भायखळा परिसरात करोनाचे थैमान सुरू असताना कोणतीही कल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिल्यामुळे १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

वरळीपाठोपाठ भायखळा परिसरातही मोठय़ा संख्येने नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे ‘ई’ विभाग कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता कार्यालयात येत नसल्यामुळे त्यांना साहाय्यक आयुक्तांनी निलंबित केले. या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दि म्युनिसिपल युनियनने याविरोधात आवाज उठविला आहे. कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करावे, अशी मागणी युनियनने केली आहे.

या संदर्भात साहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही कर्मचारी दुरून येतात. त्यांना सवलतही दिली जाते. पण काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता वा रजेसाठी अर्ज सादर न करताच वारंवार अनुपस्थित राहात आहेत. सध्या करोनाच्या संसर्गासाठी मोठय़ा प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी अनुपस्थित राहात आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. दहा जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी पाच जण कार्यालयात हजर झाले. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.