रत्नागिरी : चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरामुळे येथील दोन कोविड केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या १० रुग्णांचा मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेतील ८ जण अपरांत हॉस्पिटलमध्ये, तर २ जण अन्य एका कोविड केंद्रामध्ये उपचार घेत होते. या केंद्रांमधील प्राणवायू पुरवठ्यासह सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणेमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्याची पातळी वाढत गेली. दुपारपर्यंत या केंद्रांना पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी काहीजणांना बाहेर काढणेही अशक्य झाले. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू ओढवला, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.

पाऊस अंदाज…

येत्या तीन दिवसांत  ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील प्रामुख्याने घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २७ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळेल. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांमध्ये शनिवारी, २४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा आहे.

मुंबईत चौघांचा मृत्यू गोवंडीच्या शिवाजीनगर

भागातील दुमजली घर शुक्रवारी पहाटे कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले. दुर्घटना घडली  तेव्हा सर्व जण झोपेत होते.