मी बंगल्याच्या बाल्कनीत उभा होतो आणि समोरच्या रस्त्यावरची रहदारी बघत जरा नादावलो म्हणून मग खुर्ची घेतली आणि आता दोन-तीन तास तरी इथून हलायचं नाही असं ठरवलं. तोवर फक्त दोन-तीन जणच रस्त्यावर उरले होते. बाकीच्यांना आपापलं योग्य वाहन मिळालं होतं आणि ते त्यांच्या ईप्सित स्थळी (ईप्सित! काय शब्द मिळालाय! आता हा घट्ट धरून ठेवला पाहिजे.) रवाना झाले होते. त्या उरलेल्यांच्यात एक स्त्री होती. असेल तिशी-पस्तिशीची. आणि दोन जण होते तेही त्याच वयाचे. थोडा काळोख पडायला लागला होता..

‘‘अरे! पोचलास का नीट?’’ ..घरचे कोणीही.

‘‘हो! व्यवस्थित.’’ – मी.

‘‘काही त्रास नाही ना झाला?’’ पुन्हा तेच!

‘‘दोन तासांच्या प्रवासात कसला त्रास? कळलंही नाही कधी आलो ते. मस्त झोप झाली एक.’’ – मी.

‘‘बरं! नंतर फोन करत जा!’’ आज्ञावजा आज्ञाच!

थोडी शांतता हवी होती. कसलाही व्यत्यय नको होता कुणाचाच; म्हणून मध्यंतरी मी दोन-चार दिवस लोणावळ्याला गेलो होतो. का? एक तर काही काम नव्हतं. आणि दुसरं म्हणजे आपण घरी राहिलो तर आपला घरच्यांना त्रास होईल अशी शंका- एखाद्या सामाजिक कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटातल्या नायिकेच्या मनात प्रेम उत्पन्न झाल्यावर जसा काही विशिष्ट ठरावीक संगीताचा तुकडा झणझणून वाजतो- तशीच माझ्या मनात झंकारून गेली. जमल्यास एखादा लेख लिहायचा होता. तेवढय़ात घरून फोन आला. आता मला खरं तर असं प्रवासात, पोचल्यानंतर लगेच ख्यालीखुशाली कळवायची मुळात सवय नाहीये. मनाशी काहीतरी जुळवाजुळव करत होतो. त्यात फोन आला. सगळी विचारशृंखला तुटली. (काय जबरा शब्द आहे! एकांतात असे कठीण शब्द पटकन् सुचतात. खरं तर चार दिवस सोपा एकांतवास होता. त्यात असे कठीण शब्द नेहमी कसे सुचतात?)

आता काय लिहावं? खरं तर आमच्या व्यवसायातल्या व्यक्तींवर जेव्हा असा स्तंभबिंब लिहायचा प्रसंग गुदरतो (आणि तोही एक नाही, तर दर आठवडय़ाला!) तेव्हा बरेच जण त्याची सुरुवात करताना हटकून- ‘एका भूमिकेवर विचार करण्याकरता स्वत:ला एका कोषात गुरफटून घ्यायला गेलो होतो..’ असं लिहून बसतात. काही काही व्यक्ती निसर्गाच्या आणि शांततेच्या विवरात स्वत:ला लोटून द्यायला वगरेही लिहितात! बाकी मजकूर पुढे त्यांना मग सहज रेटून काढता येतो. कधी कधी तो प्रकार- ‘असाच घरी बसलो होतो. समोरच मागच्या महिन्यात शूटिंगला युरोपला गेलो होतो तेव्हा तिथून विकत आणलेला वाफाळलेला चहाचा कप होता. (स्त्री-लेखक असेल तर चहाची कॉफी होते.) तितक्यात अमुक किंवा तमुक गेल्याची बातमी व्हाट्स अ‍ॅपवर आली आणि माझा व त्या व्यक्तीचा गेल्या पंचवीस वर्षांचा परिचयपट डोळ्यासमोरून तरळून गेला..’ या रूपात वाचकांसमोर येतो. आता कोणीतरी गेला हे महत्त्वाचं, की तुम्ही परदेशातून कप विकत आणला, हे महत्त्वाचं? स्तंभ जर हजार शब्दांचा किंवा त्याहून मोठा असेल तर कपाऐवजी तिथून आणलेल्या एखाद्या माळेबद्दल किंवा दागिन्याबद्दल लिहावं लागतं. अर्थात, ती माळ किंवा तो दागिना स्वत:च्या घरीच द्यायला आणला असेल तर! असेलच जर आणलेला सुदैवाने (किंवा काहींच्या बाबतीत दुर्दैवानेही) तर- ‘बायकोच्या चेहऱ्यावरची चमक त्या दागिन्यापेक्षा जास्त मोहक होती!’ असं चक्क ठोकून लिहावं लागतं. आणि असं लिहिणारे बरेच महाभाग या जगात आहेत. असं लिहिण्याचा दुसरा फायदा म्हणजे यात पाच-पन्नास शब्द अधिक लिहून निघतात. आणि मग बाकीचं सगळं त्या व्यक्तीबद्दल लिहायच्या मिषाने स्वतबद्दलच जास्त लिहायचं. म्हणजे ती व्यक्ती जर नाटककार असेल (मी नाटककारांच्या जिवावर उठलो नाहीये. पटकन् आठवलं म्हणून नाटककार म्हटलं.) तर त्याच्या अमुकतमुक नाटकात मी कशी एक भूमिका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवली आणि त्याबद्दल त्या नाटककाराने कशी मला मिठी मारली, किंवा लिखित शब्दांच्या पुढे मी कसा त्या भूमिकेला आयाम दिला, वगरे लिहायचं. (हे आयामबियाम शब्द मला नेमक्या अर्थानिशी कुणी सांगेल तर बरं. शक्यता कमी आहे. कारण जे असे शब्द वापरतात ते हे कुठेतरी ऐकून अर्थाच्या फंदात न पडताच वापरतात.) असो!

