‘क्रॉसिंग स्थानक’ प्रकल्पांतर्गत समावेश; कामे प्रगतीपथावर

कोकण रेल्वे मार्गावर २०१९ या वर्षांत आणखी दहा स्थानकांची भर पडणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेळ वाचवा, नवीन गाडय़ा सेवेत याव्यात आणि नवीन स्थानके होऊन प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोकण रेल्वेने ‘क्रॉसिंग स्टेशन’ प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पांतर्गत दहा नवीन स्थानके नव्या वर्षांत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या या सर्व स्थानकांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.

कोकण रेल्वेवरून प्रत्यक्षात कोकण आणि त्या मार्गे जाणाऱ्या गाडय़ांची संख्या जास्त आहे. याशिवाय माल वाहतूकही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या दोनच रेल्वे मार्ग असल्याने गर्दीच्या काळात मोठय़ा संख्येने जादा गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतूक कोलमडते. त्यामुळे कोकण प्रवाशांचा मार्ग सुकर करण्यासाठी दुहेरीकरण, विद्युतीकरण याशिवाय क्रॉसिंग स्थानक (एकमेकांना रूळ छेदतात ते ठिकाण)अशी काही प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत.

सध्या रोहा ते वीर दुहेरीकरणाचे काम सुरू असून डिसेंबर २०१९ पर्यंत, तर विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. यातील क्राँसिंग स्थानक प्रकल्पाला सध्या गती दिली जात आहे.

क्रॉसिंग स्थानक प्रकल्प

एखाद्या ठिकाणी रूळ हे एकमेकांना छेदणारे असतील, अशा ठिकाणी दोन लांब पल्ल्याच्या गाडय़ा एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. यामध्ये दोन्ही गाडय़ांचा बराच वेळ वाया जातो. हा वेळ वाचावा, तसेच दोन्ही गाडय़ांना मार्ग मिळावा या दृष्टीने दहा क्रॉसिंग स्थानके बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. जेथे रूळ एकमेकांना छेदतात अशा ठिकाणी नवीन स्थानके उपलब्ध करण्यात येतील. जेणेकरून या स्थानकांवर थांबतानाच तेथून दोन गाडय़ांना जाणे शक्य होईल. सध्या या कामाला गती दिली जात आहे.

दुहेरी मार्गाची दुप्पट क्षमता

कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाची क्षमता दुपटीने वाढवण्यासाठीही सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा एक प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी आहे. या प्रकल्पांतर्गतही २१ नवीन स्थानके येतील. प्रकल्पानुसार कोकण रेल्वेवर टप्प्याटप्यात दुहेरीकरण केले जाईल. त्यानुसार जलद प्रवास होतानाच आणखी काही गाडय़ादेखील चालविणे शक्य होईल.

क्रॉसिंग स्थानक प्रकल्पांतर्गत दहा नवीन स्थानकांची कामे प्रगतिपथावर आहेत. २०१९ मध्ये ही स्थानके प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे.   – एल.के.वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे 

प्रकल्पाचा खर्च

  • या प्रकल्पाचा खर्च २०२ कोटी रुपये आहे.

नवीन स्थानके

  • इंदापूर’ गोरेगाव रोड ’ सापे वामाने
  • कालबनी’ कडवई ’ वेरवली
  • खारेपाटण’ अर्चिणे’ मिरजन’ इनजे.
  • कोकण रेल्वे मार्गावर ६७ स्थानके आहेत. २०१९ मध्ये दहा नवीन स्थानकांची भर पडल्यास ती संख्या ७७ पर्यंत पोहोचेल. भविष्यात तर आणखी २१ स्थानकेही सेवेते येतील.