12 August 2020

News Flash

लोकप्रभा रिव्ह्यू – सैराट: स्वप्न आणि वास्तवाचे चित्रण

नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.

The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

प्रेम हे स्वप्नवत असते. त्याला बंधन नसते आणि वास्तवाचं भान शक्यतो नसते. किंबहुना वास्तवाकडे दुर्लक्ष हा प्रेमाचा स्थायीभाव म्हणावे लागेल. वर्गीय संघर्षाचा अडसर असला तरी त्याची परिणीती वेगवेगळ्या प्रकारे होत राहते. पण त्या प्रेमातून सुरु झालेला संसार हे त्या वास्तवस्वरुप असते. त्यात घरातील तशाच सामाजिक अशा असंख्य अडचणी असतात पण त्यातून तरुन जायचे असते. ही वाक्यं तशी वैश्विक सत्य असावी अशीच म्हणावी लागतील. आणि चित्रपटातून ती असंख्यवेळा असंख्य प्रकारे मांडण्यात आली आहेत.सैराटची कथा काहीशी याच अंगाने जाणारी आहे. त्याला करमणूकीची व्यवस्थित जोड देण्यात आली आहे. त्याला घराण्याच्या प्रतिष्ठेची जोड दिल्यामुळे वर्गसंघर्षाची झालर प्राप्त झाली आहे. वास्तवाचा धागा पकडून केलेली मांडणी आणि त्याचवेळी दोन स्वतंत्र पद्धतीची मांडणी हे दिग्दर्शिय कौशल्य म्हणावे लागेल. नागराज मंजुळेने त्याला साजेशा काही गोष्टी केल्या आहेत पण त्यात काही त्रुटीदेखील आहेत.
नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे. आयुष्यात कधीही कॅमे-यासमोर उभे न राहीलेल्या नायक-नायिकेकडून सराईत कलाकारांप्रमाण दर्जेदार अभिनय करुन घेणे हे या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विशेषत: शाळकरी वयातील रिंकू राजगुरू (अर्चना) पडद्यावर ज्या सराईतपणे वावरते त्यात तिच्या अभिनय कौशल्याचा भाग जितका आहे, तितकाच ते आपल्याला हवं तसं उतरवणा-या दिग्दर्शकाचादेखील आहे. पुसटसे रोमान्स सीन, तिच्यामध्ये दडलेली उच्चवर्गीयत्वाची वेळोवेळी दिसणारी झलक, त्याचवेळी घराविषयीचं ममत्व आणि गृहकर्तव्याच्या पातळीवर तीचं ठामपणे उभं राहणं अशा सगळ्या टप्प्यांवर ती वरचढ ठरते. तिच्यातील हे बदल अगदी नेमकेपणाने पडद्यावर उतरले आहेत. नवख्या आकाश ठोसरवर (परशा) देखील अशीच मेहनत घेतली असल्याचे येथे जाणवते.पण एकंदरीतच कथानकाचा कल हा नायिकेवर अधिक असल्यामुळे तीच चित्रपटभर व्यापून राहते.
नाविन्याचा दुसरा भाग म्हणजे एकदम नव्या लोकेशन. मराठी चित्रपट शक्यतो ज्या पठडीतल्या लोकेशन वापरतो त्या टाळून थेट करमाळ्यासारख्या आडबाजूच्या तालुक्यात चित्रिकरण करुन नवख्या लोकेशनचं सौंदर्य काय असू शकते हे चांगल्या प्रकारे दाखवून दिले आहे. कथेच्या उत्तरार्धातदेखील हाच धागा कायम ठेवला आहे.अशा लोकेशन आणि कलाकारांमुळे, कथेत फारसे नाविन्य नसले तरी चित्रपट ताजा वाटतोच पण त्याचवेळी वास्तवाच्या अधिक जवळचा वाटू लागतो. आणि तो जवळचा वाटवण्यामध्ये सिनेमॅटोग्राफरचे कौशल्य वादातीत आहे.
चटपटीत संवाद आणि लोकप्रिय होतील अशा वाक्यांची पेरणी ही आणखीन एक जमेची बाजू म्हणावी लागेल. तर चित्रपटाची रचना थेट दोन टप्प्यात केलेली असल्यामुळे दोन वेगळ्या ट्रीटमेंट एकाच चित्रपटात अनुभवता येतात. पूर्वाध पठडीतला वाटतो, तर उत्तरार्ध वाट बदलतो. तुलनेनं उत्तरार्धात प्रयोगशीलतेला वाव आहे, पण तेथेकथानकचा वेग या प्रयोगशीलतेवर बंधनकारी झाला आहे.
चित्रपट अशा पातळ्यांवर चांगला ठरत असला तरी त्यात अनेक उणीवा जाणवतात. शेवटच्या टप्प्यातील काही भाग सोडला तर कथेत नाविन्य नाही.किंबहुना घासुन गुळगुळीत झालेली कथा म्हणावी लागेल. उच्च वर्ग आणि खालचा वर्ग यातील प्रेम, त्यातून निर्माण होणारा तणाव, प्रेमी युगलाची तडफड असं सारं काही या कथेत आहे. पण हेच सारं आपण यापूर्वीदेखील पाहीलं आहेच. कथेतलं नाविन्य हे क्लायमॅक्समध्ये अधिक उजळते अन्यथा नाही. कथेच्या प्रत्येक छोट्यामोठ्या प्रसंगातून भाष्य करणे हा नागराजचा नावाजण्यासारखा पैलू आहे, तसा प्रयत्न झाला आहे, पण येथे तो तुलनेनं कमी दिसतो. कथानकाचा एकंदरीत बाज पाहता तसं काही झालं असतं असेदेखील वाटत नाही.
चित्रपटाची लांबी हा नेहमी चर्चिला जाणारा मुद्दा येथेदेखील आहे. दोन तास पन्नास मिनिटे इतका प्रदीर्घ चित्रपट असावा का? तशी कथानकाची गरज आहे का? असे प्रश्नहमखास पडू शकतात. आणि त्याचं उत्तर नाही असंच म्हणावं लागेल. मुळात चित्रपट थेट दोन भागात विभागल्या गेल्यामुळे आणि दोन्ही ठिकाणची ट्रीटमेंट वेगळी आहे, ती या प्रदीर्घ लांबीमुळे आणखीनच तीव्रतेने खटकते.
चित्रपटातील गाणी ही आपला चित्रपट कसा प्रेक्षकशरण आहे हेच दर्शविणारी आहेत. अजय अतुल यांच्या संगीतात(हॅलिवूडमधील ध्वनीमुद्रण हा भाग सोडला) तर कसलही नाविन्य नसल्याचं त्यातून दिसून येतं. अर्थात लोकांची स्मरणशक्ती फारशी चांगली नसते या गृहीतकाला पूर्ण वाव देत यामध्ये गाण्यांचा वापर झाला आहे.
एखाद्या दिग्दर्शकचा एखादा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर तशाच फॅर्म्युल्याची अपेक्षा होणं साहजिक आहे.
फॅन्ड्री नंतर सैराटकडून अशाच काही वेगळेपणाची अपेक्षा असू शकते. पण चित्रपट कायमचं बोधपट, मार्गदर्शनपर असायला हवा असे नाही. तो एक चांगला कमर्शियल करमणूकप्रधानदेखील असू शकतो. त्या साच्यातून काही बोधसंदेश द्यायचा असेल तर देता येतो. सैराट काहीसा या अंगाने जातो. पण तो एकदमच वेगळी वाट चोखाळणारा किंवा क्रांतीकारी वगैरे नाही हे नक्कीच.