तर.. मी गेलो होतो लोणावळ्याला- हे राहिलंच. आमचे एक नाटय़निर्माते स्नेही आहेत कोठारी नावाचे. त्यांचा तिथे बंगला आहे. पूर्वी एकदा मी तिथे लेखन करायला गेलो होतो. अगदी निवांत आहे. छान टुमदार बंगला आहे. (आता- ‘टुमदार’! हे काही काही शब्द ना आपण बिनदिक्कत वापरत राहतो. विशेषत: नाटक-चित्रपटांत, आणि सध्या काही र्वष मालिकांत अभिनय करणाऱ्यांना लेखक मानायची एक चूष  निर्माण झाली आहे. अन् आता आम्ही लिहिणारेही स्वत:ला तेच मानायला लागलोय. तेच जास्त धोकादायक आहे. त्यांच्या लिखाणात हा शब्द हटकून असतो.) तर- तिथे एक जोडपे आहे. ते सगळी बडदास्त ठेवतात. कोठारी जोडपे जरी निर्माते असले तरी त्यांना, आपल्याला आता नाटकातलं सगळं कळतं, असा स्वत:बद्दल बिलकूल गरसमज नाही. मी चार दिवस राहतोय असं म्हटल्यावर पुढेमागे काही लिहिलं तर लगेच आम्हाला निर्मितीसाठी द्यावं अशीही त्यांची अपेक्षा नाही. उलट, त्यांनी माझ्या एका नाटकाची निर्मिती केली होती, त्यात त्यांना नुकसान झालं, ही माझ्या मनात खंत आहे.

बंगल्याच्या बाल्कनीत उभं राहिलं की समोर पाचशे मीटरवर मुंबई-पुणे महामार्ग दिसतो. सतत वाहत असणारा. गेल्यानंतर एक दिवस संध्याकाळी बाल्कनीत उभा राहून ती रहदारी बघत होतो. असंख्य गाडय़ा, बसेस, टेम्पो, ट्रक्स, ट्रेलर्स जात होते. वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाडय़ा! एखादा ट्रक मधेच थांबायचा आणि बाजूलाच उभे असलेले काही लोक धावत धावत तो ट्रक गाठायचा प्रयत्न करत होते. ट्रकजवळ जाऊन त्या लोकांची काहीतरी बोलाचाली होत होती. काही वेळा त्या ट्रकमध्ये बसून काही जण जायचे आणि काही मागे उरायचे. मग पुन्हा एखादा ट्रक आणि परत तीच धावाधाव. कोण असतील हे? आणि कुठं जायचं असेल त्यांना? बहुधा स्वत:च्या घरीच. मग ते एस. टी. किंवा ट्रेनने का जात नसतील? कदाचित त्यांना ट्रकवाले कमी पशांत सोडत असतील, अथवा ते उभे राहत असलेल्या जागेपासून एस. टी. किंवा ट्रेनचा थांबा लांब असेल. आता त्या रस्त्याचे नियम मोडून जर ट्रक किंवा खासगी बसेस थांबत असतील (त्याही थांबल्या काही त्या संध्याकाळी!) तर मग एस. टी.ने एखादा असा विनंती थांबा (फी०४ी२३ र३स्र्) का निर्माण करू नये? निदान त्यांच्या खात्याला महसूल तर मिळेल. आणि ट्रक जितक्या पशांत सोडतो तितक्याच पशांत त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सोडावे. मात्र, यात मग सरकारी कायदे, कामगारांच्या संघटना, पद मिळाल्यावर आयुष्यात कधीही एस. टी.ने प्रवास न करणारे त्यांचे नेते आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी हे सगळं शुक्लकाष्ठ मागे लागेल अशी भीती निर्माण होईल. आपल्याकडे कष्टकरी वर्गाचा जोष मागण्या मागायच्या वेळी लागतो तसा कर्तव्याच्या वेळी कधीच लागत नाही.

