|| संजय मोने

खरं तर प्रदीप आमच्या कॉलेजला नव्हता. तो होता पाल्र्याच्या भागुबाई इंजिनीअिरग कॉलेजला.

मग तो रोज आमच्या कॉलेजात का असायचा? त्याच्याच भाषेत सांगतो..

‘होतं काय, की घराच्या समोरून बस आहे १ नंबरची आणि ४ नंबरची. १ नंबरची आधी आली तर ती पाल्र्याला जात नाही. म्हणून मग इथे येतो. आणि ४ नंबरच्या बसला फार गर्दी असते. मग शेवटी इथेच यायला लागतं.’

या सदरात आधी शाळेतल्या एकंदरीत वास्तव्याचा आढावा घेतला आणि त्यातून मग जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शिवाय पुलंच्या कार्याची खरी ओळख पटल्याने- थोडी उशिरा का होईना- त्यांच्या लेखनावर मालिका सुरू झाली. शिवाय हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आणि त्यांच्या हयातीतच  ‘रसिकानुनय करणारे लेखक’ अशी टीकेची झोड काही खास बुद्धिवंतांनी उठवल्याने माझ्यासारख्या सामान्य वाचकाला किंवा एकंदरीतच सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणसांना त्यांच्याबद्दल काय वाटतं यासाठी मागच्या आठवडय़ात स्तंभ लिहिला. आता माझ्यातला जिप्सी दुसऱ्या विषयाकडे स्थलांतर करणार होता, पण वाचकांनी मला कदाचित त्यांना त्यांच्या शालेय जीवनाची आठवण आल्यामुळे असेल- अजून काही अनुभव लिहावेत असा आग्रह धरला. आणि खरं सांगायचं तर दुसरं काही विशेष सुचत नसल्याने आजच्या स्तंभाची आखणी त्यावरच करावी का, असा प्रश्न मनात घोळत असतानाच आमचे स्नेही, तरीही गुरुतुल्य असलेल्या दीपक राजाध्यक्ष यांची ‘तुमचा लेख वाचून आमचे शालेय जीवन वाया गेले..’ अशी खुमासदार आणि मार्मिक प्रतिक्रिया आली आणि तोच विषय पुढे चालवत न्यावा, हा विचार पक्का झाला, म्हणून आजच्या लेखाचे प्रयोजन करत आहे. (इतके लांबलचक मराठी वाक्य मी पुन्हा कधी आयुष्यात लिहीन असे वाटत नाही.)

