गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील चिखलवाडी पालिका शाळा क्र. ३ ची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक दहा वर्षांचा मुलगा ठार, तर अन्य तिघे जखमी झाले. जखमीपैकी आठ वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी दोघांना शताब्दी गोवंडी, तर एकाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोडकळीस आलेल्या चिखलवाडी पालिका शाळा क्र. ३ च्या इमारतीचा सध्या पुनर्विकास करण्यात येत आहे. सध्या शाळा इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. मात्र शाळेभोवतीची संरक्षक भिंत जैसे थे ठेवण्यात आली आहे. धोकादायक अवस्थेत असलेली ही संरक्षक भिंत मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास कोसळली आणि जवळून जात असलेले चौघे त्यात गंभीर जखमी झाले. चौघांपैकी आझम (१०), मासूम अहमद (२५) आणि अली हसन (४) या तिघांना शताब्दी गोवंडी रुग्णालयात, तर अहमद राशीद (८) याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.