12 August 2020

News Flash

लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड खोड्यातून सुटण्याची

साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो

चित्रपट सुरु होतो. नदीकिनारी शेळ्या, मेंढय़ा, त्यांची अखंड बे बे बे, धनगराचे विशिष्ट शब्दांनी त्यांना चुचकारणे, धनगराचा तरणाबांड धाकटा दंड बैठका घुमवितोय, मिसरुडावरुन हात फिरवित स्वप्नातदेखील रमतोय, धनगरी बोली भाषेची विशिष्ट लय तुम्हाला सादवतेय, आजूबाजूची मोकळी रानं, क्षितिजापर्यंतचं अवकाश आणि त्यात खुल्या आकाशाखालचा धनगराचा फिरता प्रपंच (वाडा). पुढच्या प्रसंगात चाऱ्याच्या शोधात वाडा स्थलांतरीत करताना धनगरी गीताचे बोल, घोडय़ावरच्या बिऱ्हाडात बसलेलं धनगराचं सहा-सात वर्षांचं पोर, मध्येच येणारा जाणारा रामराम करतोय, एखादा गाडीवाला जरा गुरगुरत जातोय आणि हे सारं पाहताना आपल्याला प्रश्न पडू लागतो की हा चित्रपट आहे की माहीतीपट, धनगरांचं जगणं मांडणारा. पण, धनगरी भाषेचा लहेजा आणि वाडय़ाचे सारे बारकावे टिपत चित्रफीत पुढे सरकू लागते आणि हळूहळू आपणदेखील त्या वाडय़ाबरोबर रानोमाळ भटकू लागतो. त्यांच्या सुख-दु:खात रमू लागतो. कथानकाची पकड बसते आणि त्या वाडय़ाला पडलेला खोडा आपल्यालादेखील जाणवू लागतो. त्या पात्रांची, त्यांच्या भाषेची, त्यांच्या भावनांची, मुक्या शेळ्या, मेंढय़ांची या साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो.

चित्रपटीय भाषेची उमज असलेला दिग्दर्शक सक्षम कथानकाला कसा उत्तम न्याय देऊ शकतो त्याचं ‘ख्वाडा’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. प्रत्येक फ्रेम न् फ्रेम दिग्दर्शकाच्या डोक्यात इतकी फिट्ट बसलेली आहे की त्याला जे हवं ते सारं काही तुमच्यापर्यंत पोहोचते. दिग्दर्शनाची पाश्र्वभूमी नाही, कसलेले अनुभवी कलाकार नाहीत, स्टुडिओचा रचनाबद्ध अवकाश नाही, सारं काही खुल्या छताखालचं आणि त्याच खुलेपणातून ही कलाकृती आकार येते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कथानकातून साकारलेलं असते. ना कसली तांत्रीक उणीव, की ना अनुनभवी कलाकारांचा बुजरेपणा. कथानक, संवाद, ध्वनी, चित्रीकरण अशा सर्वच बाबींना पुरेसा न्याय देत साकारलेलं अफलातून टिमवर्क म्हणजे ‘ख्वाडा’ म्हणावं लागेल.

आणि हे सर्व साकारतानाच एक सामाजिक भाष्यदेखील अगदी सहजपणे समोर येतं. तेदेखील आमच्यावर किती अन्याय होतोय पहा असा आक्रस्ताळेपणा अजिबात न करता. प्रत्येक पात्राचा एक स्वतंत्र स्वभाव रेखाटला आहे. पिकलेल्या दाढी मिशांबरोबर आलेला विचारातला व्यावहारिकपणा आणि प्रथा परंपरा जोपासणारा कुटुंबप्रमुख. तर नवी पिढी नवी स्वप्न पाहणारी. कधीकधी त्यातच हरवणारी. आणि वेळ पडलीच तर अंगातली रगदेखील दाखविणारी. गावातल्या नवसंरजामी वृत्तीदेखील अगदी सहज मांडली आहे. या साऱ्या भावभावना अगदी साध्या साध्या संवादातून आणि वागणूकीतून अगदी सहजपणे जाणवतात. हीच खरी तर याच्या दिग्दर्शनाची यशाची पावती आहे. तर दुसरीकडे सामाजिक भाष्य करतानादेखील दिग्दर्शक संयमाने, वास्तववादी रचना अकृत्रिमपणे मांडली आहे.

ऑडीओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी ही या चित्रपटाची बलस्थानं. कॅमेरा पॅनिंगदरम्यान काही ठिकाणाचा नवखेपणा सोडला तर एकंदरीतच सारा कॅमेरा बोलका आहे. विशेषत: अशा फिरत्या धनगर वाडय़ावरच रात्रीचं जगणं दाखवतानाचा प्रकाशाचा उपयोग मोजका, नेमका आणि परिणामकारक झाला आहे. शेळ्या, मेंढय़ांना चुचकारणं, हाकारणं, शेळ्या मेंढय़ांचे आवाज आणि हालचाली हे सारं खुल्या रानावरचा अवकाश सांभाळत चित्रपटाची मस्तपैकी ध्वनीप्रतिमाच तयार झाली आहे.

एक-दोन अपवाद सोडले तर बाकी सर्व कलाकारांसाठी चित्रपट माध्यम नवीन आहे. अशा वेळी एक प्रकारचं अवघडलंपण, बोलण्यात कृत्रिमता येऊ शकते. पण, या सर्वाचाच पडद्यावरचा वावर पाहील्यावर दिग्दर्शकाने त्यांच्यावर मेहनत घेतल्याचे स्पष्ट जाणवते. तारुण्यात पदार्पण केलेला बाळू किमान संवादातून पण, त्याच्या हावभावातून अगदी सहज उलगडतो. त्याचं स्वप्नील जग, कुस्तीत रग जिरवणारं जगं, आपल्याच मस्तीत वावरणं आणि त्याचवेळी कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी खंबीरपणे उभं राहणं. त्याला संवाद कमीच आहेत. पण, हे सारं त्यांनी देहबोलीतून समर्थपणे मांडलं आहे.

या सर्वाचा एकसंध परिणाम म्हणजे ‘ख्वाडा’ हा चित्रपट आहे. एखाद्या काल्पनिक गोष्टीत स्वप्नरंजनात रमविण्यापेक्षा दिग्दर्शकाने एक सामाजिक दृष्टी ठेवत चांगली कथा मांडली आहे. आज धनगरांचं आयुष्य असंच आहे का? ते असेच भटकतात का? आजही असा अन्याय होतो का? वगैरे प्रश्न अनेक चिंतातूर जंतूना पडू शकतात. पण, चित्रपटाची मांडणी करताना दिग्दर्शकाने प्रतिकात्मक प्रसंगांचा- कुस्ती, शेळ्या मेंढय़ांच्या हालचाली, गावातला बाजार, संरंजामशाहीकडे झुकत चाललेली नवी समाजरचना – एक अप्रितम कोलाज उभा करत ह्य़ा साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. पण, हे करताना चित्रपट शब्दबंबाळ होऊ दिला नाही. किंबहुना धनगरी भाषेचा पुरेपूर वापर करुन प्रत्येक प्रसंग जिवंत झाला आहे. केवळ प्रयोग म्हणून केलेला, वंचितांची दु:खं मांडणारा म्हणून पाहता येणार नाही. प्रत्येकाची जगण्याची व्याख्या मांडणारा, जगण्याचा आनंद दाखविणारा, जगण्याची दिशा दाखविणारा आणि बदल मांडणारा असा एक परिपूर्ण चित्रपट म्हणावा लागेल. या कथेची झिंग खरे तर हळूहळू आपला ताबा घेत जाते. अशा वेळी मध्यंतर हाच खोडा वाटू लागतो.

खोडा म्हणजे दुसऱ्याला लोळवण्यासाठी घातलेला मोडता, अडथळा. मग तो समाजातल्या एखाद्या वर्गाला घातला असो की कुस्तीतला असो. त्यातून एक हतबलता येते. तो खोडा तोडून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी हा खोडा सोडवावाच लागतो. युक्तीने असो की शक्तीने. भाऊराव कऱ्हाडे यांनी खोडय़ाची संकल्पना वापरुन समाजालाच पडलेल्या खोडय़ाचं अंगावर येणारं चित्रिकरण ‘ख्वाडा’ मधून करुन हा खोडा तोडायचा प्रयत्न केला आहे.

कथासूत्र 
रघू कऱ्हे हा धनगर आपल्या कुटुंबकबिल्यासह शेळ्या, मेंढय़ाच्या पोटापाण्याची सोयीसाठी मूळ गावापासून लांबलांबच्या गावात रानोमाळ भटकत असतो. धनगरी आयुष्याचा हा एक अविभाज्य भाग. लग्न झालेला थोरला मुलगा, त्याची बायको, दोन चिल्ली पिल्ली, तारुण्यात पदार्पण केलेला बाळू आणि पन्नास-शंभर शेळ्यामेंढय़ा असा त्याचा रघू कऱ्हेचा वाडा गावोगाव भटकत असतो. रघू तसा नेमस्त. जेथे जाऊ तेथे सर्वाना धरुन राहणारा. समाजाच्या रीतीभाती जोपासणारा. अन्याय झाला तरी पडती बाजू घेणारा. घरच्या पातळीवर प्रतिगामी वाटणारा, पण शेळ्यामेंढय़ांवर जीवापाड प्रेम करणारा. तर तरुण बाळू ही चाकोरी सोडून एका जागी स्थिरावण्याची इच्छा बाळगून असलेला. वयानुसार आलेला रगेलपणा जोपासणारा. गरज पडलीच तर दोन हात करायची खुमखुमी असणारा. पण, तरीदेखील बराच संयमी. एका मुक्कामी गावातल्या सरपंचाच्या मुजोरीचा फटका वाडय़ाला बसतो. त्यातच चाऱ्याचीदेखील कमतरता भासू लागते. बाळूचं लग्नदेखील ठरते. पण, सरपंच वारंवार खोडा घालत असतो. त्यातूनच मग वाडय़ाची तगमग वाढू लागते आणि खोडा सोडविण्यासाठी निर्वाणाची कृती करावी लागते.

चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारूती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनि संयोजक – महावीर सबनवार
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2015 12:51 pm

Web Title: marathi movie khwada review by lokprabha
Next Stories
1 पिढीच्या बदलाची नेटकी इमारत.. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’
2 लोकप्रभा रिव्ह्यू – ‘वक्रतुंड महाकाय’- बाप्पाचा भरकटलेला प्रवास
3 लोकप्रभा रिव्ह्यू – हायवे..एक प्रवास सेल्फीच्या पलीकडचा
Just Now!
X