बहुतांश वेळेला अज्ञात क्रमांकावरून मिस कॉल पडल्यानंतर आपण संबंधित क्रमांकावर परत फोन करतो. पण ही बाब धोकादायक ठरू शकते. कारण मुंबईमधील एका उद्योजकला अर्ध्या रात्री सहा मिस कॉल आल्यानंतर त्याच्या विविध खात्यातून तब्बल १.८६ कोटी रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

१.८६ कोटींचा फटका बसलेल्या मुंबईमधील उद्योगपतीचे नाव व्ही. शाह असे आहे. शाह यांच्या मोबाईलवर २७-२८ डिसेंबरच्या रात्री २ वाजतच्या सुमारास +४४ कोडने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून ६ मिस कॉल पडले होते. हा कोड ब्रिटनचा आहे. झोपेत असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नव्हता. पण सकाळी उठून शाह यांनी आलेल्या क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांना आपलाच क्रमांक बंद झाल्याचे समजले. यानंतर करण्यात आलेल्या तपासात शाह यांच्या तक्रारीवरून क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. पण आपल्या परस्पर हा सर्व प्रकार झाल्यामुळे गोंधळलेल्या शाह यांना काहीच समजत नव्हते. इतकेच नाही तर बँकेत गेल्यानंतर त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. त्यांच्या खात्यांमधून तब्बल १.८६ कोटी रुपये पळविण्यात आल्याचे समोर आले.

जवळपास १४ वेगवेगळया खात्यांमध्ये एकूण २८ ट्रांजेक्शन करत पैसे पाठविण्यात आले होते. बँकेने प्रयत्न करून फक्त २० लाख रूपये परत आणले. यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. २७ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून १५ मिनिंटाच्या सुमारास शाह यांच्या क्रमांकावरून नवीन सीम कार्डसाठी अर्ज करण्यात आला होता. तर रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर सलग सहा मिस कॉल पडले. पूर्ण प्रकरण सीम कार्ड स्वॅपिंगचे आहे.

हॅकर्सला शाह यांच्या बँक खात्यांबाबत एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे माहिती मिळाली असावी. त्याद्वारे त्यांच्या खात्यातून पैस पळविण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण मिस कॉलवर परत फोन करण्याशी संबंधित नाही. कारण शाह हे फोन साइलेंट करून झोपी गेले होते. तरीही अज्ञात क्रमांकावरून येणाऱ्या फोनबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे.