साधारणत: दुपारी एक-दीडची वेळ.. काहीशा सुस्तावलेल्या या वेळेत कुणी प्रवासात, कुणी कार्यालयात, कुणी घरी वामकुक्षीच्या तयारीत तर कुणी ‘लंचटाइम’साठी सरसावलेला.. या सुस्त वेळी व्हॉट्सअ‍ॅप हाच काय तो जगाशी जोडणारा आधार! शुक्रवारी मात्र याच वेळी आपले ‘व्हॉट्सअ‍ॅप’च सुरू नसल्याचे लक्षात येताच नेटकरांमध्ये एकच खळबळ उडाली.

असं का झालं, हा सवाल प्रत्येक जण समाजमाध्यमावरून एकमेकांना विचारत होता.. कुठे दहशतवादी हल्ला झाला नव्हता किंवा मोठी नैसर्गिक आपत्तीही कोसळली नव्हती. तरीही मोबाइलमध्ये सेकंदाला दहावेळा ठकठक करणारा व्हॉट्सअ‍ॅप मौनावल्याने जगभर अस्वस्थता पसरली. प्रथम नेटकरांची एकाचवेळी ‘ट्विट्विट’ सुरू झाली आणि काही क्षणात फेसबुकवरही या व्हॉट्सअ‍ॅप मौनाबाबत चर्चा रंगू लागली. प्रथम काळजीच्या स्वरात सुरू झालेल्या या चर्चा विनोदाकडे अलगद वळल्या आणि व्हॉट्सअ‍ॅप सुरू होईपर्यंत म्हणजे दुपारी तीनपर्यंत त्या सुरूच होत्या.

आपला व्हॉट्सअ‍ॅप संपर्क तुटल्याचे समजताच सुरुवातीला अनेकांनी स्वत:च्या मोबाइलमधील नेट जोडणी तपासली. मात्र, सर्व तांत्रिक गोष्टी ठीक आहेत, तरीही मेसेज येत नसल्याचं समजल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरून लोकांनी चौकशा सुरू केल्या. काही वेळानंतर #whatsappdown असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्याचा उलगडा झाला.

पहिली वेळ नव्हे!

व्हॉट्सअ‍ॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ३१ ऑगस्ट, २ व २२ सप्टेंबर रोजीही व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बंद पडली होती. मात्र त्या ‘बंदी’ची माध्यमात चर्चा झाली नाही.

समाज माध्यमावर हास्यधुमारे

व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर ट्विटरवर त्याबाबतचे विनोद व्हायरल होऊ लागले. यामध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्याचा प्रश्न जागतिक तापमानाच्या प्रश्नापेक्षाही मोठा असल्याचे वाटत आहे’.. ‘व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे जोडप्यांमध्ये गैरसमज’.. ‘व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्यामुळे भारतात ५०० हून अधिकजणांचा बळी. कारण दहा जणांना पाठवायला सांगितलेला संदेश पाठवता आला नाही.’ अशा संदेशांचा त्यात समावेश होता.