24 April 2019

News Flash

भैय्या उपासनी – पूर्वार्ध

पूर्वीसारखी आता लोकांना नाटकाच्या मनोरंजनाची गरज उरली नाही म्हणून

|| संजय मोने

रेल्वेत नोकरीच काय, पण प्रवासी सोडून अर्थाअर्थी दुसरा कुठलाही संबंध नसताना कोलकाता येथून मुंबई आणि मुंबई येथून नागपूरला जाणाऱ्या दोन गाडय़ा मधल्याच एका स्टेशनवर तब्बल १५ ते २० मिनिटे थांबवून ठेवणारा एखादा माणूस तुमच्या कोणाच्या ओळखीचा आहे? बहुधा नसावा. पण असा एक माणूस मला माहीत आहे. नव्हे, तो माझा अनेक र्वष मित्र होता. आज तो या जगात नाही. पण अजूनही त्याची आठवण येते. क्षणोक्षणी येते, किंवा ती आल्याशिवाय दिवस जात नाही, असं खोटं लिहायचं नाहीये मला; पण कुठेतरी तो आठवत असतो. विशेषत: जळगावला प्रयोग असला की हमखास!

पूर्वीसारखी आता लोकांना नाटकाच्या मनोरंजनाची गरज उरली नाही म्हणून; किंवा सध्या सादर होणाऱ्या बहुसंख्य नाटकांनी लोकांचे मनोरंजन होत नाही म्हणून; अथवा आता त्यापेक्षा सुमार दर्जाच्या मनोरंजनाची प्रेक्षकांनी सवय लावून घेतली आहे म्हणून; नाही तर असंही असेल, की त्याहीपेक्षा वाईट नाद पटकन् लागतात आणि चांगल्या सवयी चटकन् सुटतात म्हणून असेल कदाचित; पण हल्ली बाहेरगावी नाटकांचे प्रयोग फारसे होत नाहीत. त्यामुळे माझा त्या- त्या गावातल्या मित्रांशी थेट संपर्क तुटला आहे. तो तुटल्यामुळे आता त्यांच्याबरोबर पूर्वी घालवलेले (‘वाया’ नाही म्हणवणार; पण ‘घालवलेले’ नक्कीच!) दिवस आठवून मनाचे समाधान करून घ्यावे लागते. या माझ्या दिवंगत मित्राचं नाव- भैय्या उपासनी! याच नावाने तो सगळ्यांना माहीत आहे.

ना. धों. ताम्हणकर यांच्या ‘गोटय़ा’ या पुस्तकावर आधारित एक मालिका होती. मी त्यातल्या दोन भागांत एक भूमिका साकार करण्यासाठी गेलो होतो. त्यात गोटय़ाच्या वडिलांची भूमिका भैय्या उपासनी करायचा. आईची भूमिका मानसी मागीकर करायची. तर- त्या चित्रीकरणाच्या दरम्यान पहिल्यांदा माझी भैय्याशी ओळख झाली. चित्रीकरण थोडं उशिरा संपलं. उशीर झाला होता, पण फार छान दिवस गेला होता. दिवसभर माझ्या आणि भैय्याच्या फार गप्पा झाल्या नाहीत. चित्रीकरण संपलं आणि मी माझ्या थोडय़ाशा तुटक असलेल्या स्वभावानुसार कुणाशी न बोलता घरी जायला निघालो. अचानक भैय्या समोर आला आणि त्याने मला ‘‘कुठे राहतोस?’’ असा प्रश्न केला. फार विषय वाढवायला नको आणि आता या मालिकेशी पुढे काही माझा संबंध येणार नव्हता, तेव्हा कशाला ओळख वाढवा? असं मनात धरून, पण वरवर हसून त्याला म्हणालो, ‘‘घरात राहतो.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे वा! छान! मी रेल्वेच्या पुलाखाली राहतो.’’ मी त्यावर ‘‘शिवाजी पार्कला राहतो!’’ असं उत्तर दिलं. म्हटलं, यावर विषय संपेल. पण त्यावर लगेच त्याने- ‘‘म्हणजे मैदानात? मग घरी असं का म्हणालास?’’ असं विचारलं आणि त्या क्षणी मला तो एकदम आवडून गेला. मी त्याला पूर्ण पत्ता सांगितला. तर भैय्या म्हणाला, ‘‘इतका डिटेल नको. मी काही लगेच पुढच्या वेळी तुझ्या घरी येणार नाहीये!’’ मी नंतर मात्र मनापासून म्हणालो, ‘‘अरे, ये ना! त्यात काय?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘मी दादरला राहतोय सध्या! शारदाश्रम सोसायटीत. एरवी जळगावला असतो. चल, एकत्र जाऊ!’’

