01 March 2021

News Flash

कुछ मटेरियल नहीं इस में यार!

गेली काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे.

गेली काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे. सगळ्यांना एक प्रकारची घाई झालेली आहे. जगण्याची आणि मरण्याचीही. त्यात परत ‘आपण जगलो की बास.. इतर मेले तरी बेहत्तर!’ ही भावना पार टोकाला गेली आहे. एकंदरीतच जगणं खूप धास्तीचं झालंय. आताच्या सरकारबद्दल मी काहीतरी टीका करणारं लिहिणार आहे असं वाटून कृपा करून लगेच सरसावून वाचायला बसू नका. गेली काही वर्षें- म्हणजे पाच-सात नाही, तर तब्बल वीस-पंचवीस वर्षांपासून हे सुरू आहे. आताचं सरकारही त्याला पूर्णपणे आळा घालू शकलेलं नाही, इतपत फार तर म्हणता येईल. आणि त्याला कारण म्हणजे अंतर्गत राजकारण! मुख्यमंत्री होणं म्हणजेच स्वपक्षीय तीन-चार इच्छुक लोकांना पायाखाली घालून त्या पदावर पोहोचणं- हा हल्लीच्या युगातला पहिला धडा आहे. यापूर्वीही हे होतच असणार. पार महाराष्ट्राचा मंगल कलशबिलश आणला गेला तेव्हापासूनच! पण तेव्हा ते सामान्य जनतेच्या आकलनात येणार नाही इतक्या शहाजोगपणे केलं जात असेल, किंवा जनताच त्यामानाने सुखीबिखी असल्याने तिच्या ते लक्षात आलं नसणार. आता मात्र हहा सारखी खुलेआम साठमारी चालू असते. प्रत्येक जण एकमेकाला खच्ची करण्यात आणि आपला पत्ता वर काढण्यात मग्न असतो. वेगवेगळ्या जाती-जमातींच्या रयतेला उगाचच उचकवून मोर्चाच काढायचा, कुठेतरी कोणाला तरी फितवून दगडफेकच करायची, कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना करून तणाव निर्माण करायचा यात सगळे जण मग्न असतात. खरं म्हणजे आधीच्या सरकारच्या कार्यकालाचा उबग आल्याने सत्ता बदलून बघायचा प्रयत्न केला गेला. त्यातही कुणा एका पक्षाला निरंकुश अधिकार न देता सगळ्यांना एकमेकाला सांभाळत राज्य हाकायला लागेल अशी मेखही सर्वसामान्य मतदाराने ठेवून दिली. आता जरा धीर धरून पहावा की नाही? पण जो- तो पक्ष काहीतरी करून दाखवण्याचा प्रयोग करतोय. मधे एकदा रेल्वेच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात काही माणसांचा मृत्यू झाला. घटना वाईटच. त्याबद्दल दुमत नाही. पण लगेच रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कसला मागताय? आधी ही घटना का घडली? त्यामागची कारणं काय आहेत? तिथे काय मदत पाठवली गेली? याबद्दल सर्व पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी चर्चा करा ना! ‘पक्ष कुठलाही असो; मतदार माणूस पाहून मतं देतात आणि प्रतिनिधींना निवडून पाठवतात,’ असं हेच लोकप्रतिनिधी बोंबलत असतात म्हणून मी ‘एकत्र चर्चा करा’ असं म्हणतोय. राजीनामा काय कधीही घेता आणि देता येतो. ‘मला या पदभारातून मुक्त करण्यात यावे..’ या किंवा अशाच प्रकारचं पत्र असणार ना? आणि देशात घडलेल्या एका घटनेवरून केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. १९६२ साली आपण चीनबरोबर युद्ध हरलो. आपला दारुण पराभव झाला. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ किंवा ‘हकिकत’ सिनेमा वगरे ठीक आहे; पण आपण सपशेल हरलो तेव्हा त्या घटनेची जबाबदारी घेऊन तेव्हाच्या सरकारने राजीनामा दिला? उलट, आपण ‘हिमालयाच्या मदतीला सह्यद्री धावला’ वगरे शाब्दिक कबुतरं उडवत बसलो होतो. या सगळ्यामुळे आजच्या पिढीला आपण एक युद्ध फार हतबल होऊन हरलो हे माहीतच नाहीये. हे सगळं आधी लिहिण्याचं कारण असं, की या सगळ्याला हल्ली ज्या समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाला आहे ते कारणीभूत आहेत. कुठे काही अपघात झाला की धावले लगेच सगळे. कुठल्या मंत्र्याने काही विधान केले की त्याच्यावर कीस पाडायला  सुरुवात. (‘कीस’ हा शब्द इथे मराठी म्हणून वाचावा.) बरं, त्यात कळवळा वगरे नाहीये हा! त्यांना प्रत्येक घटनेत ‘बातमी’ बनवून दाखवायची असते. ते सगळे सध्याच्या या अस्वस्थ परिस्थितीला बऱ्याच अंशी जबाबदार आहेत. कुठलीही घटना घडली की वृत्तवाहिन्या दिवसभर ती पुन:पुन्हा दाखवतात. काही काळाने त्यातलं गांभीर्य संपतं आणि ती फार विनोदीच वाटायला लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी काही कलाकारांना गाठलं जातं आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या जातात. कारण त्या चेहऱ्यांना बघून लोक आपली वाहिनी जास्त वेळ बघतील अशी त्यांना आशा असते. एकीकडे घटनेची तीव्रता दाखवणारी दृश्ये मागे सुरू असतात आणि पुढे हे टेलिव्हिजन कलाकार, ‘सेलेब्रिटी’ या नावाने ओळखले जाणारे काही महाभाग (ज्यांच्याकडे काही कोटी रुपयांची वाहनं आहेत!) ‘‘रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित राहिला आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला?’’ अशा अव्वल मूर्ख दर्जाच्या प्रश्नाला डोळ्यावरचा काळा चष्मा डोक्यावर ठेवून अत्यंत गंभीर चेहरा करून इंग्रजीत मराठी मिसळून उत्तरं देत असतात. त्या कलाकाराचा बिचाऱ्याचा रेल्वेप्रवासाचा, अभिनयाचा आणि इथल्या सर्वसाधारण जगण्याशी संबंध तुटूनही खूप र्वष लोटलेली असतात. त्यामुळे तो कलाकार ‘‘हो! माझा ड्रायवर रेल्वेनी येतो. त्याला नेहमी उशीर होतो, म्हणजे तो प्रवास खूपच त्रासदायक असणार असं मला वाटतं..’’ अशा छापाची उत्तरं देतो. एकेकाळी जगभरात या पंचमस्तंभाने अनेक अत्याचारी सत्ता उलथून टाकलेल्या आहेत. अनेकांच्या कृष्णकृत्यांचे अब्रूहरण केले आहे. आता मात्र ते आपल्या बातम्यांमधून फक्त आपल्या मातृभाषेची अब्रू घेताना दिसतात. एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्याला वादग्रस्त रूप द्यायचे. कोणीतरी चार माणसं गोळा करायची आणि चर्चा घडवून वादाची राळ पेटवून द्यायची, हा उद्योग सगळ्याच वाहिन्यांवरून केला जातो. राजकीय प्रश्न असेल तर दोन-तीन पक्षांचे लोक जमवायचे. त्यात प्रवक्ते नावाचे कोणीतरी असतात. ते आपापल्या पक्षाचे हिरीरीने समर्थन करत असतात. त्यांना काहीही विचारलं तरी त्या प्रश्नाला तेल लावून ते तो सुळकन् फिरवतात. बरं, आपल्याला हजारो लोक पाहत आहेत याची त्यांना बिलकूल पर्वा नसते. (वाहिन्या ‘लाखो लोक’ असं म्हणतात.) रस्त्यांची दुर्दशा यावर प्रश्न आला की एका बाजूचे वक्ते ‘शहरात हजारो खड्डे आहेत,’ असं सांगतात. तर ज्यांची सत्ता आहे ते ‘छे! छे! फक्त २९ खड्डे आहेत,’ असं ठासून सांगतात. रस्त्यावरील अपघातांत ठार झालेल्यांची संख्या हजारोंनी आहे. पण जो अपघात करून माणसं मारतो त्याला जामिनावर मोकळं सोडलं जातं. त्या दिवशी शेकडो