४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्टी) येत्या २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी राज्य शासनातर्फे दहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट- असा नट होणे नाही’, ‘सैराट’, ‘हलाल’, ‘कोती’, ‘सहा गुण’, ‘बर्नी’, ‘डबल सीट’, ‘हाफ तिकीट’, ‘दगडी चाळ’ या चित्रपटांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट पाठविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. गेल्यावर्षी पणजी येथे झालेल्या ४६व्या ‘इफ्टी’ महोत्सवात नऊ मराठी चित्रपट पाठविण्यात आले होते. या महोत्सवास आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक निर्माते, दिग्दर्शक उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मराठी चित्रपट पोहोचण्यास मदत झाली. या महोत्सवासाठी २७ चित्रपटांमधून उपरोक्त दहा चित्रपटांची निवड राज्य शासनाने नेमलेल्या एका समितीने केली आहे. मराठी चित्रपटांना एक चांगले व्यासपीठ मिळावे आणि त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली जावी या मुख्य उद्देशाने ‘इफ्टी’ महोत्सवात मराठी चित्रपट पाठविण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे. कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट पाठविण्यात आले होते.