मग आम्ही दोघे बसमध्ये बसून दादरला आलो. ‘‘थोडं जेवू या? माझ्या घराच्या कोपऱ्यावर एक चिनी पदार्थ मिळणारं ठिकाण आहे.’’ आम्ही भैय्याच्या घराजवळच्या त्या ठिकाणी आलो. जेवणाची ऑर्डर दिली. पुढे इतरही काही ऑर्डर्स दिल्या. रात्री तीन-साडेतीन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. अशाच जुजबी. मी सध्या कुठलं नाटक करतोय, वगैरे. जेवण झाल्यावर निरोप घेताना त्याचा जळगावचा पत्ता त्याने मला दिला आणि नंतर- ‘‘पत्ताबित्ता सोड. जळगावात आलास की भैय्या उपासनी कुठे राहतो, एवढंच रिक्षावाल्याला विचार. माझ्या दारात आणून सोडेल! किंवा फोन कर, मी न्यायला येईन,’’ असं म्हणून स्वत:चा दूरध्वनी क्रमांकही त्याने लिहून दिला.

पुढे दोन-तीन महिन्यांत माझ्या नव्या नाटकाचा दौरा जळगाव, भुसावळ, धुळे आणि इतर दोन-तीन ठिकाणी ठरला. जळगावला पोहोचल्यावर अचानक भैय्याची आठवण झाली. म्हटलं, त्याला भेटायचं. पण कसं आणि कुठे? कारण त्याचा दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता कुठे हरवला होता, देव जाणे! पण त्याने ‘माझं नाव सांग कोणालाही.. दारात आणून उभे करतील,’ असं सांगितलं होतं ते आठवलं. तरीही जरा साशंक होतो. म्हणून जरा डोक्याला ताण दिला आणि जो काही पत्ता आठवत होता तो रिक्षावाल्याला सांगितला. पण तो अपुरा होता. त्यामुळे आमची रिक्षा इथून तिथे फिरत होती. महाबळ कॉलनी म्हणजे एक मोठं नगर होतं. तिथपर्यंत पोचलो, पण पुढे काय?

एव्हाना रिक्षावाल्याला माझा संशय आला असावा. कारण त्याने- ‘‘अरे भौ! जायाचं र्ती कोनाकडे, ते तरी सांगा नं..’’

‘‘उपासनी नामका एक दोस्त है मेरा..’’ अज्ञान झाकायला हिंदीसारखी भाषा नाही!

‘‘रेडियोवाला क्या? भैय्या भौ क्या?’’

मी होकार दिला

‘‘तो पहलेच बोले होते- भैय्या भौ के घर जाना है!’’

आणि पाचव्या मिनिटाला रिक्षा भैय्याच्या घरासमोर थांबली. इतकंच नाही, तर त्याने पैसेही घेतले नाहीत!

‘‘अरे, भैय्या भौच्या घरी आला म्हणजे तुम्ही मोठी माणसं! त्यांचे पैशे कसले घ्यायचे? पाप लागेल ना भौ!’’

काही बोलायच्या आत तो निघून गेला. इथे भैय्याची काय वट आहे, ते माझ्या लक्षात आलं. मी घरात गेलो. भैय्याने दरवाजा उघडला आणि पहिली खणखणीत मिठी मारली.

‘‘अरे, आलास तू! मला वाटलं, तू काय भेटणार परत मला? तुम्ही मुंबईवाले म्हणजे ‘रात गयी, बात गयी’वाले. ये, आत ये!’’ असं म्हणून त्याने घरातल्या सगळ्यांची ओळख करून दिली. वडील, भाऊ, बायको- सगळ्यांची. थोडंबहुत बोलणं झालं आणि आतून उत्तम असं खायला आलं. खाऊन झाल्यावर आम्ही दोघे बाहेर पडलो.

‘‘चल, तुला आमचं गाव दाखवतो.’’ भैय्या म्हणाला.

मग आम्ही त्याच्या बुलेटवरून बाहेर पडलो. अख्खा गावभर तो मला फिरवत होता आणि लोकांचे सलाम स्वीकारत होता. जाताना तोंडाचा पट्टा अखंड चालू होता. नंतर घरी परतून जेवण, थोडी विश्रांती, तिथून थेट प्रयोगाला. रात्री प्रयोग संपल्यावर आम्ही मुंबईत बाकी राहिलेल्या गप्पांचा हिशोब मांडायला बसलो. पहाटेपर्यंत. सोबत चहा किंवा सरबत पीत होतो, असं खोटं लिहून चालणार नाही!

भैय्या जळगाव आकाशवाणीत नोकरीला होता. आणि जमेल तशा एकांकिका आणि नाटकं करायचा. त्याच्याजवळ एक लाल रंगाची बुलेट होती. तिचा विलक्षण किस्सा त्याने ऐकवला.

