12 August 2020

News Flash

लोकप्रभा सिने रिव्ह्यू – ‘उर्फी’

टाइमपासमध्ये प्रथमेश परबची टपोरी भूमिका यशस्वी झाल्यानंतर त्याला तशाच ऑफर येणं एकवेळ समजू शकते.

एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका हिट झाली की मग त्याच साच्यातील ठराविक भूमिकेचा वापर कथानक बसवण्याचा मोह सर्वांनाच होतो. स्वत:चं वेगळेपण दाखवण्यासाठी काही तरी नवीन करायचा प्रयत्न होतो. मात्र त्यात कलात्मकता नसेल तर मग सगळचं बेंगरूळ होऊन जातं. तसंच काहीसं उर्फी या चित्रपटाबद्दल म्हणावे लागेल. टाइमपासमध्ये प्रथमेश परबची टपोरी भूमिका कमालीची यशस्वी झाल्यानंतर त्याला तशाच ऑफर येणं एकवेळ समजू शकते. पण कथानकाचा बाज तसाच दिसू लागला तर मात्र लोकांना कंटाळा येऊ शकतो. कदाचित म्हणूनच उर्फी मध्ये दिग्दर्शकाने चित्रपटाच्या उत्तरार्धात ट्विस्ट आणायचा प्रयत्न केला असावा. पण जसा कथानकातला पूवार्धाचा आधार अतिशोयक्तीपूर्ण आहे, तशीच किंबहुना जरा जास्तीच अतिशोयक्ती उत्तरार्धात दिसून येते. त्यामुळे कथानकाचे हे वळण बटबटीतपणाकडे झुकते. आणि अंतिमत: हाती काहीच लागत नाही.

एका इस्टेट एजंटकडे काम करणारा देवा (प्रथमेश परब) काहीसा टपोरी, पण मनाने चांगला असतो. भाडेकरुंना घर दाखविणे हे त्याचे काम. अशाच एका भाडेकरुच्या मुलीच्या प्रेमात तो पडतो. ठरलेलं लग्न मोडल्यानंतर काहीशी उदास असणारी अमृता (मिताली मयेकर) देवाच्या मोकळ्याढाकळ्या अनौपचारीक वागण्यामुळे हसू लागते. तिची उदासिनता कमी होते. त्यातूनच त्यांची मैत्री वाढते, मैत्रीचं रुपांतर प्रेमात होते. कुंभमेळ्याला देवा, अमृताच्या कुटुंबियांबरोबर जातो. त्याचवेळी एकमेकावरील प्रेमाची कबुली दिली जाते. आणि नेमका त्याचवेळी कुंभमेळ्यातील बॉम्बस्फोटात अमृता गंभीररीत्या जखमी होते. तिच्या या अवस्थेस आपणच जबाबदार आहोत याची देवाला खंत लागून राहते. मग त्याचे परिमार्जन म्हणा किंवा बॉम्बस्फोट करणाऱ्यांचा बदला म्हणून तो अनेक करामती करतो. त्यातूनच चित्रपट पुढे सरकतो.

दिग्दर्शकाने कथानकाला ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याला म्हणावं तितकं यश लाभलं नाही. अशक्यप्राय प्रेमकथा वेगवानपणे पुढे नेली आहे. पण त्याचवेळी अर्थहीन संवाद, विनोद आणि प्रसंगांमुळे त्यातील गांभीर्य हरवून जाते. पूवार्धाची आणि उत्तरार्धाची कसलीही लिंक लागत नाही. त्यातच पूर्वार्धातील उथळ विनोद आता अतिपरिचयाचा झाला आहे. साचेबद्ध झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपटातल्या उणीवा तुलनेनं कमी आहेत. पण ही तांत्रिक सफाई कथानकातील उणिवांना झाकू शकत नाही. त्यातच अतिशय अतर्क्य वाटणा-या अनेक प्रसंगांनी एकंदरीच चित्रपटाची सारी मजा निघून जाते. बॉम्बस्फोट करणा-या अतिरेक्याला पकडल्यानंतर येणा-या राष्ट्रगीताचा कसलाही संदर्भ लागत नाही. गाण्यांमुळे थोडावेळा ठेका पकडावासा वाटतो हीच काय ती जमेची बाजू. केवळ दोन तास डोकं बाजूला ठेवून करमणूक करायची असेल तरच हा चित्रपट पाहावा.

प्रस्तुतकर्ता – एनबीएस एण्टरटेन्मेंट प्रा. लि. आणि ब्रेनवेव्ह प्रोडक्शन
निर्माता: युवराज वर्मा, सरताज मिर्झा, महेलका शेख
सहनिर्मिती: स्वप्ना प्रधान
लेखक आणि दिग्दर्शक: विक्रम प्रधान
संवाद: आशिष पाथरे
संगीतकार: चिनार–महेश
गीत: मंगेश कांगणे, क्षितीज पटवर्धन
छायांकन: प्रदीप खानविलकर
नृत्य दिग्दर्शक: उमेश जाधव
कलाकार – प्रथमेश परब, मिताली मयेकर, कविता लाड, मिलिंद पाठक, उदय सबनीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 7:52 pm

Web Title: urfi marathi movie
Next Stories
1 भरजरी सांगितिक नजराणा
2 रिव्ह्यू : एका लग्नाची प्रॅक्टिकल गोष्ट
3 लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड खोड्यातून सुटण्याची
Just Now!
X