महाराष्ट्राला महान वक्त्यांची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, श्रीपाद अमृत डांगे, नानासाहेब गोरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अलीकडे दिवंगत झालेल्या राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले यांसारख्या वक्त्यांनी महाराष्ट्र गाजवला. ज्येष्ठ वक्त्यांच्या या परंपरेला पुनरुज्जीवन देण्यासाठी  ‘लोकसत्ता’तर्फे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील आठ विभागीय केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सव्वा लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘नाथे’प्रस्तुत या वक्तृत्व स्पर्धेला पृथ्वी एडिफाइस आणि जनकल्याण सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेसाठीचे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी असून १६ जानेवारीपासून राज्यातील आठ केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होणार आहे. महाविद्यालयीन तरुण मुले विविध विषयांवर खूप विचार करत असतात. त्यांना आपली मते व्यक्तही करायची असतात. त्यासाठी सध्या फेसबुक किंवा व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र केवळ मत व्यक्त न करता त्या पलीकडे जाऊन एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करण्याचे कसब वक्त्यांकडे असते. राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये वक्तृत्वाची आवड व कसब असलेले विद्यार्थी आहेत. त्यांना ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे व्यासपीठ मिळणार आहे.    

वक्तृत्व स्पर्धेसाठी संपर्क क्रमांक
*मुंबई- मकरंद पाटील (९८९२५४७२७५),
*ठाणे- विराज काळसेकर (९८२१५५३०३२),
*पुणे- रोहित कुलकर्णी (९८८१२५६०८३),
*नाशिक- वंदन चंद्रात्रे (९४२२२४५०६५),
*औरंगाबाद-समीर कल्याणकर (९९२२४००९७२),
*नागपूर- अनिरुद्ध पांडे (९८२२७२००१४),
*अहमदनगर- बडवे (९९२२४००९८१),
*रत्नागिरी- हेमंतकुमार चोप्रा (९४२२०५२४७६).

मार्गदर्शन, कार्यशाळा
विभागीय अंतिम फेरीच्या वेळी निष्णात वक्त्यांकडून ‘बोलणे’ या कलेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राज्यातील आठ उत्कृष्ट वक्त्यांसाठी १४ फेब्रुवारी रोजी, म्हणजेच महाअंतिम फेरीच्या आदल्या दिवशी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत कॉर्पोरेट वक्तृत्व, राजकीय वक्तृत्व, संभाषण कला, व्हॉइस मॉडय़ुलेशन्स आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेनंतर स्पर्धकांना महाअंतिम फेरीसाठीचे विषय दिले जातील.

स्पर्धेचे स्वरूप
ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर या आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांत घेण्यात येईल. या स्पर्धेची प्राथमिक फेरी संबंधित केंद्रांवर १६ ते २३ जानेवारीदरम्यान पार पडेल. या प्राथमिक फेऱ्यांमधून निवडल्या जाणाऱ्या वक्त्यांची विभागीय अंतिम फेरी २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान होईल. त्यातून निवडण्यात आलेल्या आठ वक्त्यांची स्पर्धा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत महाअंतिम फेरी होईल. या आठ उत्कृष्ट वक्त्यांमधून ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ निवडला जाईल. या स्पर्धेत कोणत्याही महाविद्यालयातून दोन स्पर्धकांचा एक संघ सहभागी होऊ शकतो.
स्पर्धेचे नियम, अटी आणि प्रवेश अर्ज https://loksatta.com/vaktrutvaspardha/ventryform/ येथे उपलब्ध