नवीन वर्षांत २६ सदस्यांची मुदत समाप्ती

मुंबई : नवीन वर्षांत विधान परिषदेचे २६ आमदार निवृत्त होत असून, सर्वाधिक १० आमदार राष्ट्रवादीचे आहेत. निवडणुका पार पडल्यावर वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी महाआघाडीचे वर्चस्व राहणार असल्याने विधेयके मंजूर होण्यात सत्ताधाऱ्यांना अडचण येणार नाही. बहुधा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग पत्करतील, अशीच चिन्हे आहेत.

विधान परिषदेतील एकूण ७८ सदस्यांपैकी एकतृतीयांश म्हणजे २६ सदस्य या वर्षांत निवृत्त होतील. यापैकी १२ सदस्य हे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक १० आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेस (७), भाजप (५), शिवसेना (१), पीपल्स रिपब्लिकन (१) तर अपक्ष दोन आमदार निवृत्त होतील. सध्या विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ आमदार आहेत. शिवसेना (१२), राष्ट्रवादी (१४) तर काँग्रेसचे १३ आमदार आहेत. एकतृतीयांश सदस्य निवृत्त झाल्यावर वरिष्ठ सभागृहातील पक्षीय संख्याबळ बदलेल. मात्र सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे बहुमत होईल.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये सध्या राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे पाच तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार आहे. एकूण जागांपैकी प्रत्येकी चार जागा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस वाटून घेतील अथवा शिवसेना व राष्ट्रवादी जास्त जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

नवव्या जागेसाठी चुरस

विधानसभेतून निवडून आलेले नऊ आमदार निवृत्त होत आहेत. यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. विधानसभेतील नव्या संख्याबळानुसार शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल. भाजपचे तीन उमेदवार निवडून येतील. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. भाजपचे संख्याबळ १०५ असून, काही अपक्ष बरोबर आहेत. चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता भाजपला ११ अतिरिक्त मतांची आवश्यकता भासेल. भाजपने जोर लावल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होईल. काँग्रेसकडे १४ अतिरिक्त मते उरतात. काँग्रेसची अतिरिक्त मते आणि छोटे व अपक्षांची मोट बांधल्यास महाआघाडीचा सहावा उमेदवार निवडून येऊ शकतो. गेल्याच आठवडय़ात झालेल्या विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाआघाडी सरकारच्या बाजूने १६९ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे १५४ सदस्य आहेत. याशिवाय १५ अतिरिक्त आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. काँग्रेसचे १४ अतिरिक्त मते आणि ही १५ मते मिळाल्यास महाआघाडीचा सहावा उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु विधान परिषदेकरिता गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मते फुटण्याची भीती सत्ताधारी तसेच विरोधकांनाही असेल.

संख्याबळानुसार महाआघाडीचे पाच तर भाजपचे तीन उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात. खरी चुरस ही नवव्या जागेसाठीच असेल. एखादा आर्थिकदृष्टय़ा सक्षम उमेदवार रिंगणात उतरल्यास चुरस निर्माण होऊ शकते.

पुढील वर्षी पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्येही निवडणूक होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील मतदार नोंदणीचे काम सध्या सुरू आहे. इच्छुकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यावर भर दिला आहे.

निवृत्त होणारे पक्षनिहाय आमदार

* राष्ट्रवादी : विद्या चव्हाण, सतीश चव्हाण, हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर, खाजा बेग, जगन्नाथ शिंदे, प्रकाश गजभिये (रामराव वडकुते व राहुल नार्वेकर यांचा राजीनामा)

* काँग्रेस : अनंत गाडगीळ, हुस्नबानू खलिफे, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड, रामहरी रुपनवार (चंद्रकांत रघुवंशी यांचा राजीनामा)

* भाजप : अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ, अनिल सोले (चंद्रकांत पाटील यांची विधानसभेवर निवड झाल्याने त्यांचे विधान परिषद सदस्यत्व संपुष्टात)

* शिवसेना : नीलम गोऱ्हे

* पीपल्प रिपब्लिकन : जोगेंद्र कवाडे

* अपक्ष : श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत