संजय मोने

पाऊस आता ओसरला. सकाळी फिरणारे वाढले. पण बोलायचे विषय तेच ते! राजकारणाचा विषय तर दररोज चघळला जातो. तावातावाने आपली मतं एकमेकांना सांगितली जातात. अखेर सगळ्याचा शेवट- ‘एकूण एक साले चोर आहेत!’ या वाक्यावर होतो. मग काही वेळाने पुन्हा सगळ्यांची वैयक्तिक आणि प्रापंचिक पातळीवर कुरकुर सुरू होते. आणि सगळं संपलं की जाताना- ‘काय राम नाही राहिला जगण्यात..’ असं म्हणत आपापल्या घराकडे कूच करतात.. पाय ओढत ओढत! काही वर्षांपूर्वी या सगळ्यात अचानक बदल झाला तेव्हाची ही गोष्ट..

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
changes in temperature and inflation
यूपीएससी सूत्र : वाढत्या तापमानाचा महागाईवरील होणारा परिणाम अन् अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, वाचा सविस्तर…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Loksatta editorial Summer water scarcity problem in Maharashtra state
अग्रलेख: टंचाईचे लाभार्थी..

पाऊस आता ओसरला. सकाळी फिरणारे वाढले, पण बोलायचे विषय तेच ते आहेत. कुठल्याही गोष्टीबद्दल कुरकुर करत आमचं मध्यमवर्गीयपण मिरवण्याचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही गमावत नाही. राजकारणाचा विषय तर दररोज चघळला जातो. मुळात राजकारणाचाच चोथा झालाय, तर त्यावर बोलायच्या विषयाचा किती झाला असेल? प्रत्येक पक्षाचा एक असे बरेच अनधिकृत प्रवक्ते असतात. (‘राजकारण’ आणि ‘अनधिकृत’ हे शब्द आता वेगळे काढता येतील असं वाटत नाही. असो!) ते तावातावाने आपली मतं एकमेकांना सांगत असतात. कोणी तावातावाने काँग्रेसची बाजू मांडत असतो (आजही त्या पक्षाच्या बाजूने बोलणारे आहेत ही केवळ पूर्वपुण्याई आहे.) हल्ली बरेच जण भाजपवालेच असतात. अर्थात, बहुतेक सगळे नेतेच भाजपमध्ये शिरल्यामुळे प्रवक्ते वाढले आहेत. (इतर विरोधी पक्षांची नावं घेतली नाहीत. कारण म्हणावा असा देशव्यापी विरोधी पक्षच नाही आणि जे आहेत ते आपसात लढूनच इतके थकून जातात, की त्यांना भाजपबरोबर लढायला त्राण उरलेलं नाही.) भाजपची बाजू लढवत असणारे वृद्ध बरेच असतात. काही काही समाजवादी मतांशी अजूनही चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांना आपण नेमके कुठल्या समाजवादी पक्षाबद्दल बोलायचे ते कळत नाही. अखेर सगळ्याचा शेवट- ‘एकूण एक साले चोर आहेत’ या वाक्यावर होतो. (हे केवळ मुंबईत नाही, तर भारतातल्या सगळ्या सकाळी फिरायच्या जागांवर घडत असतं. राज्यकर्त्यांना चोर आणि डाकू यापेक्षा बऱ्या शब्दांनी कोणी संबोधत नाही. लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या काही जणांना इच्छा असली किंवा त्यांच्या अंगात तेवढं धैर्य असलं, तर त्यांनी तिथं जाऊन दाखवावं.) पुन्हा उद्या ताज्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर बोलायचं असं ठरवून घराच्या तक्रारींवर पोहोचतात. काही वेळाने पुन्हा सगळ्यांची वैयक्तिक आणि प्रापंचिक पातळीवर कुरकुर सुरू होते. आणि सगळं संपलं की, जाताना- ‘काय राम नाही राहिला जगण्यात..’ असं म्हणत आपापल्या घराकडे कूच करतात. पाय ओढत.. ओढत..

काही वर्षांपूर्वी या सगळ्यात अचानक बदल झाला तेव्हाची गोष्ट आहे ही. अण्णा हजारे नावाचा अहमदनगर जिल्ह्यतला एक माणूस आपल्या सगळ्या समस्यांवर तोडगा शोधून काढणार यावर लोकांची श्रद्धा बसली होती. त्यांना देशभरातून मिळालेला प्रतिसादही अभूतपूर्व असा होता. आमच्या कट्टय़ावर बसलेल्या लोकांना एक नवीन विषय मिळाला. आता बोल बोल म्हणता भ्रष्टाचार या देशातून नाहीसा होणार याची त्यांना खात्री पटली. लोकपाल बिल आले की जणू रामराज्य येणार आणि ते रामराज्यातले पौरजन होणार याचा आनंद आता त्यांच्या परिस्थितीने विदीर्ण झालेल्या हृदयात मावेनासा झाला. एका माणसाने तर अण्णांनी उपोषण सोडल्यावर पेढे वाटले. आपण त्यांना ‘अप्पा’ म्हणू या. तर, अप्पांनी यापूर्वी १९८३ मध्ये आणि २०११ मध्ये दुसऱ्यांदा आपण क्रिकेटमध्ये विश्वकप जिंकला तेव्हा पेढे वाटले होते. त्यांच्या आयुष्यात असा पेढे वाटण्याचा प्रसंग मात्र पहिल्यांदाच आला होता. त्यांच्या मुलांनी पेढे वाटण्याइतके गुण कधी मिळवले नव्हते. पुढे दोन्हीही मुलं व्यवसायात पडली. त्यांच्या दृष्टीने मराठी माणसाने व्यवसाय करू नये, नोकरी करावी. व्यवसाय करायचाच झाला तर खाणावळ काढावी. कारण जरी माल उरला तरी घरी खाता येतो! परंतु समजा, उद्या रद्दीचा धंदा तोटय़ात गेला, तर काय जुनं वाचत बसायचं?

मुलं अशी निघाली म्हणून पेढे नाहीत. मग पुढे मुलाने लग्न केलं ते त्यांच्या मनाविरुद्ध. मुलगी घरातून पळून गेली. दोघांचं उत्तम चाललेलं आहे. सुंदर तीन नातवंड आहेत, पण पेढे वाटायचे राहिले ते राहिलेच. आता अण्णांनी पेढे वाटायची संधी आणून दिली म्हणून अप्पा खूश झाले. अण्णांचं उपोषण संपलं आणि नेमके त्याच वेळेला काही पुढारी आपल्या कर्माने तुरुंगात गेले. त्यामुळे आमचे हे पार्कीय मित्र पेटून उठले.

‘‘देवाच्या काठीला आवाज नसतो!’’ एके दिवशी सकाळी अप्पा गरजले, ‘‘बघा, आता एकेक कसा आत जाईल! साले खडी फोडायला पाठवले पाहिजेत! अण्णांनी बाजा वाजवला या हरामखोरांचा! साले लुटताहेत देशाला! निवडून यायच्या आधी साले खायचे वांदे असतात. पाच वर्षांत पोत्याने पैसा करतात. अण्णा आगे बढो हम तुम्हारे साथ हैं!’’

स्वत:शी बोलता बोलता अप्पा आता ते समाजाला ऐकवण्याच्या मन:स्थितीत येऊन पोचले. सकाळी काही राजकारणीही फिरायला येतात, त्यातल्या एकासमोर अप्पा जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘आता बघा! तुमची सद्दी संपली. लोकपाल बिल येणार!’’

तो माणूस शांतपणे म्हणाला, ‘‘अप्पा, लोकपाल बिल म्हणजे नेमकं काय? मला जरा सांगू शकाल?’’

‘‘म्हणजे तुम्हाला माहीत नाही?’’

‘‘अप्पा, आम्ही नालायक आहोत, चोर आहोत असं तुम्ही म्हणता ना! नालायक माणसाला कसं काय माहीत असणार? सांगा, लोकपाल बिल म्हणजे काय?’’

अप्पा जरा थांबले. खरंच कुणाला माहीत आहे नेमकं लोकपाल बिल म्हणजे काय? अप्पांना वर्तमानपत्रांतून आंदोलन सुरू झाल्याचं माहीत होतं, वाहिन्यांवरून त्याबद्दल प्रचंड गदारोळ झाल्याचं त्यांनी पाहिलंही होतं; पण कुणीच लोकपाल बिल म्हणजे नेमकं काय, ते सांगितलं नव्हतं.

‘‘म्हणजे आता आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्या कुणालाही विनाचौकशी तुरुंगात पाठवू शकतो. मंत्रीबिंत्रीसुद्धा त्यातून सुटू शकणार नाहीत! काळा पैसा आता बाहेर पडणार!’’ अप्पांनी सुनावलं.

‘‘१९७५ साली आणीबाणी होती तेव्हाही विनाचौकशी असं अटक करण्याचे अधिकार होते. म्हणजे तुम्हाला आणीबाणी मान्य होती?’’

‘‘पण हा भ्रष्टाचार आता अति झालाय असं नाही वाटत तुम्हाला?’’ आणीबाणीचा विषय टाळण्यासाठी अप्पांनी विषय बदलला. खरं तर, अप्पा त्या काळात आणीबाणीच्या बाजूचे होते. कारण त्यांना झळ पोहोचली नव्हती.

‘‘मान्य आहे. भ्रष्टाचार जरा वाढला आहे. पण अप्पासाहेब, मला सांगा, सगळे यात आहेत की नाहीत? ९९ टक्के आहेत असं समजू या! कोण करतं भ्रष्टाचार?’’

‘‘तुम्ही करता!’’

