१ हजार ६४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित
मुंबई : ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (सीएसएमटी) पुनर्विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सीएसएमटी इमारत व परिसराचा पुनर्विकास हा खासगी विकासकांमार्फत केला जाणार असून, प्रकल्पात रुची दाखवणाऱ्या कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव (रिक्वे स्ट फॉर प्रपोजल) मागवण्यात आले होते. त्यासाठी १० आघाडीच्या कंपन्यांनी पुनर्विकासात रुची दाखवली आहे.
जीएमआर इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट, गोदरेज प्रॉपर्टी, ऑबेरॉय रिएलिटी या आघाडीच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. यातून एका कंपनीची लवकरच निवड केली जाणार आहे. सीएसएमटी हे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांपैकी एक असून त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.
या स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनचे वेगळे विभाग करणे, स्थानक अपंगस्नेही करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे, स्थानकाची पुनर्बाधणी आणि डागडुजी करून त्याला सन १९३० सारखे स्वरूप मिळवून देणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत.
‘रेल मॉल’ : सीएसएमटी परिसरात ‘रेल मॉल’ही उभारण्याचा प्रयत्न असेल. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाच्याही सुविधा असतील. ज्या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला जाईल त्या कंपनीला या रेल्वे स्थानकावरील उद्योगांसंदर्भातील देखरेख आणि इतर (कमर्शियल) कारभार ६० वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिला जाईल. या पुनर्विकास प्रकल्पासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2021 2:22 am