मी उभा होतो आणि ते सगळं बघून जरा नादावलो म्हणून खुर्ची घेतली आणि आता दोन-तीन तास तरी हलायचं नाही असं ठरवलं. आता फक्त दोन-तीन जण रस्त्यावर उरले होते. बाकीच्यांना आपापलं योग्य वाहन मिळालं होतं आणि ते त्यांच्या ईप्सित स्थळी (ईप्सित! काय शब्द मिळालाय! आता हा घट्ट धरून ठेवला पाहिजे.) रवाना झाले होते. त्या उरलेल्यांच्यात एक स्त्री होती. असेल तिशी-पस्तिशीची. आणि दोन होते तेही त्याच वयाचे. थोडा काळोख पडायला लागला होता. मला घरात बसून सुरक्षित असल्यामुळे त्यांची काळजी लागली होती. यांना कधी मिळणार त्यांचं वाहन? कधी घरी पोचणार ते? त्यांच्या घरच्यांना किती वेळ वाट बघायला लागणार? तासभर झाला होता. हे रोजचंच असणार त्यांच्यासाठी. जसं जाणं तसंच येणं. म्हणजे सक्काळी किती वाजता निघत असतील?

आता ती बाई! तिच्या घरी लहान मूल असलं तर..? इतर माणसंही असतील, तर ती जाणार केव्हा, रांधणार केव्हा आणि कधी जेवायला बसणार? घरातल्या लोकांकडून रोज बिचारीला चार शब्द ऐकून घ्यावे लागत असतील का? माझी ठरलेली गाडी होती. तिला लागणारा वेळही साधारण ठरलेला होता. तरीही घरून फोन आला. त्या बाईचं काय होत असेल? हल्ली सगळ्यांकडे मोबाइल असतो असं आपण शहरात राहणाऱ्या लोकांना वाटतं. तिच्याकडे असेल का? आणि प्रवासाला रोज लागणारा बेहिशेबी वेळ पाळून ती पोटासाठी येते तो तिचा रोजगार काय असेल? कष्टाचाच असणार, हे निश्चित. आणि ते काबाडकष्ट करून हे असं उभं राहण्याची रोजची शिक्षा मिळूनही ती येते आणि जाते. तिच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला कशाची उपमा द्यायची? देव न करो, पण असा रोजचा प्रवास करताना कधी त्या ट्रकचा टायर पंक्चर झाला किंवा एखादा अपघात झाला, तर? तिचं सगळं वेळापत्रक कोलमडून जात असेल? अशा अवस्थेत मग ती घरी कशी आणि कधी जात असेल? किंवा समजा, तिच्याबरोबर कोणी अनोळखी प्रवाशी त्या ट्रकमध्ये बसला किंवा ती एकटीच ट्रकमध्ये असेल आणि जर कोणी तिचा गरफायदा घेतला, तर? हे माझ्या मनात आलं, तर तिच्या घरच्यांच्या मनात, तिच्या नवऱ्याच्या मनात कधी आलं नसेल? अशा वेळी तो आजकालच्या कथांत लिहितात तसा तिच्यावर संशय घेत असेल? तिला त्यावरून मारहाण करत असेल? अगदी याच्या उलट.. ती रोज उशिरा येते म्हणून नवरा गावातल्या एखाद्या दुसऱ्या स्त्रीबरोबर भावनिकदृष्टय़ा गुंतणार तर नाही ना, असा विचार त्या स्त्रीच्या मनात येत असेल का? बहुधा नसावा. कारण त्या अनुभूतीवरच्या कथा वाचायला तिला वेळच नसेल. (‘अनुभव’ म्हटलं की विचार पाणीदार वाटत नाहीत. आणि सगळ्यांना कळेल असे शब्द वापरले तर आपण वेगळे आहोत, हा गंड जोपासला जात नाही.) किंवा या असल्या गोष्टींचा कष्टमय अशा जीवनात वेगळा विचार करावा असं तिला आणि तिच्या नवऱ्याला वाटत नसेल.

तितक्यात एक ट्रक आला आणि ती त्यात बसून निघून गेली.. माझ्या अनेक प्रश्नांना उत्तरं न देताच. माझ्या शहरी भावनांनी भरलेल्या विचारांना महत्त्व देण्यापेक्षा तिला आपलं घर आणि वाट पाहणारी माणसं जास्त महत्त्वाची वाटली असणार. कोणाच्या तरी जीवावर आपल्याला एक लेख जमला म्हणून मीही खूश झालो. दुसरं आपल्याला काय हवंय? आणि त्या खुशीत घरी कळवायचं राहूनच गेलं.

sanjaydmone21@gmail.com