कथासूत्र –
अर्चना ही गावातील तालेवार घराण्यातील मुलगी, तिच्याच वर्गातील हुशार होतकरु पण खालच्या वर्गातील परशा हे एकमेकाच्या प्रेमात पडतात. उच्चवर्गीय घराण्याला हे कधीच सहन होणारे नसते. त्यातूनसंघर्ष सुरु होतो. त्याची परिणीती पळून जाण्यापर्यंत होते. तेव्हा सापडल्यानंतर होणारा झगडा पुढच्या टप्प्यावर जातो. तेथे अनेकघडामोडी होतात, आणि कथा वेगळ्या वाटेवर जाते.

नागराज पोपटराव मंजुळे फिल्म
निमार्ते – नितीन केणी, निखिल साने, नागराज मंजुळे,
कथा, पटकथा, दिग्दर्शक – नागराज मंजुळे
संवाद – भारत मंजुळे, नागराज मंजुळे
सिनेमॅटोग्राफी – सुधाकर रेड्डी
संकलन – कुतुब इनामदार
संगीत – अजय अतुल
कलाकार – रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, धनंजय ननावरे, अनुजा मुळ्ये, ज्योती सुभाष, सुरेश विश्वकर्मा, सुरज परमार, छाया कदम, नागराज मंजुळे, संभाजी तानगडे, वैभवी परदेशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 8:15 am

Web Title: sairat marathi movie review by lokprabha
Next Stories
1 रिव्ह्यू: रंगा पतंगा- मनोरंजनातून भाष्य
2 रिव्ह्यू- फिल्मी ‘गुरु’
3 लोकप्रभा रिव्ह्यू: नटसम्राट
Just Now!
X