25 February 2021

News Flash

असाही एक निकृष्ट क्रिकेट संघ!

आघाडीची जोडी एक डावरा आणि एक उजवा फलंदाज. यात लालचंद राजपूत आणि अमय खुरासिया आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

संजय मोने

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचे सामने सुरू आहेत. पहिली कसोटी जिंकून आपण सुरुवात तर झकास केली. सध्याचा हा संघ सगळ्यात चांगला आहे असं लगेच सगळे म्हणू लागले. परंतु त्यानिमित्ताने आपण एक वेगळाच संघ निवडून बघू या. तो म्हणजे सगळ्यात निकृष्ट असा भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ! आपण दोन वेळा एकदिवसीय सामन्यांत जगज्जेते झालो आहोत. असा पराक्रम याआधी फक्त दोनच देशांनी केलाय. तो म्हणजे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया! सर्वश्रेष्ठ संघाची निवड फार सोपी असते. निकृष्ट संघ निवडताना फार काळजी घ्यावी लागते. एकेक रत्न पारखून घ्यावं लागतं. या संघात निवडले जाणारे खरंच तितके टाकाऊ  नसतील; पण त्यांची खेळी आली तेव्हा परिस्थितीने त्यांच्या पुढय़ात जे वाढून ठेवलं ते फारच दुर्दैवाचं देणं असेल. काहीजण मात्र आपल्या अंगभूत अचाट कर्तृत्वाने यात समाविष्ट झाले आहेत. बघू या कोण कोण आहेत आपल्या संघात..

एकदिवसीय सामन्यात जास्त महत्त्व हे फक्त धावा किंवा बळी यांच्या आकडय़ांना असतं. प्रत्येक वेळेला त्यात दर्जा दिसतोच असं नाही. संघ निकृष्ट हवा, पण तो समतोल हवा. म्हणजे त्यात भरपूर अष्टपैलू खेळाडू असावेत. शिवाय दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज असावेत. एखादा डावरा त्यात असावा. शिवाय फलंदाजांपैकीही एखादा डावरा असावा. आणि मुख्यत्वे निवडला गेलेला प्रत्येक जण कमीत कमी दोन तरी एकदिवसीय सामने खेळलेला असलाच पाहिजे. आणि प्रत्येकाची प्रथम श्रेणी सामन्यांत कामगिरी चांगलीच असली पाहिजे.

आघाडीची जोडी एक डावरा आणि एक उजवा फलंदाज. यात लालचंद राजपूत आणि अमय खुरासिया आहेत. रजपूतने चार सामन्यांत मिळून तीन धावा काढल्या आहेत आणि खुरासियाने एक अर्धशतक केलेलं असलं आणि तेही अत्यंत आक्रमकपणे खेळून केलं असलं, तरी उरलेल्या सर्व सामन्यांत तो निष्प्रभ ठरलाय. सुमारे १७ च्या सरासरीने त्याने धावा काढल्या आहेत. याऐवजी अजून एखादा खेळाडू नक्की निवडला गेला असता; पण खुरासिया डावरा होता हा त्याचा दोष ठरला. कारण संघ समतोल करायचा तर डावा आणि उजवा अशी जोडी पाहिजे. गिलख्रिस्ट-हेडन किंवा सचिन-गांगुलीसारखी! इथे हे अवश्य सांगितलं पाहिजे, की रजपूतने अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. आजच्या काळात जर तो असता तर या संघात निवड होण्यापासून तो वंचित राहिला असता, हे नक्की. तिसऱ्या क्रमांकावर सुजिथ सोमसुंदर आहे. ज्याने खोऱ्याने धावा काढल्या असल्या तरी एकदिवसीय सामन्यांत त्याने चारच्या सरासरीने आठ धावा काढल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर आहे सुब्रमनियम बद्रिनाथ. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांत उत्तम कामगिरी केली असली तरी एकदिवसीय सामन्यांत त्याची सरासरी आहे फक्त १५! खरं तर त्याच्याऐवजी अजून दोन डावरे खेळाडू आरामात या संघात समाविष्ट झाले असते; पण त्यांची प्रथम दर्जाच्या सामन्यांतली कामगिरी बद्रिनाथइतकी लक्षणीय नाही.

