मुंबईसह राज्यात विविध भागांत केबल सेवेसाठी आज ग्राहकांना दरमाह ३०० ते ३५० रुपये मोजावे लागतात. याशिवाय काही ठिकाणी अतिरिक्त वाहिन्यांचे पैसे आकारुन ही रक्कम ५०० रुपयांच्या घरात जाते. मात्र दूरसंचार नियमन प्राधिकरण(ट्राय)ने ग्राहकांना १०० ‘फ्री टू एअर’ वाहिन्या अवघ्या १३० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याच प्रस्ताव आणला आहे. त्यानंतरही ग्राहकाला पैसे भरून काही वाहिन्या हव्या असतील तर त्याचे पाहिजे त्या वाहिनीचे पैसे भरावे आणि त्या पाहाव्या अशी सूचनाही या प्रस्तावात करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना कर आकारून केबल सुविधा दरमाह २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे.

ग्राहकांना त्यांना पाहिजे ती वाहिनी निवडण्याचा अधिकार देण्यात आला असला तरी अनेक वाहिन्या त्यांच्या सर्वच वाहिन्या केबल चालकांना दरमाह एक विशष्ट रक्कम आकारून घ्यायला लावतात. त्यानुसार केबलचालक त्या वाहिन्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. यामुळे अनेकदा ग्राहकांना त्यांना नको असलेल्या वाहिन्या घ्याव्या लागतात. ग्राहकांना या जाचातून मुक्त करण्यासाठी ट्रायने पुढाकर घेतला असून त्या संदर्भातील एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावार संबंधितांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.

या सूचना मिळाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार सध्या उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी १०० एसडी ‘फ्री टू एअर’ अर्थात मोफत वाहिन्या ग्राहकांना अवघ्या ८० रुपयांत उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी कंपन्यांनी २५ वाहिन्यांचा एक संच २० रुपयांत उपलब्ध करून द्यायचा आहे. यातील किती व कोणते संच घ्यायचे हा निर्णय ग्राहक घेऊ शकणार आहेत.

यावर ग्राहक व्यवस्थापन, बिलिंग, तक्ररी निवारण, कॉल सेंटर्स आदी सुविधांचे ५० रुपये असे मिळून ग्राहकांना केवळ ‘फ्री टू एअर’ वाहिन्यांसाठी जास्तीत जास्त १३० रुपये आकारण्याची सूचना करण्यात आली आहे.

यावर जर ग्राहकांना पैसे आकारले जाणाऱ्या वाहिन्या हव्या असतील तर ग्राहक त्याचे दर भरून पाहिजे त्या वाहिन्या घेता येण्याची मुभा देण्यात यावी अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली आहे.

ट्रायने सादर केलेल्या या प्रस्तावाचे आम्ही स्वागत करत असून याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होणार असल्याचे महाराट्र केबल ऑपर्रेटर फाऊंडेशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी स्पष्ट केले. असे झाल्याने वाहिन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार असून ग्राहकांना नाहक घ्यावे लागणाऱ्या वाहिन्यांपासून मुक्ताता मिळणार आहे. याचबरोबर असा निर्णय झाल्यावर जास्त प्रेक्षक मिळावे या उद्देशाने कंपन्या त्यांच्या जास्तीत जास्त वाहिन्या मोफत करण्याची शक्यता असल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

एचडी वाहिन्यांचीही मुभा

जर कंपनी मोफत एचडी वाहिनी देत असेल तर ग्राहकाला १३० रुपयांमध्ये ९८ वाहिन्या मिळणार आहेत. एक एचडी वाहिनी ही दोन एसडी वाहिन्यांच्या बरोबरीची मानली जाते. यामुळे एचडी वाहिन्यांच्या पॅकमध्ये १०० ऐवजी ९८ वाहिन्या मिळणार असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.