News Flash

‘स्वच्छ चारित्र्याचा जिल्हा’ स्पर्धा होणार म्हणे!

इथे लंडनमध्ये झेब्रा पट्टय़ावर कुठे गाडी उभी राहत नाही की कुणी सिग्नल तोडून जाताना दिसत नाही

प्रिय तातूस..

प्रथम तुझे अभिनंदन! सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छतेचे प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल. खरेच कोकणातले लोक नीटनेटके आणि स्वच्छ. कोठेही गटारे, झोपडय़ा, विखुरलेला कचरा असे काही दिसत नाही. बाजूला लाल माती, तांबूस जांभ्या दगडांची घरे आणि वनराई बघून मला सतत कोकणात यावेसे वाटते. आता पुढची स्पर्धा म्हणे जिथे सर्वात स्वच्छ चारित्र्याची माणसे आहेत त्या जिल्ह्याला पुरस्कार देणार आहेत असे ऐकिवात आहे. मला तर मागे एकजण- न्यूटनदेखील कोकणात जन्माला आला असता, असे म्हणाला. त्यावर मी त्याला- मग प्रॉब्लेम काय झाला, असे विचारल्यावर- ‘पण कोकणात सफरचंदाचे झाड नाही ना!’ असे त्याने सांगितले. आता थोडा तिरकस विचार करतात हे खरे, पण माणसे  आतून फणसासारखी बघ. अरे, आपण मागे पिसाचा मनोरा बघायला गेलो तेव्हा तो मनोरादेखील तुला सरळ दिसला होता!

छान कौलारू घरे आणि झाडांच्या गच्च गर्दीत लपलेल्या वाडय़ा-वस्त्या.. त्यामुळे मला इथे लंडनमध्येदेखील कोक णाचीच आठवण येते. आपण इंग्रजी कच्चे असल्याने मागे पडलो. इथल्या लोकांचे इंग्रजी चांगले असल्याने ते पुढे गेले. अगदी भिकारीसुद्धा छान इंग्रजीत भीक मागतात हे बघून आपल्याला आश्चर्य वाटते. अरे, इथे कोणाला पत्ता वगैरे विचारावा लागत नाही. प्रत्येक वळणावर रस्त्याच्या नावाची पाटी असते आणि घरावर एका ओळीत सम नंबर, तर समोरच्या घरांना विषम नंबर. आणि हे नंबरही मोठय़ा अक्षरांत असतात. त्यामुळे कोणाला विचारावे लागत नाही. आपल्याकडे दरवाजात बराच वेळ लोक उभे असतात. कुणी रस्त्याने येत असले तर हा आता आपल्याला पत्ता विचारणार म्हणून सगळे उत्सुक असतात. अरे, इथे रस्त्यावरून जाताना क्वचितच कोणी चालत जाताना दिसतो.

आपल्याला गर्दीची इतकी सवय झाली आहे की इथे अगदी सुने सुने वाटते. अगदी लोकलच्या स्टेशनात पण डय़ुटीवर असला तर एखादा माणूस असतो. भिंतीवरच्या यंत्राला आपले कार्ड लावले की पैसे किती शिल्लक आहेत कळतात. मग यंत्रात पाऊंड सरकवले की ते आपल्या कार्डावर जमा होतात. स्टेशनात वा बसमध्ये हे कार्ड आत शिरताना नुसता स्पर्श केला की हिरवा लाइट लागतो आणि आपण आत! आपल्याकडे बोलण्यात फारच वेळ जातो. अरे, अण्णा आणि मी एकदा दादरला चाललो होतो, तर कंडक्टरने कुठे निघालात, विचारल्यावर त्यांनी मुंजीला चाललोय असे सांगितले. आता त्यावर कंडक्टरपण वैतागेल ना! तर त्यानेही- कितीचा मुहूर्त आहे, कार्यालय कुठले? विचारत तिकीट दिले. भारतात वेळ कसा घालवावा याची कधीच चिंता नसते. अरे, मी नुसती सावली कशी लांब जाते आणि जवळ येते हे बघत बसणारे लोक बघितलेत. आमच्याकडे घडय़ाळ नव्हते तेव्हा आम्हाला पेठेत किती वाजलेत, हे बघायला पाठवत असत. आम्हीदेखील वेळ विचारून रमतगमत घरी येत किती वाजल्याचे सांगत असू. असो. ही अतोनात घडय़ाळे सगळीकडे आल्याने जगण्यातला भाबडेपणा निघून गेला. अचूक वेळ दाखवणारी घडय़ाळे आली खरी; पण तातू, आयुष्यात कुणावर कधी काय वेळ येईल, हे सांगणाऱ्या घडय़ाळाचा शोध काही कुणाला लावता आला नाही बघ.

लोकलमध्ये- इथे तिला ‘टय़ूब’ म्हणतात- फारसे कोणी कोणाशी बोलताना दिसत नाही. अगदी एखाद्याला धक्का लागला नाही तरी लगेच ‘सॉरी’ म्हणायची इकडची पद्धत आहे. दिवसभरात शंभर वेळा ‘थँक यू’ आणि ‘सॉरी’ सगळीकडे ऐकायला मिळते! अरे, हे लोक इतक्या हळू आणि तोंडातल्या तोंडात बोलतात, की ते एकमेकांना कसे काय कळते, कोणास ठाऊक! आपल्याकडे जणू काय बहिऱ्या माणसांशी आपण सगळे जण बोलतो आहोत की काय, असा प्रश्न पडतो. अरे, इतक्या जोराने आपण बोलत असल्याने लाऊडस्पीकरचा शोधदेखील आपल्याला नाही लागला.

इथे लंडनमध्ये झेब्रा पट्टय़ावर कुठे गाडी उभी राहत नाही की कुणी सिग्नल तोडून जाताना दिसत नाही. ट्रॅफिक पोलीस कुठल्याही चौकात दिसत नाही. पण शहाणपणा करून कुणी तोडलाच सिग्नल- किंवा तिकीट न काढता गाडी पार्क केली तर घरी ६० पौंडांचे तिकीट येते. इथे प्रत्येकाला कायद्याची भीती वाटत असते हे बघून मी थक्क होतो. मी इतक्या दिवसांत कधी रस्त्याने वरात चाललीय, मिरवणूक चाललीय आणि तासभर दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबलीय असे बघितले नाही. आपल्याकडे अजूनही गावाकडे तर ‘तीन तास ट्रॅफिक बंद पाडली!’ असं अभिमानाने वरातीतले लोक सांगताना मी बघितलेत. अरे तातू, मी काही नावे ठेवतोय असे नाही रे, पण कायद्याचे राज्य कधी येणार असे वाटत राहते. आपल्याकडे परवा पोलीस अधिकाऱ्यालाच तळ्यात बुडवून टाकणार होते ते इथे टीव्हीवर पाहिले.

मी इतके महिने इथे फिरतोय, पण गाडीतून प्रवास करताना कधी गचका बसलाय किंवा खड्डय़ांमुळे जागच्या जागी उडालोय असे झाले नाही. लोण्यासारखे रस्ते म्हणतात ना तसा सर्व प्रवास. अरे, अमुक इतक्या मिनिटांत बस म्हणा, रेल्वे म्हणा- येणारच. आपल्याकडे अर्धा-पाऊण तास स्टॉपवर लोक उभे असतात. असो. इंग्रजांच्या कौतुकाचे पुराण ऐकून तू वैतागशील. पण जे आहे ते सांगायलाच पाहिजे. पण तातू, खाण्यापिण्याच्या विविधतेबद्दल मात्र आपली बरोबरी कुणी करूच शकणार नाही असे वाटते. अरे, काय काय प्रकारच्या भाज्या, उसळी वगैरेची इथे आठवण येते. पश्चिमेकडे सगळ्या देशांत मिळते काय, तर पिझ्झा आणि वेगवेगळे ब्रेड! ते खाऊन मी कंटाळलोय.

आम्ही सगळे मिळून अमेरिकेचा दहा दिवसांचा दौरा केला. समर असल्याने फारसे कुठे गरम कपडे नेण्याची आवश्यकता नव्हती. शिकागोला कस्टमवाल्यांनी आंबे आणि कढीपत्ता (करी लीव्हज्) आणलाय का, चौकशी केली आणि सोडून दिले!

तुला सांगतो तातू, शिकागोच्या जवळ मैलोन् मैल लांब पसरलेला गोडय़ा पाण्याचा मिशिगन लेक बघितला आणि डोळ्याचे पारणे फिटले. हा लेक असाच उचलून मराठवाडय़ात ट्रान्स्फर करावा असे वाटले. देव देतो म्हणजे किती छप्पर फाडून देतो! अरे, केवढा ब्रेकफास्ट! केवढा जड चहाचा कप!! आपल्याला दोन दिवस पुरेल एवढा नाश्ता हे लोक एका वेळेला खातात. वेटर मुलीपण एवढा मोठा थाळा भरून आणतात की धडकीच भरते. सगळीकडे नुसती समृद्धी दिसते. शिकागो काय आणि न्यूयॉर्क काय- अरे, आकाश खाऊन टाकावे अशा शंभरावर मजल्यांच्या उंचच उंच इमारती बघून छाती दडपून जाते. या समृद्धीची भीती वाटते.

आपण कोकणात तुझ्या वाडीकडे पायवाटेने कधी एकदा जाऊ.. तुझे चौपाखी जांभ्या दगडाचे घर.. त्यात खमंग पसरलेला कुळथाच्या पिठल्याचा वास.. वालीची भाजी.. आणि असेच काय काय खाली जमिनीवर बसून आपण कधी एकदा खाऊ असे मला झालेय.

‘गडय़ा, आपला गाव बरा’ म्हणतात ना तसे झालेय खरे!

तुझा,

अनंत अपराधी

अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2016 4:40 am

Web Title: sindhudurg district get first prize in cleaning
Next Stories
1 उंचीचे गट करायला काय हरकत आहे?
2 दूरदृष्टी असलेला माणूस खड्डय़ात पडतो!
3 इतका ‘सैराट’ अवघड आहे?
Just Now!
X