पाचव्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यंत आपल्या या संघात अष्टपैलू खेळाडू आहेत. कारण १९८३ साली आपण विश्वचषक जिंकला होता तेव्हा त्यात मदनलाल, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद, कपिल देव, संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथ असे तब्बल सहा अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या सगळ्यांच्या कामगिरीचा एकत्रित परिणाम म्हणजे आपला अंतिम फेरीत झालेला विजय! तेव्हा आपल्या संघात सुनील गावस्कर, के. श्रीकांत, बलविंदर संधू आणि यशपाल शर्मा हे चारच खेळाडू असे होते की जे फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजी करत असत.

तर आपल्या या संघात पाचव्या क्रमांकावर येईल- लक्ष्मीरतन शुक्ला! एकेकाळी त्याच्याकडे भावी कपिल देव म्हणून पाहिले जायचे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांत सहा हजारांहून अधिक धावा आणि जवळपास पावणेदोनशे बळी मिळवले असले तरी या माजी भावी कपिल देवची एकदिवसीय सामन्यातली कामगिरी  अशी : तीन सामन्यांत नऊच्या सरासरीने १८ धावा आणि तब्बल ९४ च्या सरासरीने ९४ धावा देऊन एक फलंदाज त्याने बाद केला आहे. क्रिकेटचे तज्ज्ञ लक्ष्मीरतन शुक्लाबद्दल जेव्हा कौतुकाने बोलत होते, तेव्हाच आमचे मित्र माननीय अतुल परचुरे यांना त्याच्या कर्तृत्वाबद्दल साशंकता होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मीरतन शुक्ला या नावाचा माणूस उत्कृष्ट पानाचे दुकान थाटून विख्यात.. अगदी जगद्विख्यात पानवाला होऊ  शकतो; क्रिकेट खेळाडू नाही. लक्ष्मीरतन शुक्ला याने आपल्या कामगिरीमुळे अतुलच्या विधानाचा मान राखला, हे नक्की!

यानंतर सहाव्या क्रमांकावर असा एक खेळाडू आहे, की ज्याने १८८ सामन्यांत सहा हजारांहून जास्त धावा काढल्या आहेत. नऊ  शतके आणि २६ अर्धशतके कुटली आहेत आणि ६३० बळी मिळवले आहेत. मुंबईकडून खेळताना अनेक महत्त्वाच्या सामन्यांत त्याने आपली चमक दाखवली आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी करत असे आणि उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी. परंतु एकदिवसीय सामन्यांत त्याची फलंदाजीची सरासरी आहे ७.६६ आणि गोलंदाजीची १४१.५०! तो खेळाडू म्हणजे साईराज बहुतुले! पुन्हा एकदा स्पष्ट करतो- एकदिवसीय सामने म्हणजे फक्त आकडय़ांचा खेळ आहे. खेळाडूचा खरा दर्जा त्यातून कळेलच असं नाही. केवळ आकडेवारीमुळे हे खेळाडू या संघात आहेत.

सातव्या क्रमांकावर आहे आपला यष्टीरक्षक- भारथ रेड्डी! या जागेवर कोणीही दुसरा आपला हक्क सांगू शकत नाही. अगदी दीप दासगुप्तासुद्धा नाही. तीन सामन्यांत ११ धावा आणि दोन झेल अशी विलक्षण कामगिरी रेड्डीच्या नावावर आहे.