शाळेतून महाविद्यालयात दाखल व्हायला मधे एक वर्ष पुन्हा शाळेतच काढावे लागणार, हे त्यावेळी नवीन अभ्यासक्रमातल्या अकरावीसाठी ती महाविद्यालये सुसज्ज नाहीत, हे नक्की झाले. सज्ज म्हटले असते तरी चालले असते, पण एक ‘सु’ जर सगळ्या वाक्याचा डौल उगाचच उंचावत असेल तर कशाला कंजुषी करा- नाही का? अकरावी म्हणजेो..ख.उ. – कनिष्ठ महाविद्यालय. ‘कनिष्ठ’ या शब्दात सगळं आलंच. अचानक आमचे सगळे मराठीत शिकवले जाणारे विषय इंग्रजीत शिकवले जाऊ लागले. आमच्या मास्तरांपासून ते आमच्यापर्यंत सगळ्यांनाच ते नवीन होते. त्यामुळे पहिले तीन-चार महिने सगळीकडे चिडीचुप्प वातावरण होतं. हळूहळू त्या सगळ्याला रुळतो- न रुळतो तोच परीक्षा आल्या आणि आम्ही पास होऊन खऱ्या अर्थाने कॉलेजवीर झालो. शाळेच्या मानाने कॉलेज अवाढव्य असते. प्रचंड आवार, त्यात काही हजार मुलं. शिवाय उपाहारगृह वगरेही होतं. काही इंग्रजी माध्यमातून आलेली मुलं आणि इतर सगळी मराठी, गुजराती, पंजाबी माध्यमांतून आलेली मुलं आता एकत्र शिकू लागलो. तास बुडवून सिनेमा बघायला जाणे हा नवा शोध आम्हा बऱ्याच जणांना लागला. आणि बघता बघता तो आवडूनही गेला. शिक्षणाचे माध्यम काहीही असो; आयुष्याच्या शिक्षणाचे माध्यम मात्र िहदी सिनेमा हेच होते. हे सिनेमा थिएटरचे माध्यम आणि शिक्षण बऱ्याच लोकांना त्या काळात खूप काही शिकवून गेले. प्रेम, राग, लोभ, माया, गाणी, नाच, नवनव्या फॅशन्स आम्हाला िहदी सिनेमांनी फक्त रुपया-दीड रुपयात शिकवल्या. शिवाय एकांकिका स्पर्धा, जिमखान्यातले खेळ हे सगळंच फार नवीन होतं. आम्ही काहीजण जिमखान्यात बुद्धिबळ खेळायचो. खेळणाऱ्या दोघांनाही कधी कधी बुद्धिबळ येत नसायचं. पण मन एकाग्र करून उगाचच त्या पटाकडे बघत बसायचं आणि बऱ्याच वेळाने एखादी सोंगटी सरकवायची- असा आमचा खेळ चालायचा. त्यामागचा मूळ हेतू- ज्यांना खरोखरच बुद्धिबळ खेळता येत होतं त्यांना खेळायला मिळू नये, हाच असायचा. एकदा असं झालं, की मी आणि माझा मित्र (कै.) प्रदीप कारुळकर दोघे उगाचच सोंगटय़ा हलवत होतो. दोघांनाही त्या खेळाचा गंधही नव्हता. मागे खरे खेळणारे आपली वेळ कधी येईल याची वाट बघत तिष्ठत बसले होते. प्रदीपने कुठली तरी सोंगटी हलवली. आजही तो हत्ती होता की उंट की साधं प्यादं होतं, ते सांगता येणार नाही. पण अचानक मागून एका खऱ्याखुऱ्या बुद्धिबळपटूच्या तोंडून ‘वा! क्या बात है!’ असा उद्गार आला. आता यावर काय, असा प्रश्न माझ्या मनात आला. तरीही मी नेटाने कुठली तरी सोंगटी हलवली आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा ‘सुपर्ब!’ असा आवाज आला. प्रदीपने वाकून माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि शाबासकी दिली. त्याचा तो निगरगट्ट आविर्भाव पाहून मी अवाक् झालो. शांतपणे तो उठला आणि त्या वाट पाहणाऱ्या दोघांना म्हणाला, ‘आता पुढे खेळा तुम्ही. मला माझ्या मूव्हज् सगळ्यांसमोर ओपन करायच्या नाहीयेत. चल रे! अकराचा शो आहे. पसे जमवू या.’ आम्ही दोघेही निघालो.

पद्या कारुळकर म्हणजे अफाट माणूस होता. आमची शेवटपर्यंत मत्री टिकली होती. पुढे तो इंजिनीअर झाला आणि आसामला नोकरीसाठी गेला. त्याचे किस्से सांगायला गेलो तर काही दिवस लागतील. तरीही एक-दोन सांगतोच. खरं तर प्रदीप आमच्या कॉलेजला नव्हता. तो होता पाल्र्याच्या भागुबाई इंजिनीअिरग कॉलेजला. मग तो रोज आमच्या कॉलेजात का असायचा? त्याच्याच भाषेत सांगतो- ‘होतं काय, की घराच्या समोरून बस आहे १ नंबरची आणि ४  नंबरची. १ नंबरची आधी आली तर ती पाल्र्याला जात नाही. म्हणून मग इथे येतो. आणि ४ नंबरच्या बसला फार गर्दी असते. मग शेवटी इथेच यायला लागतं.’

असा हा पद्या आसामला पार आतमध्ये कुठेतरी नोकरीला गेला होता. अचानक एक दिवस आला आणि माझ्या प्रयोगाच्या ठिकाणी भेटला. त्याला असा अचानक बघून मला नवल वाटलं. त्यानेच खुलासा केला.. ‘आसामच्या गृहमंत्र्याच्या मुलाला मुंबईत अ‍ॅडमिशन  हवी आहे.’ त्याने एका भारीपकी लायटरने सिगारेट पेटवली. त्या लायटरवर काही आद्याक्षरं कोरलेली होती. ‘बी. पी.’ अशी. ती दाखवून तो म्हणाला, ‘त्या गृहमंत्र्यांचाच लायटर आहे.’ मला ते अजिबात खरं वाटलं नाही. त्याने शांतपणे पाकिटातून त्या मंत्र्याबरोबर असलेला आपला फोटो दाखवला. खरंच, तो लायटर त्यांचा असेल का? बहुतेक असावा. कारण त्या दोघांच्या फोटोत तो गृहमंत्रीच जरा ओशाळल्यागत वाटत होता.

