News Flash

भरजरी सांगितिक नजराणा

एखाद्या गाजलेल्या कथानकाचं संचित बरोबर असणं हे चित्रपटासाठी नक्कीच लाभदायी असतं.

सचिन पिळगावकर -कट्यार काळजात घुसली

एखाद्या गाजलेल्या कथानकाचं संचित बरोबर असणं हे चित्रपटासाठी नक्कीच लाभदायी असतं. पण, केवळ या संचितावर चित्रपट रेटता येत नाही. त्यातच अशा कथानकाला तशाच गाजलेल्या नाटकाचा आधार असेल आणि तर मग पदोपदी तुलना होण्याची शक्यता असते. मग हे सारंच संचिताचं ओझं जड वाटू लागण्याची शक्यता असते. पण, या सा-या संचिताला ओझं न मानता, मूळ गाभा तोच ठेवत, त्याची प्रतिष्ठा सांभाळत, नव्या जुन्याची लय साधत, डावं-उजवं न करता नव्याने साकारलेला चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. संस्थान काळातलं वातावरण, भरजरी वातावरण, साहित्य-कला-संस्कृतीची जोड, मानवी स्वभाव-विभवांचा विभ्रम, काळ उभा करणारी वेशभूषा, रंगभूषा आणि आणि या सा-या कॅनव्हासवर उत्तम चित्रिकरणातून चितारलेला एक भरजरी असा सांगितीक नजराणा म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट.

मुळात हे केवळ माध्यमांतर नाही. हा केवळ नाटकाचा चित्रपट नाही. चित्रपटासाठी म्हणून गरजेच्या असलेल्या अनेक गोष्टी यात येतात, त्या मूळ कथेशी जुळत नाहीत, पण त्या कथेच्या मूळ उद्दीष्टाचा हात सोडत नाहीत. कारण दिग्दर्शकाला नेमकं काय दाखवायचं याबाबत स्पष्टता आहे. संगीत श्रेष्ठ की घराणं श्रेष्ठ, सूर श्रेष्ठ की त्याची जोपासना करण्याची पद्धत श्रेष्ठ या सनातन द्वंद्वावर भाष्य करायचं आहे हे त्याच्या चांगलच लक्षात आहे. त्यामुळे कथेची बांधणी करताना हे सारे धागे त्याने व्यवस्थित पकडले आहेत. आणि त्याचवेळी त्याने अनेक उपकथानक म्हणावी अशा प्रसंगांची जोड दिली आहे. त्यामुळे कथा तुम्हाला बांधून ठेवते. दोन श्रेष्ठांमधली ही स्पर्धा, एका निकोप हेतूने सुरु झालेली. पण एकामध्ये ईर्षा ठासून भरली आहे. तर दुसरा नम्र आहे. सूरांचं नम्रपण हा महत्त्वाचा पैलू. तो मांडण्यासाठी, भाष्य करण्यासाठी दिग्दर्शकाने आधार घेतला आहे तो सूरांचाच. ‘सूर निरागस हो…’ हे नव्याने रचलेलं सुरुवातीचंच गाणं दिशा व्यक्त करते आणि त्याच नोटवर चित्रपट संपतो तेव्हा निरागस सूरांचे गारुड तुमच्यावर पसरलेलं असते. कारण ईर्षेतल्या सूरातदेखील मूलत: निरागसता असते, ईर्षेमुळे ती बाजूला पडते. ती निरागसताच पुन्हा येवो हाच त्याचा धागा आहे.

नाटकाचा मर्यादीत अवकाश आणि चित्रपटाचा व्यापक पट ही दोन भिन्न माध्यमं असल्यामुळे चित्रपटीय रचना, मांडणीसाठी केलेले बदल खटकत नाही, त्यानुसार आलेले प्रसंग आंगतुक किंवा वावदूक वाटत नाहीत आणि मूळ कथेच्या उद्देशालादेखील धक्का लागत नाही. त्यामुळे नव्या-जुन्याची तुलना बाजूला ठेवून मूळ कथानकावर आधारीत एक वेगळी कलाकृती असाच याचा विचार करावा लागेल.

