महायुती आणि आघाडी तुटल्याने राजकीय पक्षांना फाटाफुटीचे ग्रहण लागले असून भाजप व शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी अनेक नेत्यांकडून प्रयत्न आणि भेटीगाठी सुरू आहेत. माजी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमध्येही काही नेत्यांचे प्रवेश होत असून अनेकांशी चर्चा सुरू आहे. सर्वानाच उमेदवारी दिली जाणार नाही व या नेत्यांचा तसा आग्रहही नसल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, शनिवारी अखेरचा दिवस असून युती व आघाडी फुटल्यानंतर भाजप-शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, मंत्री यांनी वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी व चर्चा केल्या आहेत. सामंत हे शिवसेनेकडून रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. मुलुंड येथील भाजपचे आमदार सरदार तारासिंह यांनी ‘मातोश्री’वरही चर्चा केली. या मतदारसंघातून भाजपकडून मनोज कोटक यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर तारासिंह यांनी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. तारासिंह गेली अनेक वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व आमदार असून ही सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार संजय दीना पाटील हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचे पाटील यांनीच स्पष्ट केले.
मदन भोसले, जयंत ससाणे, भाऊसाहेब वाकचौरे आदी नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असून रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती, असे सूत्रांनी सांगितले. डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील मोठा गट नाराज आहे. ठाणे जिल्ह्य़ात शिवसेना व भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी असून अनेक नेते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. काही नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून ते भाजप किंवा शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात बहुरंगी लढती होणार आहेत व बंडखोरीही बरीच होणार आहे.