वेळा टेलिव्हिजनवर तेच तेच दाखवलं जातं. पण पुढे अशा केसचं काय होतं यावर कोणीही कार्यक्रम करत नाही. त्यात जाहिरातीचे उत्पन्न काही मिळत नाही, ही त्यामागची ग्यानबाची मेख आहे. सातत्याने राजकारणी लोकांचे बरे-वाईट धंदे जणू काही आपण रामशास्त्री प्रभुणे आहोत अशा थाटात दिवसभर दाखवले जातात. पोलिसांना किंवा इतर सरकारी खात्यांतील माणसांना मारणे वगैरे घटनांची क्षणचित्रे दाखवली जातात. बहुतेक वेळेला मार खाणाऱ्या संबंधित माणसाची बदली होते. यावरून जनतेला आपण काही केलं तरी खपवून घेतलं जाईल असं वाटायला लागतं, किंवा आता आपल्याला कोणीच त्राता नाही असा त्यांचा समज होतो. यातूनच एक प्रकारची आक्रमकता किंवा टोकाचा निराशावाद जन्माला येतो. सगळ्यावरचा विश्वास उडायला लागतो. पुढे यातूनच हिंसावाद वाढायला लागतो. नव्हे, आता तो चांगलाच फोफावायला लागला आहे. चित्रपटांतूनही तेच दिसते. स्वप्नरंजन हे ज्याचे बलस्थान होते ते चित्रपट आता भयानक हिंसा पडद्यावर मांडतात. आणि ज्या वर्गाला या हिंसेचा बिलकूल उपद्रव होत नाही ते अशा चित्रपटांवर वेगवेगळी विशेषणे लावून त्यांची स्तुती करत असतात. क्वेन्टीन टेरेन्टीनो (याचा उच्चार काय आहे तो प्रत्येकाने आपापल्या वाचनातून आलेल्या बुद्धीनुसार करावा. मला हाच माहीत आहे.) नावाच्या दिग्दर्शकाचे चित्रपट फारच उत्कृष्ट असतील; पण त्याच्यासारखी हिंसा कोणी पडद्यावर दाखवूच शकत नाही, असं इथले समीक्षक लिहितात. आता अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्रालाही या हिंसावादाचा वर्ल्ड ट्रेड सेंटर प्रकरणाने आणि तिथल्या अनेक राज्यांत जवळजवळ नियमितपणे होणाऱ्या स्वैर गोळीबाराने किती फटका बसला आहे हे सर्वानाच माहीत आहे. युरोपला पृथ्वीवरला स्वर्ग म्हणतात. तिथेही या हिंसावादाने आज मूळ धरलंय. कधी कधी वाटतं की, या असल्या प्रकारच्या बातम्या चघळून चघळून दाखवणाऱ्या वाहिन्यांवर खरंच थोडा चाप लावला पाहिजे. पण असं म्हटलं की लगेच ‘हिटलरने माध्यमांची मुस्कटदाबी केली म्हणून काही त्याचा पराभव व्हायचा थांबला नाही..’ हे हजार वेळा ऐकून घ्यायला लागेल.

काही वर्षांपूर्वी माझ्या बिल्डिंगमध्ये एका स्त्रीने आत्महत्या केली. ती एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी होती. तो त्यावेळेला बिचारा बाहेरगावी होता. अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी येऊन आमच्या इथल्या रहिवाशांना शेकडो प्रश्न विचारून हैराण करत होते. सुदैवाने मी आधीच सगळ्यांना कल्पना दिल्याने कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘तिच्या नवऱ्याला आणि पोलिसांना येऊ दे, मग आम्ही काय ते सांगू,’ असा पवित्रा सगळ्यांनी घेतला. बराच वेळ झाला आणि त्यातला एक जण म्हणाला, ‘‘चलो, निकलते हैं! मोफत में मर गयी! कुछ फुटेज नहीं मिलनेवाला! वक्त बरबाद हो गया!’’

काय बोलणार यावर! आणि बोललं तरी दाखवणार कोण? आणि कशाला? कुछ मटेरियल नहीं इस में यार!

– संजय मोने

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:46 am

Web Title: sanjay mone articles in marathi on media of india
Next Stories
1 उजळले निखारे सारे
2 बॉलीवूड पुराण
3 पात्रं‘प्रपंच’!
Just Now!
X