एकदा आमचा अजित भुरे नावाचा मित्र कॉलेजच्या कुठल्या तरी निवडणुकीला उभा राहणार होता. पद्याने त्याला एका संध्याकाळी शांतपणे एका बाजूला नेला आणि दबक्या आवाजात त्याला म्हणाला, ‘अजित, तू आत्ता या निवडणुकीतून आपलं नाव मागे घे.’ अजित साहजिकच कुरकुरत म्हणाला, ‘पण मला निवडून यायची खात्री आहे.’ त्यावर पद्या म्हणाला, ‘ते माहीत आहे मला. ३२ मतांनी तू निवडून येणार आहेस. पण आत्ता नको. वाट बघ. मी तुला पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवतो.’ यावर अजित जागच्या जागी थिजला. पण तो निवडणुकीला उभा राहिला आणि निवडून आला. मात्र, नुकसान त्याचंच झालं. मुख्यमंत्रिपद त्याच्या हातून निसटलं ते निसटलंच.

या पद्याच्या एका मित्राच्या वडिलांनी म्हणे सुटय़ा पशांत आपला पगार एका गोणत्यात भरून आणला होता. कॉलेजात एक सिगारेट अख्खी पिऊ देत नाहीत मित्र- म्हणून मी बारावीत असताना पाईप ओढायचो. त्यावेळी मी कुठला तंबाखू वापरायचा, हे पद्या ठरवायचा.

एका नाटकाचं नेपथ्य तो करणार होता. नाटकाला बोटीची पाश्र्वभूमी होती. त्यासाठी त्याने कुठून कशी माहीत नाही, पण आम्हाला एका बोटीची सफर घडवून आणली होती. अगदी पार बोटीच्या इंजिन रूमपर्यंत! नंतर त्याने १९७९ साली (जेव्हा विमानाचं मुंबई-दिल्ली तिकीट चार-पाचशे रुपये होतं, तेव्हा) एका मराठी हौशी नाटय़संस्थेला नाटकाच्या नेपथ्याचं साडेतीन लाख रुपये बजेट दिलं होतं. आणि त्याचा तपशील शेवटच्या नया पशापर्यंत मांडून दाखवला होता. सगळे मिळून एका चहाचे

पसे सगळ्यांकडून जमवून तालीम करणारा लेखक-दिग्दर्शक तो आकडा ऐकून मटकन् खाली बसला.

‘ठीक आहे. हे जास्त वाटत असेल तर राहू दे. माझा दुसरा एक प्रदीप नावाचा मित्र आहे, तो करून देईल स्वस्तात..’ शांतपणे प्रदीप म्हणाला.

तो जो दुसरा प्रदीप होता- तो आमचाच मित्र. तो आíकटेक्चरच्या दुसऱ्या वर्षांला होता. त्याने सामानाची ने-आण वगरे सगळं धरून तेच नेपथ्य सुमारे ८०-९० रुपयांत उभं केलं. त्याच्या बजेटबद्दल छेडलं तर त्यावर प्रदीपचं उत्तर होतं- ‘प्रत्येकाचा क्लास वेगळा असतो रे! तुम्हाला नाही कळणार.’

खरंच, त्याच्याबरोबर अनेक वर्षघालवून आम्हाला काही फार त्याच्याबद्दल हाताला लागलं नाही. हातात सात-आठ तिकिटं असताना सिनेमाला वीस-पंचवीस जणांना तो कसा आत घुसवायचा, त्याचं त्यालाच माहीत.

पुढे त्याने नोकरी सोडली. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मग अचानक नाटकांची निर्मिती सुरू केली. एक चित्रपटही केला. सगळंच अजब!

असेच आम्ही एकदा मॅटिनी शो बघायला गेलो होतो. पडद्यावर कुठलं तरी पावसाचं गाणं सुरू झालं. मला काय वाटलं कुणास ठाऊक; मी अचानक छत्री उघडली. मागचे लोक ओरडायला लागले. त्यावर वळून पद्या म्हणाला, ‘ताप आहे त्याच्या अंगात. भिजला तर..? राहू दे!’

त्यानंतर अनेक वर्षपावसाच्या गाण्याला छत्र्या उघडायची प्रथा चालू होती.

‘दो बदन’ नावाच्या सिनेमात आशा पारेख ही नायिका एका दृश्यात नायकाला म्हणते, ‘जवाब मालूम है, फिर भी सवाल क्यों पूछते हो?’

हे वाक्य संपताक्षणी पद्या ओरडला, ‘हेच मी युनिव्हर्सटिीला विचारतो आहे गेली दोन र्वष.’ सगळ्या प्रेक्षागृहात हास्याचा स्फोट झाला. लोकांनी मनापासून पद्याला दाद दिली होती.

sanjaydmone21@gmail.com