‘‘ओळखा बरं, माझ्या ‘हबीनं’ मला आज काय प्रेझेंट दिलं असेल?’’ मोठय़ा दिमाखात रश्मीनं बर्थ डे पार्टीला आलेल्या मैत्रिणींना प्रश्न विचारला आणि कुणीही  उत्तर देऊ शकणार नाही अशा आविर्भावात पाहू लागली. अनेकींनी अनेक उत्तरं दिली. ती जसं जसं ‘नाही’ म्हणत होती तसा तसा तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान उभारत होता. शेवटी रश्मीनं आत जाऊन पांढऱ्या पैठणीवर लखलखणाऱ्या हिऱ्यांचा सेट घातला. बाहेर आली आणि सर्वासमोर उभी राहिली. मुळात दिसायला देखण्या असलेल्या रश्मीवर तो सेट खुलून दिसत होता.

‘‘वॉव!’’ असा एकत्रित स्वर तिनं ऐकला आणि आजच्या पार्टीचं सार्थक झालेला संतोष देहभर भिरभिरून गेला. ‘माय हबी लव्हज् मी लाइक एनीथिंग’ असं म्हणून तिनं एक गिरकी घेतली आणि प्रत्येक जण प्रेम म्हणजे नेमकं काय, हे सोडून ‘प्रेमा’वर चर्चा करत होती, ऐकण्यासारखं होतं ते!

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
riche class Nariman Point Air India Economy Tata Group
नवश्रीमंत वर्गाचा नवा मंत्र!

त्याचं काय झालं, मी कोल्हापुराहून ताईकडे चार दिवस आले होते. ताईची आज किटी पार्टी होती. मी नको नको म्हणत असतानाही ताईनं जबरदस्तीनं रश्मीकडे नेलं. तशा तिच्या मैत्रिणी मला माहीत आहेत, त्याही मला ओळखतात; पण ते ‘उच्चभ्रू’ समजणारं वातावरण मला आवडत नाही म्हणून जायला कंटाळले होते.  मी पडले हायस्कूलमधली मुख्याध्यापिका. माझं वातावरण ताईपेक्षा खूपच वेगळं; पण आमचं प्रेम मात्र हेवा करण्यासारखं. म्हणून जाणं-येणं भरपूर.

ताईनं सी. एस. केलं आणि बँकेत अधिकारी म्हणून लग्नाआधीच तिची नेमणूक झाली. जिजाजीपण एम.कॉम. आय.सी.डब्ल्यू, तेपण रिझव्‍‌र्ह बँकेत. साहजिकच भोवतालचं वातावरण त्यांना साजेसं होतं. सोसायटीतल्या दोघी बँकेत, एक वकील, तीन डॉक्टर, दोघी बिझनेसवाल्या. वरचेवर किटी पाटर्य़ा करणं कुणालाच कठीण नव्हतं.

तर अशा वातावरणात प्रेमाची चर्चा.. मी आपली डोळय़ासमोर एक कादंबरी ठेवून निवांत चर्चा ऐकत होते. एकूण सगळा भर नवऱ्यानं बायकोला काय दिलं आणि बायकोनं नवऱ्याला काय काय दिलं यावर प्रेम तोललं जात होतं. क्वचितप्रसंगी आजारपणात रजा काढून घरी बसणं, स्वैपाकाचं कौतुक करणं, उत्तम खरेदी करून आणणं यावर प्रेम. त्यातल्या त्या एकीनं विचार मांडला की, प्रेम म्हणजे त्याग.. तुम्ही किती त्याग करता त्यावर तुमचं प्रेम समजतं; पण काही वेळेला त्याग हा अनिच्छेनं केलेला असेल तर त्याला प्रेम म्हणायचे का? देशासाठी केलेला त्याग, घरासाठी केलेला त्याग, मुलासाठी केलेला त्याग हा निश्चितपणे प्रेमात मोडतो; पण पती-पत्नीचं प्रेम म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. जेवणाची वेळ झाली. जेवणाची ऑर्डर बाहेरच दिली होती. जिभेचे चोचले पुरवणारी सारी पक्वान्ने होती. प्रत्येकीनं मनापासून दुवा दिला. हसत हसत आनंदाने सगळय़ा बाहेर पडल्या.

मी आणि ताई दोघी कारमध्ये येऊन बसलो. घरी जायला किमान चाळीस मिनिटं लागणार होती. साडेदहा वाजून गेले. ताईचा ड्रायव्हर शाम, गेली दहा वर्षे तिच्याकडे होता. त्याला जेवायला उशीर होणार म्हणून माझा जीव कासावीस होत होता. त्याला विचारलं, ‘‘शाम, काही खाऊन घेतलंस का? उशीर होणार आहे.’’

‘‘नाही ताई. घरी जाऊन जेवणार. आज शैला गावाहून आली असेल. कितीही उशीर झाला तरी मी तिच्यासाठी थांबणार आहे, एकत्रच जेवू या. असं तिनं सांगितलंय. ताई, आम्ही कधीच एकमेकांना सोडून जेवत नाही.’’

‘‘नशीबवान आहेस बाबा.’’

‘‘खरंच मी नशीबवान आहे. ताई, तुम्हाला सांगतो, शैला माझ्याबरोबर नेहमी शेंगदाण्याचे लाडू, भाजलेले पापड चुरून त्यावर तेल – तिखट – मीठ घालून डब्यात देते. भूक लागली की कुठेही खा. बाहेरचं तळलेलं खाऊ नका म्हणजे आणि या उन्हाळय़ात रात्रभर पाण्याच्या मोठय़ा दोन बाटल्या डीप फ्रीजरला टाकते. सकाळी निघताना दोनचार वर्तमानपत्रांत गुंडाळते आणि देते. संध्याकाळपर्यंतही पाणी छान गार राहातं. इतकी काळजी घेते.’’

‘‘तुम्ही लोक दिवसभरदेखील गाडीवर असता. रात्रीची शांत झोप तुम्हाला नीट हवी आणि नीट खाणंपिणं. मग काळजी नाही. तुझं कौतुक आहे. गेली दहा वर्षे मी तुला बघते आहे.’’

शामशी चाललेल्या माझ्या गप्पा ताईला फारशा खपत नव्हत्या; पण खुपतही नव्हत्या. कदाचित ड्रायव्हरशी सलगी त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये बसत नसावी. म्हणून मी माझी टकळी चालूच ठेवली. माझ्या बोलण्यावर शामही रंगून उत्तरं देत होता. कदाचित गप्पांत वेळ सरतो आणि मीही या समाजाचा एक भाग आहे असंही त्याला वाटत असावं. त्यानं सांगितलं,

‘‘धाकटय़ा ताई, झोपेचा प्रॉब्लेमच नाही. पैसा जास्त असला तर झोप येत नाही माणसाला. माझा तो प्रश्न नाही. घरात शांतता आहे आणि उकाडय़ाच्या दिवसांत माझा ए.सी. चालू असतो. मस्त झोप. सकाळीच जाग!’’

‘‘तू रे कधी ए.सी. घेतलास? स्प्लिट घेतला का?’’

‘‘मोठय़ा ताई, माझ्या ए.सी.चं बिल येत नाही. रात्री दोन खिडक्यांना आणि बाल्कनीच्या दाराला तीन चादरी ओल्या पूर्णपणे करून अगदी थोडय़ा पिळून माझी शैला लावते आणि जोरात पंखा सोडते. मी झोपतो तेव्हा गार पाण्याचा वारा तिन्हीकडून येतो. चादरीपण सकाळपर्यंत वाळतात. एकदा ए.सी. न लावता असं झोपून बघा. मस्त वाटतं. शैलाचं कौतुक आहे. आहे त्यात समाधानी असते. खरं सांगायचं तर, तिनं तिचं असं आयुष्य मला वाहूनच टाकलंय. अरे, बोलता बोलता पाच मिनिटांवर घर आलं ताई!’’

ताई माझ्याकडं बघतच राहिली. मी ताईला म्हटलं, ‘‘ताई, प्रेमाची सोपी व्याख्या या शामनं सर्वाना शिकवली. ‘प्रेम म्हणजे समर्पण!’’’

तुम्ही किती त्याग करता त्यावर तुमचं प्रेम समजतं; पण काही वेळेला त्याग हा अनिच्छेनं केलेला असेल तर त्याला प्रेम म्हणायचे का? पण पती-पत्नीचं प्रेम म्हणजे नेमकं काय?

माधवी घारपुरे response.lokprabha@expressindia.com