मुंबईत १० हजार चौरस फूट क्षेत्रावर विशेष कलादालन; देशभरातील २०० कलाकार सहभागी
कलाकारांना व्यासपीठ मिळावं म्हणून अनेक ठिकाणी कलादालने सुरू करण्यात आली आहेत, मात्र कलाकार या कलादालनापर्यंत पोहोचू शकत नाही, ही सद्य:परिस्थिती आहे. देशातील ग्रामीण भागातील कलाकारांना मुंबईत येऊन आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी येत्या १४ मे रोजी १० हजार चौरस फूट क्षेत्रावर आर्ट हब नावाचे एक विशेष कलादालन भरविण्यात आले आहे. दिल्ली, कोलकाता, चंदिगढ, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ, महाराष्ट्र आणि जयपूर अशा विविध भागांतील सुमारे २०० कलाकार या दालनात सहभागी झाले आहे. या जागेला ‘आर्ट हब’ हे नाव देण्यात आले असून येथे एकाच ठिकाणी ८ ते १० कलादालने, ३ कला एन्क्लोजर, दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरणे, हवामान नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या कला हबच्या माध्यमातून उदयोन्मुख चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकलाकार, प्रिंटमेकर अशा कला क्षेत्रातील संबंधित कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
हे जगातील सर्वात मोठे कलादालन भरविण्यात आले असून यामुळे नवीन कलाकारांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या भागातील जिज्ञासू आणि मनस्वी कलाकारांची निवड या दालनासाठी करण्यात आली आहे. कलाकाराला आपली कला जनतेसमोर आणण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत कला जिंवत राहू शकत नाही. त्यामुळे या दालनामध्ये कलाकारांना आपले कलाविष्कार दाखविण्याची आणि विकण्याचीही संधी मिळणार आहे. या दालनात ४० टक्के ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळणार आहे.
त्याचबरोबर देशातील कलाकारांना पाश्चात्त्य कलाविष्कार पाहण्यास मिळावे यासाठी ७ ते ८ पाश्चात्त्य कलाकार या दालनामध्ये आपली कला सादर करतील, असे ‘द आर्ट हब’चे रवींद्र मार्डिया यांनी सांगितले. हे कलादालन वरळी येथील ‘द आर्ट हब’, अट्रिआ मॉल येथे १४ ते २२ मे दरम्यान भरविण्यात आले आहे.

देशातील पारंपरिक चित्रकलेला व्यासपीठ
वारली कला ही महाराष्ट्रातील पारंपरिक बाजू उलगडणारी आहे. आदिवासी व ग्रामीण भागांमध्ये घरांच्या भिंतीवर ही कला रेखाटलेली पाहायला मिळते. मध्य प्रदेशातील गौंड या चित्रकलेमध्ये प्राणी आणि माणसांचे चित्र साकारले जाते तर, ओरिसाच्या पतचित्र या कलेमध्ये देवदेवतांचे रंगीबेरंगी चित्र काढले जाते. राजस्थानमध्ये मिनीएचर या चित्रकलेमध्ये बारीक ब्रशच्या माध्यमातून मुघलांचा दरबार, राधा-कृष्ण साकारले जातात. या सर्व कला या ग्रामीण भागातील पारंपरिक कला आहे. मात्र या कला हबच्या निमित्ताने देशभरातील पारंपरिक कला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

कलेच्या प्रसिद्धीसाठी सरकार अपयशी
कला ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे, मात्र केंद्र सरकार भारतीय कलेच्या पुढाकारासाठी प्रयत्न करीत नाही. त्यामुळे कलाकारांना आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नोकरी करावी लागते. परदेशामध्ये कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन योजना राबविते. मात्र भारतात कला जिंवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.