मुंबईबद्दल मी या लेखात जे काही लिहिले आहे ते जरी गेल्या २० वर्षांपूर्वीपासूनचे माझे वैयक्तिक निरीक्षण असले तरी तिच्या पडझडीची सुरुवात त्याही बऱ्याच पूर्वी झालेली आहे. जुने लेख वाचले तर मुंबईची ही अवस्था शंभर वर्षांपूर्वीपासून होत आलेली आहे हे उमजून येईल. आजपर्यंत असंख्य लेखण्या मुंबईबद्दल लिहून झिजल्या आहेत, किंवा कोरडय़ा होऊन प्राण सोडत्या झाल्या आहेत. त्यातले काही लेख तर इतके किचकट आणि रटाळ आहेत, की त्या लेखण्यांऐवजी त्यांच्या मागच्या लिहित्या हातांच्या मालकांनी प्राण सोडला असता तर अधिक बरे झाले असते! साष्टीबिष्टीपासून, पोर्तुगीज आणि ब्रिटिश घराण्यांत कोणाचे तरी लग्न लागले तेव्हा हा मुंबई नावाचा भूभाग आंदण दिला गेल्यापासून ते अगदी पन्नास-साठच्या दशकांपर्यंत त्यांचे लेख घरंगळत जातात. एक-दोन लेखांत तर शब्द असे सांडत गेले होते, की आपण जसे श्रीखंड वा बासुंदी ओतल्यानंतर पातेल्याच्या कडांवर आतल्या बाजूने बोट फिरवतो तसे त्या पुस्तकाच्या पानांच्या कडा मी पुसून शब्द सांडून बाहेर आले नाहीत ना, ते एकदा तपासून घेतलं.

गेली ५५ र्वष मी मुंबई बघतो आहे. ‘मी जन्माने मुंबईकर आहे’ या वाक्याला आता काहीच अर्थ उरला नाहीये. किंवा जोरही. मनापासून सांगायचं तर, माझ्या मनातल्या मुंबईच्या सीमा कितीही ताणल्या तरी त्या पाल्र्याच्या पुढे जात नाहीत. पुढे ‘बृहन्’ किंवा ‘महानगर’ असा कुठलाही शब्द लावला तरी पाल्र्याच्या पुढचा भाग म्हणजे ‘उपनगर’! आज या मुंबापुरीची पार बजबजपुरी झालेली आहे. अगदी खरं सांगायचं तर मला मुंबईचा मनापासून कंटाळा आला आहे. मला ‘कोणे एकेकाळी..’ असा रडका सूर अजिबात लावायचा नाहीये. जे वाटतंय ते स्पष्ट शब्दांत मांडायचं आहे. हा काही आखून-बेतून लिहिलेला लेख नाहीये. त्यामुळे मुद्दे वर-खाली होतीलच. शिवाय कोणीही इसम ते मुद्दे चतुर आकडेमोड तोंडावर मारून खोडूनही काढेल.

गेल्या ५० वर्षांत मुंबईत फार फार बदल घडलाय. इमारती झाल्या. आलिशान विक्री केंद्रे उघडली. जमिनीच्या वर आकाशात चालणारी गाडी सुरू झाली. चकचकीत गाडय़ा धावू लागल्या. या सगळ्याला मी ‘बदल’ म्हणत नाहीये. म्हणजे तो झालाच आहे. पण ही वरवरची गोष्ट झाली. बदल घडलाय तो वृत्तीत, जीवनपद्धतीत, सार्वजनिक विचारांत. आणि तो फारच घाणेरडा आहे.

मुळात मुंबई ही कोणाला तरी कुणाकडून तरी मिळाली असं मी मघाशी म्हटलं; परंतु ती नेहमीच फुकटात मिळाली. पूर्वी लग्नात वधू-वरांना आहेर मिळायचा; त्या आहेराएवढीच मूळ मुंबईला किंमत आहे! ब्रिटिशांच्या राजसत्तेने मुंबई वाढली. परंतु ब्रिटिशांनी मुंबईत जेव्हा आपला बाडबिस्तरा आणून उलगडला तेव्हा आजूबाजूचा परिसर राहायला योग्य असा बनवला. काही सुखसोयी त्यांनी आपल्यासाठी निर्माण केल्या. त्या करताना त्यांच्या परीने बऱ्यापकी काळजी घेतली. १९४७ साली ते इथून कायमचे चालते झाले. त्यानंतर सगळा कारभार (?) आपल्या लोकांच्या हाती आला. त्यानंतर इतक्या वर्षांत आपण आपल्यासाठी अशा कितीशा सोयी केल्या? अगदी साधी गोष्ट आहे- मलनि:सारणाची जमिनीच्या आतून बांधीव व्यवस्था त्याकाळच्या मुंबईत होती. आज उपनगरांत ती सोय आहे का? आधी रस्ते बांधले जावेत आणि मग तिथे वसाहती निर्माण केल्या जाव्यात.. तरच सगळ्याला शिस्त येईल. परंतु आपल्याकडे मात्र जिथं जागा मिळेल तिथं हवं तसं बांधकाम करायचं आणि मग तडजोड करत रस्ते बांधायचे असं झालंय. रस्ते तरी कसले? दोन-चार वर्षांत पार रया जाते त्यांची.