तो ‘नटसम्राट’ नाटकाचा प्रयोग करायला चाळीसगावला गेला होता. प्रयोग संपल्यावर तिथले एक रसिक गृहस्थ आत आले. मला वाटतं- हांडे नाव त्यांचं. त्यांनी हातातल्या बुलेटची चावी भैय्याच्या हातात दिली, ‘‘मला जास्त शब्दांत तुमची स्तुती करता येणार नाही. पण आजपासून बाहेर उभी आहे ती बुलेट तुमची. उद्या कधी समजा- तुम्हाला ती सांभाळायला आली नाही, तर मला परत द्या. त्या वेळेला जो भाव असेल त्या भावात विकत घेईन.’’ इतकं बोलून तो माणूस निघून गेला.

‘‘संजय, त्यानंतर मी जिवापाड जपून ही गाडी सांभाळतो आहे.’’ भैय्या डोळ्यांत पाणी आणून म्हणाला. पहाडासारखा दिसणारा भैय्या एकदम लहान मुलासारखा दिसला मला.

त्यानंतर मी जळगावला गेलो की त्याला नियमित भेटायचो. भरपूर गप्पा व्हायच्या. त्याची मालिका संपली आणि तो जळगावला परतला. नंतर एका नाटकासाठी त्याला मुंबईहून बोलावणं आलं होतं. त्याच्या तालमीही सुरू झाल्या. पण त्याने अध्र्यावर ते नाटक सोडून दिलं.

‘‘अरे, ते नाही जमत आपल्याला तुमच्या मुंबईतलं घडय़ाळ्याबरोबर धावणं. वाटलं होतं, तिथे जाऊन काहीतरी करावं. पण नाही जमणार आपल्याला. उंटाच्या बुडाचं चुंबन घ्यायचं तर त्या मापाचं स्टूल पाहिजे. ते नाही आपल्याजवळ. प्रामाणिकपणे सांगतो..’’ त्याचं स्पष्टीकरण बिनतोड होतं.

‘‘ऐक, आमच्या विठ्ठल वाघांची कविता ऐक.’’

मला फार काही काव्य या प्रकाराशी सलगी करता आली नाही कधीच; पण त्याची ती अहिराणी भाषेतली कविता फार मनापासून ऐकवली त्याने. मुकेश नावाचा गायक जरा सुराला पक्का नाही, असं बरेच लोक म्हणतात; पण तो फार मनापासून गातो, त्यामुळे अनेक र्वष त्याचा म्हणून एक रसिकवर्ग होता. तो का होता, हे त्या दिवशी मला भैय्याने अनेक कविता ऐकवल्या तेव्हा कळलं.

जरी सगळं तो हसून साजरं करत होता तरी आतून कुठेतरी तो अस्वस्थ होता. पुढच्या वर्षी प्रयोगाला गेलो होतो. नेहमीप्रमाणे आमचं सगळं रूटीन पार पडलं. रात्री प्रयोगाला जाताना त्याला सांगितलं, ‘‘आज प्रयोग संपला की ताबडतोब रात्रीची ट्रेन पकडून मुंबईला जायचंय. त्यामुळे आज प्रयोगानंतर नाही थांबता येणार.’’

तो नाराज झाला. ‘‘साल्यांनो! असे उडत उडत भेटता.. त्यापेक्षा येताच कशाला आमच्या आयुष्यात?’’

मी निरुत्तर झालो.

रात्री प्रयोग उशिरा सुरू झाल्यामुळे मध्यंतरातच परतीची गाडी बहुधा चुकणार असं लक्षात आलं. त्याला अंदाज आला.

‘‘आलोच रे संजय!’’ असं म्हणून तो गायब झाला. पंधरा मिनिटांनी परत आला आणि विंगेमध्ये येऊन म्हणाला, ‘‘काळजी नको. ट्रेन मिळेल.’’

‘‘कशी मिळेल भैय्या?’’

‘‘मागच्या स्टेशनवर गाडी थांबवायला सांगितली आहे.’’

.. आणि खरंच! प्रयोग संपल्यावर स्टेशनवर आलो. गाडी निघून गेली असणार याची खात्री होती. स्टेशनवर काही लोक वाट बघत होते. आम्हा तीन-चार जणांसाठी जेवणाचे डबे घेऊन. गाडी उभी होती. आम्ही आत शिरलो. गाडीने शिट्टी फुंकली आणि आम्ही मुंबईला यायला निघालो.

पुढच्या वेळेला दुसरी गाडी कशी थांबवली ते सांगायलाच पाहिजे, नाही का?

sanjaydmone21@gmail.com

First Published on August 19, 2018 12:12 am

Web Title: sanjay mone comedy story