मुंबईत उपनगरीय रेल्वे (लोकल) प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘क्यूआर कोड’ आधारित ई-पास देण्यास विविध तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. अद्याप तब्बल १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांना हा पास मिळालेला नाही.

ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करायची होती.  रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य, पश्चिम रेल्वेने लोकल प्रवास करण्यासाठी २ लाख ९३ हजार ८०४ कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. आतापर्यंत १ लाख ५१ हजार ३३७ जणांना ई-पास देण्यात आले आहेत. मात्र अजूनही १ लाख ३० हजार ४१३ प्रवाशांना पास मिळालेला नाही. तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले आहे. ५,२२८ प्रवाशांनी चुकीच्या पद्धतीने छायाचित्रे लिंकवर पाठवली. तर ६,६८०  पास नोडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच प्रलंबित आहेत.