शास्त्रीय संगीत म्हटलं की एकाचवेळी अभिजात संगीताचे दर्दी (जे प्रत्येक सूराचे मूल्यमापन करु शकतात) आणि त्याचवेळी हे काही आपल्याला कळत नाही म्हणून त्या वाटेला न जाणारेदेखील असे दोन टोकाचे समूह आपल्यात आहेत. अशा पार्श्वभूमीवर कट्यारचं आव्हान दिग्दर्शकाने व्यवस्थित पेलंल तर आहेच, पण त्याला उत्तम चित्रपटीकरणाची जोड देत काहीशा जड अशा थेट विषयाला हात घालणारा आणि सर्वसामान्यांनादेखील आपलासा वाटावा असा चित्रपट सादर करण्याचं काम दिग्दर्शकाने केलं आहे.
चित्रपटात गाण्याची संख्या खूप (१४) असली तरी, ही गाणी हाच मूळात त्या कथेचा प्राण आहे. कथा ही केवळ त्या गाण्यांना पुढे नेण्यासाठी योजलेली आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे गाण्यांचा भडीमार होत नाही, तर गाणी तुम्हाला गुंतवून ठेवतात. कारण हा चित्रपट शास्त्रीय राग, घराणी आणि अन्य संज्ञांच्या तांत्रिकतेत अडकत नाही. तांत्रिकतेत अडकलं की होत काय, की आपण निखळ आनंदापेक्षा त्या तांत्रिकतेतच वाहत जातो. त्यामुळे जरी त्यात ईर्षाधारीत स्पर्धेचा भाग आणि कथानकाचा प्राण म्हणून जरी गाणी असली तरी ती सर्वसामान्यांना जड होत नाहीत. पण, त्याचवेळी केवळ कानाला छान छान वाटते म्हणून काहीही प्रयोग केलेले नाहीत. नाटकातील मूळ पदांबरोबरच चित्रपटांसाठी अनेक नवीन गाणी साकारली आहेत, आणि तीदेखील तितकीच दर्जेदार आहेत.

दखल घेण्यासारखा भाग म्हणजे यातील कलाकार. शंकर महादेवन यांची ही पहिलीची भूमिका. त्यांनी अगदी आत्मीयतेनं ती साकारली आहे. गायक-कलाकार अशी ही भूमिका असल्यामुळे गाण्याचा अभिनय करावा लागला नाही. गाणं हाच प्राण असल्यामुळे ही निवड सार्थ ठरते. काही संवादात अभिनयातली कमतरता जाणवते, पण एकंदरीतच चित्रपटाच्या व्यापक अशा कॅनव्हासवर ते झाकून जातं. सचिन पिळगावकरांच्या आयुष्यातली पहिलची अशी भूमिका की ज्याला खलनायकाची छटा आहे. उर्दू बोलीतले संवाद, त्यात असणारा टिपिकल लहेजा त्यांनी हिकमतीने सांभाळला आहे. काही ठिकाणी थोडा अति बाणेदारपणा झाला असे वाटते, पण दिग्दर्शकाच्या चित्रपटीय सादरीकरणाचा भाग म्हणावा लागेल. स्वत: दिग्दर्शकाने म्हणजेच सुबोध भावेने साकारलेला सदाशिव हे पात्र चांगलेच जमलं आहे. त्याचा मूळ निरागसपणा आणि त्याचबरोबर परिस्थितीनुरुप आलेली सूडभावना यांची संमिश्र अशी भावना त्यांनी पुरेपूर व्यक्त केली आहे. इतर पात्रांना तसा वाव कमी आहे.

नाटकाचा चित्रपट केलेला नसल्यामुळे हे काय नवीन पाहतोय असं म्हणायचं असेल तर त्या आक्षेपावर आपणास थेट फुल्ली मारावी लागेल, असे कव्वालीसारखे काही प्रसंगदेखील चित्रपटात आहेत. चित्रपटीय रुपांतराचा भाग असणा-या प्रसंगाचे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला द्यावे लागेल. पण, त्याचबरोबर काही प्रसंगातून चित्रपटीकरणाच्या ओघात झालेल्या गोष्टी खटकतात. मूळ कथानकात खाँ साहेबाचे पात्र हे नि:संशय घराण्याच्या प्रतिष्ठेपायी भरकटलेलं आहे. पण, त्यातला कुत्सितपणा चित्रपटात खटकण्याइतपत जाणवतो. तो जरा अंगावरच येतो. अशाच काही ठिकाणी इतर पात्रांचा अतिबाणेदारपणा त्रासदायक वाटणारा आहे.

प्रकाश कपाडिया यांची पटकथा आणि संवादाला दाद द्यावी लागेल. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या मूळ कथेची उंची कमी होऊ न देता त्यांनी हे शिवधनुष्य पेलंल आहे. मंदार चोळकर, समीर सामंत, मंगेश कांगणे यांनी दिलेली नव्या गाण्याची जोडदेखील उत्तम म्हणावी लागेल. शंकर एहसान लॉय यांनी हे सारं सांगितीक संचित सांभाळत केलेल्या नव्या रचनांची विशेष दखल घ्यावी लागेल.

