सर्व १७ टीबीएम यंत्रे कार्यान्वित

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३चे भुयारीकरणाचे काम करणाऱ्या १७ अजस्र टनल बोअरिंग मशीन (टीबीएम) कार्यान्वित झाल्या आहेत. या प्रकल्पातील शेवटचे ‘तानसा-२’ हे टीबीएम मुंबईत दाखल झाले असून सोमवारी या यंत्राला नेहरू विज्ञान केंद्र येथील मोठय़ा विवरात (लॉन्जिंग शाफ्ट) उतरविण्यात आले. प्रकल्पातील काही टीबीएम यंत्रे पूर्णपणे कार्यान्वित झाली असून काही कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असल्याने भुयारीकरणाच्या कामाला वेग प्राप्त होणार आहे. आजतागायत या प्रकल्पातील १० किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

मेट्रो-३च्या भुयारीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. सर्वप्रथम माहीमच्या नयानगर येथील मोठय़ा विवरात कृष्णा १ आणि २ टीबीएम यंत्रे उतरविण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने कफ परेड, आझाद मैदान, नेहरू विज्ञान केंद्र, विद्यानगरी, मरोळ, आंतराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विवरात टीबीएम यंत्रे उतरवून ती कार्यान्वित करण्यात आली. भुयारीकरणाच्या प्रक्रियेमधील सर्वात शेवटच्या टीबीएम यंत्राला नेहरू विज्ञान केंद्र येथील विवरात उतरविण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ४५ दिवसांच्या जोडणीनंतर प्राथमिक भुयारीकरणाच्या कामाला हे यंत्र सुरुवात करेल. शेवटचे १७वे टीबीएम कार्यान्वित करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने मेट्रो-३ प्रकल्पाच्या निमित्ताने शहरातील भूगर्भात सुरू  असलेल्या भुयारीकरणाच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती मेट्रो-३ चे प्रकल्प संचालक एस.के.गुप्ता यांनी दिली. या ५१ किमीच्या भुयारापैकी आतापर्यंत १० किमीचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १७ टीबीएम यंत्रांपैकी १५ यंत्रांनी भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. तर त्यातील ९ यंत्रांनी मुख्य भुयारीकरणाचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी सर्वप्रथम माहीमच्या नयानगर येथून सोडण्यात आलेल्या कृष्णा-१ यंत्राने २०५० मीटरचे आणि कृष्णा-२ यंत्राने १७२७ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.