आठ, नऊ, दहा आणि अकरा या क्रमांकांवर निदान एखादा फिरकी आणि तीन वेगवान आग ओकणारे गोलंदाज नक्की आहेत. मुरुगन कुमारन, भारथी अरुण, अमित भंडारी, आर. पी. सिंग (हा पूर्वी तीन सामन्यांत खेळलेला गोलंदाज आहे. सध्याचा आर. पी. सिंग नाही.), रणधीर सिंग आदी अनेक उमेदवार या जागांसाठी अगदी हक्काचे आहेत. पण शक्य असल्यास या जागीही एखादा अष्टपैलू मिळाला तर फलंदाजी आणि गोलंदाजी अजून भक्कम होईल. म्हणून या आठव्या क्रमांकावर खेळायला येईल सुरु नायक. मोहिंदर अमरनाथला डावलून त्याची इंग्लंडच्या दौऱ्यासाठी संघात निवड झाली होती. मध्यमगती गोलंदाज आणि एक फलंदाज म्हणून त्यावेळी तो दौऱ्यावर गेला होता. याही संघात त्याची निवड याच बहुमोल गुणांवर झाली आहे. एक हजार धावा आणि १०० बळी अशी प्रथम श्रेणी सामन्यांतली कामगिरी असूनही एकदिवसीय सामन्यांत मात्र त्याने तीनच्या सरासरीने फलंदाजी आणि १६१ च्या सरासरीने गोलंदाजी केलेली आहे. ग्यानेंद्र पांडे हे अजून एक नाव माझ्याकडे होतं. पण गोलंदाजीची सरासरी सुरु नायक याची निवड करताना उपयोगी पडली.

वेगवान गोलंदाज म्हणून नवव्या क्रमांकावर स्थान मिळवण्यात राजिंदरसिंग घई यशस्वी ठरला आहे. प्रथम श्रेणी सामन्यात तब्बल १०० बळी मिळवणारा घई खराखुरा वेगवान होता. मात्र, एकदिवसीय सामन्यांत भारतातर्फे सहा सामने खेळताना त्याने ८६ च्या सरासरीने तीन गडी बाद केले आहेत, तर फलंदाजी करताना एक धाव केलेली आहे. आणि हेच त्याच्या निवडीचे गमक आहे!

एक ऑफस्पिनर गोलंदाज दहाव्या क्रमांकावर निवडला गेलाय, तो म्हणजे सरदिंदू मुखर्जी! रणजी पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या सरदिंदूने तीन एकदिवसीय सामन्यांत दोन धावा काढल्या आणि ४९ च्या सरासरीने दोन बळी घेतले आहेत.

अकराव्या क्रमांकावर रशीद पटेल नावाचा एक डावखुरा वेगवान गोलंदाज निवड होण्यापासून वाचला; कारण तो फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला म्हणून. आणि त्याची जागा पटकवली आहे- व्ही.आर.व्ही. सिंग याने! एकेकाळी तो भारतातला सर्वात वेगवान गोलंदाज होता. प्रथम श्रेणीच्या फक्त २९ सामन्यांत त्याने १२१ फलंदाज बाद केलेत. मात्र, दोन एकदिवसीय सामन्यांत त्याची कामगिरी म्हणजे आठच्या सरासरीने फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने फक्त धावा बहाल केल्या, बळी मात्र एकही मिळवता आला नाही.

तर असा हा अकरा जणांचा संघ. या संघात अजून रिषी धवन, गुरकीरतसिंग मान आणि अजून एक-दोन जण आरामात समाविष्ट होऊ  शकतात. मी निवडलेल्या संघातील सगळ्या खेळाडूंची आकडेवारी एकत्र केली तर आपल्याला त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित आकडेवारीची कल्पना पुढील आकडय़ांवरून नक्की येईल. या सगळ्यांच्या धावा, बळी आणि त्यांनी घेतलेले झेल यांची संख्या अशी आहे : सर्वानी मिळून काढलेल्या धावा ३१९. सगळ्यांनी मिळून घेतलेले झेल १८. आणि या अष्टपैलू खेळाडूंचा भरभक्कम समावेश असलेल्या संघातील सगळ्यांनी मिळून घेतलेले बळी आहेत- नऊ! याहून जास्त निकृष्ट संघ असेल असं मला वाटत नाही. कोणी अजून देखणा संघ कागदावर उतरवून काढला तर त्याला माझा मुजरा!

sanjaydmone21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:31 am

Web Title: such a bad cricket association
Next Stories
1 भावना दुखावू नयेत म्हणून..
2 राजकारण.. एक धंदा
3 एका चष्म्याची गोष्ट
Just Now!
X