‘‘आम्ही एकटेच कसा करू? आम्हाला पैसा कोण देतं?’’

‘‘आम्ही निवडून देतो म्हणून तुम्ही पैसा मागता.’’

‘‘अप्पासाहेब, मागच्या निवडणुकीत तुम्ही मतदान केलं होतं?’’

‘‘अं.. अं.. जोडून सुट्टी आली आणि नातवंडं हटून बसली म्हणून मग आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो.’’

‘‘म्हणजे तुम्ही निवड करायचा अधिकार टाळलात?’’

‘‘पण इतर अनेकांनी तुम्हाला मतं दिली त्याचं काय?’’

‘‘सध्या आपण तुमच्या-माझ्याबद्दल बोलू.’’

‘‘का? प्रश्न देशाचा आहे!’’

‘‘हो ना? मग त्याच देशाचे नागरिक म्हणून तुम्ही मतदान का नाही केलंत? मतदान करून तुम्ही तुम्हाला हवे ते लायक उमेदवार का नाही निवडून दिलेत? का आमच्यासारख्या नालायक लोकांवर विश्वास टाकलात?’’

‘‘माझा व्यक्तिश: तुमच्यावर राग नाही!’’

‘‘धन्यवाद! पण अप्पासाहेब, प्रश्न देशाचा आहे!’’

प्रश्न देशाचा आहे म्हटल्यावर अप्पा गप्प बसले. सकाळी सकाळी आपल्यावर एकदम देशाची जबाबदारी येऊन पडेल असं त्यांना वाटलं नव्हतं. अप्पा तसे जबाबदारी अंगावर घेऊन वागणाऱ्यांतले कधीच नव्हते. सारस्वत असल्यामुळे आलेल्या माणसांशी बायकोने बोलायचं व आपण तिच्या खांद्यावरून मध्ये मध्ये सूचना करायच्या आणि बायकोने दटावलं की गप् बसायचं- असा त्यांचा शिरस्ता होता.

तो राजकारणी पुढे बोलू लागला, ‘‘नोकरीत असताना तुम्हाला वर्षांतून एकदा फिरायला जायचा भत्ता मिळायचा, बरोबर? त्यात किती वेळा तुम्ही गेलात? आणि किती वेळा न जाता भत्ता खिशात टाकलात? गाडी चालवताना किती वेळा योग्य दंड भरलात? प्रवासात तिकीट तपासनीसाला किती वेळा चिरीमिरी दिलीत? तुमचा मुलगा आणि मुलगी दोघेही उद्योजक आहेत; त्यांना विचाराल, किती वेळा खरा खरा कर भरलात? दिवाळीत भेटी मिळायच्या नोकरीत, त्या किती वेळा नाकारल्यात?’’

अप्पांना शब्द सुचत नव्हते.

‘‘अप्पासाहेब, या सगळ्या प्रश्नांना तुम्ही नेहमी किंवा कधी कधी असंच उत्तर द्याल. एकदाही ‘नाही’ असं उत्तर तुम्हाला देता येणार नाही.’’

‘‘हे बघा साहेब, या छोटय़ामोठय़ा गोष्टी झाल्या. आमचा राग आहे तो कोटीच्या संख्येत भ्रष्टाचार होतो त्याबद्दल. आणि म्हणून..’’ अप्पांना आता मुद्दा सुचेनासा झाला. त्यांनी आजूबाजूला मदतीसाठी आपल्या मित्रांकडे पाहिले. पण ते सगळे ‘आपल्या अंगावर तर काही येत नाही ना, मग मरो तो अप्पा’ असं मनाशी म्हणत तोंड फिरवून बसले होते.

‘‘म्हणजे काही लोकांना भरपूर मिळतं आणि बहुसंख्य लोकांना ते मिळत नाही हे तुमचं दु:ख आहे! हो ना? आपण असं गृहीत धरू, की मगाशी मी म्हटलं तशा मार्गानी तुम्ही अख्ख्या आयुष्यात फक्त ५००० रुपये मिळवलेत. आता मी जर अशा तुमच्यासारख्या लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे तर मला तुमच्यासारख्याच सवयी असणं नैसर्गिक आहे. मला मागच्या निवडणुकीत एक लाख मतं मिळाली असं समजा. म्हणजे मी जर खासदार असेन तर मी पाच हजार गुणिले एक लाख म्हणजे पन्नास कोटी इतके पैसे जमवले तरी चालतील. कारण मी तुमचाच प्रतिनिधी आहे. बरोबर ना? जाऊ द्या, हिशोब खूप मोठा आहे. मलाही नाही जमणार करायला. चला, तुम्हाला माझ्या गाडीतून घरी सोडतो! लाजू नका, तुमच्याच पैशांवर घेतली आहे मी ही!’’

त्या दिवसापासून आज एक आठवडा झाला, अप्पा आले नाहीत. बहुदा आकडेमोड करत असतील!

sanjaydmone21@gmail.com