सूरांचे स्वरांचे उगमस्थान हे मेंदू आणि हृदयाच्या मधोमध असते. भावना आणि हुशारी अशा दोहोंचा संगम तेथे असतो. ते सूर निरागस असतात. त्या निरागसतेची जाण झाली की मग सा-या औपचारीक भिंती गळून पडतात. आणि मग उरते ते केवळ एक निखळ संगीत तत्त्व. ‘कट्यार…..’ मुळे या एकतत्त्वाचा भरजरी नजराणाच रुपेरी पडद्यावर साकारला असे म्हणावे लागेल.

कथासूत्र – पंडीत भानुशंकर हे विश्रामपूर संस्थानाचे राजगायक असतात. शास्त्रीय संगीतात नवे प्रवाह यावेत, त्यात प्रयोग व्हावेत आणि प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने संस्थानाने दरवर्षी एक स्पर्धा घेण्याची संकल्पना मांडतात. त्याच स्पर्धेत आफताब हुसेन बरेलीवाले खाँसाहेब (ज्यांना पंडीतजींनीच मिरजेहून विश्रामपूरला आणलेले असते) आपली कलादेखील सादर करतात. दोघांची सूर आणि स्वरांवर अपार निष्ठा. पण, सादरीकरणाची पद्धत वेगळी. एक हरकती, मुरकतींनी आक्रमक तर दुसरी मृदू, भक्तीरसपूर्ण. स्पर्धा सुरु झाल्यापासून १४ वर्षे पंडीतजी स्पर्धा जिंकत असतात. १५ व्या वर्षी कारस्थान होतं. आणि पंडीतजी गातच नाहीत. खाँसाहेब राजगायक होतात. पंडीतजींची निशाणी पुसुन टाकण्याच्या वेडापायी खाँसाहेब अनेक उद्योग करतात. त्याचवेळी लहानपणी पंडीतजींकडून गंडा बांधलेला सदाशिव गुरव संस्थानात येतो. त्याला गाणं शिकायच असतं. पण, पंडीतजी तर निघून गेलेले. त्यांच्या जाण्याचं कारण कळल्यावर त्याच्यामध्ये खाँसाहेबांप्रती सूडभावना जागृत होते. पण, पंडीतजींची मुलगी त्याला सूडभावनेपेक्षा संगीतातून श्रेष्ठत्व प्राप्त करण्याची जाणीव करुन देते. पंडीतजींच्या रेकॉर्डवरुन रियाज सुरु होतो. पण, पुढे काय. संगीत शिकण्याची इच्छा तशीच अपूर्ण असते. त्याचवेळी मनात सूडभावनादेखील असतेच. आणि मग एक प्रवास सुरु होते. खाँसाहेबांची सूडभावना जिंकते, की सदाशिवचे निरागस सूर जिंकतात यांची एक अनोखी जुगलबंदी सुरु होते.

कट्यार काळजात घुसली 
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, झी स्टुडिओज्
सहनिर्माते- निल फडतरे श्री गणेश मार्केटींग ड फिल्मस्
दिग्दर्शक- सुबोध भावे
कथा- पुरुषोत्तम दारव्हेकर
पटकथा-संवाद- प्रकाश कपाडिया
संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी आणि शंकर-एहसान-लॉय
गीतकार- पुरुषोत्तम दारव्हेकर, प्रकाश कपाडिया, समीर सामंत, मंदार चोळकर, मंगेश कांगणे
गायक- शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, अरिजीत सिंग, दिव्य कुमार, शिवम महादेवन, अर्शद मुहम्मद, सावनी शेंडे, आनंदी जोशी,
सह दिग्दर्शक – वैभव राज चिंचाळकर
पार्श्वसंगीत – संतोष मुळेकर
संगीत संयोजन- आदित्य व्ही. ओक
मिक्सिंग मास्टरींग- विजय दयाळ
ध्वनी संयोजन- अनमोल भावे
संकलक- आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय
छायाचित्रण- सुधीर पलसाने
कला दिग्दर्शन- संतोष सुरेश फुटाणे
वेशभूषा सल्लागार- नचिकेत बर्वे
वेशभूषा- पुर्णिमा ओक
रंगभूषा- विक्रम गायकवाड
व्हिएफएक्स- प्रसाद सुतार
कलाकार – शंकर महादेवन, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, साक्षी तन्वर, पुष्कर श्रोत्री, स्वप्निल राजशेखर, अस्मिता चिंचाळकर, चिन्मय शिंत्रे, चिन्मय पाटसकर, कट्यारीचा आवाज – रिमा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 9:40 am

Web Title: lokprabha movie review katyar kaljat ghusli
Next Stories
1 रिव्ह्यू : एका लग्नाची प्रॅक्टिकल गोष्ट
2 लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड खोड्यातून सुटण्याची
3 पिढीच्या बदलाची नेटकी इमारत.. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’
Just Now!
X