मुंबई : व्हायग्रा आणि विविध सॉफ्टवेअर विक्रीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी १० जणांना अटक केली.

चार महिन्यांपासून आरोपी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करीत होते. याप्रकरणी पोलिसांनी कॉल सेंटरचा मालक अब्दुल पठाण, कॉल सेंटर लीडर प्रज्वल शेट्टी, हुसेन शेख यांच्यासह अन्य सात जणांना अटक केली.

मालाड पश्चिमला असलेल्या तीन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या परिमंडळ १० ने तीन पथके तयार करून मालाड पश्चिमेकडील एस. व्ही. रस्त्यावरील लोट्स बिझनेस पार्क आणि लिंक रस्त्यावरील पाम स्प्रिंग इमारतीवर एकाच वेळी छापा मारला. लोट्स बिझनेस पार्क येथे वॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (वीओआयपी) प्रणालीद्वारे अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांना व्हायग्रा आणि तत्सम इतर औषधांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी आढळून आले. कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे यांनी तीन मुख्य आरोपींना अटक केली. तर अन्य ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल के ला आहे. दरम्यान, पाम स्प्रिंग इमारतीत छापा मारला असता त्या ठिकाणी गूगल या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून परदेशी नागरिकांना सॉफ्टवेअरची विक्री केल्याचे पोलिसांना आढळून आले.