चंद्रपूरच्या तुलनेत चिपळूण संमेलनात निम्म्यानेच खरेदी
चिपळुणात नुकत्याच भरलेल्या अक्षरनिष्ठांच्या मांदियाळीत वाचनप्रेमींनी तीन दिवसांत दीड कोटी रुपये किंमतीच्या पुस्तकांची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी चंद्रपुरात झालेल्या साहित्य संमेलनात यापेक्षा दुप्पट म्हणजेच तीन कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली होती. त्यामुळे यंदाच्या संमेलनात पुस्तकांना फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे.
 चिपळूणमध्ये झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी  ग्रंथ विक्रेते आणि पुस्तक प्रकाशकांचे एकूण २०४ स्टॉल्स होते. ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी तीन दिवसांत गर्दी होऊनही पुस्तकांची विक्री फारशी झाली नाही. परंतु तरीही तीन दिवसांत सव्वा ते दीड कोटी रुपये किंमतीची पुस्तके विकली गेल्याचे ग्रंथप्रदर्शन समितीचे प्रमुख प्रकाश घायाळकर यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रात मोठय़ा आणि अगदी छोटय़ा गावांमधून गेली काही वर्षे सातत्याने पुस्तक प्रदर्शने आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ या संस्थेचे लक्ष्मण राठीवडेकर यांनी सांगितले की, गेली १७ वर्षे साहित्य संमेलनात आम्ही पुस्तकांचा स्टॉल लावत आहोत. संमेलनातील गर्दीच्या तुलनेत अपेक्षित विक्री झाली नाही. गेल्या वर्षी चंद्रपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनातही जोरदार पुस्तक विक्री झाली होती. तीन दिवसात आमच्या स्टॉलवर सुमारे अडीच ते पावणेतीन लाखांची विक्री झाली. अन्य ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनांच्या तुलनेत मात्र ही विक्री खूपच कमी आहे. ‘ग्रंथाली’चे सुदेश िहगलासपूरकर यांनी मात्र प्रतिसाद आणि विक्रीही चांगली झाली असल्याचा दावा केला. ग्रंथप्रदर्शन आणि विक्रीच्या स्टॉल्स येथील व्यवस्था उत्तम होती. मात्र स्टॉल्सची मांडणी योग्य प्रकारे केली गेली नसल्याने अन्य ग्रंथविक्रेते आणि प्रकाशकांना कदाचित प्रतिसाद मिळाला नसल्याचेही ते म्हणाले.
चिपळुणात का नाही?
चंद्रपूर येथील साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्री दुपटीने झाली होती. चंद्रपूरसारख्या ठिकाणी दर्जेदार साहित्य सहजपणे उपलब्ध होत नसल्याने संमेलनस्थळी पुस्तकविक्रीला जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र, चिपळूण येथील संमेलनाला फारशी गर्दी झाली नाही. मुंबई-पुण्यासारख्या शहरांपासून जवळ असलेल्या चिपळुणात मात्र दर्जेदार साहित्य सहजी उपलब्ध होऊ शकते. असे असतानाही येथे पुस्तकविक्रीला फारसा प्रतिसाद लाभला नाही, हे विशेष.
पुस्तकविक्रीचा आलेख
(किमती रुपयांत)
चिपळूण संमेलन – दीड कोटी चंद्रपूर संमेलन – तीन कोटी
पुणे संमेलन – आठ कोटी
सोलापूर – अडीच कोटी
सांगली व महाबळेश्वर – दोन कोटी