वैमानिक संघटनेची जनहित याचिका

मुंबई : करोनाकाळात सेवा देताना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश देण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी वैमानिकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल के ली आहे. ही मागणी करताना फेब्रुवारी २०२१ पासून आतापर्यंत १३ वैमानिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट’ या संघटनेने या प्रकरणी जनहित याचिका केली आहे. त्यात वैमानिक हे अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वा संसर्ग झालेल्या वैमानिकांना पुरेशी नुकसान भरपाई देण्यात यावी, त्यांना लसीकरणात प्राधान्य द्यावे व करोना काळात सेवा देणाऱ्या वैमानिकांना विमा संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्चपासून ‘वंदे भारत’ या मोहिमेअंतर्गत काही विमान सेवा सुरू असून त्यांचे वैमानिक अविरत सेवा देत आहेत, अन्य देशांत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप भारतात आणत आहेत, करोनाच्या दुसऱ्या लाटेतही औषधांची वाहतूक करत आहेत. ही सेवा देताना बऱ्याच वैमानिकांना करोनाचा संसर्ग झाला असून काहींचा मत्यूही झाला आहे. काहींना करोनातून मुक्त झाल्यानंतर म्युकरमायक्रोसिससारख्या आजाराने कायमस्वरूपी वा तात्पुरते अपंगत्व आणले आहे.

‘इंडियन पायलट गिल्ड’ने केंद्र सरकारला निवेदन सादर करून वैमानिकांना आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तसेच लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली होती. सर्व वैमानिकांसाठी सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी के ली आहे.