भाषणं फेकत असतात. जर इतक्या मोठमोठय़ा कार्यक्रमांना मंत्री-संत्री येत असतील तर एखाद्या छोटय़ाशा कार्यक्रमाला एखादा नगरसेवक सहजच येऊ  शकतो की नाही?

तर- असाच एक कार्यक्रम अर्धा झाला आहे. आणि..

निवेदक : प्रेक्षकहो! आताच आपण एका अत्यंत सुंदर नृत्याचा अविष्कार पाहिलात (‘आविष्कार’ हा शब्द ‘अविष्कार’ असाच रूढ झाला आहे. जसा ‘पारंपरिक’ हा ‘पारंपारिक’ म्हणून ओळखला जातो, तसा. अर्थात ऐकणाऱ्यांना बऱ्याच वेळा दोन्हींतला फरक माहीत नसतो, त्यामुळे चालून जातं. हल्ली साध्या पाहण्यालासुद्धा आविष्कार-बिविष्कार म्हणायची पद्धत आहे.). आजची रम्य संध्याकाळ आपल्या कायम आठवणीत राहील, हे नक्की. (खरं तर मुंबईच्या हवेत आता रम्यबिम्य काहीही उरलेले नाही. पावसाच्या धारा आणि घामाच्या धारा या दोनच खऱ्या. तरीही हे सगळं निवेदनात यावं लागतं. अचानक फुटणाऱ्या पाण्याच्या पाइपातून जसं पाणी उसळतं तसा निवेदक तोंडाने उसळत असतो!) आता आपण वळू या पुढच्या पुरस्कारांकडे.. (कुठे वळू या? निवेदक तिथेच उभे असतात तरी त्यांना पुरस्कार देण्यासाठी अचानक वळण्याची ऊर्मी का दाटून येते?)

तेवढय़ात आरडाओरडा ऐकू येतो आणि एक माणूस अचानक मंचावर येतो. संपूर्ण पांढरे कपडे. कुणी हिंदी चित्रपट कलावंत निधन पावला की उरलेले जिवंत असलेले कलाकार जसे पांढरे कपडे घालून आणि डोळ्यावर गॉगल घालून जातात, अगदी तस्सा पांढरा रंग. शिवाय जिथे कुठे घालता येतील त्या सगळ्या अवयवांवर सोन्याचे दागिने. तो येऊन सरळ निवेदकाकडे जातो. ‘आमच्या नसानसांतून फक्त शौर्य वाहतंय..’ वगैरे संवाद तीनच मिनिटं आधी फेकणारा निवेदक त्या इसमाकडे बघून लटलट कापू लागतो.

माणूस : मी हुबा राहून बघतोय. कोनाकोनाचं नाव घ्येताय आनी कायतरी वाटप करताय. काय हाये हे?

निवेदक : आम्ही एक मनोरंजनाचा कार्यक्रम करतो आहोत.

माणूस : मणोरंग! कोनचा रंग?

निवेदक : मनोरंजनाचा कार्यक्रम.. पारितोषिक वितरण सोहळा..

माणूस : सोळा कार्यक्रम? हा सोळावा हाये? आनी मंग आधीचे पंधरा कधी झाले?

निवेदक : सोळा नाही हो, सोहळा. म्हणजे आम्ही एक प्रोग्राम करत आहोत.

माणूस : आस्सं! आस्सं! पोग्राम करताय? मग सापसीधं मराटीत बोला की! काय रे, पोग्रामवाल्या, नाव काय तुझं?

निवेदक : पुष्कराजवर्धन..

माणूस : मायला! घरच्या सगळ्यांचं नाव नाय विचारलं. तुझं एकटय़ाचं सांग!

निवेदक : माझा येकटय़ाचाच नाव हाये.. सॉरी.. माझं एकटय़ाचंच नाव आहे.. पुष्कराजवर्धन..

माणूस : पुष्.. पुष्..

निवेदक : अजून थोडं पुश करा आणि मग राजवर्धन म्हणा, मग संपलंच..

माणूस : पुष्कर्जन.. पुर्षकराजध्न.. पु.. पु.. आडनाव काय?

निवेदक : सिद्धसाधनकर!

माणूस : सिद्ध.. सिद्ध.. हे बग, आम्ही तुला पक्या म्हणू? काय?

निवेदक : निदान ‘प्रकाश’ तरी म्हणा.

माणूस : पक्या फायनल! तर पक्या, तुझा कसला पोग्राम आहे?

निवेदक : क्रीडा आणि कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल काही गुणवंतांना आम्ही मानचिन्हं प्रदान करत आहोत.

माणूस : ए! गप एकदम! काय बोलतोयस तू? अरे, आपल्या मुंबईत मराटीच बोलली गेली पाहिजे. मराटीत बोल. म्हाराट्रामध्ये मराटीचा अपमान आम्ही सअन करनार नाही. मराटीत बोल रे! मराटी कोनाची भाशा आहे? (इथे ‘भाषा’तला ‘ष’ शाईतल्या ‘श’सारखा उच्चारला जातो.) ‘मनाचे श्लोक’ लिनाऱ्या द्यानेश्वरांची, द्यानेश्वरी लीनाऱ्या रामदासांची, भिंत चालवनाऱ्या तुकाराम म्हाराजांची. त्या आपल्या ह्यंची मराटी, आनी.. आनी..

इथून पुढे त्याची ज्ञानाची बांधलेली पुरचुंडी संपते आणि तो नुसता ‘मराटी.. मराटी’ म्हणत राहतो.

निवेदक : साहेब! काहीतरी घोळ झालाय तुमचा. भिंत ज्ञानेश्वर, अभंग तुकाराम आणि श्लोक रामदासस्वामी.

माणूस : चलता है! कोनी काय केलं ते थोडं चुक्ल आशेल.. म्हंजी वार्ड बदलला, पन पार्टी तीच ना? पयले हितं काय चाललाय ते बोल.

निवेदक : आम्ही लोकांना इनाम देत आहोत.

माणूस : क्याश?

निवेदक : हो. आणि सर्टिफिकेट.

माणूस : परमिशन हाये काय पोग्रामाची?

निवेदक : हो आहे.

माणूस : दाकव!

निवेदकाला आता काय करू ते सुचत नाही. तो त्याच्यासमोर असलेला निवेदनाचा कागद पुढे धरतो. मराठी कार्यक्रम असूनही निवेदन रोमन लिपीत लिहिलेलं असतं (हल्ली असल्या कार्यक्रमांत निवेदन देवनागरीत लिहिलेलं असेल तर आपण दर्जाहीन ठरू अशी भीती संयोजकांना वाटत असते!), म्हणून नगरसेवकाला ते वाचता येत नाही आणि तो ‘ठीकाय.. ठीकाय..’ असं म्हणत राहतो.

माणूस : कुटल्या कुटल्या वार्डाच्या बाहेरच्या लोकांना बोलावून पैसा देताय. आनी..

निवेदक : पैसा नका हो म्हणू. त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करतोय आम्ही.

माणूस : पन मिळालेला पैसा ते कलाकार खर्च करनार ना? का वाटून टाकनार पब्लिकला? (सत्याच्या अत्यंत जवळ जाणारा प्रश्न अनपेक्षित जागेवरून आल्यामुळे निवेदकाची बोलती बंद होते.) ए! आता का गप झाला? मला कोन देनार क्याश? तू देतो? का तुझा बा?

निवेदक : नाही, ते घरी आहेत. इथल्या नाही, वरच्या. आठ र्वष झाली. पण तुम्हाला का द्यायचं?

माणूस : लोकांना देता आनी लोकप्रतिनीदींना नाय? अरे पक्या, मी नगरशेवक हाये.. लोक-प्रतीनीदी!

निवेदक : तुम्ही नगरसेवक आहात? काय नाव आपलं?

माणूस : कतऱ्या गनेश!

निवेदक : आपलं काय पानाचं दुकान होतं काय आधी?

माणूस : येडा हाय रे हा! मानसाला मी कतरी सुपारीसारका बारीक कातरून टाकायचो! म्हनून आपलं ते नाव हाये. पन पैले नुसती हवा होती आपली.. पन पद नव्हतं, पोजिशन नव्हती. म्हनून नगरशेवक जालो! तर सांगायचं म्हंजे ईथे या एरियात कायपन देवघेव जाली तर माझा वाटा आसतो! तवा मलापन देऊन टाका तुमचं येक इनाम!

निवेदक : असं कसं देणार? आज इथे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्य, संगीत, वेशभूषा, प्रकाशयोजना असे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

माणूस थोडा विचार करतो. अचानक त्याचा चेहरा उजळतो.

माणूस : ए पक्या, जर मी तुला पटवून दिलं- ही सांगितलेली सगळी कामं आपनपन करतो, तर मला देनार? इनाम आनि सर्फीटिकेट?

निवेदक : अं! अहो साहेब, तुम्ही ही कामं कधी केलीत? कातरण्याआधी की नंतर?

माणूस : दोन्ही कामं येकाच टायमाला करत होतो. आता लेककाचं इनाम मलाच मिळालं पायजे. कारन आपली सोताची बोलण्याची येक टाईल आहे. आपन जेव्हा कोनाला पैशासाटी फोन करतो तेव्हा आपले डायलॉग आपन बोलतो. लेकक म्हनजे अजून काय?

निवेदक : हो! बरोबर आहे तुमचं.

स्टेशनात गेल्यावर ट्रेन निघून गेल्याचं कळल्यावर जसा चेहरा होईल तसा निवेदकाचा चेहरा आणि अवस्था!

माणूस : मंग! बोललो ना तुला? एरियामध्ये कसं काय करायचं ते आपन ठरवतो. आता डायरेक्शन आजून काय वेगळं आसतं? इलेक्शनच्या टायमाला आम्ही लोकांना जे काय सांगतो ती अ‍ॅक्टिंग नाही तर अजून काय असती? फूडचं काय आहे?

निवेदक : नेपथ्य.. म्हणजे सेटिंग!

माणूस : सेटिंग तर आपन डेली लावतोच!

निवेदक : अरे हो, खरंच की! आता संगीत आणि ड्रेस आणि लायटिंग..

माणूस : अरे पक्या, हे तर मलाच मिळाले पाहिजेत तुमचे पारिशोतिक. सत्यनारायणाच्या म्हापूजेला आमच्या हिते तीन दिवस फुल मुझिक आणि लायटिंग आसतं. आणि त्या टायमाला आपन आसा ड्रेस घालतो की सगळे बगत राहतात.. आता अजून काय आहे?

निवेदक : मी आयोजकांना विनंती करतो, की गणेशसाहेबांना सर्वच्या सर्व पारितोषिकं देण्यात यावीत.

माणूस : लवकर दे! संद्याकाळ झाली. आपला टाईम झालाय. हात कापायला लागले आपले..

sanjaydmone21@gmail.com