मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ा बचाव केंद्रातील ‘भंडारा’ नावाच्या दहा वर्षांच्या बिबटय़ाचा सोमवारी (१७ सप्टेंबर) रात्री ११च्या सुमारास मृत्यू झाला.

राष्ट्रीय उद्यानातील सूरज या दहा महिन्यांच्या बिबटय़ाच्या बछडय़ाचा मृत्यू ११ सप्टेंबरला झाला होता. सूरजबरोबरच भंडारा बिबटय़ाची प्रकृती गेल्या आठवडय़ापासून ढासळली होती. अन्नविषबाधेमुळे या दोन्ही बिबटय़ांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिबटय़ांच्या मृत्यूमुळे जाग आलेल्या राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने मंगळवारी बिबटय़ा बचाव केंद्रासह व्याघ्र-सिंह सफारीच्या अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तसेच बिबटय़ांच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अन्नातून विषारी पदार्थ पोटात गेल्याने ११ सप्टेंबर रोजी उद्यानातील अनेक बिबटय़ांना त्रास सुरू झाला होता. त्यातील काही बिबटय़ांनी उलटी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र भंडारा बिबटय़ा आठवडाभर गंभीर आजारी होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. डॉ. पेठे म्हणाले, दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरच्या सकाळपासून ‘भंडारा’ची प्रकृती खालावली होती. त्याचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून लवकरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

उद्यानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि ‘भंडारा’चा मृत्यू विषबाधेमुळेच झाला आहे. या घटनेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. अन्नाद्वारे एखादा विषारी पदार्थ दोघांच्या पोटात गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यात अधिकाऱ्यांमधील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या खासगी चौकशीबरोबरच त्यांच्या मोबाइलवरील कॉल रेकॉर्डही तपासण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. बिबटय़ांना दिलेल्या बैलाच्या मांसामध्येच विषारी पदार्थ असल्याच्या शक्यता असल्याने त्या दृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी साहाय्यक वनसरंक्षक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन बिबटय़ांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाला धक्का बसला आहे. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यासाठी बिबटय़ा बचाव केंद्रासह व्याघ्र-सिंह सफारीत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

– अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक- संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान