News Flash

चार वर्षांत तब्बल १० हजार रुग्ण पसार!

उपचारासाठी दाखल झालेले जवळपास १० हजाराहून अधिक रुग्ण बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

जे.जे., केईएम, नायर, शीव रुग्णालयातील प्रकार

डॉक्टर, पाच नंबरच्या बेडवरचा रुग्ण सकाळपासून बेपत्ता आहे, परिचारिकाने सांगताच थोडी शोधाशोध केल्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात रुग्ण पळून गेल्याची तक्रार दाखल केली जाते. अशा घटना शासनाच्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालय, तसेच महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात रोजच घडत असतात. गेल्या चार वर्षांत उपचारासाठी दाखल झालेले जवळपास १० हजाराहून अधिक रुग्ण बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले आहे.

यात महिलांचे प्रमाणही मोठे असून जवळपास एक हजाराहून अधिक महिला रुग्ण या उपचारादरम्यान पळून गेल्या आहेत. यात मेडिसिन आणि शस्त्रक्रिया विभागातून पळून जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. साधारणपणे सकाळी लवकर अथवा सायंकाळी बाथरूममध्ये जाऊन रुग्णालयाने दिलेले कपडे बदलून बहुतेकवेळा रुग्ण पळून जातात.

जे.जे.रुग्णालयाचे सात वर्षे अधिष्ठाता राहिलेले व राज्याचे विद्यमान वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांना रुग्ण पळून जाण्याच्या घटनांविषयी विचारले असता ते म्हणाले, जवळपास ८५ टक्के रुग्ण हे अत्यंत गरीब असल्यामुळे उपचारानंतर जे थोडेसे पैसे भरायचे असतात, ते न भरताच पळून जातात. उर्वरित १५ टक्के प्रकरणात वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये कधी रुग्णांची संगणकीय नोंद करण्याचे राहिल्यामुळे रुग्ण गायब झाल्याचे दिसते तर काही वेळा अन्यत्र उपचार करण्यासाठी रुग्ण निघून जाताना दिसतो.

उपचारासाठी पैसे नसल्याचे कारण

बेपत्ता होणाऱ्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्णांवरील उपचार हे पूर्ण झालेले असतात आणि आता उपचाराची थोडीशीच असलेली रक्कम भरण्यासाठी जवळ पैसे नसल्यामुळे पळून जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. बरेच वेळा उपचारात दिरंगाई होत असल्याच्या भावनेतून ‘डामा’ (अगेन्स्ट द मेडिकल अ‍ॅडव्हाईस) रुग्ण निघून जातात. काही प्रकरणात घरची आठवण येणे तर काहीवेळा शस्त्रक्रियेच्या भीतीपोटीही रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडतात असे या चारही रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. जे.जे. रुग्णालयातून पळून जाणाऱ्यांचे प्रमाण हे मोठे असून गेल्या चार वर्षांंत चार हजार रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून दिवसाला किमान एखादा रुग्ण तरी गायब म्हणजेच पळून जात असतो. महापालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयातून गेल्या चार वर्षांत सुमारे सहा हजार रुग्ण पळून गेले आहेत. पळून जाणाऱ्या रुग्णांची कारणे वेगवेगळी असतात. बरेच वेळा उपचार झाल्यानंतर जसे रुग्ण निघून जातात तसेच अन्यत्र खासगी रुग्णालयात उपचार घेण्याच्या मानसिकतेमधून आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करून निघून जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.  

      -डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:43 am

Web Title: 10 thousand patients abscond in 4 years from government hospital
Next Stories
1 लेखापरीक्षकांकडून दोन वर्षांपूर्वीच इशारा
2 पीएनबी घोटाळा : गोकुळनाथ शेट्टींसह तिघांना अटक
3 ‘सूर्यावर थुंकू नका थुंकी तुमच्याच तोंडावर’ शिवसेना आणि भाजपामध्ये ‘ट्विटरवॉर’
Just Now!
X