प्रचंड लोकसंख्येच्या दबावाखाली मुंबई मरते आहे, गुदमरते आहे. तिला वातानुकूलित करणं हा त्यावरचा उपाय नाही. समजा, एक घर आहे. त्यात पाच माणसांना राहायला जागा आहे. त्या घरात अजून दोन माणसं कोंबून नाइलाजाने राहू शकतील. पण २० नाही ना राहू शकत? मग त्याला उपाय काय? तर जादा असलेल्या माणसांना बाहेरचा रस्ता दाखवणं. मुंबई हे एक मोठं घर आहे असं मानलं तर हाच उपाय करावा लागणार. नव्हे, हाच एक उपाय आहे. यावर ‘रोजगार मिळवणं हा माणसाचा प्राथमिक अधिकार आहे,’ असं काही जण गरजतील. परंतु रोजगार कमावणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी (सुखसोयी म्हणत नाहीये मी. सुखबिख फार पुढच्या गोष्टी झाल्या.) मिळाल्या पाहिजेत की नाही? झोपडपट्टी वाढत चालली आहे. त्यांना नवीन घरं मिळतात. बहुतेक वेळा ती घरं विकली जातात. आणि विकत घेणारे कोण असतात? आपणच ना? तेव्हा आपण काहीच बोलत नाही. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा त्यावेळचा आपला पवित्रा असतो.

रस्त्यांवर ‘जिकडे तिकडे चोहीकडे’ फेरीवाले मोकाट बसलेले असतात. परंतु आपण जी काही भाजी किंवा फळं अथवा तत्सम खरेदी करायची असेल ती मंडईत जाऊन नाही करू शकत? किती दिवस तो विक्रेता गिऱ्हाईकांशिवाय विकायला बसेल? आपण सर्वजण एकवटून उभे राहिलो तर हे घडू शकतं. कुठलाही हिंसाचार न घडू देता! परंतु झालंय असं, की आपण सगळेच थोडय़ाफार प्रमाणात भ्रष्ट झालो आहोत. आणि काही क्षुल्लक का होईना, पण त्याचे फायदे आपल्याला होतात असं आपल्याला मनापासून वाटायला लागलंय. जे जास्त भ्रष्ट आहेत त्यांना जास्त, खूप जास्त फायदे मिळालेत असंही आपल्याला ठामपणे वाटायला लागलंय. आणि त्याबद्दल आपण त्यांच्यावर आगपाखड करत राहतो आणि अत्यंत असमाधानी आयुष्य जगत राहतो.

आजच्या मुंबईचं सर्वसाधारण चित्र असं आहे!

पण मुंबई पूर्वी अशी नव्हती. रोज रस्ते धुतले जायचे तेव्हापासूनची मुंबई मला आठवते आहे. अंधूक अंधूक ट्राम आठवते आहे. एकदाच मी मला वाटतं, राणीचा बाग ते दादर असा ट्राममधून प्रवास केला होता. बसला गर्दी नाही, ट्रेनमध्ये उभं राहायला जागा असा काळ मी पाहिलाय! त्यात प्रवाशांना आधी उतरायला देण्याची चूक त्याही काळी होत नव्हती. पण उतरूच न देता उलट आत ढकलून देणं तरी होत नव्हतं!

त्या मुंबईत सगळे ऋतू आपली हजेरी शक्यतो वेळेवर लावून मोकळे व्हायचे. कधीतरी दुष्काळ पडायचाही. माणसं तेव्हा मदतीला पाठवली जायची. पण त्यावर चर्चा करणं हे मुंबईकर तेव्हा वेळेचा अपव्यय समजायचे. हल्ली काही पढतमूर्ख त्या चर्चावर आपली उपजीविका चालवतात. मलबार हिल, मरिन ड्राइव्ह, नेपियन सी रोड या आणि इथल्या लोकांनी फोर्ट, काळबादेवी, झवेरी बाजारात पसे कमवायचे आणि उरलेल्या लोकांनी मेहनत करायची अशी फार साधी विभागणी होती तेव्हा. माणसं आणि त्यांचे कामाचे, हिंडण्या-फिरण्याचे विभागही ठरलेले होते. शाकाहारी माणसं शाकाहार करायची. मांसाहारी माणसांना नळ्या तोडायला मज्जाव नव्हता. पण त्यांनीही आपल्यावर सोमवार, मंगळवार, गुरुवार पाळायचं बंधन अंगवळणी पाडलं होतं. मुख्य म्हणजे कोणीही कुणालाही अमूक खा आणि तमूक खाऊ नकोस असे सल्ले द्यायच्या फंदात पडत नसे. ‘जैन शेझवान पिझ्झा’ असला धर्म, प्रांत आणि खाद्यपदार्थ एकत्रित असलेला आचरट प्रकार हॉटेलात मिळत नव्हता! हॉटेलं भरपूर गिऱ्हाईकांनी कायम गजबजलेली असायची. पण दिवाळी-दसऱ्याला स्वयंपाक घरीच होत असे. काही घरांत क्वचित अपेयपानही चालायचं. पण त्याला आजच्यासारखी प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती. लोकांच्या आहारातल्या संतुलितपणाला भौगोलिक परिमाणं होती. लोकं खच्चून आणि चिवटपणे जगायची. पुरोगामी आणि प्रतिगामी वगरे विशेषणं समाजाला पिडत नव्हती. सणवार साजरे केले जात. अगदी कोपऱ्यावरचा छोटासा देवही भाव खाऊन राहत होता. आणि तोही खासगी होता. त्याला ‘सार्वजनिक’ असं बिरुद लागलं नव्हतं. आपल्या भावना आपल्या भाषेतच व्यक्त करता यायच्या. त्यांना इंग्रजी प्रतिशब्दांची बेगड लावायला लागायची नाही. एकंदरीतच सगळं सोपं होतं.

चाळी होत्या. तिथे वाद होत असत. त्यात वेळेला एकमेकांच्या आई-बहिणी आणि इतर नातेवाईकांची व्यवस्थित विचारपूस चारचौघांत केली जायची. जातीवरून मुक्तपणे शिव्या दिल्या जायच्या. पण त्याचं कोणालाच काही वाटायचं नाही. ती सगळी भांडणं सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीत कोसळणाऱ्या पावसाबरोबर धुतली जायची. गणपती उत्सव तेव्हा ‘उस्तव’ झाला नव्हता. ठिकठिकाणी कार्यक्रम असायचे. रात्री बऱ्याच ठिकाणी नाटकं असायची. त्यासाठी एक किरकोळ परवानगी पोलीस स्टेशनला जाऊन घ्यायला लागायची. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खास अंगात धर्य असणारे लोक असायचे. कारण पोलीस स्टेशनवर जायचं या कल्पनेनेच लोकांचा धीर गळाठायचा.

त्याही काळात त्या- त्या ‘येरियाचे दादा’ असायचे. तेही पोलिसांना घाबरून असायचे. (आता राजकीय नेत्यांच्या मुलांना ‘दादा’ म्हणतात. काळ बदलला तरी अर्थ तोच आहे!) तर ते गल्लीचे दादा सर्वसामान्य लोकांना त्रासबिस देत नसत. संध्याकाळी ते दररोज नाक्यावर उभे राहत. पण समोरून कोणी बाई येताना दिसली की त्यांची मान खाली जायची. वेळेला पावलांनी ताळ सोडलेला असायचा; पण वृत्ती मात्र शाबूत होती. सर्वसामान्य माणसं झोपी गेली की त्यांची भांडणं अगदी निकरावर येत असत. सकाळ झाली की पुन्हा सगळं सामसूम. आज मात्र कोणीच कुणाला घाबरत नाही. तरीही सगळे जण धास्तावल्यासारखे वागतात. जगात अनेक शहरं आहेत, पण मुंबई ही सगळ्यात सुरक्षित होती. गिरणी कामगारांचा संप झाला त्यानंतर मुंबई पाहता पाहता बदलली. अंतर्बा. पूर्णपणे. मराठी नाटकं आणि सिनेमे या गिरणी कामगारांनी एकेकाळी चालवले. दादा कोंडके यांचे चित्रपट सगळ्यांना पाहायची सवय त्यांनी लावली. धनवान लोक होतेच; परंतु मुंबई जोपर्यंत कामगारवर्ग इथे होता तोपर्यंत मध्यमवर्गीय माणसांच्या कह्यत होती. आवाज मोठा केल्याशिवाय किंवा झगडा केल्याशिवाय आपलं कोणी ऐकणारच नाही अशी हताश भावना तेव्हा नव्हती.

सत्तावन्न र्वष इथे घालवल्यानंतर आज मुंबईचा कंटाळा आलाय. जर कुठे संधी मिळाली तर एखाद्या कमी यातायातीच्या ठिकाणी जाऊन राहावं असं खरंच वाटायला लागलंय. काही माणसं तर सोडून गेलीही. प्रत्येकालाच हे जमेल असं नाही. ज्यांना जमलं ‘तेचि पुरुष दैवाचे’!

sanjaydmone21@gmail.com